शिंदे मामा

Submitted by फूल on 4 December, 2017 - 15:03

“सर सर पुढे सर... ए दादा... तिकडं सर... या चिऊला बसाय जागा दे..” रिक्षेत दहा घरच्या पाच-सहा चिमण्या आणि पाच-सहा दादा नाहीतर भाऊ कोंबून त्यांना नित्य-नियमित वेळेवर शाळेत आणण्या-नेण्याचं काम शिंदे मामा देव जाणे कित्येक वर्षं अव्याहतपणे पार पाडत होते. “काका कितीदा सांगितलं तुम्हाला मला चिऊ म्हणू नका...” जिला चिऊ म्हटलेलं असायचं ती पाच-सहा वर्षांची पाकोळी बिनदिक्कत मामांच्या अंगावर खेकसायची. “आणि मलाही दादा म्हणू नका...” दादाही दरडावायचा. “बरं...दादा… नाही म्हनत दादा तुला… चल चल पुढं सर दादा....” “सर नाही सरक असं म्हणतात हो काका...” अजून एक कुणीतरी ठमाकाकू त्यांच्या भाषेच्या मागे लागली असायाची. एवढं सगळं होऊनही दादा काही पुढे सरकलेलाच नसायचा. त्याला सरकायला मुळात रिक्षेत अशी जागाच किती असायची? मग ती चिऊताई तशीच तोल सावरत रिक्षेत उभी रहायची आणि पूर्ण वेळ मामांना ऐकव ऐकव ऐकवायची... “मला रोज उभं राहावं लागतं, मी सांगणारे आईला तुमचं नाव, रोज तुम्ही मला शेवटी आणायाला येता... वगैरे वगैरे...” मामा हसतमुखाने सगळं ऐकून घ्यायचे. “उंद्याच्याला तुला पयली घेतो... बस्स? पक्का वायदा...” असं क्वचित वचनसुद्धा द्यायचे पण ते पाळलंही क्वचितच जायचं...

मी आई-बाबांना पहिल्यांदा कधी भेटले हे जसं मला आठवत नाही तसंच शिंदेमामांना पहिल्यांदा कधी भेटले तेही आठवत नाही. मी बालवाडीत असल्यापासून ते मला शाळेत सोडायचे. तेव्हापासून अगदी मी इयत्ता सातवीत जाईपर्यंत. काळा-सावळा रंग, बऱ्यापैकी उंच, किंचित सुटलेलं पोटं, चेहऱ्यावर कायम हसू आणि डोळे बारीक करून हसायची सवय, बोलताना सारखं सुरर्र सुर्रर्र करून तोंडात जमा होणारी लाळ गिळायची सवय, मिश्या छपरी नव्हत्या पण वाढून नेहमीच ओठांवर यायच्या, तश्या त्या आल्या की पोरं विचारायची “जेवताना केस तोंडात जातात का हो काका...?” त्यावर मामा हसून म्हणायचे, “आजपात्तूर येक केस पोटात ग्येला न्हाई... आता उंद्याचं कुनी सांगाव..?” पोरं खिदळायची. कुठला तरी शर्ट, असाच कुठलातरी पायजमा, डोक्यावर विस्कटलेले केस असे मामा जवळ जवळ झोपेतून उठून सकाळी सव्वा सहाला आमच्या बिल्डींगच्या खाली यायचे. एकूणच सगळा अवतार अघळ-पघळ, गबाळा. पंढरपूरला जाऊन गळ्यात माळ घालून आले होते. त्या माळेशी मात्र कायम इमान राखलं त्यांनी. त्यामुळे अपेयपान, अभक्ष्य भक्षण आणि शिव्या देणं... संपूर्ण वर्ज्य. आम्हा पोरांपैकी कुणी त्यांना काका म्हणायचं कुणी मामा.

