बाबुडी- ५ : जावे त्याच्या वंशा ..

Submitted by यशू वर्तोस्की on 11 January, 2018 - 21:20

धंदा करणं वरवर जरी सोपं वाटत असलं तरी गल्य्यावर बसणारी डोकी काही वेगळीच असतात असं कोणी तरी म्हणून ठेवलं आहे . प्रवीणभाई देसाई बँकेचे जुने कस्टमर .तळ्यावरच्या सकाळचा कंपू त्यांच्या पुढाकाराने सुरु झाला होता . देसाईच नाही तर अनेक क्षेत्रात मर्दुमकी गाजवणारे सिनियर सिटीझन्स या कंपूत होते . देसाईंच्या ओळखीने बाबुराव या कंपूत आले आणि पंधरा दिवसातच एकदम लाईफ मेम्बर होऊन गेले होते . प्रवीणभाईंना थोडा रक्तदाबाचा त्रास होता पण काल जरा अस्वथ वाटू लागल्याने त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे चक्कर मारली . डॉक्टरांनी त्यांना काही टेस्ट करून घायचा सल्ला दिला आणि त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ ची अपॉइंटमेंट ठरली होती. तसा धंद्याच्या गडबडीचा काळ म्हणून सुट्टी घेणं त्यांच्या जीवावर आलं होतं . प्रवीणभाई अँड सन्स हे बाबुरावांच्या बँकेचं तिच्या फाउंडेशन डे पासूनचे कस्टमर . आधी कपड्याच्या व्यापारात असणारं देसाई कुटुंब , पुढे जस रेडिमेड कपड्यांचा दौर सुरु झाला तसं गारमेंट्स आणि टेलरिंगच्या व्यवसायाकडे वळलं . देसाई अँड सन्सची दोन कापड दुकानं , एक रेडिमेड गारमेंट्स , इनरवेअर्स आणि कपडे भाड्याने देण्याचं अशी चार पाच शाखा होत्या . शिवाय मोठा गोडाऊन होतं.

तळ्यावर संध्याकाळी प्रवीणभाईच्या उसळत्या रक्ताचीच चर्चा होती . जरा धावपळीचा सिझन असल्याने अर्धा दिवस दुकानात गल्ल्यावर बसायला कोणीतरी भरोश्याचा माणूस हवा होता . प्रवीणभाईंचा पुतण्या दुपारी तीन वाजेपर्यंत येणार होता म्हणजे सकाळी १० ते दुपारी तीन एव्हढाच प्रश्न होता . गल्य्यावर बसायचं म्हणजे कॅश हाताळायची सवय हवी म्हणून बाबुरावांनी आपण होऊन मदत देऊ केली . तशी हाताखाली एकदोन सेल्स गर्ल्स आणि वरकामाला प्युन होताच म्हणून बाबुरावही तसे निश्चिन्त होते . प्रवीणभाईंनी पुन्हा पुन्हा " डिंगणकर साहेब तुम्हाला नक्की जमेल ना ? " असं विचारल्यावर बाबुरावांनी " अहो देसाईसाहेब हे केस काही उन्हात पांढरे झाले नाहीयेत , आयुष्य कॅश सांभाळण्यात गेलं आमचं . तुम्ही निश्चिन्त राहा ,अर्धा दिवसच काय मी महिनाभर गल्ला सांभाळीन . " असं भरघोस आश्वासन दिल्यावर मनातली धाकधूक तशीच ठेवून त्यांनी होकार भरला .
आपला नवरा कामावर जातोय म्हंटल्यावर सुनीताबाईंना खूप गंमत वाटत होती . खूप दिवसांनी डबा पाण्याची बाटली वगैरे घेऊन नऊच्या ठोक्याला बाबुरावांनी ऍक्टिव्हाला स्टार्टर मारला . दुकानातल्या सर्वांना आधीच सूचना दिल्या असल्याने सर्वजणांनी बाबुरावांचं जोरदार स्वागत केलं . चहा झाला आणि बाबुराव काउंटरच्या मागे स्थानापन्न झाले . मालाची बिल बनवायची आणि कॅश सांभाळायची म्हणजे बाये हात का खेल . साडे दहा पासून दुकानाबाहेर गर्दी व्हाल लागली . उपवन फेस्टिवल मध्ये भाग घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी भाड्याचे ड्रेस घेण्याकरता दुकानात जमायला सुरुवात केली . ती गर्दी पाहून बाबुरावांना बँकेच्या सकाळच्या रशअवर्सची आठवण झाली . कॉम्पुटरचं युग आलं तरी देसाईंच्या या दुकानात जास्त आयटम्स असल्याने बिलं बनवणं अजूनही मॅन्युअल होतं . अर्ध्या तासांतच बाबुरावांना अंदाज यायला लागला . ड्रेस भाड्याने घ्यायला आलेल्या बायकांनी काउंटरसमोर एकाच झुम्मड उडवली होती . भाड्यानं कपडे देणं हा बराच गुंतागुंतीचा प्रकार असतो . साईज , टाईप बघून अचूक मापाचे कपडे काढून त्याची लिस्ट करणे . कपड्याची कन्डिशन तपासून घेणे , बरोबरीच्या ऍक्सेसरीज ची यादी बनवणे हे म्हणजे मोठं कठीण काम होतं . बाबुरावांचा कामाचा स्पीड हा नॅशनलाईज बँकेच्या सिनियर एम्प्लॉयीला साजेसा असल्याने आता काउंटरसमोरची रांग दुकानाच्या पायऱ्या ओलांडून पार दोनतीन दुकानं पलीकडे गेली होती .

" अहो काका जरा माझा ब्लाउज काढाना लवकर " या वाक्याने बाबुरावांनी दचकून वर पाहिलं . समोर एक बाई हातात रंगीत साडी घेऊन समोरच्या रॅक मधल्या मॅचिंग ब्लाउजच्या ढिगाऱ्याकडे पाहून जोरजोरात हातवारे करत होती . टिपिकल गुजराथी दुकानात असतात तसे याही दुकानात सेल्समनची संख्या आवश्यकतेपेक्षा कमीच असल्याने ते मान कापलेल्या मुरारबाजीप्रमाणे दोन्ही हातांमध्ये विविध वस्तू गोळा करून काउंटरच्या दिशेने सरकवत होते . हळू हळू काउंटरच्या समोर वस्तू आणि कपड्यांचा ढिगारा जमू लागला . नेहेमीचा अनुभव असणाऱ्या लोकांमध्ये एक असंतोषाचा वारा वाहू लागला .
" अहो काका जरा हात चालवा ना लवकर. माझी साडी पटकन काढून घ्या " आता या वाक्यावर काय करायचं ते एव्हाना बाबुरावांच्या लक्षात आलेलं असावं कारण समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्याकडे न पाहता त्यांनी हाताच्या दिशेने पाहत साडीचं बंडल ओढून घेतलं आणि बिल बनवलं . दुकानातल्या गर्दीला हळूहळू मोर्च्याच स्वरूप यायला लागलं होतं . काही नेहेमीची इलाईट गिर्हाईकं सेल्सगर्ल्स बरोबर नेहेमीची घसट असल्याने लांबूनच हातातल्या वस्तू त्याच्या दिशेने टाकून आपल्याला हव्या त्या साईजच्या आणि टाईपच्या कपड्याची सोय करून घेत होत्या .
" ऑफिसला चालल्ये पॅक करून ठेव घरी जातांना कॉलेक्ट करते ." असं म्हणून हात दाखवून आपापल्या आलिशान कार्स मध्ये बसून जाताना पाहून एक तासापासून रांगेत उभ्या असणाऱ्या बाकी तमाम जनतेच्या असंतोषाला आता हळूहळू आवाज फुटायला लागला .
" तुझी सासू लागते का ग ती ? आम्ही इथे सकाळपासून उपाशी उभे आहोत ते काय आम्हाला कामधंदे नाहीत म्हणून असं वाटलं का तुम्हाला " हे वाक्य जरी सेल्सगर्लला उद्देशून असलं तरी रोख बाबुरावांच्या दिशेने होता .
एकंदर परिस्थिती पाहून मग माणिक प्युन बाबुरावांच्या मदतीला धावला . बिलं बनवायचं काम जरा वेगाने व्हायला लागलं बाहेरची रांग लहान व्हायचं नाव घेत नव्हती . ' इतकी अर्जन्सी होती तर मग दोन दिवस आधी यायचं होतं ना ' असं बोलण्याचं त्याच्या मनात आलं पण भाड्याच्या पैशाचाही प्रश्न होताच म्हणून त्यांनी ते मनातल्या मनात गिळलं. पण एकंदर आजचा दिवस बाबुरावांचं नशीब जरा कमजोर पडलं असावं कारण तेवढ्यात इनरवेअर्सची नवी कन्साईन्टमेन्ट आल्याची बातमी आली , ते काम जास्त जोखमीचं म्हणून बाबुराव काउंटर माणिकच्या हवाले करून आतल्या बाजूला गेले . कंपनीच्या सेल्समनने बॉक्सेस उघडून आतला ‘माल ‘ चेकिंग करता बाबुरावांच्या समोर ठेवायला सुरुवात केली आणि बाबुरावांच्या अंगाला कापरं भरल्यासारखं झालं . समोर असलेल्या आयटम्सच्या बाबतीत ते अनभिज्ञ नसले तरी इतके एकावेळेस म्हणजे ...... . त्यांनी ठीक आहे म्हणून ते बाजूला सारायचा प्रयत्न केला पण कंपनीचा माणूस बराच तयार असावा .
