डिजिटल डिटॉक्स

Submitted by मी_किशोरी on 19 December, 2017 - 00:13

सरत्या वर्षाला गुडबाय म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वचजण सज्ज झालो आहोत. नवीन वर्षात प्रवेश करताना आपण नेहमीच जग कसं आधीपेक्षा जास्त आधुनिक, प्रगत झालं, आपल्या वैयक्तिक आयुष्यात वर्षभरात काय गोष्टी घडल्या, किती प्रगती झाली इ. गोष्टींचा आढावा घेतो. उद्यम जगताच्या अशा आढाव्यामध्ये ज्या गोष्टींनी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट-परिणाम घडवला अश्या गोष्टी बघितल्या तर नक्कीच पहिल्या तीन गोष्टींपैकी एक असेल ती म्हणजे टेक्नॉलॉजी . टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपण कसे जास्त स्मार्ट झालो, जास्त वेगवान झालो, कंपनीज कशा जास्त उत्पादनक्षम झाल्या, टेक्नॉलॉजीमुळे किती वेळ, पैसा वाचला, खर्च कमी झाला, फायदा वाढला इ. गोष्टींचे मोठे विश्लेषणात्मक लेख तुम्ही वाचाल. खूप इम्प्रेसिव्ह, अतिशय प्रभावी असे नंबर्स, चार्ट्स, ग्राफ्स आणि तितक्याच प्रभावी प्रेझेंटेशन्सनी तुम्हाला पटवून दिले जाईल की टेक्नॉलॉजी आणि डिजिटायझेशन याच त्या दोन गोष्टी आहेत ज्या नवीन वर्षातही तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहेत, तुम्हाला दररोज अधिकाधिक चांगलं जगायला मदत करणार आहेत, तुमच्या आरोग्याची, स्वास्थ्याची, पैशांची, भविष्याची काळजी घेणार आहेत. याबरोबरच, सोशल मीडियामुळे आपण सगळे कसे अधिक जवळ आलो, किती गोष्टी सोप्या झाल्या, किती नवीन गोष्टी समजायला लागल्या या सगळ्याचाही पाढा वाचला जाईल.

पण या सगळ्याबरोबरच एक वेगळा सूरही ऐकू येतोय. अनेक लोकप्रिय होणाऱ्या बझवर्ड्समध्ये हाही एक शब्द ऐकायला यायला लागलाय, इतकेच नाही तर या शब्दाभोवती वलयही दिसायला लागलेय. लोक याबद्दल फक्त बोलतच नाहीयत तर काय करता येईल याचा विचारही करत आहेत आणि विचारांची अंमलबजावणीही. हा नवीन बझवर्ड आहे 'डिजिटल डिटॉक्स'. आणि २०१८ मधल्या टॉप बझवर्ड्सपैकी हा एक असणार आहे.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय आणि त्याची काय गरज आहे?

तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रॉफिट वाढवत आहे पण त्याचवेळी बेकारीपण वाढवत आहे. तंत्रज्ञान लोकांमधील विचाराची देवाणघेवाण वाढवतंय हे खरं आहे, त्याचवेळी द्वेषमूलक वक्तव्यही तितक्याच वेगाने पसरवत आहे. लोकांना जोडण्याचं काम तंत्रज्ञानाने खूप चांगल्याप्रकारे केलंय पण त्याचवेळी लोकांना खूप वेगाने एकमेकांपासून दूर घेऊन जाणारही तंत्रज्ञानच आहे. जुन्या मित्रांशी, जरा लांबच्या शेजाऱ्यांशीही आपण कनेक्टेड आहोत पण अगदी जवळच्यांशी तरी प्रत्यक्ष संपर्कात आहोत का, पूर्वी लोक जसे मनाने एकमेकांशी जोडलेले होते तसे आहोत का, हा एक मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या आरोग्यसेवा आपल्यासाठी सुलभ केल्या आहेत, आरोग्यतज्ञ आणि त्यांचे ज्ञान आपल्या दाराशी काय हातातच आणून ठेवले आहे, रोज आपल्यावर अनेक आरोग्यविषयक पोस्ट्सचा मारा होत आहे पण त्याचवेळी आपल्या आरोग्यावर दूरगामी वाईट परिणाम करणारे तंत्रज्ञानच आहे.

