Be पॉझिटिव!

Submitted by अँड. हरिदास on 14 December, 2017 - 22:25

Be पॉझिटिव!
परवा कामानिमित्त औरंगाबादला गेलो असता एका जुन्या मित्राची भेट झाली..कॉलेजला असताना आपल्या हरहुन्नरी स्वभावामुळे कायम चर्चेत राहणार 'तो' आज पूर्णपणे बदलला होता.. चेहरा पूर्ण टेन्शन ने भरलेला.. त्याच्या वागण्यात निराशा, बोलण्यात निराशा.. त्याचा जीवनाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला होता.. त्याच्याशी झालेल्या (नकारात्मक) चर्चेतून मला ही माझ्यासोवर दुःखाचा डोंगर असल्यासारखे वाटू लागले. विचार करत असताना नकरात्मकतेने मनात घर केले..अन विचारांचे घोडे चोफेर उधळलले गेले. समोर असलेले प्रश्न, जबाबदाऱ्या, अडचणी झर्रकन डोळ्यासमोर येऊ लागल्या.. मनावर दडपण आल्यासारखं झालं, आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला.. ज्या गोष्टीकडे आपण सकारत्मक दृष्टिकोनातून पाहून आनंद घेत होतो. त्याकडे नकरात्मकतेने पाहिले कि सर्व कसं कठीण होऊन जातं याचा अनुभव क्षणात येऊन गेला..' आपण जसं जीवनाकडे पाहतो, जीवन तसंच होऊन जातं ' या वाक्याची अनुभूती आली. आणि, नैराश्याच्या कारणांचा शोध सुरु झाला.

डिप्रेशन अर्थात नैराश्य म्हणजे नेमकं काय? याची तात्त्विक व्याख्या करता येत नाही, पण मनाची उदासीन अवस्था म्हणजे निराशा, अशी याची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. कोणतंही काम करावंसं न वाटणं, दु:खी असणं, सतत काळजी, चिडचिड करणं, स्वत:ला दोषी समजणं, दैनंदिन कामात अजिबात रस नसणं म्हणजे डिप्रेशन येणं होय. दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे हे डिप्रेशन माणसाच्या आयुष्यात डोकावू लागलं आहे. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते. ज्यांची मनोवृत्ती तग धरण्याची, लढण्याची असते, मनात आत्मविश्वास असतो; त्यांना अशावेळी तरून जाता येते. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांचे मन कच खाते. कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहानसहान वाटणा-या गोष्टींमुळे कित्येक जण नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. त्यांची आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलून जाते. हे असे का होते?? यामागे आर्थिक समस्या, बेकारी, वैयक्तिक स्तरावर येणारं यशापयश, आर्थिक नुकसान, जोडीदाराचा वियोग, घटस्फोट आदी जी असंख्य कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे नकरात्मकता..

नकारात्मक विचार आपल्याला निराशेच्या गर्तेत घेऊन जातात. तर सकारात्मक विचारांची शक्ती आपल्या जीवनाला नवी ओळख निर्माण करून देते. खळखळणाऱ्या नदीच्या प्रवाहमार्गात अनेक खड्डे येतात, म्हणून तो प्रवाह थांबत नाही. तर ते खड्डे भरून तो आपला प्रवास निरंतर सुरु ठेवतो. हे नदीचं वाहणार पाणी आपल्याला साकारत्मकता शिकवीत असते. माणसाच्या आयुष्यातही अनेक चढउतार येतात, त्याने विचलित व्हायचं नसत तर आपला प्रवास नदीच्या पाण्यासारखा अविरत सुरु ठेवायचा असतो. त्यासाठी आपले विचार सकारत्मक असले पाहिजे. विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं..माणूस स्वतः ला दुबळा समजू लागला कि त्याच्या मनात नकारात्मक विचार सुरु होतात. त्यामुळे आपल्याला हवे तसे कमी आणि नको तसे जास्त घडताना दिसते. असे का होत असावे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनातला आहे.

