शेतकरी योद्धा!

Submitted by अँड. हरिदास on 11 December, 2017 - 14:07

(" शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी यांचा आज स्मृतिदिन.. त्यानिमित्ताने अभिवादनपर दोन शब्द..!")

शेतकरी योद्धा!
जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात' या पु.लं.च्या वाक्याची सत्यता पटवणारे काही मोजकेच दुर्मिळ व्यक्तीमत्त्व देशात आहेत... शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी हे नाव सुद्धा यापैकीच एक..उच्च विद्याविभुशित आणि युनो सारख्या ठिकाणी गलेलट्ठ पगारावर नोकरीवर असणार्या या माणसाने ठरविले असते तर आपले आयुष्य अतिशय सुख समाधानात घालविले असते.. पण देशभरातल्या शेतकर्यांचे 'दुखः' पाहून हा माणूस कळवळला आणि त्याने युनोतील नोकरी सोडून शेतकर्यांच्या न्याय हक्क्साठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला..आपली संपूर्ण हयात शेतकर्यांसाठी खर्च केली. शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत करून त्यांना जगण्याचे आत्मभान मिळवून देणाऱ्या या लढाऊ सेनापतीचा आज दुसरा स्मृतिदिन.. त्यानिमित्ताने या शेतकरी नेत्यास विनम्र अभिवादन..

शेतीचा अर्थवाद सरकारच्या अजेंड्यावर आणणं असो की सरकारचं शेतकरीविरोधी धोरण वेशीवर टांगणं असो, शरद जोशींनी शेतकऱ्यांचा आवाज नेहमी बुलंद केला.शेतकरी चळवळीमध्ये प्राण फुंकण्याचे काम शरद जोशी यांनी केले..

"जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी"

असा मंत्र देत शेतकर्यांची एकजूट करून जोशी यांनी उत्पादन खर्चावर आधारित ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. देश स्वतंत्र झाल्यानंतर विकसनशील अवस्थेत असलेल्या भारतात शेतकरी विकासाच्या आणि प्रगतीच्या परीधाबाहेर फेकला गेला होता.त्याच काळी 'भिक नको हवे घामाचे दाम' असा नारा देत शरद जोशी यांनी शेतकर्यांच्या हक्क्साठी शास्त्रीय पद्धतीने खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली. अत्यंत क्लिष्ट असलेले शेतीचे अर्थशास्त्र अशिक्षित आणि अडाणी शेतकर्याला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि शेतकरी पेटून उठला.शेतकरी आंदोलनाला एक नवे आणि निर्णायक वळण मिळाले.

संघटनेचे काम राज्यापुरते मर्यादीत न ठेवता संपूर्ण देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांना एकत्रीत केले त्यासाठी किसान समन्वय समितीची स्थापना करून महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने सुरू केली. कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन शरद जोशी रस्त्यावर उतरले आणि 'शरद जोशी' हे नाव घराघरात पोहोचले. १९९४ मध्ये ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना करून देशाची आर्थिक,सामाजिक आणि राजकीय व्यवस्था बदलवून टाकण्यासाठी उपाययोजना सुचविणारा एक अनोखा जाहीरनामाही त्यांनी मांडला होता. कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणाऱ्याा व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यांनी केले त्यासाठी वारंवार उपोषणे, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे हि संघटनेच्या माध्यामातून त्यांनी आयोजित केली..हि चळवळ पुढे रेटत असताना शरद जोशी यांना अनेकदा तुरुंगवास हि भोगावा लागला. त्यांनी शेतकर्याच्या अनेक मागण्या मंजूर करून घेतल्या. बर्याचदा शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे सरकारला आपले शेती विषयक धोरण बदलावे लागले आहे.

२००४ ते २०१० या काळात स्वतंत्र भारत पक्षाचे सदस्य म्हणून त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवडही करण्यात आली होती. राजकारणात सक्रीय सहभाग असतांनाही जोशी यांनी सत्तेचे राजकारण कधीच केले नाही. शेतकर्यांचे प्रश्न केवळ रस्त्यावरूनच नाही तर सभागृहातही मांडले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी खासदार बनून आणि सरकारच्या विविध महत्वपूर्ण समित्यांवर काम करत असतानाही 'शेतकर्यांच्या समस्या' हा अजेंडा कायमचा ठेवला त्याच्याशी कधीहि तडजोड शरद जोशी यांनी केली नाही.शेतकरी चळवळ चालवीत असताना दारूदुकानबंदी आंदोलन, स्त्री-पुरूषमुक्ती चे आंदोलन उभारून त्यांनी महिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी करण्याचा प्रस्ताव मांडला ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरुषांना आवाहन केले त्यामुळे लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर नोंदविली गेली.चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. घेवून जोशी यांनी महिलांना राजकीय सहभागाची मागणी केली या अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती होती.

शेतकर्यांचा हा जाणता नेता एक उत्तम प्रशासक हि होता बँकिंग विषयासाठी त्यांना सी रँडी सुवर्णपदकही मिळाले होते. 1958 मध्ये त्यांनी भारतीय टपाल सेवेची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. त्यांनी कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनंतर भारतीय टपाल सेवेमध्ये सुमारे दहा वर्षे ते पहिल्या दर्जाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते.सयुंक्त राष्ट संघातही त्यांनी काम केलेले आहे. शेतकर्यांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहली.. सुरवातीच्या काळात स्थंभ लेखाच्या माध्य्मातूंनच त्यांनी शेतकरी प्रश्नाना वाचा फोडली. शरद जोशी यांनी फक्त शेतकरी चळवळ उभारली नाही तर शेतीवर अभ्यासपूर्ण विवेचन करणारी आणि शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी कार्यकर्त्यांची एक पिढी निर्माण केली..शरद जोशी यांच्या एक बोलण्यावर लोक जीव द्यायला तयार असत,एवढा प्रभाव त्यांच्या नेतृत्वाचा होता..

या समाजात अनेक लोक अतिशय सेवाभावी पणे, निरलस, निस्पृह वृत्तीने समाजसेवेचे व्रत घेऊन विविध क्षेत्रात काम करत असतात. पण त्यांचे महत्व आणि कर्तुत्व त्यांच्या पश्च्यातच लक्षात येते.राजकीय पदाचा केवळ समाजाच्या भल्यासाठीच उपयोग करणारी हि मंडळी खरोखर ग्रेट म्हटली पाहिजे..शरद जोशी आज आपल्यात नाहीत पण एक क्रांतिकारी विचारांचा ठेवा ते आपल्यासाठी सोडून गेले आहेत. त्यांच्या विचाराची धग कधीही कमी होणार नाही..अश्या या महान आत्म्यास एका शेतकरी पुत्राचे विनम्र अभिवादन..!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults