Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

Submitted by सचिन काळे on 2 December, 2017 - 23:01

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

21272536_1624525010953311_2384495317876345364_n.jpgयेऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी. पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!

Making of photo and status :
वरच्या फोटोत काय दिसतंय ते पहा बरं!!? त्यात एक जोडपं दिसतंय ना? त्यांच्या गळ्यात असलेल्या हारावरून आणि एकंदर पेहरावावरून त्यांचं नुकतंच लग्न झालेलं वाटतंय ना? जोडपं जरा गावकडचं असावं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे अभिर्भाव तर किती मजेदार दिसतायत नाही!!? डोक्यावर पदर घेतलेली नवरी कित्ती नाजूक साजूक वाटतेय. तिचे टपोरे डोळे नववधूसारखे बावरलेले वाटतायत. ओठांचा केलेला चंबु तर खासच दिसतोय. आणि चेहऱ्यावर रुळणार्या बटेने तर नागिणीसारखे वेटोळे घेतलेत. तसेच डोक्याला मुंडासे बांधलेल्या नवरदेवाच्या जाड भुवया, सुपासारखे कान, आणि फुगीर नाक त्याच्यातील राकटपणा दर्शवितोय.

हा फोटो पाहून मला असं वाटलं, की नुकतेच लग्न झालेले त्यातील नवरा नवरी हनिमूनला जाताना कोणाचातरी निरोप घ्यायला दोन क्षण थांबलेत. बस्! मी ठरवलं की आपण ह्या त्यांच्या निरोप घेण्याच्या प्रसंगावरचंच स्टेटस लिहावं. दोघेही गावाकडचे वाटत असल्यामुळे स्टेटसची भाषा मी मुद्दाम गावरान निवडली आणि स्टेट्सच्या सुरवातीलाच पहिलं वाक्य लिहिलं "येऊ का आता?" आपण निरोप घेताना म्हणतो ना अगदी तसं! पुढे लिहिलं "लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी." या वाक्यावरून वाचकांना मी कन्फर्म करून दिलं, की या जोडप्याचं नुकतंच लग्न झालंय आणि ते खंडाळ्याला हनिमूनला जायला निघताना आपला निरोप घ्यायला थांबलेत.

आता मी त्या जोडप्यांकरिता 'खंडाळा' हेच हनिमूनचं ठिकाण का निवडलं असावं? कारण मला स्टेटसमध्ये जराशी गंमत आणायची होती. खंडाळा म्हटलं तर आपल्याला काय आठवतं बरं? अगदी बरोब्बर!! आपल्याला 'आमिर खान'चं तुफान गाजलेलं 'आती क्या खंडाला?' हे गाणं आठवतं. बस् ! मी त्या गाण्याचा आणि आपल्या स्टेटसचा संबंध लावून टाकला. आणि नवरदेवाच्या तोंडी उपहासाने एक वाक्य टाकून दिले, की "पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!" म्हणजे पहा! नवरदेव किती खोडकर आहे ते!! त्यालाही माहितेय ते आमिर खानचं गाणं आणि त्यातील गंमत.

इथे झालं की मग आपलं फोटोवरून स्टेटस तयार! फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश लिहिलेले नसतानाही मी त्या फोटोला अजूनच मजेदार करून टाकलं. प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तुम्हीही तुमची कल्पनाशक्ती वापरून ह्याच फोटोवर एक संपुर्ण वेगळं स्टेटस लिहू शकता. बघा बरं प्रयत्न करून. पण ते मला कळवायला विसरू नका हं!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन काळेजी..

तुमचे अन्य लिखाण तसेच वेगवेगळ्या लेखांवर दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय भावतात, आवडतात. कित्येकदा तर "अरेच्या.. आपल्यालाही अगदी हेच म्हणायचे होते" असं मनात येतं. तुमचे अनुभव वाचताना अगदी रोजच्या ओळखीतील कोणीतरी परिचित आपल्याला गप्पांच्या नादात एखादा किस्सा सांगतोय असं वाटतं.