आम्ही एकूण एक सगळी मुलं त्यांना वाट्टेल ते बोलत असू. त्यांची भाषा सुधारणं हे तर आमचं आद्य कर्तव्यच होतं जणू. घरी आई-बाबांसमोर, पाळणाघरातल्या आज्जी, मावशी, काकू ज्या कुणी असतील त्यांच्यासमोर आणि शाळेत शिक्षकांसमोर जो राग व्यक्त करता येत नव्हता त्या सगळ्या रागाचा निचरा रिक्षेत व्हायचा. खरंतर आमच्यासारख्या पोट्ट्यापाट्यांना ते अगदी सहजी गप्प करू शकले असते पण का कोण जाणे ते अज्जिबात न रागावता हसतमुखाने ऐकून घ्यायचे. सगळ्यांचेच आईवडील दिवसाचे १२-१३ तास मुलांना भेटत नसत. शाळा संपल्यावर आई घ्यायला आली आहे हा आनंद काही औरच असेल कदाचित... आमच्या वाट्याला कधीच आला नाही तो पण शिंदे मामांना बघूनही तेवढाच आनंद व्हायचा.

पहिलीत असताना संपूर्ण फळाभरून बाई गृहपाठ लिहून ठेवायच्या. तो गृहपाठ सगळाच्या सगळा वहीत उतरवून घेणं म्हणजे माझ्यासाठी भयंकर कर्मकठीण काम. त्यात मैत्रिणींशी गप्पा कधी मारणार आणि गृहपाठ उतरवणार कधी, असं होऊन जायचं. शाळा सुटून पंधरा मिनिटं झाली तरी मी दिसत नाही असं बघून मामा शाळेत यायचे. मला शोधत वर्गात यायचे. तोवर वर्गात मी एकटीच उरले आहे याचं भान मला आलेलं असायचं आणि मामांना बघून रडू फुटायचं. गृहपाठही उतरवून घ्यायचा असायचा. मग मामा कसेबसे आमच्या इवल्याश्या बाकड्यात माझ्या बाजूला बसायचे. “काय झालं चिऊताई..? रडू न्हाई... आन मी लिवतो... उंद्याच्याला बाईनी तिकडं गुरपाठ लिवायला घेतला की तूबी हिकडं लिवायला सुरू करायचं... काय? ” असं म्हणून सगळा गृहपाठ उतरवून घ्यायचे आणि माझं दप्तर भरून ते स्वत: पाठीवर घेऊन मला रिक्षेपर्यंत घेऊन यायचे. तोवर इतर पोरांनी रिक्षा जवळ जवळ डोक्यावर घेतलेली असायची. “रोज हिच्यामुळे उशीर होतो” असलं काहीतरी ऐकायला लागणार म्हणून आणखीन रडू येत असायचं. मग मामा मला रिक्षात पुढे उभं करायचे...आणि रडू कुठल्या कुठे पळून जायचं.

एकदा मामांना बरं नव्हतं म्हणून त्यांची बायको आम्हाला घ्यायला आली होती. गंमत म्हणजे तिलाही रिक्षा चालवता यायची. माझं गृहपाठ पुराण अजूनही सुरूच होतं. त्यादिवशी तीही मला शोधत माझ्या वर्गात आली आणि मामांसारखा तिनेही गृहपाठ उतरवून दिला मला. येताना म्हणाली, “रडू नको ताई... तुझं मामा म्हनलं मला... येतान तुला पुडं बशिवत्यात...” तेव्हा मला काही विशेष वाटलं नव्हतं या गोष्टीचं पण आता लक्षात येतंय वरवर गबाळ्या दिसणाऱ्या या माणसाला आमच्यातल्या प्रत्येकाबद्दल अपार माया होती.

