कीप इट सिम्पल सिली .......

Submitted by यशू वर्तोस्की on 11 January, 2018 - 21:07

हे वर्ष मात्र सुट्यांचं होतं शनिवार रविवारला जोडून आलेल्या सुट्यांमुळे लॉंग विकेंड्स खूप होते त्यामुळे पार्टी अनिमल्स करता सरतं वर्ष म्हणजे एक पर्वणी होती. हल्ली दीड दिवस सुट्टी असली तरी लोक मुंबईच्या बाहेर पळतात तर अश्या लॉन्ग विकेंडला काय विचारा . मुंबई बाहेर जाणारे सर्व रस्ते तुडुंब असतात . माझ्या घरापासून ठाण्यात यायला सामान्यतः वीस पंचवीस मिनिटे पुरतात पण अश्या विकेंड्सला हेच अंतर काटायला मला जवळपास दोन अडीच तास लागत होते . जणूकाही सर्व शहर रिकामं होत होतं असा भास होत होता .
पेपरात टीव्हीवर हीच चर्चा असायची की कसे सगळे एक्सप्रेस हायवेज जॅम झालेत . सर्व आऊटिंगची ठिकाणं ओसंडून वाहत आहेत . खोटं कशाला बोलू पण या वाहत्या गंगेत आम्हीही थोड्याफार प्रमाणात सामील होतोच . माझं कामाचं शेड्युल आणखी लवचिक असल्याने तसाही प्रत्येक विकेंडला मी लॉन्ग विकेंड करू शकतो पण तरीही मनात कुठेतरी एक टेन्शन किंवा गिल्ट असते . असे लॉन्ग विकेंड आले की ही गिल्ट थोडी कमी होते एव्हढंच . अगदी शहरी वातावरणाच्या एकदम विरुद्ध असणारे रिसोर्र्ट्स , किंवा समुद्रकिनारी असणारी विकेंड होम्स , किंवा त्यापलीकडे जाऊन बाईक वरून सापुतारा किंवा माळशेज घाटाची सफर किंवा अगदी लडाख , कच्छचं रण कितीतरी ऑप्शन्स उपलब्ध होते आणि ते आम्ही वेळोवेळी घेतले . परत आल्यावर नाईलाजाने दुसऱ्यादिवशी ऑफिसला जायला लागायचं तो आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस असायचा . त्यानंतरचा अख्खा आठवडा सामानाची आवराआवर आणि मेमेरीज सांभाळणे यात जायचा . या सर्व नंतर पुढचे काही दिवस खूप थकवा जाणवायचा . आनंद मिळत होता पण ड्रेन झाल्यासारखं व्हायचं .
बरेचदा आपल्या वाचनात प्रवास वर्णनं येतात . माणसं कुठेकुठे जाऊन येतात किंवा त्यांना कितीतरी भयानक किंवा अलौकिक अनुभव येतात . सुदैवाने आम्हाला आमच्या कुठल्याच प्रवासात फार अलौकिक अनुभव आले नाहीत . पण यामुळे आमच्या आनंदात कुठे एक्साइटमेन्ट कमी होती असं आम्हाला कधीच वाटलं नाही . आज बऱ्याच मुशाफिरी करणाऱ्या किंवा विकेंड्सला बाहेर जाणाऱ्या लोकांशी सहज चर्चा होते तेंव्हा एक गोष्ट जाणवते की आनंद मिळवणं एव्हढंच पुरे पडत नाहीये . माणसांची भूक वाढत जाते . एक थोडासा कमर्शियल ऍप्रोच झालाय . मी विकेंडला तीन दिवस खर्च करून , इतका प्रवास करून आणि खर्च करून जातोय म्हणजे मला त्या प्रमाणात मजा केलीच पाहिजे. हल्ली मजा याचा अर्थ आनंद नसून ऍक्टिव्हिटीज असा झाला आहे . या तीन दिवसात साधारण २००-३०० किलोमीटर ड्रायव्हिंग किंवा प्रवास , रात्रीची जागरणं , विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती , ते पदार्थ , मद्य , कॅम्प फायर , साईट सिईंग , गाणी , दिवसा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ..... हे सगळे रकाने भरले तर तर ती ट्रिप सक्सेसफुल अन्यथा नो गूड असं काहीसं झाला आहे .
