गजबजलेल्या आठवणी

Submitted by बेफ़िकीर on 31 December, 2017 - 02:13

(एका व्हॉट्स अ‍ॅप समुहावरील उपक्रमाचा भाग म्हणून लिहिलेली एक आठवण)

गजबजलेल्या आठवणी:
=================

बाबांची सायकल:

बाबांच्या सायकलवर बाबा मला डबलसीट घेऊन जायचे तो काळ माझ्या हृदयाच्या एका कप्प्यात केव्हाचा जपून ठेवला आहे मी! प्रत्येकाच्या मनात आयुष्यातील करोडो आठवणी असतात आणि त्यातल्या काही खास असतात. तशाच माझ्यासाठी खास असलेल्या अनंत आठवणींपैकी ही फारच खास!

माझे बाबा अतिशय साधे गृहस्थ! आज वयाच्या ८५ व्या वर्षाचे असतानाही देवदयेने सुदृढ आहेत ह्यामागे एकेकाळी काढलेले कष्टच आहेत असे मी मानतो. आजही ते नियमीतपणे भरपूर व्यायाम करतात व दिवसातून दोन वेळा चालायलाही जातात. त्यांची दिनचर्या आणि एकुण वर्तन पाहून मला माझी लाज वाटते हे सांगायची लाज वाटत नाही.

तर अशा माझ्या बाबांनी वयाच्या चोपन्नाव्या वर्षापर्यंत सायकल चालवली.

मी अगदी लहान असताना मला पुढच्या दांडीवर बसवून ते शाळेत सोडायला यायचे. मायबोलीवर लिहिलेल्या श्रीनिवास पेंढारकर - एक बाप मधील गट्टूच्या लहानपणीच्या कैक गोष्टी ह्या माझ्याच आहेत. अर्थात ती कथा पूर्ण वेगळी आहे. मी कधीच माझ्या बाबांना एकटे सोडले नाही आणि सोडणार नाही. तर मला पुढे बसवून ते नामस्मरण करत किंवा वेगवेगळी स्तोत्रे म्हणत जायचे. मग ती स्तोत्रे मलाही पाठ व्हायची. इतर मुलांचे वडील तुलनेने जरा पॉश किंवा मोठ्या नोकर्‍या करणारे असल्याची मला कधीच लाज वाटली नाही. बाबांच्या सायकलवर पुढे बसले की मागून त्यांचा होणारा स्पर्श जाणवून आणि आवाज ऐकून मला अगदी सुरक्षित वाटत असे.

एका मे महिन्याच्या सुट्टीत मला डेक्कन जिमखाना ग्राऊंडवर फुटबॉल खेळायला घातले. दुपारी चारला आई मला इतर मित्रांबरोबर बसमध्ये बसवून द्यायची. तेव्हाचे पुणे म्हणजे स्वर्गच. त्यात अतिशय सुरक्षितही होते. साडे चार ते सहा फुटबॉल खेळायचे सगळेजण! साधारण पावणे सहा वाजता प्रशिक्षक खेळ थांबवून सगळ्यांना रांगेत उभे करायचे. मग जन गण मन म्हंटले जायचे. तोवर माझी नजर मैदानाच्या एका कडेला सायकल घेऊन उभे राहिलेल्या बाबांवर खिळलेली असायची. जन गण मन संपले की सर्वच्या सर्व चाळीस मुले कुठेतरी एका दिशेने धावत सुटायची. मी बाबांच्या दिशेने धावत सुटायचो. मला कळायचेच नाही की मुले एकाच दिशेला कुठे धावतात आणि का! बाबा मला उचलून सायकलवर बसवायचे आणि एक्स्ट्रॉ स्ट्राँग नावाची एक गोळी खायला द्यायचे आणि म्हणायचे, खेळल्यावर लगेच पाणी पिऊ नये, पोट दुखते. मला राग यायचा. भयंकर तहान लागलेली असायची. पण मी गोळी चघळतच घरी पोचायचो. नंतर पाणी प्यायचो. एकदा बाबांना यायला पाच दहा मिनिटे उशीर झाला तेव्हा मलाही मुलांबरोबर त्या दिशेला धावावे लागले. मला हे माहीत नव्हते की मुले कुठे आणि का धावतात. पण जे काही असेल त्यात आपण मागे राहायला नको म्हणून मीहि धावलो. अर्थातच माझ्या धावण्यातला जोर इतर मुलांइतका नव्हता कारण का धावायचे हेच माहीत नव्हते. बघितले तर मैदानाच्या एका आड बाजूला एक पाण्याची टाकी होती आणि त्याच्या नळाला तोंड लावून पाणी पिण्यासाठी मुले धावत सुटली होती. बाबा आलेले नाहीत हे पाहून मीही मग पाणी प्यायलो. कदाचित बाबांची ती मी पहिली 'न ऐकलेली'गोष्ट असेल आयुष्यातील!

