पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २. कारवां (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 5 January, 2018 - 12:54

६० आणि ७० च्या दशकातल्या बऱ्याच चित्रपटांतली अनेक गाणी माझ्या आवडीची आहेत. आजकाल आपली आवडती गाणी ऐकायला छायागीत किंवा चित्रहार किंवा सुपरहिट मुकाबला अश्या कार्यक्रमांची (गेले ते दिन गेले!) वाट पहावी लागत नाही हे जरी खरं असलं तरी ह्या गाण्यांचं picturization मुद्दामहून प्रयत्न केल्याशिवाय (उदा. युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करून) पहायला मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. मग कधी कुठे तरी रिमोट घेऊन चॅनेल्सच्या जंगलात 'कोणी चांगला कार्यक्रम दाखवता का?’ असं म्हणत हिंडताना अचानक ह्यातलं एखादं गाणं नजरेस पडतं. हिरो आणि हिरोईन नुसतेच बागेतून धावत नसतील तर गाण्यातून कथानक पुढे सरकताना दिसतं आणि वाटून जातं 'काय बरं गोष्ट असेल ह्या पिक्चरची?’. हो, हो, माहित आहे. विकिवर आजकाल तीही कळायची सोय आहे. पण पुढे काय घडणार आहे ह्याचे अंदाज बांधत पिक्चर बघण्यात जी मजा आहे ती विकिवर इस्टोरी वाचण्यात नाही. नाही का?

तर नमनाला घडाभर तेल घालायचं कारण म्हणजे असाच एक चित्रपट ज्याबद्दल मला कित्येक वर्षं अपार कुतूहल होतं तो म्हणजे १९७१ सालचा कारवां. नावच कसलं झकास आहे ना? कारवां म्हटलं की डोळ्यांसमोर दूर क्षितिजापर्यंत पसरलेली बैलगाड्यांची रांग, त्यातले रंगीबेरंगी कपड्यातले गाणी म्हणत जाणारे बंजारा लोक आपोआप दिसायला लागतात. काय असेल ह्या कारव्याची गोष्ट? Hflicks२ चॅनेलच्या कृपेने मला मागच्या आठवड्यात ही गोष्ट पाहण्याची संधी मिळाली. ती आज तुम्हाला सांगणार आहे. सुरु करू का?

तर चित्रपट सुरु होतो तेव्हा आपल्याला एक गाडी दिसते. एक तरुणी ती गाडी चालवतेय खरी पण तिचं गाडीवरचं नियंत्रण सुटलंय कारण कोणीतरी गाडीचे ब्रेक्सच फेल केलेत. धोकादायक वळणं असलेल्या रस्त्यावरून गाडी वेडीवाकडी धावत चाललेय. दुसर्या बाजूला खोल दरी. ती तरुणी खूप घाबरलेय पण तरी गाडी ताब्यात ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतेय. एका क्षणी मात्र तिचा नाईलाज होतो आणि गाडी खोल दरीत कोसळते. उलटीपालटी होत अगदी तळ गाठते. मग दुसर्या शॉटमध्ये दिसतात ते पंचनाम्यासाठी आलेले पोलीस, गर्दी. एक तरुण पोलिसांशी हुज्जत घालतोय. त्या तरुणीची, सुनीताची, डेड बॉडी मिळाली नाही तेव्हा ती जिवंत असणार असं पोलिसांना सांगतोय पण पोलीस ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात की आमच्या माणसांनी सगळीकडे शोधलं पण ती मिळाली नाही, एव्हढ्या वरून गाडी पडल्यावर ती जिवंत कशी राहील, तिची बॉडी दरीत एखाद्या झाडाला अडकली असेल. तो तरुण हताश होऊन तिथल्याच एका झाडाला टेकतो.