म्हणूनच या सगळ्या कॉन्स्टन्ट चेन्जपासून, स्थिर बदलापासून, सतत होणाऱ्या माहितीच्या माऱ्यापासून, सततच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीपासून ब्रेक घेण्याची, दूर जाण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि असे डिजिटल जगापासून दूर जाणे म्हणजे डिजिटल डिटॉक्स. डिजिटायझेशन मुळे आपल्या आयुष्यात निर्माण झालेल्या या विषारी परिणामांचा उपचार करणे म्हणजे डिजिटल डिटॉक्स.

डिजिटायझेशनचा खूप दूरगामी परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होत आहे. यामुळे, प्रत्येक दिवशी जो तोटा होत आहे तो न मोजता येणारा, रोजच्या रोज न जाणवणारा असला तरी तो तोटा होत आहे. आणि एकत्रितरित्या जेंव्हा तो कळतो तेंव्हा खूप मोठा तसेच इरिव्हर्सिबल म्हणजे कधीच भरून न निघणारा, कधीच आपल्याला मूळ परिस्थितीत जाऊ न देणारा असा आहे. आपल्या कार्यक्षमतेला कितीतरी टक्क्यांनी कमी करणारा आहे.

खूप मोठ्या प्रमाणावर झालेल्या डिजिटायजेशनचे दुष्परीणाम

• खूप लोकांना 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' झाला आहे, म्हणजे त्यांना फोनचा बझिंग आवाज ऐकू येतो, जाणवतो पण असा आवाज खरोखर नसतो, फोन खरोखर वाजत नसतो.
• आजची किशोरवयीन मुलं, ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत ती जास्त उदासीन झाली आहेत. त्यांची झोप कमी झालीय, हे अनेक संशोधनात्मक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालंय.
• FOMO - 'फिअर ऑफ मिसिंग आऊट' म्हणजे सतत जगात कुठेतरी काहीतरी महत्वाचं घडतंय आणि आपण ते मिस करतोय म्हणजे आपल्याला ते समजलं नाही तर काय, अशी चिंता प्रत्येकाच्या मनामध्ये व्यापून राहतेय.
• व्यावसायिक पातळीवर कामापासून क्षणाचीही सुटका अशक्य झाली आहे कारण आपला फोन एकसारखा कॉल्स, मेसेज, इमेल्स, मिटिंग अलर्टस, व्हाट्सअप मेसेजेस या सगळ्या द्वारे आपल्याला सतत कामाच्या विचारात ठेवत आहे.
• आपल्या मेंदूला शांतपणा, विश्रांती, रिफ्रेश होण्यासाठी आवश्यक असलेली झोप मिळेनाशी झाली आहे. अनेक लोकांचा ऑनलाईन असण्याचा कालावधी खूप वाढला आहे, झोपेचा वेळीही ते ऑनलाईन असतात, मेंदूतल्या कुठल्यातरी एका भागाला त्यासाठी जागेच राहावे लागते.

यामुळेच बऱ्याच 'डिजिटल डिटॉक्स' ट्रिप्सचे लोन हळूहळू सर्वत्र पसरत आहे आणि दिवसेंदिवस जास्त लोकप्रिय होत आहेत. डिजिटल डिटॉक्स ट्रिप्सचा मुख्य कन्सेप्ट आहे, कुठल्याही प्रकारच्या टेक्नॉलॉजीपासून आणि त्याच्या वापरापासून दूर राहणे. अशा प्रकारच्या ट्रिप्समध्ये तुम्हाला काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात. ते अशा प्रकारचे असतात.

१. कुठल्याही प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान तुम्हाला या ट्रीपच्या कालावधीत वापरता येत नाही.

२. हल्ली जिथे जिथे वर्किंग प्रोफ़ेशनल्स, व्यावसायिक लोक एकत्र येतात, अशा प्रसंगांना नेटवर्किंग करण्याची संधी मानलं जात म्हणजे व्यावसायिक ओळखी वाढवण्याची संधी. पण डिटॉक्स ट्रिप्समध्ये व्यावसायिक गोष्टींवर बोलायला, एकमेकांशी शेअर करायला परवानगी नसते. याउलट व्यक्तिगत पातळीवर मैत्री, कौटुंबिक नाती यांना काही हरकत नसते.

३. तुम्ही तुमचा फोन या ट्रीपवर घेऊन जाऊ शकत नाही. घेऊन गेलाच तर तो ट्रिपच्या सुरवातीला, ट्रिपच्या व्यवस्थापकाच्या ताब्यात द्यावा लागतो. लॅपटॉप, इंटरनेट किंवा अजून इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सना परवानगी नसते.

