मराठी दुकानदारी ...

Submitted by यशू वर्तोस्की on 11 January, 2018 - 13:35

मराठी माणूस आणि व्यापार किंवा दुकानदारी हे दोन शब्द फक्त विनोदा करता एकत्र आणले जातात. अगदी पुलंनी देखील आपल्या लिखाणातून मराठी माणसाच्या व्यापार करू न शकण्याच्या मनोवृत्तीवर बोट ठेवले आहे.

दुकानदार कसा हवा असं कोणालाही विचारलं तर काही ठराविक ऊत्तरं आपल्याला मिळातील . गुजराथी माणसां सारखा . दुकानदाराच्या तोंडात साखर हवी , अगत्य हवे आलेल्या गिर्हाईकाला काका , मामा , साहेब असं संबोधलं पाहीजे , मालाची खूप व्हरायटी पाहीजे , सर्व्हिस चांगली हवी . आणि नेमक्या या गोष्टी मराठी दुकानदार करत नाहीत म्हणून मारवाडी गुजराथी दूकानदारांचा धंदा तेजीत असतो आणि मराठी माणसाचा धंदा कमी असतो असं सतत म्हटलं जातं. पण हे बोलत असताना आपण फार वरवरचा विचार करतोय असं नाही वाटत आपल्याला ? . आगत्य दाखवणे , मिठ्ठास बोलणे वगैरे ठीक आहे पण नेमक्या याच कारणासाठी मराठी माणूस पाठी रहातो , आता ईथे पाठी रहाणं हे आर्थिक चष्म्यातून आहे बरं का. पण या सगळ्या गदारोळात ज्याच्याकरता आपण दूकानात जातो त्या मालाचं काय ? त्या विषयावर आपण काहीच बोलत नाही.

आता वानगीदाखल मी तूम्हाला दोन ऊदाहरणं देतो. आम्ही काही दिवसांपूर्वी अतिशय प्रतिष्ठित दुकानातून अंजलीचं कांदा कापण्याचं मशीन घेतलं. एकदम पॅक्ड असलेलं . घरी आल्यावर असं लक्षात आलं की त्याच्या पात्यांना अजिबात धार नाही. आम्ही लगेच ते परत घेऊन गेलो. मशीन घेताना आम्हाला साहेब साहेब म्हणून गुदमरून टाकणारा दूकानदार आम्हाला ओळख दाखवायला तयार नव्हता. आता त्याच्या दूकानात इतर साहेब होते. त्याने आम्हाला दोन दिवसांनी यायला सांगितलं. दोन दिवसांनी मशीन बदलून द्यायची तयारी नव्हतीच , पण त्याने पात्याला चक्क धार काढून आणली. यावेळी आम्ही पण समजदार झालो होतो. आम्ही जाताना कांदे बरोबर घेऊन गेलो होतो . पण धार काढल्यानंतरही परिस्थिती जैसे थे होती. आम्ही त्याला सजेस्ट केलं की हे मशीन कंपनीकडे परत पाठव आणि आम्हाला दुसरं मशीन बदलून दे. त्यावर त्याचं ऊत्तर एकही पीस शिल्लक नाही असं होतं. तो जवळपासच्या दुकानातून एखादं मशीन आम्हाला अगदी सहज अव्हेलेबल करून देऊ शकत होता पण नाही कारण आता आम्ही साहेब नसून कटकट करणारी मराठी माणसं झालो होतो . बरं महागडी वस्तू असती तर जरा तमाशा करता आला असता पण अडिचशे रूपयांकरता आरडाओरडा करणं प्रशस्त वाटत नव्हतं. तिसऱ्या चौथ्या फेरीत तो आम्हाला बघून न बघितल्या सारखं करायला लागला . काही बोलायला जावं तर " दादा दूकानात गिर्हाईक हाय जरा बघ ना " असं ऊत्तर मिळायला लागलं. आता माझं साहेब वरून दादा असं डिमोशन झालं होतं. चारपाच वेळा पाहिल्यावर मात्र आम्ही वेळकाळ न पहाता आवाज वाढवला पण तो ढिम्म ... शेवटी चार लोकांच्या देखत ते मशीन त्याच्या तोंडावर फेकून आलो. बाकीचे बरेच लोक दूकानात ऊभे होते पण कोणालाही काय झालंय ते जाणून घ्यावसं वाटलं नाही. साहेब साहेब च्या गजरात त्यांची पूजा चालू होती.