कुणाला बरं नसेल तर त्याला रिक्षात पुढे बसवणं, दप्तर आणि शाळेतलं कसलंसं प्रोजेक्ट अमुक-तमुक असं बरंच सामान जर एखाद्याकडे असेल तर त्याला किंवा तिला अगदी वर्गापर्यंत सोडायला जाणं, आम्हाला आयत्यावेळी आठवलेल्या लहानसहान गोष्टी विकत घेऊन देणं... उदा. “काका कंपासपेटी घरी राहिली एक पेन घेऊन द्या ना किंवा पट्टी तुटली विकत घेउन द्या, वही संपली लक्षात नव्हतं... आज नवीन वही आणायला विसरलो. किंवा बऱ्याचदा पालकांनीही काकांकडे पैसे दिलेले असायचे पोराला अमुक एक दुकानातून घेऊन द्या म्हणून” हे सगळं कमी की काय म्हणून प्रत्येकाच्या पालकांच्या वीसेक सूचना असायच्या... “आमचं कार्ट मस्तीखोर आहे त्याला रिक्षाच्या दरवाज्यात बसवू नका, आज आमकीला पाळणाघरात नाही आज्जीकडे सोडायचंय... किंवा उलट, तमकीला शाळा सुटली की फळ खाण्याची आठवण करा ती रोज विसरते, आमक्याच्या आजोबांना जिने चढता-उतरता येत नाहीत म्हणून त्याला वर बिल्डिंगमध्ये नेऊन सोडा खालच्या खाली सोडून जाऊ नका...” बऱ्याचदा सकाळी पोराला शाळेत आणि त्याचा शाळेनंतर खायचा डबा, कपडे पाळणाघरात पोचवण्याचं कामही मामाच करायचे... रिक्षात पुढच्या बाजूला त्यांच्या पायाशी सात-आठ पिशव्या पडलेल्या असायच्या. त्यातली कुठली कुणासाठी कुठल्या पाळणाघरात पोचवायची त्यांना बरोब्बर माहित असायचं. या गोष्टीत ते कधीच हलगर्जीपणा करायचे नाहीत.

एकदा रिक्षातलीच एक मुलगी संध्याकाळी शाळा सुटल्यावर बराच वेळ आलीच नाही. मामांचं चित्तं थाऱ्यावर नव्हतं. त्यांना इतकं अस्वस्थ झालेलं मी कधीच बघितलं नव्हतं. सगळी शाळा धुंडाळून आले मामा. सगळ्या शिक्षकांकडे चौकशी केली. पण मुलीची वर्गशिक्षिका तोवर घरी निघून गेली होती. जवळ जवळ अर्ध्या तासाने शाळेतूनच त्या मुलीच्या घरी त्यांनी फोन करायला लावला. तेव्हा कळलं की मुलीची आज्जी वारली म्हणून दुपारीच तिची आई तिला शाळेतून घेऊन गेली. आम्हाला सगळ्यांना त्यादिवशी घरी जायला उशीर झाला. थंडीचे दिवस म्हणून अंधार लवकर पडला होता. काका त्यादिवशी प्रत्येकाला घराच्या दरवाज्यापर्यंत सोडून प्रत्येकाच्या घरी जाऊन काय झालं ते सांगत होते.

मला सहा महिन्यातून एकदा तरी सर्दी, खोकला, ताप असलं काहीतरी व्हायचंच. दोन-तीन दिवस शाळेला बुट्टी असायची. मग शनिवारी किंवा रविवारी सकाळी मामा घरी यायचे मला भेटायला. “आर्रर्रर्र... चेहरा पार उतरला” हे ठरलेलं वाक्य. “सोमवारी येतो काय.. तोवर बरं व्हायाचं...” कुणाला बरं नसलं की असे ते आमच्या प्रत्येकाच्या घरी जायचे. आई-बाबांशी गप्पा मारायचे. बऱ्याचदा advance हवा असायचा म्हणूनही यायचे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला न चुकता पंढरपूरला जाऊन यायचे. दोन दिवस रिक्षा बंद असायची. सगळ्या पालकांची पळापळ.

वार्षिक परीक्षा जवळ आली की शाळेला सुट्टी कधीपासून याची उत्सुकता मुलांपेक्षाही मामांना अधिक असायची. रोज विचारायचे... “सुट्टीचं काय म्हनले शालंत?” “कळलं की सांगू हो तुम्हाला काका... रोज विचारू नका...” कुणीतरी टिकली खेकसायची... “तू सांगशील की पन म्या इसरलो म्हंजे..” असं काहीतरी बोलायचे...पण बोलायचे... “काहीही बोलत असतात हं काका... काका... कठीण आहे तुमचं” हे आमच्याकडून ऐकून घ्यायला आवडत असावं त्यांना बहुधा. “काकाचं सादं-सूदं न्हाई लई कठीन हे... चला आली की सगळी... आज पुडं कोन उबारनार?” “उभं रहाणार... काकाsss” सगळे एकसाथ ओरडायचो... “हा त्येच त्ये... हुबं रानार...” आमच्यापैकी ज्याचा टर्न असेल तो पुढे जायचा... “दादा.. पीप नको वाजीवू काय?” “पीप नाही हॉर्न असं म्हणतात आणि दादा नका हो म्हणू...”