४. या ट्रिपच्या काळात घड्याळ आणि वेळ यांच्याशी असलेली तुमची बांधिलकी दूर ठेवण्यासाठी,तुम्हाला घड्याळ वापरायला परवानगी नसते.

५. सर्व प्रकारचा ताणतणाव, चिंता, काळज्या, भीती विशेषतः FOMO Fear of Missing Out या सर्व प्रकारांपासून तुम्ही दूर राहावे असे प्रयत्न आणि अपेक्षा असतात.

अशा प्रकारच्या ट्रिपवर तुम्ही स्वतः आपला आपला प्लॅन घेऊन, कुठे - केंव्हा - कसे हे सगळे ठरवून जाऊ शकता. तुम्हाला एखाद्या व्यावसाईक ऑर्गनाईजर बरोबरच गेले पाहिजे असे नाही. फक्त जेंव्हा तुम्ही एखाद्या ग्रुपबरोबर असता आणि सगळ्यांचेच लक्ष्य 'डिजिटल डिटॉक्स' हेच असते , तेंव्हा तुम्ही यामध्ये यशस्वी होण्याची जास्त खात्री असते. व्यावसाईक ऑर्गनाईजर तुम्हाला शांत, जगरहाटीपासून दूर असे ठिकाण, राहण्याची व्यवस्था पुरवतो, मार्गदर्शनाखाली योगा - ध्यान - प्राणायाम यांची सोय करतो. योगा किंवा इतर प्रकारचे व्यायाम करण्याची व्यवस्था तिथे असते. आरोग्यदायी जेवणाखाण्याची व्यवस्था असते आणि या सगळ्याबरोबरच ज्यामुळे तुम्ही अधिकाधिक मानसिक आराम करून, रिलॅक्स होऊ शकाल अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आयोजित केलेल्या असतात. डिजिटल डिटॉक्स होण्यासाठी, तुमचे मन त्या विशिष्ट अवस्थेमध्ये जाण्यासाठी, चर्चा करून तुम्ही काय 'बेस्ट प्रॅक्टिसेस' अनुसराव्यात हे तुम्हाला सांगितले जाते, मार्गदर्शन केले जाते.

अशा प्रकारच्या ट्रिप्सवर जाऊन आलेल्या लोकांनी, त्यांना झालेल्या फायद्यांमध्ये आरोग्यात सुधारणा, मनःशांती, सर्जनशीलता वाढल्याचे सांगितले आहे, त्याचबरोबर आपली कार्यक्षमता वाढल्याचेही नमूद केले आहे.

मित्रांनो अजूनतरी भारतात या प्रकारच्या ट्रिप्सबद्दल ऐकायला, वाचायला मिळाले नाही. कदाचित आपल्या ट्रॅव्हल एजन्सीज आता या विषयावर कामही करत असतील आणि लवकरच आपल्याला अशा जाहिराती दिसतील. पण मित्रांनो दररोज नवनवीन टेक्नॉलॉजीजचे पेव फुटत असताना, सभोवती आणि विशेषतः आपल्या मोबाईलमध्ये माहितीचा महापूर आलेला असताना, आपण तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर, मनावर दृश्य स्वरूपात दिसेपर्यंत आणि ट्रॅव्हल एजन्सीज आपल्यापर्यंत अशी ट्रिप घेऊन येईपर्यंत आपण वाट पाहायची का? आपल्या रोजच्या आयुष्यात आपण स्वतःसाठी काही साधी पथ्ये ठरवली आणि पाळली तर? याविषयीच्या टिप्स इथे लिहायची खरंच गरज आहे?

unplug.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आयडीया आहे.
सेफ्टी/चुकामूक हे मुद्दे डिटॉक्स टुर ऑर्गनायझर हँडल करत असतीलच.

करत असावेत. ट्रिप बुक करण्याआधीच शंकानिरसन करून घेतलेलं बरं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हा पण लेख छानच आहे. रोज कुत्र्याबरोबर एक दोन तास फिरले म्हणजे हे डिजिटल लोच्या होत नाही डोके जाग्यावर राहते असे माझे निरीक्षण आहे.

अरे वा. उत्तम लेख.

