आज काल......!!!!!

Submitted by स्मिता दत्ता on 5 January, 2018 - 07:04

परवा एकदा एका मैत्रिणीने मला काहीतरी अगदी आठवणीने करायला सांगितले आणि मी अगदी आठवणीने ते विसरले ! अगदी अस्संच आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असावं ! आपण हल्ली बऱ्याच गोष्टी विसरतो. पूर्वी आपल्याला कितीतरी फोन नंबर तोंडपाठ होते. आजकाल आपण आपल्या जवळच्या लोकांचे नंबर पण लक्षात ठेवू शकत नाही, लगेच मोबाईल उघडून बघतो फटाफट ! जराही तसदी घेत नाही ते लक्षात ठेवण्याची, तसाच काहीसा प्रकार आजकाल थोड्याफार प्रमाणात ठिकाणांच्या बाबतीत होतोय. पूर्वी अगदी मुद्दाम आपण काही खाणाखुणा लक्षात ठेवत असू. हा चौक , ती बिल्डिंग, ते दुकान, ते हॉटेल इत्यादी इत्यादी. पण आताशा अजिबात लक्ष देत नाही या गोष्टींकडे, कारण गूगल मॅप आहे ना ! छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण खूपच तंत्रन्यानावर अवलंबून राहू लागलो आहोत.

म्हणजे अमक्याच्या लक्षात बरेच फोन नंबर असतात किंवा ती सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवून आवर्जून फोन करते. अता जर असं कोणी केलं की "अर्रे मोबाईल वर सेव असेल ना !" किंवा फेसबुक वर कळलं असेल, असं म्हणून त्यांच्या बुद्धीचं श्रेय सारं तंत्रन्यानाला देऊन आपण मोकळे होतो आणि आपण एखाद्याच्या लक्षात आहोत या गोष्टीतलं सुख हरवून बसतो. एखाद्याच्या आपण बर्रोब्बर लक्षात आहोत ही भावना किती सुखावह होती खरंतर ! ते सारं कमी कमी होत चाललंय. काही दिवसांनी आपण माणसं पण विसरणार का ? म्हणजे असं पहा कि आपण कोणत्यातरी समारंभात वा गेट टुगेदर गेलोय आणि आपली कोणीतरी कोणाशी तरी ओळख करून देतं. आपण फटाफट फोटो काढतो आणि सेव्ह करून ठेवून देतो. तिथे कोण कोण भेटलं हे ही आपण विसरुन जातो कारण फोटोत आहेतच ना ?

हल्ली आपण फोटोही कित्ती काढतो ! जो तो फोटो काढणे आणि ते शेअर करण्यातच दंग असतो म्हणजे असं की कुठंही वाढदिवसाला, लग्नाला , सनसमारंभाला, पार्टीला जाताना अधी फोटो काढतो, मग तिथे गेल्यावर फोटो काढतो. ग्रुप फोटो, सेल्फी, याच्यासोबत त्याच्यासोबत नुसते फोटोच फोटो. केक चा, डेकोरेशन चा, आतषबाजीचा, याचा नि त्याचा भारंभार फोटो ! पण आपण ते सारं अनुभवतो का ? तो केक कसा होता ? ती फुलं कित्ती सुंदर दिसत होती, ते डेकोरेशन किती कलात्मक होतं, ते आपण डोळ्यांनी किती अनुभवतो ? त्याही पलीकडे जाऊन मनांत किती साठवतो ? कि जेव्हा कधी निवांत कुठे तरी बसलो आपण !

अगदीच खरं सांगायचं तर आजकाल सारे सण समारंभ सोशल मीडिया साठीच होतात की काय असं वाटतं, म्हणजे गुढीबरोबर सेल्फी, गणपतीबरोबर सेल्फी, वाढदिवसाची सेल्फी विथ केक, इतकंच काय लग्नात सुद्धा सेल्फी आपण आजकाल ज्या त्या प्रसंगाच्या सेल्फीच्याच नादात असतो आणि प्रत्यक्षात ते प्रसंग अनुभवण्याचे प्रमाण खुपचं कमी झाले आहे. आताशा आपण आभासी जगतातच वावरत असतो आणि प्रत्यक्षात कमी जगतो. साऱ्या गोष्टी आभासी जगात शेअर करायची घाई झालेली असते. अगदी परीक्षा कशी गेली, पिक्चर कसा होता, लग्नं, पार्टी कशी झाली, जेवण कसं होतं, इतकंच काय आज काय खाल्लं, बनवलं सारं सारं ! अगदी पूर्वी ज्या गोष्टी चार चौघात न सांगण्याचे संकेत होते तेही आजकाल "चव्हाट्यावर" येतात.

पूर्वी प्रवासात शेजारी कोण बसलंय ते आपण पहात असू. चार गोष्टी त्यांच्या ऐकत असू. आपल्या काही गोष्टी त्यांच्या बरोबर बोलत असू. प्रवासात भेटलेली व्यक्ती म्हणजे खरंतर बिन दिक्कत व्यक्त होण्याचं हक्काचं माणूस, कारण ती पुन्हा आयुष्यात भेटण्याची सुतराम शक्यता नसायची, लांब पल्ल्याच्या गाड्यात तर हमखास असे प्रसंग येत. त्यामुळे अगदी काहीही सांगायला संकोच नसायचा. पण आताशा आपण सीट वर बसलो की सुरु ! खाली मुंडी पाताळ धुंडी ! ते बार्क खेळणं काढायचं आणि चल होजा शुरु ! एकतर इधर का माल उधर नाहीतर मग युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी आहेच. काहीच नाही तर गेला बाजार गाणी तरी नक्कीच ऐकायची. मग खिडकी बाहेर डोकावून काय चाललंय, कोणतं गाव, ठिकाण आलंय. माणसं कशी आहेत ? शेत शिवारात काय आहे ? काही नाही बस आपलं चालू !

पर्यटनाचीही काही वेगळी अवस्था नाही. म्हणजे कुठंही गेलं की आधी फोटो, अर्रे ती वास्तू, ते ठिकाण, निसर्ग, पक्षी मन भरून अनुभवावं, डोळ्यात साठवून ठेवावं. तो आनंद भरभरून घ्यावा. तर ते नाही. फटाफट इथे तिथे उभं राहायचं, वेग वेगळ्या अँगल ने फोटो काढायचे आणि चालू अपलोड करण्याचा कार्यक्रम ! या सगळ्यात बिचारी घरातली ज्येष्ठ. म्हातारी माणसं एकाकी पडत चाल्लीयेत असं वाटावं तर तिथंही आनंदी आनंदच ! हे आपले सिरीयल च्या विश्वात गुंग. त्यांच्या सिरीयल मध्ये कोणी आलं किंवा फोन जरी आला तरी वैतागणार आणि जाहिरातीच्या वेळेत कार्यक्रम आटोपणार. सिरीयल च्या वेळेत जिथे असतील तिथून घरी परतणार. एखादा दिवस अगदीच अपरिहार्य कारणाने मिस झालाच तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीचं जागून रिपीट टेलिकास्ट बघणार. म्हणजे एकंदर काय तर आपण सारे तंत्रन्यानाच्या आहारी गेलो आहोत आणि जीवनातला खरा आनंद गमावून विकतचा आनंद घेऊ लागलो आहोत नाही का ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी बरोबर आहे.. पटलच.. मी मुलीला कुठे फिरायला गेले की डोळ्यात तर आधी साठवून घे असे सांगत असते.

एकदम खर आहे

लक्षात ठेवायची सवय सुटत चालली आहे