बाबांकडे डार्क हिरव्या रंगाची सायकल होती, कंपनीचे नांव आता आठवत नाही. एच ह्या अक्षरापासून होते. कदाचित हर्क्युलस होती. चांगली दणकट सायकल! सहाशे रुपयांची होती पण बाबा करत असलेल्या तीन नोकर्‍यांपैकी एका नोकरीतून आगाऊ रक्कम घेऊन ती हप्त्यावर घेतलेली होती. बाबांचा तेव्हाचा पगार ९२ रुपये होता. त्या सायकलचे सर्व्हिसिंग बाबाच करायचे. मीही मग सर्व्हिसिंग करायला शिकलो. एकदा चित्रशाळेपासून संध्याकाळी येत असताना मी असाच पुढे बसलेलो होतो आणि चुकून माझा पाय पुढच्या चाकात गेला. सायकल उलटी झाली आणि बाबा तोंडावर पडले. अर्थात मीही पडलोच. मी भयंकर रडत होतो पण ते घाबरून, कारण मला तसे काहीही झालेले नव्हते. बाबांना थोडेसे खरचटले. नेमके त्यांच्या ऑफिसमधील एक पारखी म्हणून तेथेच उभे होते त्यांनी आम्हाला सावरले. आम्ही पुन्हा पुढे निघालो. मी बाबांना चार चार वेळा विचारले की काही लागले आहे का! ते नाही नाही म्हणत राहिले आणि स्तोत्रे म्हणत राहिले. मला फार अपराधी वाटले होते. आजही वाटते. अजाणतेपणी माझ्यामुळे बाबांना झालेली ती कदाचित आजवरची एकमेव जखम असावी.

पुढे ती सायकल मी शिकू लागलो. मधून पाय घालून चालवू लागलो. बाबा लक्ष ठेवून असायचे.

पुढे मग मला स्पीडकिंग नावाची सायकल घेऊन देण्यात आली. तीवरून मी मित्रांबरोबर शाळेत जायचो आणि यायचो. बाबांच्या सायकलपासून काहीशी ताटातूट झाली. मी कॉलेजला गेलो आणि मला एम एटी घेऊन देण्यात आली तेव्हा पेट्रोल आठ रुपये लिटर होते. बाबांकडे मात्र एक लुना होती. सायकल आता सोसायटीतील पडीक सायकलींमध्ये दीनवाणेपणाने उभी असे. पुढे ती कधीतरी आमच्याकडे काम करणार्‍या बाईच्या नवर्‍याने किरकोळ किंमत देऊन विकत घेतली. एक नाते त्या दिवशी तुटले.

सायकल ही केवळ वस्तू! पण त्या सायकलवर बाबांबरोबरचा सहवास म्हणजे माझ्यासाठी माझ्यातला एका केव्हाच मेलेल्या निरागस व्यक्तीच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक आहे. मी आहे, बाबाही आहेत, सायकल आता नसेल. पण ती आठवण कधीच पुसली जाणार नाही.

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज वाचताना लिखाण ओघवते वाटले नाही. 'बाबांची सायकल' या विषयावर निबंध वाचतोय असे वाटले. (फारतर मोठ्या कॉलेजगोईंग मुलाने लिहिलेला)

तुम्हाला राग आला तर क्षमस्व. एरवीच्या तुमच्या लिखाणाची मी खूप चाहती आहे. एरवीचे तुमचे लेखन अतिशय ओघवते आणि एका वाक्यात दुसऱ्या वाक्याची साखळी गुंफल्यासारखे असते. आज मात्र ते तुटक वाटतेय.