लडाख , काश्मीर किंवा अगदी कच्छच्या रणात फिरायला जाणाऱ्या ( खरं तर ही हॉलिडे ट्रिप करण्याची किंवा व्हेकेशन मधे फिरायची ठिकाणं नाहीत ) लोकांना आपल्या बरोबर लहान मुलं , खूप सामानसुमान असला लवाजमा घेऊन जाताना पाहिलं कि खूप विचित्र वाटतं . याच्या एकदम उलट या ठिकाणी विमानाने जाणं किंवा सध्या मार्गाने प्रवास करणं म्हणजे फालतू आणि याठिकाणी बाईक्स वरून ट्रिप , किंव स्वतः ड्राइव्ह करून जाण्याचं थ्रिल म्हणजेच मजा असं मानून बाकी सामान्य लोकांकडे तुच्छतेने बघणारी पण एक जमात आहे .
आपण नेमके कशाकरता बाहेर पडलो आहोत हेच लक्षात न घेतलेले सध्या आऊटिंग मध्ये ओढूनताणून थ्रिल आणणारे आणि थ्रिल म्हणून आचरट प्रकार करणारे दोघेही एकाच माळेचे मणी असतात . मी हे म्हणत नाही की आनंद मिळत नाही , नक्की मिळत असतो पण अँट व्हॉट कॉस्ट . आनंदाने माणसाला शांतात , स्थैर्य मिळते , कधीकधी तर शाररिक श्रम होतात पण तरीही फटिग येत नाही . पण पैसे वसूल नादात कमी वेळात सगळी सुखं किंवा सगळ्या एन्जॉयमेंटचे रकाने भरण्याच्या नादात आपण कमावतो त्यापेक्षा काहीतरी जास्त गमावतो . आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याची सवय लागते ज्यामुळे पुढे पुढे कुठल्याच गोष्टीत माणसाला तृप्तता येत नाही . काय मिळवलं यापेक्षा आणखी काय काय करायचं राहून गेलं यांच्यातच गुंतून माणसं जे कमावलं त्याचा आनंदच उपभोगू शकत नाहीत . दुसर्याबद्दल नाही तर मी हे स्वानुभवावरून सांगतोय . वेगळं करणं म्हणजे काहीही अचाट करणं गरजेचं नसतं . काही इंग्लिश खाडी पोहून जाणे एव्हरेस्टवर चढणे किंव जंगल ट्रेक करणे गरजेचं नाही . ते करणं चुकीचं नाही पण त्याची सवय आणि त्याचं वय या गोष्टी ध्यानात घ्याव्यात एव्हढंच म्हणणं आहे . हे करणारी माणसं लौकिकार्थाने वेगळी नसतात तर वेगळं आयुष्य जगणारी असतात . आपण रुटीन आयुष्य जगणारी माणसं वेगळेपण मिळवणाच्या नादात म्हणून बरेचदा मनस्ताप मिळवतो .
वेगळा विषय म्हणून शेअर करतो .... टीव्हीवर मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया कार्यक्रम असतो. मी तो पूर्वी रेग्युलर बघायचो. असं वाटायचं की या कार्यक्रमातून काही वेगळ्या डिशेश बघायला मिळतील . पण त्यांचं कुकिंग आणि फूड कल्चर आपल्यापेक्षा फारच वेगळं आहे . त्यामुळे त्यांच्या बऱ्याचश्या डिशेश जरी बनवता आल्या तरी खायला कितपत जमतील याबद्दल मी साशंक होतो . आपल्याकडचे कुकरी शोज पाहणं म्हणजे एक शिक्षाच असते . एकतर या शोज मध्ये येणारे लोक सो कॉल्ड सेलिब्रेटीज असतात त्यामुळे त्याचं कुकिंग त्याच्या ग्लॅमरही संबंधित म्हणजे यथातथाच असतं आणि बाकीची सामान्य माणसं सध्या