" प्राप्त त्या दिनाला"

Submitted by मश्गुल कलन्दर on 2 January, 2018 - 20:38

प्राक्तन देवांनी / योजियेले काय
बुडत्यात पाय / तुझा माझा
म्हणतात काय / संत नि महंत
नको त्याची खंत / तुला मला
असावे सादर / आलिया भोगासी
ठेवावा मानसी / हाचि भाव
किती "तो" देईल / अजून हिवाळे
का औंदाच दिवाळे / काढील तो?
सागर उसळे / उंच कड्याखाली
उजवण झाली / मोसमांची
आजची मदिरा / आजच ती प्यावी
उद्याची सोडावी / सर्व आशा
बोलता बोलता / काळ व्यर्थ जाई
जगण्याची घाई / कर आता
प्राप्त त्या दिनाला / खेचून धरावे
आभार मानावे / क्षणोक्षणी

भाषांतर : मिलिंद पदकी

मूळ लॅटिन
Ode I-XI : “Carpe Diem”
: Quintus Horatius Flaccus "Horace"

Group content visibility: 
Use group defaults