सुनिताचं काय झालं असा विचार आपण करतोय एव्हढ्यात तिचा voiceover ऐकु येतो. ती आपल्याला सांगते की तो तरुण म्हणजे तिचं कालच ज्याच्याशी लग्न झालं तो राजन. ती मुंबईच्या एका प्रख्यात मिलमालकाची, मोहनदासची, एकुलती एक मुलगी. राजन तिच्या वडिलांच्या दिवंगत मित्राचा मुलगा. (हे मित्र प्रकरण पूर्वीच्या काळच्या चित्रपटात भारी असायचं नाही? आजकाल हिरो-हिरोईनच्या वडिलांचाच स्टोरीत पत्ता नसतो तर मित्र कुठून असायला?) राजनच्या सांगण्यावरून मोहनदासनी अनेक वर्षं इमानेइतबारे सेवा केलेल्या आपल्या जनरल मॅनेजरला, करमचंदला (जो त्यांचा चांगला मित्रसुध्दा झालेला असतो) काढून टाकून तिथे राजनची नेमणूक केलेली असते कारण राजनने करमचंदने त्यांची फसवणूक केली आहे असं त्यांना पटवून दिलेलं असतं. पण राजन काय चीज आहे हे त्यांना लगेच कळून येतं कारण तिजोरीत ठेवलेल्या १० लाख रुपयांपैकी ३ लाख राजन कोणाला तरी परस्पर देऊन टाकतो. मोहनदासना जेव्हा हे कळतं तेव्हा ते त्याला त्याचा जाब विचारतात. सकाळपर्यंत पैसे आणून दिले नाहीत तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात आणि हे सगळं करमचंदला लिहिलेलं पत्रही दाखवतात. आतां ह्याचा 'अंजाम तो होना बुराही था' होणार ह्याची आपल्याला कल्पना येते. राजन बाल्कनीतून ढकलून देऊन मोहनदासचा खून करतो आणि ते पत्रही हस्तगत करतो.

सुनीताला वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसतो. जेव्हा करमचंद तिला भेटायला येतो तेव्हा ती त्याला हाकलून लावते. सर्वांची अशी समजूत होते की तिला वेड लागलंय. राजन तिला खोटंच सांगतो कि आपल्या दोघांचं लग्न व्हावं अशी तुझ्या वडिलांची इच्छा होती. सुनिता वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करायचा निर्धार करते. आणि मृत्युपत्रात आपल्याला काय झालं तर सगळी संपत्ती राजनला मिळावी असं लिहून ठेवून जणू आपली कबर स्वत:च खोदते.

लग्न झालेल्या दिवशी राजन तिला खंडाळ्याला घेऊन जातो (इश्श! निदान माथेरान-महाबळेश्वरला तरी जायचं). जेव्हा ते हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करतात तेव्हा तिथे आधीच मोनिका मौजूद असते. ती राजनचे आणि आपले संबंध जाहीर करते. राजनने तुझ्या वडिलांचा खून केलाय असं म्हणून त्यांनी करमचंदला लिहिलेलं पत्र दाखवते (ते तिने राजनकडून लंपास केलेलं असतं). आणि हा एक दिवस तुझाही काटा काढणार अशी भविष्यवाणी वर्तवून 'तुला ह्या पुराव्याची गरज लागली तर माझ्याकडे ये' असं आवतान देऊन अंतर्धान पावते. हबकलेली सुनिता स्वत:ला खोलीत कोंडून घेते आणि रात्री राजन झिंगून पडलाय ह्याची खात्री करून घेऊन गाडी घेऊन पळ काढते. नंतर तिच्या लक्षात येतं की गाडीचे ब्रेक्स राजनने फेल केलेत. तरी प्रसंगावधान राखून गाडी दरीत कोसळायच्या आधी ती गाडीतून बाहेर उडी मारते. अपघाताची चौकशी करायला आलेल्या पोलिसांना पाहूनही तिला खरं सांगायचं धैर्य होत नाही कारण तिच्याकडे पुरावा नसतो. तो आणायला तिला मुंबईला मोनिकाकडे जावं लागणार असतं.