मी 'आजीचं घर' या संकल्पनेवर एका टूरकंपनीसाठी काम करत आहे. त्यात हा डिजिटल डिटॉक्सचा अंतर्भाव केलेला आहे. इतकंच नव्हे तर अगदी १०० वर्षांआधी असलेल्या खेड्यांतल्या परिस्थितीत २ दिवस पूर्ण घालवावे असं आयोजन आहे. यात संपर्कसाधने तर नाहीतच, तसेच आधुनिक कुठलीही उपकरणे नाहीत, वीजेवर चालणारी वगैरे. जेवणसुद्धा त्याच शेतातल्या भाज्यांपासून आधुनिक साधने न वापरता जुन्या पद्धतीने बनवलेले. ही शेतं जवळपास पाण्याचे स्रोत असलेली असतील. कुठलाही आधुनिक स्पर्श न लागू देता हे दोन दिवस घालवायचे असा प्लान आहे. ऐषोआरामाची आणि हाक मारल्यावर कॉलबॉय हजर झाला पाहिजे अशी सवय असणार्‍यांना कदाचित आवडणार नाही. कारण बरीच स्वावलंबी ट्रीप असणार आहे. बघूया कितपत प्रतिसाद मिळतो ते.

राजसी, ते एकाच ठिकाणी आहे व निसर्गोपचार केंद्राची इमेज वेगळी पडते. आम्ही जे प्लान करत आहोत त्यात मुंबईपासून दोनशे कीमी च्या रेडियसमध्ये असलेल्या व चांगले रस्ते असलेल्या किमान १००-१५० गावातल्या शेतकर्‍यांची शेतं आहेत. जिथे एका वेळेला एकच गृप असेल, शक्यतो फॅमिली. चार ते आठ जणांची. एक्स्क्लुजिव एक्स्पिरीयंस. फॅमिली बाँडींग वगैरे वगैरे.

मुंबैतल्या ज्यांची स्वतःची घरं गावाखेड्यात आहेत ते आमचे टार्गेट कस्टमर नाहीत. ते त्यांचं त्याचं जाऊन राहू शकतात. Happy

नानाकळा मस्त कल्पना आहे. जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा अधिक माहिती द्या प्लीज. म्हणजे बुकींग कसे करायचे? लहान मुले असली तर चालतील का? वगैरे

असं "कोल्ड टर्की" जाणे (एका झटक्यात वापर बंद करणे) प्रत्येकाला जमेल असे नाही. वाहन चालवताना, वर्गात, रेस्टॉरंट, प्रार्थना मंदिरे इ. अशा काही जागी वापर करायचा नाही अशी सुरूवात जमण्याजोगी आहे.

डिजिटल डिटॉक्स म्हणून पुस्तके वाचण्याचा फायदा होउ शकतो का. खरि पुस्तकं, ई रिडर किंवा टेब्लेट, मोबाईल वर नव्हे. कारण आपण म्हणताय त्या प्रकारच्या टुर्स या वर्षाकाठी एक किंवा दोन वेळा शक्य आहेत. पण पुस्तक वाचन, मुलांनबरोबर चित्रकला या गोष्टी आठवड्यात एक दोन वेळा करता येउ शकतात. Jogging, walk ला जाताना किंवा gym मध्ये सुध्दा पूर्ण पणे डिस्कनेक्ट होता येत नाही, कारण फोन वर संगीत ऐकणे, फिड्स चेक करणे हे होतेच।

{अशा प्रकारच्या ट्रिप्सवर जाऊन आलेल्या लोकांनी, त्यांना झालेल्या फायद्यांमध्ये आरोग्यात सुधारणा, मनःशांती, सर्जनशीलता वाढल्याचे सांगितले आहे, त्याचबरोबर आपली कार्यक्षमता वाढल्याचेही नमूद केले आहे. }

प्लासेबो? स्तोत्रपठन करून देखील लोकांना हेच रिझल्ट्स मिळाल्याचे दावे ऐकायला मिळतात.

नानकळा, संकल्पना छान आहे. अगदी १०० वर्षे नाही तर २०, ३० वर्षे आधीचं वातावरण सुद्धा पुरेसं होईल.

नॅन्क्स, Chaitrali - धन्यवाद.

सीमंतिनी, बन्नु - अगदी खरंय तुमचं म्हणणं. रोजच्या जीवनात जेवढे शक्य होईल तेवढे आपण स्वतःला डिजिटल डिटॉक्स केले पाहिजे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

छान लेख सुंदर कल्पना...

