१०० टक्के मराठी..

Submitted by यशू वर्तोस्की on 12 January, 2018 - 09:38

पुलंनी मुंबईकर पुणेकर नागपूरकर मधे मराठी माणसांच्या गमतीजमती सांगून आपल्याला पोट दुखेपर्यंत बसवलं. पण मुंबई पूणे नागपूर ही झाली शहरांची नावं पण मराठी माणसाचं काय? मध्यंतरी शिवसेनेने ' मी मराठी ' नावाचं मिशन राबवले होतं. राज ठाकरेंनी नवनिर्माण सेना भुमीपुत्रांचे लढे वगैरे चालवत असते. पण त्यापलिकडे ही एक दुर्लक्षित कॅटेगरी आहे ही मराठी असूनही मराठीपणाला वंचित राहीलेली आहे.

आता तुम्ही म्हणाल याचं काय प्रयोजन? खरं तर काही नाही पण तरीही एक सत्य मला अचानक डसलं त्याचा उहापोह.. दुसरं काही नाही. काल दिवसभर इंटिरियर शूट केलं. तशी खूप मजा येते पण दोन साईट्स असल्याने सामानाची हलवाहालव करायला बँक आँफिसमधून एक तरूण मुलगा बोलावला होता. वय साधारण वीस बावीस तरतरीत पण कमी बोलणारा. कदाचित या गुणामुळेच त्याला ही नोकरी मिळाली असावी.

आपल्या मराठी माणसांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण परक्या माणसाशी हिंदीत बोलतो. कदाचित ही कामं मराठी माणसं करत नसल्याने ह्या कँटँगरीत फक्त भैय्ये असतात हा एक पुरातन आणि बहुतेकदा खरा ठरणारा अनूभव. आम्ही त्याला " अरे ये उठाओ, इधर रख्खो " वगैरे चालू केलं. मला मुलगा खूप गप्प गप्प होता ते बोचत होतं. मधल्या मोकळ्या वेळेत मी त्याला बोलता करायचा प्रयत्न केला.
" तू मराठी की यूपी कडचा ? " माझ्या प्रश्नावर तो थोडावेळ गप्प होता.
" यूपीकडचा नाही ".
" अरे वा मग... मराठीच आहेस ना? "
" मराठी नाही " तो पुटपुटला.
" मराठी नाही मग कोण? "
" मी माँमेडियन आहे " त्याच्या उत्तराने मी चमकलोच.
" अरे माँमेडियन आहेस ते ठिक आहे, पण तुझं गांव कुठलं? "
" नगरच्या जवळ आहे " तो खालच्या आवाजात बोलला.
" मुळचा नगरचा की युपी बिहारहून आलात? "
" मुळचा नगरचा... पंचवीस पिढ्या नगरला आहोत. मुळ गांव नगरच " एव्हाना त्याच्या हिंदीला नगरचा मराठी लहेजा यायला लागला.
" आता ठाण्यात कसा? "
" आजोबा वडील ठाण्यात आले. " या बाब्याचे जन्म , शिक्षण सर्व ठाण्यात झालेलं.
" अरे मग तुझा धर्म मुस्लिम आहे पण तु मराठी आहेस " त्याला फार पटलेलं नव्हतं.
" बरं तुझ्या घरात तुम्ही हिंदी बोलता? " आता मी त्याची शाळा घ्यायच्या मूडमध्ये आलो होतो.
" नाही मराठी बोलतो"
" आई आजी बुरखा घालतात, आजोबा वडील कोणी तशा टोप्या करता पायजमा वापरतात? " उत्तर नकारार्थीच असणार होतं, कारण मी नगरला वावरलेलो आहे. चांदबीबी का महाल वगैरे असलं तरी नगर मधे हिंदू मुस्लिम वेगळे ओळखताही येत नाहीत. भाषा ,पेहेराव , डोक्यावर गांधीटोपी सगळं टिपिकल नगरचं असतं.

मग मी थोडा वेळ काढून त्याला समजावलं की तू १०० टक्के बावन्नकशी मराठीच आहेस. धर्म वेगळे पण मराठीपण वेगळं. त्याच्या चेहेर्यावर चमक आली.

माझं काम निट पार पडलं पण डोक्यात तोच विचार की फक्त महाराष्ट्रियन हिंदू नाव असलेलाच माणूस मराठी असतो. मग या अशा माणसांचं काय ज्यांची ओळख फक्त मुस्लिम अशी आहे. ठाण्यात राहणाऱ्या साक्षर मुलाला असं वाटतंय तर बाकी एक दोन पिढ्यांपासून महाराष्ट्रात जन्मलेल्या युपीकडच्या मुलांना काय वाटत असेल.? हे लोक मराठी फर्ड बोलतात. छटपूजेपेक्षा गणपती दहीहंडी यामध्ये जास्त रमतात . त्यांच्या वाडवडीलांचे ठिक आहे पण यांचे कुठले धागे तिकडे असतील? आपण सुट्टीत फिरायला जातो तसे दोनतीन वर्षांतून दहा दिवस गावाला जाऊन काय होतं.

आपल्यालाच मराठीपणाची सीमा जरा वाढवायला हवी. कारण ही सगळी मंडळी कळत नकळत आपल्या मराठी मुलखाच्या वैभवात उभारणीत आपापला वाटा उचलत असतात. हे १०० टक्के मराठी आहेत असं मला वाटतं

Group content visibility: 
Use group defaults

हे देखील मस्त...
अवांतर - तुमचा लिहिण्याचा स्पीड माझ्या वाचण्याच्या स्पीड पेक्ष्या जास्त आहे. 1 लेख वाचेपर्यंत 2 नवीन लेख आलेले असतात .. ☺️

मराठी लोकांचे धर्मांतर होते. काही मुस्लिम बनतात तर काही ख्रिश्चन.
लेख छान
>>> परत तेच... अहो मराठी हा धर्म नाही आहे..

एकदा मला एक व्यक्ती भेटली, आडनावापुढे कर जोडलेले होते आणि गाव बार्शीजवळ, अगदी १००% मराठी, पण धर्म जैन. असे असू शकते.

तसेच माझा एक मित्र आहे जगमोहन सिंग म्हणून. शीख आहे. त्याला सर्वजण १००% पंजाबी समजतात. पण तो खरं तर राजस्थानी आहे. तो पण तेच म्हणला, की त्याचा धर्म शीख आहे, पण म्हणून तो काही पंजाबीच असला पाहिजे असं नाही!

>>मराठी ही जात आहे.हिंदु हा धरम आहे. भारतातले मुसलमान,खीशचन पण हिंदुच असतात.
अरे बापरे, हा धागा आता १००० क्रॉस करेल की काय ? Uhoh
सीमा२७६, ये आपने क्या कर दिया ? Sad

मराठी जात नाही हो... मराठा जात असते.
मराठी एक समुदाय आहे.. त्यात हिंदू, मुस्लिम, जैन,शीख,ख्रिश्चन कोणीही असू शकते.