इथेतिथे भटकत असताना तिला कोणीतरी वाळत घातलेले गावातल्या बाईचे कपडे मिळतात. ते तिला फिट्ट बसतात बरं का! इथे आम्ही दुकानात घालून पाहिलेले कपडे घरी आले की तंग. असो. मग तिला एक गाडी-कम-व्हॅन-कम-मिनीबस दिसते. त्या गाडीचा ड्रायव्हर मोहन आणि त्याचा मित्र दोघांना एका बंजार्‍यांच्या कबिल्याच्या मालकाने त्यांचं सामान एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायच्या कामावर ठेवलेलं असतं. सुनीता आपली सोनी अशी ओळख सांगून लोणकढी ठोकून देते की तिचे काका तिचं एका म्हातार्याशी लग्न लावून देताहेत म्हणून ती पळून चाललेय आणि तिला मुंबईला एका नातेवाईकाकडे जायचंय. मोहन तिला मुंबईला पोचवतो पण मोनिकाकडे पोचल्यावर सुनीताच्या लक्षात येतं की खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये जे घडलं ती मोनिका आणि राजनची मिलीभगत होती आणि ती हयात नाही हे सिद्ध झालं की दोघं लग्न करणार आहेत. ती तिथून पळून जाण्यात यशस्वी होते खरी पण राजन तिला बघतोच.

राजन आणि त्याचे चमचे तिच्या मागे लागतात तेव्हा तिला (अर्थातच!) मोहनची गाडी दिसते. ती पुन्हा गाडीत जाऊन लपते. ह्या वेळी मोहनचा भाऊ मोंटूही त्याच्या सोबत असतो. तिला हे माहित असतं की करमचंद बेन्गलोरमध्ये आहे आणि युरोपमधून २ महिन्यांनी परत येणार आहे. मोहनला ती आपल्या गाडीत आहे हे कळतं तेव्हा ती त्याला बन्गलोरला सोडायची विनंती करते. नाहीतरी बंजार्यांचा तो तांडा तिथेच तर निघालेला असतो की. सुनिता करमचंदला भेटू शकते? का राजन आणि कंपनी त्याआधीच तिचा काटा काढते? काय होतं कारवाच्या ह्या प्रवासात?

तसं बघायला गेलं तर स्टोरीत फारसे धक्के नाहीत. राजन वाईट माणूस आहे, त्याने सुनीताच्या वडिलांचा खून केलाय, मोनिका त्याला सामिल आहे हे सगळं आपल्याला आधीच माहित असतं. थोडेफार हिंदी चित्रपट पाहिलेला कोणीही माणूस पुढची स्टोरी आणि शेवटच नाही तर मोहनवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या बंजारी तरुणीचं, निशाचं, काय होणार हेही सांगू शकेल.

मग असला प्रेडीक्टेबल चित्रपट कशासाठी बघायचा बुवा? जाईनात का बापडे बंजारे मुंबई ते बंगलोर. आपुनको क्या? तर मी असं म्हणेन की चित्रपट पाहायचा तो त्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांसाठी . मग तो स्वयंपाक न येणाऱ्या सोनीला मदत करायला गेलेला मोहनचा मित्र दारूच्या नशेत सगळं जेवण करपवून ठेवतो तेव्हा मोंटू ते जेवण आणि कबिल्याच्या मालकाच्या बायकोने बनवलेलं जेवण ह्यांची अदलाबदल करतो तो प्रसंग असो किंवा निशा नाचायला नकार देते म्हणून मोहन आणि सोनी दोघांना तिच्याऐवजी ऐनवेळी स्टेजवर नाचगाणं सादर करावं लागतं तो प्रसंग असो किंवा सोनी मोहनवरच्या प्रेमाची खात्री पटवून द्यायला दारू पिते तो प्रसंग असो. ‘कैच्या कै दाखवताहेत' असं म्हणत म्हणत आपण बघतोच. असे 'कैच्या कै' प्रसंग आजकालच्या भलत्याच वास्तव झालेल्या चित्रपटात असतात का मला माहित नाही. पण पुढे काय होणार ह्याचे अंदाज मोठमोठ्याने वर्तवत हा पिक्चर बघायला मला तरी जाम मजा आली.

