' किमयागार'

Submitted by मकरन्द वळे on 15 December, 2017 - 04:39

कधी पर्णहिन शिशिर तर कधी वसंत हिरवागार
तूच निर्मिसी हिमालय कधी ज्वालामुखी अंगार
अथांगशा त्या आभाळाचा लिलया वाहसी भार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
-----१
विविधता अगणित दाविते तव सर्जन आविष्कार
पठार पर्वत, खोल दरी कुठे जमीन काळीशार
जलधी ,प्रपात , सरिता अन् कधी पर्जन्याची धार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
------२
कुणास देसी रंग मनोहर, कुणा कंठी तान सुस्वर
कुणास शिंगे, कुणास शुंडा, शेपूट झुपकेदार
कुणा सुळे अन् कुणा खुर , कुणा विषारी फुत्कार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
-------३
रंगोत्सव पु्ष्पांचे भरले इंद्रधनु धरेवरी सांडले
परिमल त्यांचे मंद मोहक लाघवी अलवार
तयात भरीसी मकरंदाचे मधुघट अपरंपार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
-------४
नभांगणाचा दिव्य पसारा, धुमकेतुचा फुले पिसारा
नक्षत्रांची तेजोधारा, आकाशगंगा मिरवी तोरा,
अगणित ग्रहतार्यांची ना कोणी मोजदाद करणार
तू अगाध किमयागार ईश्वरा अगाध किमयागार
-------५
अ कारातून तुच दिधला जिवसृष्टीस आकार
ऊ कारातुन तुच जाहला त्यांचा पालनहार
म कारातुन लयास नेसी चराचर साकार
तू अगाध किमयागार ईश्वरा तुच रे ॐकार
--------६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !