चार आनं ( सत्य घटनेवर आधारीत )

Submitted by स्वार on 1 January, 2018 - 11:06

कऱ्हेला पूर आला होता. आपल्या अंगाखाली दगडधोंडे घेत ती पुढे धावत होती. धावता धावता ते पाणी कऱ्हेचा काठ रूंदवीत हाेते.नेहमीपेक्षा अधिकच विस्तीर्ण तिचे पात्र झाले होते.गढूळ पाणी सारी नदी ढवळून पुढे वाहत होते. नदीच्या काठांवर करंज,शेवरींची दाट झाडे उभी होती. त्यांच्या फांद्या पुरातल्या पाण्यात हात बुडवीत होत्या. त्यामुळे फांद्यांना हेलकावे बसत होते.

पूर्वेला सूर्याने आपले रूप साकार केले होते. शुभ्र ढगांच्या पदरात तो गुरफटून गेला होता. त्यामुळे त्याची सोनेरी किरणे ढगांच्या उरात रूतली होती. ती धरतीवर उतरू शकली नव्हती. रात्रभर पावसाने झोडपलेली झाडे पावसाचे काही थेंब अंगावरती घेऊन वाऱ्यावरती मंद मंद झोके घेत होती. घरट्यांतली पाखरे चेकाळली होती. त्यांच्या मंजुळ सुरांनी वातावरण अनोख्या धुंदीने मोहरले होते. पाऊस पडून गेल्यामुळे सारे शिवार धुवून निघाले होते. वातावरणाला एक नवीन तजेला चढला होता.

माधू आपल्या रानातल्या विहीरीवर आला होता. तो अंघोळ करण्याआधी भरपूर व्यायाम करीत असे. त्याचा हा नियम सहसा तो चुकवीत नसे. म्हणूनच त्याची शरीरयष्टी पिळदार झाली होती. छाती रूंदावली होती. त्याच्या बाहूत अफाट ताकद होती. सारे शरीर पोलादा प्रमाणे दिसत होते. त्याने व्यायामासाठी अंगातील कपडे काढून तो लंगोटीवर व्यायाम करू लागला. बऱ्याच वेळानंतर त्याने आपला व्यायाम संपवला. व सवयी प्रमाणे त्याने आपला डावा दंड थोपटला. त्या आवाजाने ते शांत वातावरण थरथरलं. त्याच्या शेजारी उभे असलेले कुत्रे बिथरून वस्तीकडे पळाले. माधूने तशीच विहीरीत उडी मारली. तीन चार डुबक्या मारुन तो बाहेर आला.त्याने अंग पुसून कपडे अंगावरती चढवले. तो घराच्या दिशेने चालू लागला. काही अंतर चालून आल्यानंतर तो एकाएकी जागीच थबकला. त्याला गावातून लोकांचा गोंगाटा ऐकू आला. त्याने गावाच्या दिशेने आपली नजर फेकली. व तो कानांत प्राण आणून ऐकू लागला. पण ते पुसट होऊन येत असलेले शब्द कानांवर पडण्याआधीच विरून जात होते. तो काही क्षण त्याच अवस्थेत उभा राहीला. त्याचे कुतूहल जागे झाले. त्याने गावाकडे आपला मोर्चा वळवला. गाव त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर होते. तो ज्या वाटेने चालला होता ती एक पायवाट होती. ती पायवाट नाईक वस्तीतून पुढे एका ओढ्यात उतरून वाळुंज गावात जाऊन थांबली होती. माधू चालत चालत त्या पांदीतून वरती आला. काही वेळातच तो गावात शिरला. जिथून लोकांचा आवाज येत होता त्या दिशेने तो निघाला.तो लक्ष्मी आईच्या मंदिराजवळ येऊन थांबला. देवळापुढे पाच सहा झोपड्यांची दलित वस्ती होती. त्या झोपड्या कशातरी तग धरून उभ्या होत्या. रात्रीच्या पावसात त्यांचा कसातरी निभाव लागला होता.कोसळण्याच्या भितीपोटी कसातरी आपला जीव राखीत उभ्या होत्या. त्यांच्या शेजारूनच कऱ्हा वाहत होती. त्या पाण्यापुढे त्या झोपड्या फारच दुबळ्या वाटत होत्या. मंदिराच्या उजव्या बाजूच्या अंगाने कऱ्हा पुढे धावत होती. त्या ठिकाणी असलेल्या नदीच्या काठावर लोकांची गर्दी जमली होती. गावातील गडी माणसे,स्त्रिया, म्हातारी माणसे, लहान मुले तो पूर पाहत उभी होती. माधूही त्यांच्यात सामील झाला. व पुराच्या पाण्याची खोली डोळ्यांनी मोजू लागला.

