लगीनसराई

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 26 December, 2017 - 13:16

“आया लग्नोंका मौसम आया” म्हणत लगीनसराईचा सिझन आला. पुंग्यांना पुंग्या भिडल्या, रोज अलगअलग रंगांच्या, आकाराच्या पत्रिका मुंडावळे बांधून यायला लागल्या.

तशी आमच्या गल्लीत एकदम एकजुट. कुणाचं लग्न असो की तेरवीचा कार्यक्रम, सगळे झाडूनपुसून जेवायला हजर. ढेकर दिल्याशिवाय पानावरून उठणार नाहीत.

असंच एकदा नाऱ्याच्या चुलत मावसभावाचं लग्न होतं. त्यानं पन्नास पत्रिका शिल्लक छापून घेतल्या अन गल्लीतल्या प्रत्येकाच्या घरात जाऊन वाटल्या. वरून नाही आले तर उचलून नेइन अशी धमकीपण देऊन आला. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास असल्यावर कोण सोडणार लग्न.

लग्नाचा दिवस उजाडला. सकाळच्या दहा वाजता दोन जीपगाड्या कचाकच ब्रेक मारत नाऱ्याच्या दारात येऊन थांबल्या. काही चलाख बाया पळत आल्या अन पटापट जागा पकडून बसल्या. तरुण पोरांची फौज प्रत्येक घरात घुसली. त्यांनी म्हाताऱ्या-कोताऱ्यांना पिटाळून आणलं अन गाड्यांत बसवलं. उरलेल्या पन्नास साठ लोकांसाठी एक म्याट्याडोर बोलवण्यात आलं. वचावचा जेवतांना तोंडात अन्नाचा बोकणा भरल्या जावा तसं म्याट्याडोरमधल्यांकडं पाहून वाटत होतं.
एकदाचे पॅसेंजर भरले अन तिन्ही गाड्या सुरू झाल्या.
“गजानन महाराज की जय”
“रेणुका माता की जय” असे जयघोष घुमले अन तिन्ही गाड्या रस्त्याला लागल्या.

नाऱ्यानं सगळ्या तरुण पोरांना मुद्दाम मागं ठेवलं होतं.
काही दिवसांआधीच त्यानं सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर उधारीत घेतलं होतं.
गण्याच्या बोअरमध्ये पाईप खोचून त्यानं सर्रसर्र फवारे उडवत ट्रॅक्टरला आंघोळ घातली, नंतर चारीबाजूनं रिबिनी बांधून नव्या नवरीसारखं ट्रॅक्टर सजवलं.
तर अशा नवख्या ट्रॅक्टरवर नाऱ्याचे नवखे सवंगडी बसले. चकणा रूषा, बेरका हित्या, चाटाड्या चिक्या, आजा – विजा असे सगळे टारगट पोरं ट्रॅक्टरवर चढले. त्यांच्याकडं पाहून मोकाट नंदीबैलांचा बाजार भरल्यासारखं वाटत होतं अन गाडीच्या स्टेअरिंगवर होता हल्याबैल नाऱ्या. सगळं ट्रॅक्टर काठोकाठ भरलं अन चाबी फिरणार तेवढ्यात नेहमीच्याच स्टाईलनं बाल्या पळत आलं.
“सरका सरका मले जागा द्या थोडंशीक.” ते ट्रॉलीत चढता चढता बोललं.
“आता का मांडीवर बसतो आमच्या.” मोटा सुम्या चिडलं.
“मोट्या, चार जणायची जागा अडवून बसला तू . बारीक होय की जरा.”
“जमणार नाही. तू तुही झक मार.”
“राजूभाऊ, सरका की जरसक.”
“मुंगीले घुसायलेबीन जागा नाही.”
नाऱ्यानं खाली उडी मारली.
“बाल्या ले उशीर केला तू यायले म्हणून जागा उरली नाही. आता एक काम कर, हे पेट्रोलचे पैसे घे अन तुह्या हिरोहोंडावर ये.”
“नाही नाही मले तर तुमच्यासोबतच यायचय.”
नाऱ्यानं डोकं खाजवून जरा विचार केला.
“एकच ऑप्शन हाये गड्या.”
“कोणता ?”
“तुले चिमट्यावर बसून येणं पडल.”
तोंडाने उत्तर न देता बाल्या एखाद्या माकडाच्या शिताफीनं इंजिन अन ट्रॉलीले जोडणाऱ्या चिमट्यावर जाऊन बसला.