दुसरा अनूभव मी नेहमी जिथून कपडे खरेदी करतो ते दुकान. काही टीशर्टस् आम्ही खरेदी केले. पण घरी आल्यावर एक टीशर्ट जरा फिटिंगला घट्ट आहे असं जाणवलं. लगेचच्या लगेच आम्ही दूकानात परत गेलो. टीशर्ट बदलायला आलो असं म्हणताच " अरे हा काय टीशर्ट बदलायचा टाईम हाय का " हे त्याचं ऊत्तर होतं. बरं चाॅइस वगैरे पण काही भानगड नव्हती फक्त एक साईज मोठा घ्यायचा होता. बरं या दूकानात मी वर्षभरात पन्नास साठ हजारांचे कपडे घेत असतो. पण तरीही दूकानदारी वृत्ती तशीच. मी त्याला सांगून दमलो की हवंतर मी बाहेर ऊभा रहातो मला फक्त एक साईज मोठा टीशर्ट दे , जो समोरच्या कपाटात मला दिसत होता. पण नाही म्हणजे नाही. शेवटी मी तो टीशर्ट दूकानात ठेवून आलो आणि नंतर फोनवरून वेळ ठरवून नवीन टीशर्ट घेऊन आलो.
वरची दोन्ही ऊदाहरणं प्रातिनिधीक आहेत. सर्वात संतापजनक गोष्ट अशी की तूमची एकदा खरेदी करून झाली की तूम्ही एकदम फालतू बनता. तूमच्याकडे इतक्या घाणेरड्या आणि कोरड्या नजरेने पाहीलं जातं की ती नजर आपल्याला बोचते. बरं दुकानातला मालाची क्वालिटी काही स्पेशल असते असंही नाही , बरं डिस्काउंट स्किम्स् विषयी न बोललेलंचं बरं. मराठी माणसाच्या दूकानात फार व्हरायटी नसली तरी माल चोख असतो , वजनं पॅकिंग चोख असतं. कदाचित मराठी माणूस मुळातच थोडासा कोरडा असतो त्यामुळे सतत दादा काका साहेब असं करणार नाही पण त्याच्या नजरेत तो बोचणारा भाव दिसत नाही. आणि खूपवेळा जाणयेणं झाल्यानंतर तो तुमच्याशी हसुनखेळून बोलू पण लागतो. एखादी कंप्लेंट असेल तर मराठी दूकानदार गिर्हाईकाला सोडून तूम्हाला अटेंड करतो कारण आपल्या दूकानातल्या वस्तूविषयी तक्रार असणे त्याला अतिशय अस्वस्थ करणारं असतं. म्हणून मराठी दुकानातून वस्तू घेणारी माणसं शक्यतो इतर ठिकाणी जात नाहीत. आपण जर निरिक्षण केलं किवा माहिती घेतली तर आपल्याला असं आढळेल की प्रत्येक शहरात किंवा गावातील एखाद्या विशिष्ठ वस्तूकरता प्रसिद्ध असणारं दूकान मराठी माणसाचं असतं किंवा मुळात मराठी माणसाने सुरूवात केलेलं असतं. मराठी मालकांच्या पिढ्यानपीढ्या आपली क्वालिटी राखून असणार्या वस्तू मॅनेजमेंट बदल्यानंतर आपली ओळख हरवून बसल्याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
महाराष्ट्र व्यापारात मागे का ? याचं ऊत्तर मराठी माणसाला खोटेपणा करता येत नाही , शक्यतो लांडीलबाडी न करण्याकडे मराठी माणसाचा कल असतो. एखाद्या वस्तूवर भरमसाठ फायदा मिळवणे तो कदाचित करेल पण फायदा वाढवण्याकरता वस्तूचा दर्जाशी तो प्रतारणा करत नाही. त्याला गोड बोलता येत नसेल पण तो माणूसकीने वागतो. आपल्या मालाची तक्रार येणे हा त्याच्या दृष्टीने मोठा अपराध असतो त्यामुळे वेळप्रसंगी आपल्या पदराला खार लावून तो गिर्हाईकाला त्याचा हक्क मिळवून देतो. आपल्या पुढच्या पिढीला दूकानदारीत आणण्याआधी तीला चांगलं शिक्षण देण्याकडे त्याचा कल असतो त्यामुळे मराठी दुकानांमधे अगदी पूड्या बांधणारे सोडले तर सहसा असंस्कृत अनाडी माणूस तुम्हाला दिसणार नाही. मराठी माणूस आपल्या घराशी आणि घरातील माणसांशी खूप अटॅच्ड असतो. त्यामुळे पैसा कमावण्याची जीवघेणी स्पर्धा वगैरे गोष्टींपासून दूर राहून तो आपल्या कुटूंबाला वेळ देतो . कदाचित स्पर्धेच्या युगात हे मागासलेपण असेल किंवा ज्याला आपण टिपिकल मराठी वृत्ती म्हणतो ते असेल ... त्याला त्याची फिकीर नसते.

आणि कधीतरी त्यांच्या घरांचे पडदे जरा किलकिले करून आत डोकावून पाहिलं की आपल्याला कळेल की कोणी काय कमावलं आहे ते.