सहामाही आणि वार्षिक परीक्षा संपली की शेवटच्या दिवशी पार्टी ठरलेली... शाळेसमोरच्या दुकानातला वडापाव आणि पेप्सीकोला. “दादा जा रे... मोज किती पोरं हायीत आनी आन जा..” असं म्हणून कुणाच्या तरी हातात पन्नास-साठ रुपये सरकवायचे... सगळ्यांचं खाणं सुरू असतानाच रिक्षा सुरू व्हायची... “गाडीत घान करू नका...” काकांची एकमेव सूचना... “गाडी नाही रिक्षा” लग्गेच आमची दुरुस्ती.. मग कुणीतरी म्हणायचं... “काका तुम्ही आम्हाला खरंतर हॉटेलमध्ये पार्टी द्यायला हवी... आमच्यासारखी साधी मुलं तुम्हाला मिळणार नाहीत कुठे... आम्ही आहोत म्हणून चालवून घेतोय..” एखादी चिऊताई माहिती पुरवायची.. “त्या केतकीच्या रिक्षात ते काका त्यांना केक्स आणून देतात खायला...” मामा मनापासून हसायचे आणि म्हणायचे, “पुढल्या वरसाला... पक्का वायदा...” “त्यापेक्षा काका तुम्ही रिक्षात डेक बसवून घ्या” “ड्येक? त्यो बसवला तर मग तुमचं बोलनं कदी ऐकायचं दादा...?” या वाक्याचा अर्थ तेव्हा नाही कळला पण आत्ता हेच वाक्य कुठेतरी आत भिडतं... टोचत राहतं... “काहीही बोलत असतात हं काका... काका... कठीण आहे तुमचं...”

एका अश्याच पार्टीच्यावेळी मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघे काकांकडून पैसे घेऊन पळत सुटलो. वडापावच्या दुकानात आधी कोण पोचतं अशी शर्यत.. माझा पाय कश्याततरी अडखळला आणि मी तोंडावर पडले. वरचे दात खालच्या ओठात आणि ओठ फुटला. लागलं यापेक्षा वडापाव खाता येणार नाही याचं दु:खं जास्त होतं.. रक्ताची धार लागली होती. आजूबाजूला माझ्याच वयाची पोरं भेदरून बघत उभी. कुणाला काय करावं सुचेना. कुणीतरी मामांना बोलावलं... मामांनी लग्गेच वडापाववाल्याकडची हळद चेपली आणि फर्मान काढलं... “दादा आज काय पार्टी नको...” दादा वैतागला... “अरेsss तुझी ताई हे... बघ जरा तिच्याकडं...” सगळ्यांचा हिरमोड झाला... काकांनी सगळ्यांचं सगळं ऐकूनही घेतलं... माझ्यापायी. वडापाव हुकलाच वर आईने घरी गेल्यावर उत्तरपूजा बांधली ती वेगळी... पण आता विचार केल्यावर असं वाटतं की मामांसारख्या माणसाला child psychology वगैरे कुणी शिकवली असेल?