यक्षप्रश्न सोडवून नाऱ्या पुन्हा ड्रायव्हरच्या कापडी छताखाली जाऊन बसला. फटर्र फटर्र आवाज करत गाडी सुरू झाली, इंजिनानं जांभई देत धुरान्ड्यातून काळा ऊच्छवास बाहेर फेकला. गेअर पडताच चाकं फिरू लागले. पाठोपाठ टेपपण सूरु झाला. सनी अजयचे गाणे फुल्ल आवाजात वाजू लागले, त्याच्यापेक्षा जास्त जोरात पोट्टे बोंबलू लागले, काही बसल्याजागी आंग वाकडं करून नाचायला लागले. ही वरात गल्ल्यागुल्ल्या पार करत धावत होती. एखादी मिरवणूक चालली की दंगल सुरू झाली हे पहायला घरांतले लोकं पळत बाहेर येत होते, प्रेक्षक पाहून पोट्ट्यांना आजुन जोर चढत होता. गाडी हायवेला लागली अन नायगावच्या दिशेनं धावू लागली. हळूहळू ऊन तपायला लागलं अन बुडाला चटके बसू लागले. सगळ्यांच्या उत्साहाला थीगळ लागलं अन सारा बारदाणा शांत झाला.
एका तासाच्या आत नायगाव आलं. गाव येताच गुलाबाच्या ताटव्यांचा वास भक्कन नाकात घुसला.

लग्न होतं जिल्हा परिषदच्या शाळेत. सिमेंटच्या बुट्ट्या स्टेजवर दोन लाल गुबगुबीत खुर्च्या मांडलेल्या होत्या. लहान लेकरं त्याच्यावर इकडून तिकडं उड्या मारत होते. पाठीमागं थर्माकोलचे दोन दिल चिकटवले होते. एकावर गणेश, दुसऱ्यावर पल्लवी अन मधात स्वस्तिकचं चिन्ह. बाजूच्या ओट्यावर आंदणं मांडले होते. चमच्याच्या सेटपासून स्टिलच्या सोफ्यापर्यंत अन टिकटॉक घड्याळापासून ते फ्रिजपर्यंत सगळं. नवरीची मेकअप रूम तिच्या घरी होती तर नवरदेवाची ड्रेसींग रूम म्हणजे पारावरचं मारुतीचं मंदिर. तिथं पेशल गादी टाकून नवरदेव बसलेला. डोक्यावरचा पंखा भर्रभर्र हवा फेकत असलेला. चिल्लेपाल्ले असिस्टंट पाचपाच मिन्टानं सरबताचे ग्लास आणून बळजबरीने पाजत होते. मे महीना, आंघोळ नाही अन अंगावरचे जाडजूड कपडे. त्यातच लाईन गेली. नवरदेवाची भयाण तगमग सुरू झाली.
हित्या अन विजाला मात्र याचं काही सोयरसुतक नव्हतं. बाकीच्या पोरांना मंदिरात बसवून ते चुपचाप बाहेर सटकले अन नाऱ्याच्या गळ्यात हात टाकून गावाबाहेर पडले.
ते जे गायब झाले ते उगवले डायरेक्ट वरातीत. दोनदोन पेग मारून त्यांच्या बॅटऱ्या फुल्ल चार्ज झाल्या होत्या. गण्याला अजिबात ओळखत नसूनपण वरातीत ते दोघं चड्डीफाड नाचले. नागिनचं वर्डफेमस गाणं लागलं. हित्या बनला नागिन बनून जमिनीवर लोळायला लागला अन विजा रुमाल तोंडात पकडून बीन वाजवू लागला. "मै तुमसे मिलने आ जाऊ क्या अन वरून हलगी बजाऊ क्या" हे फेमस गाणं लागताच पोरांनी नवरदेवाला घोडीवरून खाली ओढलं. नवरदेव लाजतबुजत आला अन पोरांच्या गराड्यात येताच भन्नाट नाचायला लागला. काहीजणायनं नाचणं थांबवलं अन हाच नवरदेव आहे का एकदा पाहून घेतलं. कुठून कोण जाणे येडं गजा खिंकाळत आलं अन त्याचा फेटा उडवून पळून गेलं. तेव्हा कुठं गण्या भानावर आला अन इज्जत डोक्यात घालून घोडीवर उडी मारून बसला.
लग्न लागायचा वेळ झाला तरी कुणीच नाचायचं थांबत नव्हतं.