आणि हा चित्रपट बघावा त्यातल्या गाण्यांसाठी - मग ती lusty म्हणता येतील अशी 'अब जो मिले है तो', ‘चढती जवानी' आणि 'पिया तू अब तो आ जा' (त्यातला तो पुरुष नर्तक तेव्हढा अगदीच असह्य आहे!) असोत, cheery म्हणता येतील अशी 'दिलबर दिलसे प्यारे', ‘कितना प्यारा वादा है' आणि 'गोरिया कहां तेरा देस रे' असोत किंवा विनोदी 'दैय्या रे मै ये कहां आ फसी' असो.

आशा पारेखने शहरी सुनिता आणि ग्रामीण सोनी दोन्ही भूमिका छान वठवल्या आहेत. ‘दैय्या रे मै ये कहां आ फसी' मध्ये तर ती अशी नाचली आहे की यंव रे यंव! बिचारा Dancing Jack सुध्दा तिच्यापुढे फिका पडलाय. जितेंद्र वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे शिक्षण अर्धवट सोडून ड्रायव्हरची नोकरी पत्करावी लागणाऱ्या सद्गुणी मोहनच्या भूमिकेत फिट्ट बसलाय. ज्युनियर महमूद निरागस मोंटूच्या भूमिकेत शोभलाय. फटाकडी निशा अरुणा इराणीशिवाय कोण साकारू शकणार? हेलनने dancing vamp ची भूमिका नेहमीच्याच झोकात केली आहे. मदन पुरीनेसुध्दा कबिल्याच्या सरदाराची भूमिका मस्त केली आहे. फक्त तो राजन तेव्हढा झेपला नाही आपल्याला.

अर्थात मेंदू बाजूला काढून ठेवूनही काही गोष्टी पटत नाहीत. निशाचे वडील मोहनदास ह्यांच्या टेबलावर त्या जनरल मॅनेजर करमचंदचा फोटो का असतो हे गूढ मला काही केल्या उकलत नाहीये. फक्त मित्राचा एक फोटो, तेही तो हयात असताना, आपल्या टेबलावर ठेवणारे किती लोक तुम्हाला माहित आहेत? माझ्या माहितीत एकही नाही. असंच वर्षानुवर्ष न उकललेलं आणखी एक गूढ म्हणजे गाडीचे ब्रेक्स फेल झालेत हे कळल्यावर लोक स्टिअरिंग व्हील गरागरा का फिरवतात? सुनीताची गाडी ब्रेक्स फेल झालेत म्हणून नाही तर स्टिअरिंग व्हील तिच्या हातात तुटून आल्यामुळे दरीत पडणार असंच मला वाटत होतं. बाकी मोहनदास आणि करमचंद ही नावं ऐकून आता नक्की गांधी नावाचा कोणीतरी माणूस येणार अशी खात्री पटली होती. शिकली-सवरलेली सुनिता आपली तमाम जायदाद राजनच्या नावे करायचा मूर्खपणा कशी करू शकते? अगदी गळ्याशी येईतो ती मोहनला सगळं का सांगत नाही? आणि शेवटी जी जागा अगदी एकाकी आहे असं राजन मोठ्या तोर्यात सांगतो तिथे पोलीस नेमके कसे येऊन पोचतात? हे प्रश्न हिंदी चित्रपटांच्या बाबतीत सनातन आहेत हेच खरं. नदीचं मूळ, ऋषीचं कूळ आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधू नयेत Happy

२०१७ संपताना मला तरी ह्या बंजार्यांच्या कबिल्यासोबत प्रवास करायला खूप मजा आली. तुम्ही कधी निघताय?
----

वि.सू. ह्या लेखात २ क्रमांक टाकला आहे कारण 'नीलकमल' वर आधी लिहिलंय. त्याचं टायटल आता बदलता येत नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमा आणि झीनत यांनी कपडेपट आणि कॅमेरा अँगल्सबद्दल यांच्याबद्दल कसं दक्ष राहावं लागे ते कॉफी विथ करणमध्ये सांगितलेलं.

Pages