तरीदेखील खूप नम्रपणे आपल्याला सांगू इच्छिते की हे पर्टीक्युलर सदर बऱ्यापैकी कंटाळवाणे होत आहे. फोटो व स्टेटस थोडे ओढून ताणून बसवलेले वाटते.

तरीही तुमच्या सलग 100 दिवसांची कमिटमेंट पाळण्याला सलाम. अशी चिकाटी अभावाने आढळते. मी मागे "100 हॅपी डेज" ला सुरुवात केली होती. म्हणजे सलग 100 दिवस आपल्याला हॅपी करणाऱ्या वेगवेगळ्या घटनांविषयी फेसबुकवर लिहायचे (थोडक्यात आजच्या दिवसात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट). ते अर्ध्यातच सोडून दिले मी. त्यामुळे तुमचं कौतुक.

@ मेघा, धन्यवाद!

@ पियू, आपणांस माझे अन्य लिखाण व लेखांवरील प्रतिसाद आवडतात हे वाचून मला आनंद झाला. आपले फार फार आभार.

सदर मालिकेविषयी आपण लिहिले आहे, की <<< तरीदेखील खूप नम्रपणे आपल्याला सांगू इच्छिते की हे पर्टीक्युलर सदर बऱ्यापैकी कंटाळवाणे होत आहे. फोटो व स्टेटस थोडे ओढून ताणून बसवलेले वाटते.>>> आपल्या अपेक्षेप्रमाणे ह्या मालिकेचे माझ्याकडून लिखाण झाले नाही ह्याचे मला अत्यंत वाईट वाटतेय. मी प्रस्तावनेत लिहिले होते, की <<< तसेच आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरूनसुद्धा २० Making of photo and status ची मालिका पूर्ण करायची की नाही हे अवलंबून असेल. काही चुकभुल झाल्यास आपण सांभाळून घ्यालच याची खात्री आहेच. तरी कुठल्याही क्षणी आपणांस कंटाळा आला तर मला फक्त एक hint द्या. मी ते प्रसिद्ध करायचं थांबवेन. >>>

आपण दिलेल्या प्रतिसादावरून मी ही मालिका प्रसिद्ध करण्याचे थांबवावे हे स्पष्टपणे प्रतिवेदीत होत नाही. तरी योग्य तो निर्णय घेण्याकरिता आपण मला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो. इथे मी आपणांस स्पष्ट करू इच्छितो, की मी मालिका थांबवली तर त्या गोष्टीची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच असेल. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत.

नाही सचिनजी..
मी फक्त माझे वैयक्तिक मत मांडले.. मायबोलीवर अनेक वाचक आहेत, तुमचे चाहते आहेत.. माझ्या एकटीच्या मतावर ठरवू नका. इतरांना सांगू दे. जर मॅजिरीटी लोकांचे मत असे पडले तर तुम्ही काय तो निर्णय घ्या.

@ च्रप्स, Lol

@ व्यत्यय, आपल्या प्रतिक्रियेकरिता आभार!

च्रप्स Lol
छान स्टेटस आणि फोटो
सचिनजी आणखी एक दोन भाग तरी कराच. कदाचित जे स्टेटस सगळ्यांनी पाहिले पाहिजे होते ते आलेच नाहीत. ते पाहिल्यावर मतपरिवर्तन होईलही.

@ धन्यवाद, अक्षय दुधाळ. मला आपला मुद्दा पटला.

ही वीस भागांची, ठरीव प्रकारची रूपरेखा असलेली (म्हणजे प्रथम फोटो, मग त्यावरील स्टेटस आणि शेवटी त्या फोटो आणि स्टेट्सचे मेकिंग) अशी मालिका असल्यामुळे काही भाग उत्तम होतील तर काही भाग आकर्षक वाटणार नाहीत. कधी कधी असेही होईल, की एकच भाग एखाद्याला अतिशय आवडेल, तर तोच भाग दुसऱ्याला पटणार नाही. हे सर्व आपण गृहीत धरायला हवे.

आणि ही कलाकृती साकारताना मला स्वतःला व्यक्तिशः भरपूर आनंद मिळतोय. त्यात तुम्हीही थोडेफार सहभागी व्हावे हीच इच्छा! Happy