" अरे सेठ .... तुम्ही नविन माणूस दिसते . असा ठीक आहे बोलून चालत नाय . समदा मटेरियल चेक करावा लागतो . नायतर नंतर प्रॉब्लेम झाला अंतर आमचा पेमेंट अटकेल ना " असा म्हणून त्याने प्रत्येक गोष्ट हातात घेऊन त्याची साईज , इलॅस्टिक , त्याचा आकार , त्याच्यातल्या खुब्या , क्वालिटी टेस्ट वगैरे गोष्टीचं प्रात्यक्षिक सुरु केलं . वस्तू हाताळताना बाबुरावांच्या हाताला कंप सुटला होता . जवळपास एक तास ते सर्व ' टेस्टिंग ‘ पार करून डिलेव्हरी चलनावर सही शिक्का घेऊन तो माणूस आल्या मार्गाने परत गेला . बाबुरावांची हालत बरीच नाजूक झाली होती , घटाघटा बाटलीभर पाणी प्यायल्यावर त्याच्या जिवंत जीव आला . दुपारचे दोन वाजायला आले होते पण बाहेरची गर्दी हटायला तयार नव्हती . आतातर एकाच प्रकारचे ड्रेस हवे असणाऱ्या दोन गटांमध्ये शाब्दिक चकमकी संपून एकमेकांच्या झिंज्या ओढण्याचा अध्याय सुरु होतो की काय अशी वेळ आली होती . बाबुरावांच्या पायातलं त्राणच संपलं होतं . बँकेत राश अवरला गर्दी असायची पण इथे तर जत्रा जमली होती . त्याच्या बोलण्याचा गोंधळ राजकीय सभेच्या आवाजाच्या डेसिबल्सचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारा होता . त्या आवाजाने त्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता . एकंदर परिस्थितीची माहिती दुसऱ्या दुकानात पोहोचली असावी कारण प्रवीणभाईंचा पुतण्या परेश लगबगीने दुकानाच्या पायऱ्या चढून दुकानात शिरला . तो काउंटरवर बसताच क्षणी कामांना एकदम गती आली . गर्दी जरा ओसरल्यावर बाबुराव परेशच्या मागे उभे राहून त्याचं काम पाहत होते . परेशचा हात , तोंड अविरत चालू होतं आणि डोकं तर कॉम्प्युटरच्या वेगाने आकडेमोड करून अचूक बिलाचा आकडा काढत होतं .
" मी गेलं तर चालेल का ? " हा प्रश्न विचारताना बाबुरावांच्या स्वरात एकाचवेळी सुटका , निराशा , अचंबा आणि आदर याचं मिश्रण होतं .
" हां हां कोई वांदो नथी , हूं सांभळू छू , जय श्री क्रिश्ना " हे वाक्य बाबुरावांकडे नजरही न वळवता आलं होतं . दुकानाबाहेर पडतांना आता त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं .
ऍक्टिव्हा चालू करून बाबुराव तळ्याच्या दिशेने सुटले . तळ्याभोवतीच्या कट्ट्यावर बसल्यावर त्यांना एकदम शांत शांत वाटू लागलं . बरोबर आणलेला डबा त्यांनी निरिच्छपणे सावकाश संपवला . तसेच अर्धा तास ते तिथेच होते. दुपारी चारच्या सुमारास घराची बेल वाजल्यावर सुनीताबाई उत्साहाने दरवाज्याकडे धावल्या . नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा थकलेला नूर पाहून त्यांना फार बोलावसं वाटलं नाही . हातातली पिशवी त्यांच्या स्वाधीन करून बाबुरावांनी बेडवर अंग झोकून दिलं . त्यानंतर थेट संध्याकाळी सात वाजता त्यांना जाग आली . चहाचा कप हातात देताना सुनीताबाईंनी सूचक प्रश्न विचारले आणि बाबुरावांनी जमतील तशी उत्तरं दिली अर्थात बराचसा तपशील वगळून. त्या दिवशी संध्याकाळचा तळ्यावर जायचा नेम त्यांनी मोडला आणि टीव्हीसमोर चॅनेल्स बदलत वेळ काढला .