इकडं मंडपात लोकं वरातीची वाट पाहून कंटाळले होते. अक्षदा वाटणाऱ्या पोरांच्या चारचार चकरा झाल्या. त्यातले अर्धे तांदूळ – ज्वारी लोकांनी खाऊन टाकले. शेवटी एकदाची वरात मंडपात आली अन बँडच्या तालावर नवरदेव सिंहासनावर बसला. पाठोपाठ ‘बहारो फुल बरसावो’ गाणं लागलं. व्हिडिओ शूटिंगवाल्यांचे फोकस सुरू झाले, सगळ्या लोकांच्या नजरा पाठीमागं वळल्या. थोड्याच वेळात जमिनीवर नजर खिळवून अन डोक्यावरचा चांदण्यांचा पदर सावरत नवरी हळूहळू चालत आली. स्टेजवर चढून ती आल्लाद रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसली. नंतर सातआठ लोकल नेत्यायचे भाषणं झाले, लग्नाले येऊन उपकार केलेल्या पन्नाससाठ पाहुण्यायचे सत्कार झाले अन एकदाच्या मंगलाष्टका सुरू झाल्या.

तदैव लग्नम…..
सावधान सावधान सावधान
उरल्यासुरल्या सगळ्या अक्षदांचा पाऊस पडला.
बँड वाजला अन धडाम्म धूम, फटाक, ताड़ताड़ ताड़ताड़, सुई SS सुंग
फटाके फुटले.

ज्यांचे जेवणं झाले होते ते बाहेर पडले, ज्यांचे बाकी होते त्यांनी जागीच बुडं फिरवले अन जेवणाच्या पंगती तयार झाल्या. इकडं स्टेजवर आफ्टर मॅरेज सेरोमनी सुरू होते. नवरदेव गणेश टेलर बेरक्या नजरेचा. बाईकडं पाहून त्याला झंपराचं माप समजायचं, चेहरा पाहून उधार गिर्हाइक आहे का नगदी याचा अंदाज यायचा. त्यामुळं जस्ट मॅरीड बायकोची चुळबुळ त्याच्या सराईत नजरेतून सुटली नाही. मोठ्या बुडाच्या त्या खुर्चीचा एक तृतीयांश भागच तिने व्यापला होता. अन ती त्याच्यापासून सुतासुतानं दूर सरकत होती.

इकडं आधीच लग्न लागायला उशीर झाल्यामुळं नाऱ्या सगळ्या पोरांना जेवायला बसवत होता. येडं गजा मात्र स्टेजजवळ घुटमळत होतं.
“ये गजा, अरे चाल जेवायले.”
“आलोच पाच मिन्टात.”
“अरे बाबा जायचंये आपल्याले, चाल पटकन.”
“आलोच दोन मिन्टात.”

स्टेजवर फोटोसेशन सुरू झालं. रुपाली स्टुडीओवाले पोरं मॉडेलींग फोटोग्राफरसारखे तिरपे – तारपे फोटो घेत होते. स्टेजच्या या कोपऱ्यातून तर कधी त्या, कधी आंधनांच्या मधातल्या भोकातून तर कधी खुर्चीवर चढून फोटो घेत होते. झक्क पिवळ्या उजेडात सगळं भगभगत होतं.

हातात हात घ्या, काढला फोटो खिचीक.

खांद्यावर डोकं टेकवा… खिचीक.

हासा, आजुन हासा, फेट्याचं शेपूट नीट करा, पापणीवरची चमकी झटका, गळ्यात हात टाका...
गण्यानं अंमलबजावणी करायला जसा हात उचलला तशी नवरी नकळत दोन पावलं मागं सरकली. त्याच्या डोक्यात लगेच ट्युबलाईट पेटली. आत्ता आलो म्हणत त्यो फोटोग्राफरच्या मधातून वाट काढत घाईघाईत निघून गेला. काय झालं कोणालाच समजलं नाही. नवरी खुर्चीवर बसली. तेवढ्यात येडा गजा पटकन समोर आला अन नवरदेवाच्या खुर्चीवर बसला. दोघायचे खिचीक खिचीक फोटो निघले. नवरी बेडकासारखी उडी मारून उठून बसली. गजा मात्र मुक्या घोड्यासारखं खिंकाळत होतं.

