पुन्हा नव्याने फुलून आलो

Submitted by निशिकांत on 9 January, 2018 - 00:24

(तरही. मतल्यातील सानी मिसरा गझलकार श्री भूषण कटककर--"बेफिकीर" यांचा. )

विरान रस्ता, रटाळ जीवन असेच कांही जगून आलो
नशा गझलची जशी कळाली, पुन्हा नव्याने फुलून आलो

जळावयाला तयार असते शमा बिचारी मुशायर्‍यातिल
तृषा तिची चांगल्या गझलची, जरा जरा शांतवून आलो

घडायचे ते घडून जाते, नशीब हाती कधीच नसते
करू नये त्या किती अपेक्षा! मनी निराशा, हरून आलो

घरास अंगण अता न उरले, कुठे न दिसती फुले सुगंधी
तिला सजवण्या निलांबरातिल मुठीत तारे भरून आलो

तशी खरे तर मरावयाची मनात इच्छा असून सुध्दा
असून नसल्यासमान खडतर जगावयाचे शिकून आलो

कधी विठू धावलास वेगे, असे न घडले तरी परंतू
तुझी पताका धरून हाती, पवित्र वारी करून आलो

अतीत माझे विचित्र होते, कळून आले वळून बघता
नवे उसासे जुनाट कबरीमधे जरा दाखवून आलो

कशास नाते विणावयाचे? गळ्यास धागे करकचणारे
पुढे नि मागे कुणीच नसते, उतार येता खचून आलो

कशास "निशिकांत" धाव घेशी उन्हाकडे सावली त्यजूनी
भणंग म्हणतो उन्हातही मी, भिजावयाचे म्हणून आलो

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users