आता ज्यांची वयाची तिशी पस्तिशी पार पडली आहे त्यांच्या लहानपणी हे काही नव्हते. पण त्याशिवाय देखील आपण जगलो आहोत हेच मुळात ते विसरून गेले आहेत.
येणारया पिढीला लहानपणापासूनच हातात टॅब मोबाईल आहे. त्यांचे तर पुढे आणखी अवघड होईल.
मला तर भिती आहे की एखाद्याचे गॅझेटस तुम्ही दोन दिवस काढून घेतले तर अचानक तिसरे दिवशी त्याच्या मेंदूला हे सहन न झाल्याने त्याला वेडाचा झटका तर नाही ना येणार..

सकाळी वा संध्याकाळी वॉल्कला जाताना, वा जिमला जाताना, वा मार्केटमध्ये एखादा फेरफटका मारायला जाताना तुम्ही मोबाईल सोबत नेत नसाल पण घरी आल्यावर तो आठवणीने चेक करत असाल तर काही फायदा नाही. कारण तुम्ही त्याला सतत डोक्यात घेऊन असतात. या मेंटल फेजपासून बाहेर यायला हवे. फिरायला जाताना फोन सोबत न्या आणि त्या तास दोन तासात त्याला उघडूनही बघू नका. आणि हे कष्ट न घेता सवयीने होऊ द्या. तर तुम्हाला ते जमले. पण फोनची बॅटरी लो झालीय आणि चार्जर जवळ नाही, म्हणजे प्राणवायूच संपला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर अवघड आहे.

आधी माझेही असे व्हायचे. ऑफिसमधून बाहेर पडताना मोबाईल बॅटरी क्रिटीकली लो दिसली तर माझ्या डोक्याला शॉट लागायचा की आता घरापर्यण्तचा अर्धापाऊण तासाचा प्रवास मोबाईलशिवाय कसा होणार. पण काही बिनबॅटरीचे प्रवास आणखी मजा देऊन गेले हे मला समजले तसे हल्ली मी खिश्यात बॅटरी संपलेला स्विचऑफ मोबाईल घेऊन फिरणे एंजॉय करतो. हळूहळू हा पिरीअड वाढवत नेला की आपले आपल्यालाच समजते की आपल्यावाचून जगाचे अडत नाही की तिथे काय चाललेय हे न समजल्याने आपले काही अडत नाही.

लेख मस्त आहे आणि ती डीटॉक्स कल्पना पण आवडली. एक शंका वाटते की अश्या ट्रिपला जाऊन 'आपण कनेक्टेड नाही' या विचारात (आणि चिंतेत) सगळा वेळ जात असेल काय?

डिजिटल डिटॉक्स>> फोन न घेता ५ वर्षापुर्वी ३० दिवस युरोप मध्ये फॅमिली सकट फिरलो होतो. हॉटेल, ट्रेन तिकिट आधीच बुक केले होते. पण कधीच कनेक्टेड नाही असे वाटले नाही. एक आय पॅड घेउन गेलो होतो जो दिवसभर हॉटेल मधेच असायचा. आई-वडलाना emergency मध्ये ईमेल करायला सांगितले होते पण तशी वेळ आली नाही. रस्ता जर कळला नाही तर रस्तावर लोकाना विचारल्यास ते मदत करतात. कुठे फिरायचे त्याचा प्रिंट घेतल्या होत्या. सकाळी हॉटेल मध्ये त्याबद्दल विचारुन थोडाफार बदल केला जात होता.

मागच्याच वर्षी फोन न वापरता खिशात ठेउन १० दिवस कॅली - नवाडा - अ‍ॅरिझोना टुर केली. फोन फक्त सेल्फी काढण्यासाठी होता . सगळे हॉटेल आधीच बुक केले होते. कुठे जायचे त्याचा प्रिंट होत्या. AT&T चा $२ per call without cellular चा प्लॅन घेतला होता ज्यावर वडिल emergency मध्ये फोन करु शकले असते पण त्याची गरज नाही पडली. गाडीत गारमिन चे GPS होते आणि गाणी ऐकण्यासाठी CD घेउन गेलो होतो. पुर्ण ट्रीप मध्ये फोन वर एकही कॉल झाला नाही की डेटा वापरला गेला.