“तुह्या मायला, चालतो का नाही जेवायले.” नाऱ्या पळत आला अन त्याले ओढत घेऊन गेला. थोड्या वेळात नवरदेव परत आला. घामाचा वास दाबणारा डिओड्रंट मारला होता. तिरप्या नजरेनं त्यानं नवरीकडं पाहलं… ती गालातल्या गालात मंद हसत होती.

सगळे पोरं रट्टावून जेवले अन नवरदेवाचा निरोप घेऊन ट्रॅक्टरजवळ आले. बाल्या सगळ्यांच्या आधी येऊन ट्रॉलीत जाऊन बसलं होतं. मोटा सुम्या ट्रॉलीत चढला अन त्याला आल्लाद उचलून चिमट्यावर बसवलं. मग सगळेजणं आपापल्या जागेवर जाऊन बसले. चुनातंबाखूच्या पुड्या बाहेर पडल्या. थंडीगार हवा सुटली होती, अर्धवट चांदणं पडलं होतं. घरी पोहचेस्तोवर आता फिकीर नव्हती.

नाऱ्यानं चाबी फिरवली अन गाडी सुरू केली, पाठोपाठ टेपपण चालू झाला. पण… हेडलाईट काही सुरू होईना.
इंजिन बंद करून तो खाली उतरला. पाहतो तर काय, दोन्ही हेडलाईट फुटलेले. कोण्यातरी बावंड्या पोरानं लाईट फोडले होते. आता करणार काय ? समोरचं तर काहीच दिसत नव्हतं.

“नाऱ्या, धकतो की नाही. का इथंच मुक्काम करायचा इरादा हाये.” हित्या झिंगलेल्या आवाजात ओरडला. अजून त्याची धुंदी पुर्णपणे उतरली नव्हती.

“फोकनीच्या, येऊन पाह्य जरा इकडं.”

हित्यानं राजाच्या मांडीवर पसरवलेल्या तंगड्या काढून घेतल्या अन बाजूच्या दोघांच्या खांद्यांवर हात दाबून उभा राहला. दोघंजण 'अयाय S' करत कळवळले. नंतर कुणाचा हात तर कुणाचा पाय चेचारत तो मागं गेला अन कसाबसा खाली उतरला.
नाऱ्या ट्रॅक्टरच्या समोरच डोक्याला हात लावून बसला होता.
“काय झालं बे ?”
“कोणंतरी लायटं फोल्डे.”
“च्या मायला, कोण हाये रे त्यो. कोणाच्या बापाचं मरण जवळ आलं. एकाची औलाद आसंल त समोर ये. ह्यो पठ्ठ्या तुले सोडणार न्हाई” हित्या झोकांड्या मारत ओरडला. प्रतिसादादाखल एक कुत्रं भुक्क करून हसलं.

गोंधळ ऐकून सगळ्या पोरांनी पटापट खाली उड्या मारल्या. कुत्रं भेदरून पळून गेलं. थोड्याच वेळात सगळ्यांना गंभीर परिस्थितीचा अंदाज आला.

“मायबाप पैदाच कशाले करतात अशा औलादी.” एकजण

“ते काट्टं सापडू दे फक्त. उचलू उचलू हाण्तो.” दुसरा

“आपलंच ट्रॅक्टर सापल्डं का काळतोंड्याले.” तिसरा

“त्यो सापडूस्तर मी फोटो काढून येऊ का ?” येडा गजा.

“अरे येड्यायहो, कोणं फोडला, कसा फोडला ते घाला चुलीत. आता घरी कसं जायचं याचा विचार करा.” नाऱ्या टायरावर बुक्की आदळत बोलला.

सगळ्या विद्वानांनी डोकं खाजवायला सुरुवात केली.
“मी काय म्हणतो, आपण मोबाईल टॉर्चच्या उजेडात जाऊ. मी मागून बरोब्बर फोकस मारतो.” राजा

“तू हागायले जरी गेला तरी किसान टॉर्च घेऊन जातो अन एवढं मोठी गाडी मोबाईलच्या उजेडात जाईल काय ?”
एकूण सभासद X ( खी: खी: खी )

“इथंच झोपू नाहीतर रात्रभर.” विजा

“चालतं न. मह्या सासऱ्याचा बंगलाच हाये इथं.”