दुसऱ्या दिवशी सकाळी तळ्यावर कंपूत त्यांचं जोरदार स्वागत झालं . बाबुराव तसे उशिरा पोहोचले होते . प्रवीणभाईं सकट बाकीचे सर्व मेम्बर्स आधीच पोहोचले होते . सर्वांच्या तोंडावर खट्याळ हसू दिसत होतंच . ' मग डिंगणकर ..... कसा होता कालचा अनुभव ? " प्रश्न विचारण्याच्या टोन वरूनच उत्तर माहित असल्याचं लक्ख कळत होतं . बाबुरावांनी कसनुसं हसून वेळ मारून नेली. प्रवीणभाईंनी पुढे होवूंन बाबुरावांच्या खांद्यावर थोपटलं.
" डिंगणकर साहेब , यू नो . मी एक दिवस आजारी पडला तर तुम्ही माझा बेस्ट फ्रेंडने पुढे होऊन माझा हेल्प केला . अरे थोडा गडबड झाला तर काय त्याचा एव्हढा . मी जर ब्यांकेत आला अने कॅश काउंटरवर बसला तर बँकेचा बीजा दिवालाच निघाला असता . तुम्ही तरी लई मस्त काम केला , थँक यू व्हेरी मच . दोस्तलोक थ्री चियर्स फॉर डिंगणकर साहेब . अने या बद्दल उपवन फेस्टिवल मदे मी सर्वांनला आईस्क्रीम पार्टी देनार "
पार्टीच्या अनाउंसमेंटवर जोरदार टाळ्या झाल्या . बाबुरावांनी प्रवीणभाईंना हाताच्या कोपरापासून दंडवत घातला आणि एव्हढंच म्हणाले " जहाँपनाह तुसी ग्रेट हो "

Group content visibility: 
Use group defaults

आता बाबुडी चे सगळे भाग वाचले,
क्युट वाटले.एक वेगळंच विश्व.मध्ये मध्ये गंगाधर टिपरे पण आठवले.
'इनरवेअर्स भाड्याने' आणि 'लुनाची डिकी' हे प्रकार मात्र झेपले नाहीत जरा.

भाड्याने कपडे देणे आणि इनरवेअर्स हे वेगवेगळे बिझनेस आहेत. बाबुराव गोडाऊन कम भाड्याच्या कपड्याच्या दुकानात असतात ( आँब्यिअसली जागा जास्त लागते)

हे पण लिखाण भावलं.
खरंच पाण्यामध्ये मासा श्वास घेई कैसा
जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. Happy

पुलेशु!