ह्या दोन्ही ट्रीप मध्ये पुर्ण फॅमिलीनी भरपुर मजा केली. एकमेकाचे संवाद वाढले. घरी मात्र असे बंधन पाळले जात नाही. आता तर रिलायन्स नी सगळ्याना २४ तास कनेक्टेड करुन ठेवले आहे. Uhoh

माझी अवस्था डिजिटल डिटॉक्स पेक्षा पुढचीच आहे. लोक वापरतात ती सिस्टिम मी मेंटेन करते त्यामुळे कंप्यु टरच्या आत राहणा रे व्यक्तिमत्व!!! फोन कधीच बंद करत नाही रात्री २ वाजता अपडेट होतात तेव्हा फक्त एक मिनिट. पण ह्या सर्वातून दूर राहायला मी रोज घरीआल्यावर फोन चार्जिंगला लावून एक तास बघत नाही. त्या वेळात सीरीअल्स बघते. वीकांताला खडे मण्यांची ज्वेलरी बन वते. फ्रॉम स्क्रॅच. वॉकला जाताना शक्यतो गाणी ऐकत नाही. स्वयंपाक करते तेव्हा एफ एम रेडिओ ऐकते. रेसीपी नेट वर बघावी लागत नाही. तशी ग रज असेल तर आधी बघून मग फोन बाजूला ठेवून काम करते. घरकाम करताना पण नेट व फोन पासून दूर.

हार्ड कॉपी पुस्तके वाचते पण प्रमाण कमी होत चालले आहे. एक तर गुगल बुक वरून डाउन्लोड करणॅ व मोठा साइज करून वाचणे जास्त सोपे आहे. दिवाळी अंक आता बंदच करणार. नीट वाचता येत नाहीत.
मला डिजिटल बॅलन्स सापडला आहे.

डिजिटल डीटॉक्स! छान कल्पना आहे.
नाताळच्या सुटीत कुटुंबासह गावी जाणार आहे. तेव्हा ट्राय करुन बघायचा विचार करते.

सस्मित, धन्यवाद .
नंतर, तुमचा नाताळचा अनुभव जरूर सांगा आम्हा सर्वांना .

उत्तम संकल्पना...
एक अनुभव शेअर करतो... आम्ही सुट्टीवर आलो की मुंबईला असलेल्या आई-वडिलांसहित सर्वजण कोकणातल्या गावी जातो. तिथे अगदीच डिस्कनेक्टेड नसलो तरीही नो इंटरनेट, नो वॉट्सअप... फोन असतो.. पण तो बायकोच्या माहेरून आला तरच किंवा मामा मावश्यांपैकी कोणीतरी केला तरच.. किंवा मग तशीच काही गरज आम्ही कोणाला तरी केला तर... टीव्ही आहे पण तो ही बातम्या किंवा क्रिकेट करता लावला तर तेसुद्धा संध्याकाळी....
दिवसभर आंब्याच्या-नारळाच्या बागेत काम करताना निसर्गाच्या सानिध्यात बाहेरच्या जगाशी संपर्क नसला तरीही फारसे बिघडत नाही. किंबहुना या सर्वांची आठवणही येत नाही. गावातून यात-जात बऱ्याच जणांशी संवाद होतो. वेळेवर जेवण होते.. झोप होते.. आणि सकाळी वेळेवर उठणेही...
ऋन्मेऽऽष यांचा हा मुद्दा नक्कीच पटला की या आधी आमच्या लहानपणी यातले काहीच नव्हते.. त्यामुळे अशा वातावरणातही लोकांचे आयुष्य पुढे सरकत होते... शहरातून गावी पत्रव्यवहार होत असत.. याचा अर्थ असा नव्हे की प्रगती होऊच नये... पण आजकाल आपण आणि नवीन पिढीने आहारी जाऊ नये..
दुष्परिणाम लेखात आधीच नमूद केलेले आहेतच....

उनाड पप्पू , अनुभव शेअर केल्याबद्दल थँक्स .
कोकणात गाव असणे ही किती छान उपलब्धी आहे!!

डिजिटल डिटॉक्स - काळाची गरज.
दोन वर्षांपूर्वी मुलाची मुंज, कोकणात जाऊन केली. तिथे नेटवर्क नाही. गरज पडल्यास, landline फोन.
८०-९० लोकं, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी. एवढ्या लोकांमध्ये कोणीही नेटवर्क नसल्याची तक्रार केली नाही. किंबहुना सगळे नुसतेच उपस्थित नसून, सोहळ्यामध्ये संपूर्णपणे सहभागी होते. मग अश्या सोहळ्याची मजा वेगळीच. नाहीतर आजकाल लग्नमुंजीमध्ये नावाला उपस्थिती असते, पण जो तो स्वतःच्या फोनमध्येच असतो.

Pages