या अश्या मधाळ माणसाला मी एकदाच चिडलेलं बघितलं आहे. कारणही खास होतं. शनिवारी आमची शाळा अर्धा दिवस असायची. रिक्षेत त्यादिवशी मुलंही कमी असायची कारण बऱ्याच मुलांचे पालक त्यादिवशी घरी असायचे. एका शनिवारी मी आणि माझे दोन मित्र असे आम्ही तिघेच होतो रिक्षेत. मामांबरोबर आमची नेहमीसारखीच जुगलबंदी सुरू होती. हसणं, खिदळणं सुरू होतं. आम्ही वेगळ्याच रस्त्याला लागलो आहोत हेही कळलं नाही आम्हाला. अचानक रिक्षा थांबली तेव्हा लक्षात आलं मंजिरीच्या घराखाली रिक्षा थांबली होती. मंजिरी रोज आमच्या रिक्षातून शाळेत यायची. आम्हाला कळेना आता का मंजिरीला आणायला चालले आहेत काका...? आम्ही तर शाळा संपवून घरी चाललो होतो. थोड्या वेळाने मामा एका उंच जाड्या मुलीला घेऊन आले. ती मामांचा हात धरून चालत होती. थोड्याच वेळात काय तो प्रकार आमच्या लक्षात आला. आम्ही सगळेच ऐकून होतो आज प्रत्यक्ष बघितलं. मंजिरीची मोठी बहिण स्पेशल चाईल्ड होती. तिला मतिमंदांच्या शाळेत नेण्याचं काम काका करत असावेत असं वाटलं. त्या मुलीने पावडर जरा जास्त लावली होती. ते बघून माझ्या दोन मित्रांपैकी एक म्हणाला... “काका हा पावडरचा डबा कुठनं आणलात?” ती अगदी लहान मुलीसारखी हसून सगळ्यांकडे बघत होती. “वाटाण्यासारखे डोळे आहेत तिचे काका..” पुन्हा तो माझा मित्र म्हणाला. “दादा लै बोलायलास... गप बस” आम्ही सगळेच एकमेकांकडे चमकून बघायला लागलो. “मोठ्या माणसांशी कसं बोलायचं ते शिकवीत न्हाईत होय रे तुमच्या शालंत? वयाचा मान राखाव दादा... माफी माग तिची... नाहीतर सोडत नाही बघ घरी.” आम्ही सगळे अवाक. हे मामाच आहेत नं? माझ्या त्या मित्राची पुढे काहीही बोलायची टाप नव्हती. हा किस्सा आमच्या रिक्षेत खूप रंगला. मामा रागावतात याचा आमच्या हाती आलेला तो एकमेव पुरावा होता.

पुढे सातवीत गेल्यावर सायकल शिकले. मग सायकलवरून शाळेत येणं-जाणं सुरू झालं. रिक्षा सुटली. शेवटच्या दिवशी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मी एकटीच होते रिक्षात. मला म्हणाले, “भेटत रहा काय ताई...?” मलाही काय बोलावं सुचलं नाही. बर म्हणून उतरले. त्यानंतर शाळा सुटली की शाळेत भेटायचे. “बसती का? चल सोडतो...” म्हणायचे. पावसाळ्यात सायकल नसायची मग कधीतरी सोडायचेही घरी.

एक दिवस असाच खूप पाऊस पडत होता. मी छत्री घेऊन क्लास मधून घरी चालत चालले होते. मामा त्याच रस्त्याने कुठेतरी जाता असावेत... वाटेत रिक्षा थांबवून मला बसवून घेतलं... “कशी काय ताई? आई बाबा कसं काय?” मीही त्यांची त्यांच्या बायको मुलाची आवर्जून चौकशी केली. मला म्हणाले, “एका आजोबांना घ्याचं हे तेवडं घेतो मग तुला सोडतो... चालतंय?” मी हो म्हटलं... एका कुठल्यातरी कोपऱ्यातल्या जुनाट घरासमोर रिक्षा उभी राहिली. पावसामुळे ती जागा अजूनच अंधारी दिसत होती. एक आज्जी काठी टेकून दारात उभ्या होत्या. “मला वाटलं एवढ्या पावसाचा येतोस की नाही...” आज्जी म्हणाल्या... “पावसाचा दवाखाना बंद असतोय काय आज्जी?” असं म्हणत मामा सरळ घरात गेले. पहिल्यांदी एक उशी आणून रिक्षेत टाकली त्यांनी आणि नंतर येताना अक्षरश: आजोबांना दोन्ही हातांवर उचलून घेऊन आले. आजोबांचं शरीर म्हणजे अक्षरश: हाडांची मोळी झाली होती. त्यांच्या डोळ्यात आजूबाजूच्या जगाची पुसटशीही ओळख दिसत नव्हती. त्यांना रिक्षेत बसवलं तर त्यांची मान उजवीकडे कलली मामांनी त्यांच्या मानेखाली उशी सरकवली आणि आज्जीना सांगितलं, “तासा-दोन तासात आनून सोडतो, निवांत ऱ्हावा.” माझ्याकडे हसून बघितलं.