सरळ पदार्थांची अशी काही मोडतोड करतात ते खाणं तर दूरच पण ते पाहाणं देखील खूप त्रासदायक असतं . घरात असलेल्या उपलब्ध साहित्यापासून फारसा तोडमोड न केलेला किंवा अचाट प्रयोग न केलेला साधा चविष्ट पदार्थ बनवणे म्हणजे स्वयंपाकाची कला . म्हणजे खूप मेकअप न करता किंवा खूप कॉश्च्युम्स न घालता फक्त साधे कपडे आणि कमीतकमी मेकअप करून फक्त आवाजाच्या चढउतारांनी किंवा मुद्राभिनयाने सादरीकरण करणारा नट हा नटसम्राट मनाला जातो तसं.
पण मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाच्या एका एपिसोड मध्ये एक सिनियर सेलिब्रिटी शेफ आला होता . पूर्ण वेळ तो स्पर्धकाच्या अवतीभोवती फिरत होता . त्याच्या हातात एक शेफ्स नाईफ असायची . तोंडाने तो एकच मंत्र जपत होता की " टू मेक अ ग्रेट डिश .... कीप इट सिम्पल "
किती अचूक स्ट्रॅटेजि .... कालिनरी आर्टच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हे चपखल बसतं . कीप इट सिम्पल . दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी लवकर स्वयंपाक झाला होता . फार मोठा बँक्वेट प्लॅन नव्हता ( पराठे आणि चटणी , दही ) . आदित्य घरी यायला बराच वेळ होता. म्हणून स्वातीने डबा तयार केला , पाण्याची बाटली , पेपर प्लेट्स घेतल्या . बाईकवरून काळा तलाव परिसरात गेलो . एकमेकांचा हात हातात धरून थोडं चाललो . लोकं कुतूहलाने पाहत होते गंमत वाटत होती . थोडावेळ माशांना पिठाचे गोळे खाऊ घातले . काळोख नुकताच पडत होता . पाण्यातली कारंजी चालू झाली होती , प्रकाशाच्या खेळ सुरु होता . दूरवर तळ्याच्या पैलतीरी बाळासाहेब ठाकरे मेमरियलचे दिवे पेटले होते . त्या वास्तूचं प्रतिबिंब पाण्या फारच सुरेख दिसत होतं . पाण्यात बदकं , पाणकोंबड्या , बगळे विहरत होते . वॉक करणारे , नेहेमीचे पेन्शनर्स , किलबिलाट करणारी लहान मुलं . पण थंड वाऱ्याच्या झुळुकांबरोबर थंडी पसरत होती . आम्ही हलकेच अंगावर स्काफ गुंडाळून घेतला . या सगळ्यामध्ये असूनही आम्ही एकदम शांत आणि एकटे होतो ..... फक्त एकमेकांबरोबर. एक तास कसा गेला कळलं नाही . डबा खाऊन थोडावेळ रेंगाळून आम्ही घरी परत आलो . आदित्य आला होता त्याला जेवायला घालून सर्व आवरून झोपायला बारा वाजून गेले . पण कुठेही थकवा जाणवत नव्हता . काय गप्पा झाल्या ते देखील आठवत नव्हतं पण शांत वाटत होतं . अनुभव कुठेतरी आतपर्यंत पोहोचला होता .
आता मनात कसलीही शंका उरली नाही . शक्य तेव्हढा कमी प्रवास , झेपेल तेव्हढंच थ्रिल , पोटात मावेल एव्हढंच अन्न आणि सोसवेल एव्हढेच श्रम किंवा जागरण . एकदा हे ठरवलं की रात्र थोडी सोंगं फार अशी अवस्था होणार नाही . आणि मुख्यतः शिणलेल्या शरीराने किंवा मनाने काय राहिलं यापेक्षा काय मिळालं याचं सुख जास्त आहे .
आतला आवाज पण मला कित्येक दिवस हेच सांगत होता " किप इट सिम्पल सिली ".......

