माणुसकी

Submitted by ओजसउवाच on 2 January, 2018 - 14:16

साधी कॉलर सुद्धा मळलेली चालत नसणारा तू बाईकडून किंवा मशीन कडून कपडे धूतोस,
ऐटीत ऑफिस मध्ये येतो ते सुद्धा तुझ्या आलिशान गाडीतून
आणि कॅमेरा समोर अन्याय झाल्याच्या बाता करतोस.
हराम्या! जेवताना फुरक्या मारत असताना एकदा तरी बालपण आठव.

घाणेरड्या मऊ खुर्चीत बसून ,
करायला काही नाही म्हणून
जाळपोळ करण्यासाठी जातीचा विषय शोधतोस ?
तुला माणसापेक्षा त्याची जात आधी कळली,
हराम्या! एकदा माणसाचा इतिहास वाचून बघ.

कोण कुठला तू अशिक्षित
म्हणे पुढारी,
एखाद्या जातीला माणूस विकायला निघालेला भिकारी आहेस तू
ग्लासात ओल्ड मॉंक सोड्यासोबत मिक्स करताना
रंगायला हवा असा माणुसकीचा जुगार मंडलायेस तू
हराम्या! एकदा क्रांतीचा अर्थ लक्षात घे.

कधी इकडे या जातीकडून
कधी तिकडे त्या जातीकडून
कधी या रंगाचा
कधी त्या रंगाचा,
कधी या टेबल वर
कधी त्या टेबल वर
हराम्या! चितेत जळणाऱ्या प्रेताच लाल रक्त दिसत नाही,
फक्त आग दिसते आणि मग राख हे लक्षात असू देत.

चल आता पळून दाखव या रस्त्यावरुन
तिकडे त्या जातीचे
इकडे या जातीचे
चारही बाजूला तू भडकवलेल्या आगीत शिजलेले प्रेतं दिसतील,
कावळ्यांच्या आणि गिधाडांच्या रांगा दिसतील
काळ्या धुराने सूर्यप्रकाश झाकला जाईल
तुला जात विचारल्याशिवाय आणि ती कळल्यावर मारल्याशिवाय ते सोडणार नाहीत
तेव्हा मात्र या भयानक स्वप्नातून बाहेर पाडण्यासाठी घाबरून त्यांना सांगू नकोस
हि प्रेत शिजवणारी आग तू लावली आहेस,
माणुसकी अशी आगीत भाजू नकोस,
हराम्या! माणुसकी मेल्या नंतर तुलाही कुणीच माणुसकी दाखवणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users