{आज वाचताना लिखाण ओघवते वाटले नाही. 'बाबांची सायकल' या विषयावर निबंध वाचतोय असे वाटले. (फारतर मोठ्या कॉलेजगोईंग मुलाने लिहिलेला) }

+११

आमचे लाडके बेफिकीर तुम्हाला पुन्हा एकदा लवकरच सापडोत ही सदिच्छा. पुलेशु !!

लोकहो या भावनाप्रधान लेखाला तरी २ आकडी प्रतिसाद देऊन आपल्या लाडक्या लेखकाचा हुरूप वाढवावा ही नम्र विनंती.

आता हा लेख वाचत असताना एकीकडे टीवी वर सलील कुलकर्णी "दमलेल्या बाबाची कहाणी" ही कविता सादर करत होता.... घशात आंवढे गिळले....

खूप सुंदर लिहिले आहे. प्रत्येकाला अशा आठवणी असतात पण शब्दरूपात इतक्या छान व्यक्त करता येणे शक्य नाही.

खूप सुंदर लिहिले आहे. प्रत्येकाला अशा आठवणी असतात पण शब्दरूपात इतक्या छान व्यक्त करता येणे शक्य नाही.<<+१११

तुमच्या याआधीच्या लिखाणाप्रमएणेच हे देखील खूप सुंदर लिहिले आहे. आमचे लाडके बेफिकीर परत एकदा फूल फोर्समधे मायबोलीवर यावेत ही सदिच्चछा.

छान लेख !
माझे बाबा सायकलवर बसवून आठवडी बाजाराला घेऊन जात किंवा माझ्या वसतीगृहात सोडायला येत . ग्रामिण भागतले कच्चे रस्ते त्यात भरीला उलटे वारे . बाबांच्या अंगातले कपडे घामाने ओलेचिंब होत .

माझ्या आयुष्यातली दुसरी महत्वाची सायकल माझ्या मित्राने दिलेली जी त्याने मुंबई ते कन्याकुमारी प्रवासासाठी वापरली होती .

दोन्ही अतिशय हळव्या आठवणी जाग्या झाल्या.

धन्यवाद !

सुंदर लिहिलंय.
काही आठवणी मनावर कोरलेल्या रहातात.
मग कधी मधी अगदी लख्ख चित्र उभं रहातं.

अतिशय सुंदर आठवण.
पण फार लवकर आटोपती घेतलीत.
तुमच्या बाबांना भेटले असल्याने कल्पनेला चेहरा देऊ शकले.

अतिशय सुंदर आठवण.
पण फार लवकर आटोपती घेतलीत.
तुमच्या बाबांना भेटले असल्याने कल्पनेला चेहरा देऊ शकले.

सुंदर आठवण!
मुलांना सुखात ठेवण्यासाठी पालक किती कष्ट करतात, मुलांनीही अशीच त्यांची जाणीव ठेवावी!

छान आठवणी. बेफी इज बॅक. Happy
पूर्वीच्या काळी अशाच घरोघरी फक्त सायकलीच असत. आमच्या गल्लीत मारवाड्याची एखादी स्कुटर येत्जात असे.. आमचे आजोबा मला भाजीला जाताना सायकलवर घेऊन जायचे. मोठ्या पुलावरुन (खालून रेल्वे लाईन होती) जाताना गार वारे लागल्याने मला झोप येऊ लागायची अन मी त्यांच्या हातावर रेलायचे.. ते आठवले. नंतर पाचवी ते सतरावी भरपूर सायकल चालवली. Happy

छान आठवणी. बेफी इज बॅक. Happy
पूर्वीच्या काळी अशाच घरोघरी फक्त सायकलीच असत. आमच्या गल्लीत मारवाड्याची एखादी स्कुटर येत्जात असे.. आमचे आजोबा मला भाजीला जाताना सायकलवर घेऊन जायचे. मोठ्या पुलावरुन (खालून रेल्वे लाईन होती) जाताना गार वारे लागल्याने मला झोप येऊ लागायची अन मी त्यांच्या हातावर रेलायचे.. ते आठवले. नंतर पाचवी ते सतरावी भरपूर सायकल चालवली. Happy

बेफिकीर सर, खूप छान आठवणी. तेव्हा हर्क्युलसच असायच्या ना. माझ्या वडिलांची सुद्धा होती. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि : Lol

छान आठवण. बाबांसोबत सायकलवर बसून शाळेत जाण्याच्या आनंद मिही घेतला आहे. अजुनही त्या आठवणी मनात आहेत.