Group content visibility: 
Use group defaults

बरोबर आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'तुलना' नको. आपण आपलं आयुष्य जगणार आहोत, की इतरांना दाखवायला? शिवाय ते सत्राशेसाठ फोटो.

अतिशय सुंदर लिखाण.
प्रवास किंवा ट्रिप च्या बाबतीत तुम्ही म्हणताय ते नक्की घडते, आपण खर्च केलेल्या पैशाचा पुरेपुर मोबदला मिळावा यासाठी लोक एरवी जितके दमतात त्यापेक्षा जास्त ट्रिप मध्ये दमून स्वतःचे हाल करून घेतात.
तिथे जाऊन नुसते पहुडले तर काय फरक पडतो? सगळं ठिकाण पालथं घातलंच पाहिजे असं काही शास्त्र नाही.

मस्त लेख. माझे ही हेच मत्त आहे. ते डोंगर चढणे अन एन्फील्ड घेउन लेह ला जाणे वगैरे प्रकरणे मला आजिबात बोअर होतात. परत लेख मालिका लिहिणे आणी फोटो पेस्ट करणे जिथे तिथे.

मस्त! ओढूनताणून येईल ती मजा कसली? पुलंनी कुठेतरी लिहिलंय. .. सूर्योदय पहायला पहाटे उठून जाणं हा अरसिकपणा आहे. रात्रभर रंगलेली मैफल संपवून घरी जाताना वाटेत अवचित पहाट भेटली पाहिजे. Happy
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'तुलना' नको. आपण आपलं आयुष्य जगणार आहोत, की इतरांना दाखवायला? >> +१

दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी लवकर स्वयंपाक झाला होता . फार मोठा बँक्वेट प्लॅन नव्हता ( पराठे आणि चटणी , दही ) . आदित्य घरी यायला बराच वेळ होता. म्हणून स्वातीने डबा तयार केला , पाण्याची बाटली , पेपर प्लेट्स घेतल्या . बाईकवरून काळा तलाव परिसरात गेलो . एकमेकांचा हात हातात धरून थोडं चाललो . लोकं कुतूहलाने पाहत होते गंमत वाटत होती . थोडावेळ माशांना पिठाचे गोळे खाऊ घातले . काळोख नुकताच पडत होता . पाण्यातली कारंजी चालू झाली होती , प्रकाशाच्या खेळ सुरु होता . दूरवर तळ्याच्या पैलतीरी बाळासाहेब ठाकरे मेमरियलचे दिवे पेटले होते . त्या वास्तूचं प्रतिबिंब पाण्या फारच सुरेख दिसत होतं . पाण्यात बदकं , पाणकोंबड्या , बगळे विहरत होते . वॉक करणारे , नेहेमीचे पेन्शनर्स , किलबिलाट करणारी लहान मुलं . पण थंड वाऱ्याच्या झुळुकांबरोबर थंडी पसरत होती . आम्ही हलकेच अंगावर स्काफ गुंडाळून घेतला . या सगळ्यामध्ये असूनही आम्ही एकदम शांत आणि एकटे होतो ..... फक्त एकमेकांबरोबर. एक तास कसा गेला कळलं नाही . डबा खाऊन थोडावेळ रेंगाळून आम्ही घरी परत आलो . आदित्य आला होता त्याला जेवायला घालून सर्व आवरून झोपायला बारा वाजून गेले . पण कुठेही थकवा जाणवत नव्हता . काय गप्पा झाल्या ते देखील आठवत नव्हतं पण शांत वाटत होतं . अनुभव कुठेतरी आतपर्यंत पोहोचला होता .>>>>>>>>

खूप छान वाटले वाचून...

लेख मस्त जमलाय.

खूप छान लेख. कीप इट सिंपल...आवडले. हे आयुष्याच्या सर्वच पैलूंसाठी ध्यानात ठेवायला हरकत नाही.

मी स्वतः मात्र प्रवास करते तेव्हा मला खूप गोष्टी पहायच्या, खायच्या, खरेदी करायच्या असतात. त्याचा थकवा अजिबात येत नाही. उलट मजा वाटते. नविन अनुभव येतात आणि प्रसन्न वाटते. रिसॉर्ट बुक करुन तेथे पडून रहायच्या ऐवजी मला घरात पडून रहायला आवडते.

छान लेख ! मी सुद्धा हे नेहमीच बोलतो, आयुष्य खूप सिंपल आहे, आपण उगाच कॉम्प्लीकेटेड करून ठेवतो.

हल्लीच हे हे विकेंडवारीचे फॅड आले आहे. खरे तर हे पाश्चात्य फॅड आहे. फाईव्ह डे वीक कमवायचे आणि विकेंडला खर्चायचे. मजा करायची. पण आपल्याकडचे भारतीय कामगार मात्र पाच दिवस ऑफिसात राब राब राबून या अफाट लोकसंखेच्या देशात ट्राफिक झेलत स्वत:च्या जीवाची दमछाक करत विकेंड ट्रिप आखतात ती त्रासदायकच ठरते...... असे माझा एक कॅनडाला राहणारा भारतीय मित्र म्हणाला होता.

खरे तर जे लोकं आठवड्याचे पाच दिवस आयुष्याची मजा लुटू शकत नाही त्यांना अश्या विकेंडचे कौतुक असते. त्यापेक्षा सोमवार ते शुक्रवार, रोजचे जगणेच जगण्याचा आनंद लुटत जगायचे ठरवल्यास या विकेंडचे तितके अप्रूप राहणार नाही. ना रविवारच्या संध्याकाळी ती सोमवारच्या भितीने आलेली उदासीनता जाणवणार.. रोज स्वत:च्या फॅमिलीला पुरेसा वेळ द्या, रोज स्वत:चे छंद जोपासायला थोडा वेळ काढा, थोडेसे ऑनलाईन फेरफटका मारा, थोडेसे घरच्यांशी वा मित्रांशी प्रत्यक्ष गप्पा मारा. नाचायची आवड असो नसो, जमल्यास थोडेसे रोज न चुकता नाचा. एखादा खेळ खेळा. मैदानीच असे गरजेचे नाही, बैठा खेळ खेळा. भले मग ते कॅरम बुद्धीबळ वा सापशिडी ल्यूडो का असेना. फक्त एकट्याचा विडिओगेम न खेळता पार्टनर घेऊन एखादा खेळा. समवयीनच असणे गरजेचे नाही, मुलांशी खेळा. एकूणच याने मन ताजेतवाने राहते.
खरे तर रोज एखादा खेळ खेळा हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल... पुन्हा कधीतरी सविस्तर बोलू यावर

