लोक लाभले किती वेगळे!

Submitted by निशिकांत on 13 December, 2017 - 00:12

लोक लाभले किती वेगळे !

दीन भुकेल्या रयतेचे हे भाग्य आगळे
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

कोण मूर्ख तो पोलिसवाला गाडी अडवी?
शिक्षा करण्या आमदार मग त्याला बडवी
भेद विसरले, नेता गण एकत्र येउनी
बडतर्फीच्या टाचेखाली इमान तुडवी
न्यायाचे का जिवंत असता प्रेत जाळले?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

अभद्र नेते ठाउक नाही अभंगवाणी
ताल सोडुनी बडबड करती, आले कानी
लघुशंकेला सर्व निघाले धरणामध्ये***
तरी लोक का म्हणती पीण्या नाही पाणी?
अक्रोशाची शांत शांत का अशी वादळे?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

काळ बदलला, आज अपेक्षा किती बदलल्या
रोटी, कपडा, मकान गरजा जुन्या जाहल्या
"गल्ली बोळांमध्ये देइन अनेक सोयी"
खैरातीच्या खास घोषणा घुमू लागल्या
मते मागती राजकारणी, आम्ही बावळे
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

राजकारणी नको तिथेही वास तयांचा
देवांच्याही गळ्याभोवती फास तयांचा
असोत साई, विठ्ठल अथवा लंबोदरही
अग्रपुजेचा मान नेहमी खास तयांचा
ट्रस्टी होउन काबिज केली किती देउळे?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

***पाणीटंचाईच्या काळात श्री अजीत पवार यांनी दिलेल्या बेजबाबदार वक्तव्यावरून सुचलेली ओळ.

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारणतः हा विषय चावून चावून खूप चोथा केलेला आहे. त्यावरच्या कविता पण रटाळ वाटतात, परंतु या विषयावरची ही पहिली कविता आहे जी मला आवडली . चांगली शब्द रचना आहे.