माझ्या डोळ्यात सहाजिकच त्यांना अनेक प्रश्न दिसले असतील... मामा बोलायला लागले.. “एकदा ही दोघं नवरा बायको रस्त्यात हुबी. मी असंच गिऱ्हाईक मिळल म्हणून घुमवत होतो गाडी... ह्यांला बघितलं आन थांबीविली... दर आठवड्याला तीन टाईम हास्पिटलात घीऊन जावं लागतंय... त्ये काय ते रक्त सुध्द करत्यात ते... आज्जीला म्हनलं मी पोचीवतो... तर म्ह्नल्या तूला परम नंट क्येला तर जास्त पैशे माग्शीला... म्हनलो दीऊच नका... मग झालं...? कुटं कुटं फिरंल आता म्हातारी या वयात...?” मी आपलं होनं होनं करत होते. बाजूच्या आजोबांकडे बघवतही नव्हतं. “तुला तिथंच सोडायचं नवं का? घरी का अजून कुटं?” मी तंद्रीत हरवले होते. “ओ ताई... कुटं हरवली...?” “हो हो तिथेच सोडा...येत जा घरी अधून मधून... तुम्हाला माहितीये घर...” मीही हसून म्हटलं आणि उतरले. आत कुठेतरी काहीतरी हललं होतं. नक्की काय हललंय हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण आज जाणवतंय माझ्या मनात मामांची जी मी प्रतिमा निर्माण केली होती की एक वेडगळ, अजागळ माणूस तिला धक्का बसला होता.
त्यानंतर मामा क्वचितच भेटले. शाळा संपल्यावर शाळेकडे जाणंही बंद झालं.. त्यामुळेही असेल कदाचित. एक-दोनदा असेच दिसले होते. माझ्या लग्नात त्यांना बोलवायचं म्हणून दोन-तीन दिवस सलग संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेला शाळेजवळ जाऊन उभी रहात होते पण मामा भेटले नाहीत. रीक्षेतल्या मित्रांकडेही चौकशी केली पण कुणालाच पत्ता नव्हता. अजूनही नाही. जशी पहिली भेट आठवत नाही तशीच त्यांची आणि माझी शेवटची भेटही पुसटंच...! भारतात गेले आणि शाळेजवळून संध्याकाळी कधी जायचा प्रसंग आला तर माझ्याही नकळत माझी नजर त्यांना शोधू लागते.

लहानपणी सगळीकडून उपदेशाचा महापूर लोटलेला असताना मामांचे दोन कान हे सदैव आमचं ऐकण्यासाठीच बनले असल्यासारखे आम्ही हक्काने त्यांना ऐकवत रहायचो. आमच्या लहान-सहान तणावांचा किती सहजी निचरा होत असे. आमच्या त्याकाळच्या भावविश्वातला अविभाज्य भाग होते मामा. आई-बाबा दिवसभर या शहरात नसतात ते कामानिमित्त लांब आहेत हे माहित असूनही एकाही क्षणी असुरक्षित वाटलं नाही त्याचं सगळं श्रेय शिंदे मामांना. शाळेने जेवढं घडवलं नाही तेवढं शिंदे मामांसारख्या माझ्या आजूबाजूच्या माणसांनी घडवलं मला. साधी साधी म्हटली जाणारी माणसंच आयुष्य शिकवून जातात नै?

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान लिहिलं आहे! अगदी डोळ्यांसमोर आमचे रिक्षावाले काकाच आले. अशीच शेवटच्या दिवशी पार्टी असायची, तो रिक्षातला गोंधळ आणि गडबड. किती तरी आठवणी.

शेवटी डोळ्यांत ट्च्च पाणीच आले.