मी स्वतः मात्र प्रवास करते तेव्हा मला खूप गोष्टी पहायच्या, खायच्या, खरेदी करायच्या असतात. त्याचा थकवा अजिबात येत नाही. उलट मजा वाटते. >> मला पण Happy .. विशेषतः ठिकाणं फिरून पहायला आवडतात. नुसतं हॉटेलमध्ये बसून कंटाळा येतो. आरामातच बसायचं तर घरी बसायला आवडतं. ज्याला जसं पटतं, रुचतं, तशा प्रकारे आनंद घ्यावा. दुसरे असं करतात म्हणून आपण आपल्याला रुचत नसलेल्या गोष्टीत आनंद शोधायचा आणि खोटा खोटा आनंद ( फोटोंमधून) दाखवायचा याला काही अर्थ नाही.
दक्षिणा, धन्यवाद Happy

मी स्वतः मात्र प्रवास करते तेव्हा मला खूप गोष्टी पहायच्या, खायच्या, खरेदी करायच्या असतात. त्याचा थकवा अजिबात येत नाही. उलट मजा वाटते. >> मला पण >> मला पण

लेख आवडला. छान लिहीला आहे

लेख आवडला. विषय आणि मांडणी‌ दोन्ही चांगलं जमल आहे. लिहीत रहा.
एक अवांतर : तुम्ही कल्याणचे आहात का? 'काळा तलाव' उल्लेखामुळे वाटलं. मला कल्याण सोडून जवळपास पंचवीस वर्षे झाली. तरी तिथले उल्लेख वाचून जीव गार होतो!

थोडावेळ माशांना पिठाचे गोळे खाऊ घातले . काळोख नुकताच पडत होता . पाण्यातली कारंजी चालू झाली होती , प्रकाशाच्या खेळ सुरु होता . दूरवर तळ्याच्या पैलतीरी बाळासाहेब ठाकरे मेमरियलचे दिवे पेटले होते . त्या वास्तूचं प्रतिबिंब पाण्या फारच सुरेख दिसत होतं . पाण्यात बदकं , पाणकोंबड्या , बगळे विहरत होते . वॉक करणारे , नेहेमीचे पेन्शनर्स , किलबिलाट करणारी लहान मुलं . पण थंड वाऱ्याच्या झुळुकांबरोबर थंडी पसरत होती . आम्ही हलकेच अंगावर स्काफ गुंडाळून घेतला . या सगळ्यामध्ये असूनही आम्ही एकदम शांत आणि एकटे होतो ..... फक्त एकमेकांबरोबर.>>>>> खूप छान अनुभव!

"मी विकेंडला तीन दिवस खर्च करून , इतका प्रवास करून आणि खर्च करून जातोय म्हणजे मला त्या प्रमाणात मजा केलीच पाहिजे. हल्ली मजा याचा अर्थ आनंद नसून ऍक्टिव्हिटीज असा झाला आहे . या तीन दिवसात साधारण २००-३०० किलोमीटर ड्रायव्हिंग किंवा प्रवास , रात्रीची जागरणं , विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती , ते पदार्थ , मद्य , कॅम्प फायर , साईट सिईंग , गाणी , दिवसा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ..... हे सगळे रकाने भरले तर तर ती ट्रिप सक्सेसफुल अन्यथा नो गूड असं काहीसं झाला आहे ."

हे एकदम लाख मोलाचं बोललात येशू साहेब!!

हेहि छानच लिखाण..
पैसे वसूल करण्याच्या नादात कमी वेळात सगळी सुखं किंवा सगळ्या एन्जॉयमेंटचे रकाने भरण्याच्या नादात आपण कमावतो त्यापेक्षा काहीतरी जास्त गमावतो . आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याची सवय लागते ज्यामुळे पुढे पुढे कुठल्याच गोष्टीत माणसाला तृप्तता येत नाही .>>> अगदि अगदि..

एकदम पटले बुवा.
बाईकवरून काळा तलाव परिसरात गेलो . >>>> तुम्ही पण कल्याणात रहातात का ?

Pages