“मायला हेबीन नाही अन तेबीन नाही. कराव तर काय कराव.”
सगळेजण पेचात पडले.

तेवढ्यात तिकडून संग्र्याची फटफटी आली अन करकचून ब्रेक मारत थांबली.
पुऱ्या गांधीनगरात संग्र्याची गाडी फेमस होती. हॅलेचा धूमकेतू अन हळू वेगात गाडी चालवणारा संग्र्या दिसणं मुश्किल. रात्रीच्या अंधारात अचानक एखादा ठिपका रस्त्यावरून गेला अन गायब झाला तर लोकं म्हणायचे संग्र्या गेला वाटतं. तर असा हा वेगबहाद्दर संग्र्या नाऱ्याजवळ येऊन थांबला. त्यानं परिस्थिती जाणली.
“नाऱ्या, दोनच्या ऐवजी एक लाईट आसला तर चालंल का ?”

“चालंल पण इथं कुठं बसवणार लाईट ?”

“हेपाह्य, माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन हाये. मी माझी दोनचाकी मी ट्रॅक्टरच्या पुढं हाणतो. त्या उजेडात तू चालव ट्रॅक्टर. एकदा का हायवे लागला की फ़िकिर नाही.”

नाऱ्यानं खिशातून तंबाखू काढली, मग चुना टाकून मळली.
“तुह्या गाडीचा फोकस बिकस तर बरा हाये न पण ?”

“बरा ??!!” संग्र्या खांदे उडवत खुदकुन हसला “तुह्या ट्रॅक्टरचा लाईट झक मारल. हे पाह्य.” त्यानं गाडी सुरू करून अॅक्सिलेटर पिळला. लांबपर्यंत फोकस गेला. टमरेल घेऊन बसलेलं एक म्हतारं दृष्टीक्षेपात आलं.

“बंद कर आलं लक्षात.”

“चालायचं का मग ?”

“बिलकुल.”

सगळे पोट्टे पटापट ट्रॉलीत बसले, टेप फुल्ल आवाजात सुरू झाला. संग्र्यानं किक मारली अन नाऱ्यानं चाबी फिरवली. पुन्हा बोंबलू लागले.
झालं. संग्र्या होंडावर, नाऱ्या महिंद्रावर. पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. संग्र्या काही सत्तर ऐंशीच्या खाली उतरायला तयार नव्हता अन ट्रॅक्टर कधी बापजन्मात पन्नासच्या पुढं जात नाही. संग्र्या चिंगाट पुढं पळायचं अन मग एखाद किलोमीटरवर जाऊन गाडी थांबवायचं. ट्रॅक्टर आलं की सॉरी सॉरी म्हणायचं अन पुन्हा गाडी दामटायचं. असं करता करता गाडी पेठच्या खतरनाक वळणावर येऊन पोहचली. संग्र्यानं शिताफीनं गाडी पुढं दामटली पण भरधाव वेगानं अंधारात चाचपडत येणाऱ्या नाऱ्याला काही ते वळण दिसलं नाही. ट्रॅक्टर सरळ समोर निघून गेलं. पण जसं त्याच्या लक्षात ते वळण आलं तसं त्यानं करकच्चून ब्रेक दाबला. जसा ब्रेक दाबला तसा भयानक आवाज आला अन मागची ट्रॉली नव्वदच्या कोनात गर्रकन फिरली. ट्रॉलीतले पोरं आल्लाद जागेवरुन उडले अन सुपरमॅन सारखे उडत लांबलांब जाऊन पडले. कोणी काट्याकुपाटीत तर कोणी पुलाखालच्या गटारात. सगळ्यांची नशा एका झटक्यात उतरली.

त्या भयानक आवाजानं सगळं गाव त्यादिशेनं धावत आलं, तोपर्यंत संग्र्यापण आला होता. सगळ्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. पुढचे आठ दिवस ते 'अयाय' करत कण्हारत पडले होते.

या घटनेनंतर आमच्या नगरातला माणूसच काय, साधं चिटपाखरूपण दुसऱ्याच्या लग्नांना गाड्याघोड्या करून जात नाही.

#######################

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं वाचताना डोळ्यासमोर येत होतं. एकच नंबर लिहिलंय.