आमच्या आईने न चुकता काकांना माझ्या लग्नात बोलावले होते. त्यावेळेस बर्‍याच वर्षांनी काकांना भेटलो. त्याचबरोबर खुप जूने शिक्षक पण आले होते.
Happy

खूप सुंदर लिहिलंय. आयुष्यात कधी रिक्षेने शाळेत जायची वेळ आली नसली तरी सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं आणि डोळे पाणावले.

अगदी आय डी प्रमाणे ( फूल-निरागस, कोमल) लिहीलय. माझी शाळा हाताच्या अंतरावर असल्याने हे अनूभव मात्र घेतले नाहीत, पण वाचुन छान वाटले.

फूल हे लिखाण वाचलं आणि मी पण माझ्या भूतकाळात गेले. अगदी पहिली ते चौथीत असताना केव्हातरी आमच्या बाबांच्या शाळेतला एक शिपाई "दौलुमामा' (दौलत) आम्हाला दोघीना (मला आणि माझ्या थोरल्या बहिणीला) शाळेत सोडायचा. पुढे दांडिवर एक आणि मागे कॅरियर वर एक अशी आमची वरात निघायची. तो माणूस किती साधा सुधा आणि स्वच्छ मनाचा आणि स्पर्शाचा होता त्याची आता विचार केल्यावर प्रचिती येते. अलिकडे पेपर मध्ये अगदी २-३ वर्षाच्या मुलीवर सुद्धा वाईट नजर ठेवणारे नराधम दिसतात तिथे दौलुमामा आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचा. मी फारच लहान असल्याने मला काहीही आठवत नाहिये. पण तो अतिशय प्रेमळ आणि स्वच्छ माणूस होता हे नक्की. आम्ही त्याला अरे तुरेच करत असू. पुढे मोठे झालो, स्वतःचं स्वतः शाळेत जाऊ लागलो, शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूर सुटले, त्याची अनेक वर्ष भेट झाली नाही. २०११ की २०१२ साली मी बाबांपुढे हट्ट च धरला की मला त्याला भेटायचं आहे. माझ्याच शाळेत (रिटायरमेंट नंतर सुद्धा) तो अजून नोकरी करतो म्हणून मुद्दाम तिथे भेटायला गेले. पाया पडले, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलं. तो मला अहोजाहो करू लागला आणि तुम्ही शिक्षणानं मोठं वगैरे बोलला पण तो कितीतर उंच आहे याची मला तेव्हा जाणिव झाली. काही माणसं आपली माती आणि मूळं सोड्त नाहीत त्यातलाच तो. त्याचे डोळे घारे (हिरवट) असले तरि तो बेरकी अजिबात वाट्त नाही. उलट त्याच्या डोळ्यातले भाव मी विसरू शकत नाही.
लहानपणी माझ्या मनात छापलेली त्याची छबी तिच, फक्त केस पांढरे... __/\__ आता लिहिताना सुद्धा मला त्याची प्रचंड आठवण येतेय. Happy काही लोक महान असतात शब्दापलिकडे असतात त्यांच्या बद्दलच्या भावना.
तुझ्या लेखामुळे दौलुमामा मनात एकदम उसळी मारून वर आला. धन्यवाद.

रिक्षातून शाळेत जायचा अनुभव नाही पण तुमचा लेख वाचून डोळे पाणावले. अप्रतिम व्यक्तिचित्रण.
दक्षिणाताई तुमची पण आठवण छान आहे.

सगळ्यांचे आभार मनापासून! दक्षिणा... तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरंय... दौलत मामा काय शिंदे मामा काय देवमाणसंच म्हणायला हवीत. आत्ता विचार करूनही काटा येतो अंगावर पण मामांच्या रिक्षातून मी जवळ जवळ सम्पूर्ण शहर फिरलेय... अगदी दुपारच्यावेळी सगळीकडे सुनसान असताना एकटी सुद्धा! पण कधीच असुरक्षित वाटलं नाही. माझी लेक आता दोन वर्षांची आहे. आजच्या काळात तिच्याबाबतीत हा मला विचारही करवत नाही...

Pages