शेजारीच गावातील काही गडी माणसे बोलत होती. माधूू त्यांचे बोलणे ऐकू लागला. त्यातला एकजण म्हणाला," यंदा लय पाणी आलंय नदीला". " व्हयं रं आता काय पाणी लवकर हाटत न्हाय". दुसरा म्हणाला. पहिला पुन्हा म्हणाला," आरं ह्या पुरात कोण उडी मारीन का रं?" लगेच दुसरा म्हणाला," पुरात कशाला कोण मरायला उडी मारतय?". मग पहिल्याला जोर चढला. तो पुन्हा चढत्या सुरात म्हणाला," ह्या पाण्यात कोण उडी मारीन त्याला माझ्याकडून 'चार आनं' बक्षीस." हे ऐकूण कोणीच काही बोलेना. त्या माणसांना चार आन्यापेक्षा आपला जीव लाखमोलाचा वाटत होता. क्षणभर तिथे शांतता पसरली. " मी हाय तयार " ती शांतता भंग करीत माधूचा आवाज आला. माधू त्याच्या समोर येऊन थांबला. तो अवाक् होऊन पाहतच राहिला. तो क्षणभर भांबावला व स्वत:ला सावरून म्हणाला," बरं बरं." माधूने अापल्या अंगावरील कपडे उतरवली. व तो लंगोटीवर उभा राहिला. तो थोडा पुढे आला. कऱ्हेला हात जोडून म्हणाला," हे कऱ्हामाय मी तुझ्याकडं येतोय, तुच मला आता सांभाळ " मागे न पाहता त्याने त्या पूरात उडी घेतली.काठावरील पाहणाऱ्या लोकांनी डोळे विस्फारले. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

माधू पूरात वाहत वाहत पुढे जाऊ लागला. काही पोरं नदी काठाने त्याला पाहण्यासाठी पुढे पळू लागली.पण त्यांच्या धावण्याच्या वेगा पेक्षा पूराच्या पाण्याचा प्रवाहाची गती जास्त होती. ते पाणी माधूला कुशीत घेऊन धावत होते. माधूही आपले हातपाय जोराने हालवीत होता. तो धावणाऱ्या पोरांपासून बराच दूर गेला. होता. तरीही काठावरल्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात होता. माधू वाहतच होता. त्याच्यापासून पुढे काही अंतरावर पाण्याचा एक मोठा भोवरा होता. काठावरल्या लोकांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यातील एक जण म्हणाला ," आता माधू काय वाचत न्हाय." दुसरा म्हणाला ," मला बी तसंच वाटतया." माधू त्या भोवऱ्यात सापडला. पण तो सावध होता. तीच संधी साधून त्याने नदीच्या दुसऱ्या बाजूला पोहण्यास सुरूवात केली. तो आता काठाने वाहत होता. करंजाच्या झाडांच्या फांद्या त्याला हात देऊ लागल्या. पण पाण्याच्या वेगामुळे माधूच्या हातून त्या फांद्या निसटून जात होत्या. तो वाहत असताना पुढे काही अंतरावर एक शेवरीचे झाड काठावर उभे होते. त्या झाडाची एक मोठी फांदी पूराच्या पाण्यात बुडाली होती. माधूचे लक्ष त्या फांदीकडे गेले. तो फांदीच्या दिशेने जाऊ लागला. तो फांदी जवळ आला. व त्याने त्या फांदीला घट्ट धरले. तो फांदीला धरूनच बाहेर आला. व जिंकल्याच्या अर्विभावात त्याने आपला डावा दंड थोपटला.त्याचे गाव एका काठावर राहिले. तो दुसऱ्या बाजूच्या काठाने वरती आला होता. आता पूर ओसरल्या शिवाय आपल्याला आपल्या गावात जाता येणार नाही हे त्याने जाणले. तिथूनच काही अंतरावर फुलेवाडी होती. त्या वाडीत माधूचे पाहुणे राहत होते. माधूने त्यांच्याकडे जाण्याचा विचार केला. व तो वाडीच्या दिशेने चालू लागला.थोडे पुढे आल्यानंतर तो एकाएकी जागीच थांबला. आपण फक्त लंगोटीवरच आहोत या विचाराने त्याचं काळीज ओशाळलं. पण त्याच्या डोळ्यांपुढे चार आने गिरकी घेऊ लागले. मग मनातला विचार झटकून तो फुलेवाडीची वाट चालू लागला.चालता चालता त्याच्या मनात ' चार आनं ' खणखणत होते.

Group content visibility: 
Use group defaults

कथा थोडक्यात छान जमली आहे.
नक्कि किती पैश्यासाठी अथवा किर्तीसाठी आपला जीव अथवा सर्वस्व पणाला लावावे हे कित्येकांना कळत नाही.
आपली फुशारकी कधी हास्यास्पदही ठरू शकते हे त्यांच्या गावीच नसते.