लिहीत राहा. वाचायला जाम मजा आली. बोलीभाषेत केलेलं लिखाण जाम भिडून जातं मनाला. मग भाषा नागपुरी असो वा मालवणी (फक्त अजिबातच कळली नाही तर प्रॉब्लेम होतो). हे लिहिलेलं जाम मस्त आहे.

फक्त शेवट वाचून वाईट वाटलं उगाच. आधीचं सगळं वाचताना गालावर हसू आलेलं असतं आणि ते शेवटचा अपघात वाचून एकदम मावळल्यासारखं होतं. Sad
ज्याचा शेवट गोड ते सारे गोड या न्यायाने शेवट थोडा गोड करता येईल का? ते कायमचं अपंगत्व वगैरे फार वाईट वाटते वाचताना आणि सगळी गंमत जाते आत्तापर्यंत आलेली.

आपण मांडलेल्या मुद्द्यांवर विचार केला.
शेवटचं वर्णन थोडं soft केलंय.

अपघात पूर्णपणे टाळणं अवघड आहे, कारण theme अशी आहे की गाड्याघोड्या करून जाणाऱ्यांचं मतपरिवर्तन कुठल्या घटनेने झालं

मस्त वर्णन. संपुर्ण वाचताना हसु येत होतं.
शेवट वेगळा होता का? पण पियू म्हणते तसं असेल तर हाच शेवट चांगला आहे.

धन्यवाद सस्मित

शेवट असा होता :

>> उडला नाही फक्त बाल्या, कारण ट्रॅक्टरचा चिमटा जागीच त्याच्या मांडीत घुसला.
त्या भयानक आवाजानं सगळं गाव त्यादिशेनं धावत आलं, तोपर्यंत संग्र्यापण आला होता. सगळ्यायले दवाखान्यात नेलं. कोणाची पाठ सोलली तर कोणाचं तंगडं तुटलं, एकाचे दात पडले तर एकाचं होबाल्डं फुटलं. बाल्या तर चिमटा घुसल्यानं कायमचं लंगडं झालं. आजकाल ते वन फोर्थ कन्सेशनच्या पासवर बसमधून हिंडतांना दिसतं. नाऱ्यानं ट्रॅक्टर विकलं अन मंगरूळात हॉटेल टाकली.

या घटनेनंतर आमच्या नगरातला माणूसच काय, साधं चिटपाखरूपण दुसऱ्यायच्या लग्नांना गाड्याघोड्या करून जात नाही.

विनय.. आताचा सॉफ्ट शेवट छान आहे. माझ्या सूचनेचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. असेच लिहीत राहा. आम्ही वाचत राहू Happy

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 December, 2017 - 10:50> ओके.
पण आताचा शेवट चांगला आहे.
आय होप सत्यकथा नाही.

एक नंबर लिहिलंय !! मजा आली. Rofl

त्यानं गाडी सुरू करून अॅक्सिलेटर पिळला. लांबपर्यंत फोकस गेला. टमरेल घेऊन बसलेलं एक म्हतारं दृष्टीक्षेपात आलं.

>>> हा क्षण तर कसला पकडलाय! मान गए! Biggrin

आय होप सत्यकथा नाही.
>> सत्यकथा नाही म्हणता येणार, पण मॅटेडोरमधे बसून लग्नाला गेलेल्यांचे अपघात झालेले आहेत. बाकी वर्णन तर गावाकडच्या लग्नात अनुभवलेलं

घाबरत घाबरत वाचली.चिमट्यावर बसला वाचल्या पासून मनात वाईट शंका होतीच.बाय द वे चिमटा म्हणजे ट्रॅक्टर मेन ते ट्रॅक्टर ट्रॉली जोडणाऱ्या कपलिंग ला म्हणतात ना?

हो

काय्य झ्याक लिव्हलय. येकदम फस्टक्लास..
अख्खी ईस्टोरी शिनेमावाणी डोळ्याम्होरं आली बगा..>>>>सहमत
खूप छान लेखन

मस्त लिहीलीय.. Happy

तुमच्या आधीच्याही असल्या वर्णनबाज कथा आवडलेल्या.

शेवट बदलायचा सल्ला अचूक आणि आपण तो अमलात आणण्यातले स्पिरीट उत्तम ! Happy

Pages