Group content visibility: 
Use group defaults

वा छान लेख, पटला..
जो आपले छंद जोपासतो आणि जो व्यवसायापुढे भावनांना प्राधान्य देतो तो खरा मराठी माणूस.. हे जग मराठी माणसांच्या चांगुलपणावरच टिकून आहे असे म्हटले तरी आतिशयोक्ती ठरू नये Happy

एकदम खरं.आमच्या जवळपास सर्व दुकानं राजस्थानी माणसांची आहेत.त्यांच्या कष्ट घेण्याच्या वृत्तीला मात्र मनापासून सलाम.सकाळी ७ ला उघडलेले दुकान रात्री १०.३० ला बंद करताना गिर्‍हाईक आलं तरी तितक्याच चपळतेने वस्तू काढून देतात.
नियम मात्र प्रचंड ओव्हर राईड करतात. कस्टमर मागतो म्हणून गुटखा सिगरेट सर्व ठेवतात.आपलं पार्किन्ग दुसर्‍या छोट्या खाणे किंवा पानवाल्याला भाड्याने देऊन बाहेर रस्त्यावर पार्किन्ग ची गर्दी वाढवतात.(अर्थात यात सध्या स्थानिक मराठी माणसंही मागे नाहीत.)
मराठी दुकानदार पण आता बराच बदलला आहे. आठ्या पाडून 'काय हवॅय' वाली जनर आता जुनी झाली.आता हसून स्वागत करतात, टेक्नॉलॉजीत प्रगत असतात.व्यवहारात चोख असतात.सूचना ऐकून घेतात.(उदाहरणः कोथरुड सिनर्झिप जवळचे अग्रज)

लेख पटला नाही आणि सरसकट मत तर अजिबातच नाही. मला गुजराथी माणसाच्या दुकानातपण तुसडेपणाचा अनुभव आला आहे आणि चितळ्यांच्या दुकानात सौजन्याची वागणूक मिळाली आहे.

...>>>(उदाहरणः कोथरुड सिनर्झिप जवळचे अग्रज)>>> हायला अनु, तुम्ही अगदी आमच्या एरियात येऊन गेलात कि Happy

बराच भाग पटला नाही लेखाचा.
खरेदी झाली तरी तीच अदब ठेवणारे, गुजराती, मारवाडी, मराठी व इतर अमराठी दुकानदार सगळीकडे पाहिलेत. वस्तु खराब निघाल्यावर वा इतर कारणांमुळे बदलून हवी असेल तर काही वाईट अनुभव आलेत पण त्यात अमराठी व मराठी दुकानदारही होते, त्यामुळे मला ते सामान्य अनुभव वाटले जे व्यक्ती स्वभावानुसार येतात.

वाद घालणे हा मराठी गिह्राइकाला फार आवडते.
गुजराथी गिह्राइक ( विशेषत: बायका) कशा वागतात हे अनुभवले काय? मालाडला जाऊन बघा. माल परत करणे वर घासाघिस.

सिम्बा
त्या एरियाशी आमचे लव्ह हेट नाते आहे
लव्ह = आधीचे माहेर
हेट = अती बेशिस्त ट्राफिक, डहाणुकर चौकात सिग्नल तोडून वळणारे वीर, सहवास उतारा कडून अती वेगात येणारे वीर

वाईट अनुभव!

मला प्राधिकरण मधे असा अनुभव आलाय.. कित्येक वर्ष आम्ही एका सारडा क्लॉथ नावाच्या दुकानातून खरेदी करतो (नाव सारडा अस्ले तरी ते मराठी च बोलतात सगळ्यांशी)... मागच्या भारतवारीत एक पंजाबी सूट चे कापड घेतेले. शिवायला दिले तेव्हा कळले की त्याला भोक पडलेय आणी ते शिवून अगदी समोरच येईल असे.... रिसीट ठेवलेली होतीच ती घेऊन गेले बदलीच्या वेळातच. तरीही कोणी ढिम्म दाद देईना. आम्ही बदलून देत नाही एकदा विकलेल्या गोष्टी हा एकच धोशा चालू. म्हटले अहो इतके वर्ष तुमचे गिर्हाईक आहोत त्याची तरी जाण ठेवा. नाही म्हणे आता तो लॉट गेला, आम्ही घेऊन काय करू... म्हटलं आणि मी हे असं खराब कापड घेऊन शिवू का? पैसे वाया, कापडही वाया..... परत त्या दुकानाची पायरी चढणार नाहीये...

अमेझॉन असताना दुकानात का जायचे? Fitting रूम असलेल्या दुकानात का नाही जायचे? Contract act चा पहिला नियम - buyer beware नेहमीच लक्षात ठेवायचा. आवडत्या दुकानाच्या, प्रॉडक्ट च्या sale तारखा लक्षात ठेवून shopping केली तर 50 टक्के off पण मिळते. मोस्टली खरेदी sale नुसार प्लान करून केली तर चुकुन कधीं emergency shopping करायची वेळ आली तर पूर्ण पैसे द्यायला पण काही वाटत नाही. खाण्याची वस्तू साठी sale पर्याय वापरत नाही.