मध्यंतरी एक कीर्तन ऐकण्यात आलं. त्यात, कीर्तनकाराने नैराश्य बीज उत्पत्तीचं सुदर विवेंचंन केलं होत. आपण सर्वात जास्त विचार कश्याचा करतो? जे आपल्याला हवे आहे त्याचा, कि जे नको त्याचा? साधं उदाहरण आहे.. आपण बस पकडायला चाललो तर पहिला विचार 'बहुतेक भेटणार नाही आता..!!' असाच येतो. एकाद्या उंच डोंगरकड्यावर चढलो आणि खाली पाहिले कि 'इथून पडलो तर!!' असा विचार गरज नसताना बहुतेकांच्या मनात डोकावतो. अर्थात, अशा विचारांची काही गरज आहे का? पण ते माणसाच्या मनात उत्पन्न होतात आणि त्यामुळे मानवाची सकरात्मक ऊर्जा खर्च होते. यासाठी एक सोप्प उदाहरण अजून..पावसात भिजल्यावर सर्दी होते. पण, प्रत्येक वेळी ओले झाल्यावर आपल्याला सर्दी होते का? नाही ना..मग, केंव्हा होते? तर, ज्या दिवशी आपण पावसात भिजलो आणि, 'आता मला सर्दी होणार!!'..असा विचार मनात आला, कि सर्दी हमखास होते. कारण, पावसात भिजल्याने होणाऱ्या सर्दीला जी प्रतिबंधात्मक ऊर्जा होती, ती आपल्या नकारात्मक विचाराने नष्ट केली. नकरात्मकता माणसाची ऊर्जा कमी करते, हे सत्य मानसशास्त्र सुद्धा मान्य करते. शिवाय हे अनुभवनही फार सोपं आहे.. आपण एखादं महत्वपूर्ण काम करण्यासाठी निघालो आहोत, आणि सातत्याने आपल्या मनात नकारात्मक विचार सुरु असतील. तर त्याचा परिणाम बहुतांशवेळा त्या कामावर होताना दिसतो. असंच एकदा महतवाच्या युक्तिवादासाठी न्यायालयात गेलो असतानाचा अनुभव आहे..विरोधी पक्षाचा युक्तिवाद सुरु झाला.. ' केसच्या फॅक्ट चुकणार तर नाहीत ना ? असा विचार काही कारण नसताना माझ्या मनात घोटाळला..ऐक तर ज्युनियर, त्यात मनात असले विचार.. व्हायचे तेच झाले.. मी युक्तवादासाठी उभा राहिल्यावर प्रकरणाची पार्श्वभूमी यशस्वीपणे मांडली. पण नंतर बोलायचे काय? तेच लक्षात येईना. जवळ फाईल होती, पण ऐनवेळी काय, आणि किती फॅक्ट पाहून मांडनार? माझी गोंधळलेली अवस्था बघत न्यायालयाने अभ्यास करून येण्याचा सल्ला देत, पुढची तारीख दिली, हे नशीब. नाहीतर अडचणच झाली असती... आज एकादी अटकपूर्व जमानतरीवरची सुनावणी असती तर..? या विचाराने अंगावर काटा आला. आणि, पुन्हा विषाची परीक्षा बघायची नाही, असा निर्धार करून तो विचार कायमचा मनातून काढून टाकला.

माणसाचे मन अथांग आहे.. "मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर.." या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेप्रमाणे ते चंचल देखील आहे. त्यामुळे मनाला आवर घालणे किंव्हा त्यावर नियंत्रण मिळविणे बहुतांशवेळा अशक्यच..पण तरीही मनात कायम सकारात्मक विचार सुरु असतील तर त्याचा जीवन जगताना फायदाच होतो. 'Every Thought is Application to God ", असं म्हटलं जात. आपल्या मनात उत्पन्न होणार प्रत्येक विचार जर विधात्यासमोर निवेदन असेल तर तो चांगलाच नको का??"अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन अशा" समुद्राला हिणवणाऱ्या या ओळीतून सावरकरांनी मानवाची क्षमता विशद केली आहे. "संकोचून काय झालासे लहान..||" या अभंगातून तुकाराम महाराजानीही माणसाने संकोच सोडून 'स्व' ची ओळख करून घेण्याचा सल्ला दिला आहे. मग, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकोचित आणि नकारातमक कशाला??? म्हणून Be Positive . रक्तगट पॉजिटीव्ह, निगेटिव्ह असल्याने काही होत नाही.. माणूस पॉझिटिव्ह असला पाहिजे. बघा पटतंय का..!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की पटलंय. एक छोटासा विचारांमध्ये केलेला बदल आपलं अख्खं आयुष्य बदलू शकतो.

तुम्ही "द सिक्रेट" वाचलंय का? "लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन" आवडेल तुम्हाला.

The law of attraction is the belief that by focusing on positive or negative thoughts a person brings positive or negative experiences into their life

छान आहे लेख. पटला. पण विचारात बदल घडविणे खूप अवघड असते.

अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन अशा" समुद्राला हिणवणाऱ्या या ओळीतून सावरकरांनी मानवाची क्षमता विशद केली आहे. " >>> सावरकर नव्हे कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांच्या कोलंबसाचे गर्वगीत नावाच्या कवितेतील ओळ आहे ही.

चानगला विशय
...."अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन अशा" समुद्राला हिणवणाऱ्या या ओळीतून सावरकरांनी मानवाची क्षमता विशद केली आहे.....
याच द्सावरकरानि "प्रतिकूल ते तेच घडेल" अशी मनोभुमिका ठेवुन वागण्याने/जगण्याने अपेक्षाभंगाचे दु:ख नाहिसे झाल्याचे व भविषय्कालिन संकटानचे आकलन झाल्याचे वर्णनही केले आहे.
तेव्हा, सकारात्मक व नकारात्मक विचार यातिल व्हक्तिसापेकश क्शमतानचा फरक व त्यानुसाराचे उपाय अधीक सुकषमपणे व्यक्त व्हायला हवेत.

सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार.. धन्यवाद.. आपले प्रतिसाद प्रेरक आहेत.

तुम्ही "द सिक्रेट" वाचलंय का?<<
>> अजुन वाचल नाही.. योग आला की नक्की वाचनार

पण विचारात बदल घडविणे खूप अवघड असते.<<
>> चांगला अर्थात सकरात्मक विचार करने फार कठिन नाही.. हो पण, हे विचार अंगिकारने कठिनचं.. "अनंत आमुची..."ओळींचा संदर्भ चुकलाच..सावरकरांचा काहीतरी संदर्भ द्यायचा होता त्यात गड़बड़ झाली..

Thank you

+७८६
सुख दुख आनंद त्रागा या जश्या मनाच्या स्थिती आहेत तसेच यश अपयश देखील मनाच्याच स्थिती आहेत. बरंच काही आपल्या मानण्यावर ठरते.
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते सुंदर आहे हा सकारात्मक विचार करून जगता आले पाहिजे.

एक्दम पटतय. आमच्या ग्रुप मधेही एक जण अशी होती की कधीही तिच्याशी बोला तिची काहीतरी कप्लेनच चालालेली असायची. गंमत म्हणजे ती जे सांगतेय नेमक्या त्याच सिच्युएशन मधे असुनही ती सिच्युएशन ईतकी वाईट आहे हे आमच्या डोक्यातही आलेले नसायचे.

सुंदर लेख व उत्तम विचार.
प्रतिकूल परिस्थिती असताना सकारात्मकता ठेवणे मात्र खरंच खूप अवघड आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, चांगली (सकारात्मक) साथसंगत तसेच कधीकधी समुपदेशकाचीही गरज पडू शकते.

मनःपूर्वक धन्यवाद..

एक्दम पटतय. आमच्या ग्रुप मधेही एक जण अशी होती की कधीही तिच्याशी बोला तिची काहीतरी कप्लेनच चालालेली असायची. गंमत म्हणजे ती जे सांगतेय नेमक्या त्याच सिच्युएशन मधे असुनही ती सिच्युएशन ईतकी वाईट आहे हे आमच्या डोक्यातही आलेले नसायचे.<<

>> यावरून मला एक निरिक्षण याठिकानी नोंदवावे वाटते.. आपण जेंव्हा आपल्या परिचित व्यक्तिना भेटतो त्यावेळी साहजिकच "कस काय बर आहे ना!!!" म्हणुन औपचारिक चौकशी करतो..बहुतांश वेळा 'ठीक 'किंव्हा 'मजेंत' अस उत्तर देवून हा संवाद संपविला जातो.. मात्र यातही काही महाभाग असे असतात की ते नुसती औपचारिक चौकशी करत नसतात तर ते चेक करत असतात.. याच कस सुरु आहे.. आपण त्याला "चांगलं सुरु आहे" अस उत्तर दिल की ते लगेच सुरु करतात... अरे तुझ्यापुढे किती प्रॉब्लम आहेत.. यातून तू मार्ग कसा काढणार.. अजुन तुझ घर झाल नाही.. मुलांच्या भविष्यासाठी तरतूद केलिये का?? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करुण ते समोरच्याला डिस्टर्ब करुण सोडतात...निरिक्षण आहे.. आपल्यालाही असा अनुभव आला असेल..!