अनुभव

Submitted by मोहना on 30 November, 2017 - 21:40

प्रशांतीने आपलं मोजकंच सामान एकत्र केलं. मुलाचा फोटो, त्याने काढलेली एक दोन चित्र, हरीचा आणि तिचा फोटो. फार नव्हतंच. एका तासात तिला सगळं आवरायचं होतं. जेमतेम तीन महिने एकत्र काम केलेल्या सहकार्‍यांचा निरोप घ्यायचा की नाही हे तिला समजत नव्हतं. त्यांना ठाऊक असेल? काय म्हणतील? प्रश्न, सल्ले आणि सहानुभूती... नकोच. काय कळायचं ते इथून गेल्यावरच कळलेलं बरं. पण ती नक्की का सोडून जाते आहे ते कुणाला ठाऊक असण्याची शक्यता तिला वाटत नव्हती. काय करावं? सामान पाहिलं की सर्वांच्या नजरा वळणारच. तिला रडायला यायला लागलं. डोळ्यातले अश्रू कसेबसे आवरत ती सामान भरत राहिली. कुठून या फंदात पडलो असं होऊन गेलं होतं तिला. पण त्याचवेळी सुटल्यासारखंही वाटत होतं. गेले तीन महिने रोजचा मनावर येणारा ताण आता कमी होणार होता. तिला ती या कंपनीत रुजू होण्यापूर्वी नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड आठवत राहिली.

"तुझे प्रयत्न कमी पडत असतील. इतक्या भारतीय बायका नोकर्‍या करतात. त्यांना कशा मिळतात?" प्रशांतीच्या चेहर्‍याकडे पाहत हरी म्हणाला.
"मला काय माहीत? मी नसेन हुशार." तो काहीच बोलला नाही.
"हे मला काही जमेल असं वाटत नाही. सहा महिने शिकायचं आणि दोन - तीन वर्षाचा अनुभव दाखवायचा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताच येत नाहीत."
"मग बसा रडत. दुसरं काय सांगणार?"
"हेच तुझं. उडवून लावायचं. काहीतरी आश्वासक बोलशील तर बिघडेल का?" तो काहीच बोलला नाही तशी प्रशांती तणतणली.
"नाहीतरी तुझ्यामुळेच पडलेय या भानगडीत. गुपचुप हातावर हात चोळत बसलेलं बरं." तिच्या फटकळपणावर काही बोलावं असं हरीला वाटलं नाही. पण वाद वाढविण्यात त्याला रस नव्हता. तो तिच्यासमोरुन निघून गेला. प्रशांती चडफडत राहिली. तिला काही नोकरी करायची हौस नव्हती, आत्मविश्वास तर अजिबात नव्हता. पण मुलाला डॉक्टर करायचं हरीच्या मनाने घेतलं आणि तो तिच्या मागेच लागला. मुलाची इच्छा काय आहे, भारतात तो रुळेल का असे प्रश्न त्याला पडले नव्हते त्यामुळे मुद्दाम कार्तिकच्या मनाचा कल पाहण्याची आवश्यकता त्याला वाटली नाहीच.
"कार्तिक भारतात राहणार असेल कॉलेजसाठी तर पैशाची तरतूद करणं आलं. तू पण नोकरीचं मनावर घे. अधूनमधून म्हणत असतेस. आता ते अमलात आणण्याची हीच वेळ आहे. कार्तिक, आहे ना तयारी भारतात चार वर्ष राहायची?" हरीने सर्व काही आधीच ठरवलं होतं. त्याला दोघांचा होकार ऐकून फक्त संमतीचा खुंटा बळकट करायचा होता. कार्तिकने फार कुरकूर केली नव्हती. प्रशांतीची आपण इथे आणि मुलगा भारतात याला फारशी तयारी नव्हती पण खर्च, कार्तिकचं भवितव्य या सार्‍याचा विचार करुन तिनेही हरीच्या बेताला मान्यता दिली. त्याच्या शिक्षणाचा खर्च हरीच्या पगारात शक्य नव्हता आणि तसंही कार्तिक भारतात गेला की करमणं कठीण होतंच. नोकरी हा उत्तम पर्याय होता.

हरीच्याच मित्राच्या क्लासमध्ये तिने जायला सुरुवात केली. सॉफ्टवेअर टेस्टिंग! सहा महिन्यात तिथे ती जे काही शिकली ते किती कळलं, पुढे त्याचा किती उपयोग होईल याचा तिला अंदाज नव्हता. पण पाण्यात उडी टाकलीच आहे तर पोहणं भाग होतं. ते तितकंसं सोपं नाही हे लक्षात आल्यावर तिचा निश्चय डळमळीत व्हायला लागला. मुलाखतीत कुठे अडत होतं ते कळत नव्हतं. कधी तिला विचारलेले प्रश्न समजत नव्हते तर कधी ती काय बोलतेय ते पलिकडच्या व्यक्तीला कळत नव्हतं. नन्नाचा पाढा चालू होता. पण पैसे टाकले की फोन इंटरव्ह्यू देणारी माणसं मिळतात हे प्रशांतीच्या कानावर आलं होतं. तिनेही तेच करायचं ठरवलं. विजी बरोबरच्या भेटीत यापुढच्या मुलाखती विजीने द्यायच्या आणि काम झालं तर पाचशे डॉलर्स प्रशांती तिला देणार हे ठरुन गेलं. हरी देखील प्रशांतीने टाकलेल्या या पावलावर खूश होता.
"करावं लागतं हे सगळं. माझ्याच माहितीतली बरीचजणं अशी लागली आहेत."
"पण पुढे काय? नंतर कामंही जमायला हवं."
"जमतं. शिकशील हळूहळू." प्रशांती उगाचच फार विचार करतेय असं वाटत होतं हरीला.
"पण आपल्यामुळे सगळेच भारतीय बदनाम होतात." प्रशांती पुटपुटली आणि हरी जोरजोरात हसला.
"इथे काही आपण भारताचं प्रतिनिधित्व करायला आलेलो नाही. पोटापाण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी हातपाय हलवणारच ना." हरीने तिच्या मनातल्या विचारांवर शिक्कामोर्तब केल्यावर प्रशांतीला बरं वाटलं. प्रामाणिकपणा, सत्य अशा मनाच्या ताबा घेणार्‍या विचारांना तिने आनंदाने झटकून टाकलं.

विजीने दिलेल्या मुलाखतीतून लवकरच प्रशांतीचं काम झालं. प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळेस प्रशांतीचा प्रभाव पडला की झालं. पण त्या परीक्षेची वेळ आलीच नाही. कंपनीने तिला पंधरा दिवसात हजर व्हायलाच सांगितलं. प्रशांतीला आनंदाचं भरतं आलं.
"जमेल मला? भिती वाटतेय. म्हणजे मुलाखत विजीने दिली. काम करायला मी जाणार. आवाज ओळखला तर?" हरीने तिची समजूत काढली.
"पंधरा दिवसात तुझा आवाज ते विसरुनही गेले असतील प्रशांती. पुन्हा ज्यांनी मुलाखत घेतली त्यांच्याबरोबरच काम करशील असं थोडंच आहे?"
"हं." प्रशांतीने हुंकार दिला तरी पुढचे पंधरा दिवस ती बेचैन होती. झटून ती अभ्यासाला लागली. टेस्टिंगबद्दल जी काही माहिती मिळेल ती शोधून, यु ट्यूबवर व्ही.डी.ओ. पाहून पाहून आपल्याला आता बरंच काही समजायला लागलंय असं तिला वाटायला लागलं. काही वेळा मन धास्तावून जात होतं. ती स्वत:चीच समजून घालायला शिकली. लगेच काम नाही कुणी सोपवत. प्रशिक्षण मिळेलच. त्या वेळेला कल्पना येईल कामाची. जमेल. जमवू.

चेहर्‍यावर आत्मविश्वासाचा खोटा मुखवटा लावून तिचा पहिला दिवस व्यवस्थित पार पडला. दोन - तीन स्वत:च्या राज्यातलेच सहकारी पाहून तिचा जीव भांड्यात पडला. भारतीय आणि त्यातून आपल्याच भागातले ही दिलासादायक गोष्ट वाटली तरी अस्वस्थपणाही आला. कामात कमी पडलो तर यांच्यासमोर शोभा. पण वेळ पडली तर आपलीच माणसं मदत करतील याचीही तिला खात्री होती. हरीही तेच म्हणाला होता ते तिला आठवलं. पण अमेरिकन सहकार्‍यांबरोबरही चांगले संबंध ठेवायचे हे तिने मनातल्या मनात ठरवून टाकलं. प्रशिक्षणकाळात तिची मुलाखत ज्यांनी घेतली होती त्यांचीही भेट झाली. तिच्या हुशारीचं, हजरजबाबी पणाचं त्यांनी कौतुक केलं. अस्वस्थ मनाने तिने ते स्वीकारलं. आवाज वेगळा वाटतोय असं कुणी म्हणालं तर ही चिंता तिच्या चेहर्‍यावर पसरली होती. पण तसं काही झालं नाही आणि उगाचच भितीचा बागुलबुवा आपल्याभोवती उभा केला याचं तिला हसू येत राहिलं. तिला विजीचंही कौतुक वाटलं, मुलाखती देऊन नोकरी व्यतिरिक्त तिला मिळणार्‍या पैशांचं अप्रूपही.

काम सुरु झाल्यावर विजीबरोबर आणखी एक सौदा तिने केला. दोघींनीही थोडी घासाघीस करत व्यवहार ठरवला. विजी घरातून काम करायची. प्रशांतीला कामात अडचणी आल्या तर ती विजीला फोन करणार होती आणि महिन्याच्या शेवटी झालेल्या तासांचे प्रशांती विजीला पैसे देणार होती. पहिल्यांदा फोन करताना प्रशांतीच्या अंगाला कापरं भरलं. कुणी ऐकलं, पाहिलं तर? फोनवर अतिशय हळू आवाजात बोलत होती ती. मनातल्या मनात त्याचवेळेला कुणी येऊ नये याची प्रार्थनाही. विजीच्या सूचनांप्रमाणे ती काम करत होती. जमतही होतं ते. हळूहळू दोघीही सरावल्या. त्या दिवशीही ती फोन करत असतानाच अचानक स्कॉट आला आणि झटकन फोन ठेवलाच प्रशांतीने.
"घाईघाईत फोन ठेवलास. मी आलो म्हणून?" त्याने हसत हसत विचारलं. गडबडून तिने अर्धवट मान डोलावली. थोडंफार कामाचं बोलून उठताना स्कॉट म्हणाला,
"निम्मा वेळ फोनवर असतेस प्रशांती तू."
"छे, काहीतरीच काय स्कॉट." तिने त्याला उडवून लावल्यासारखं केलं. तो हसला आणि तिथून निघून गेला. प्रशांती स्कॉटला आपण फोनवर असतो हे कसं समजलं याचा विचार करत राहिली. पण अशा गोष्टींचा विचार करण्याऐवजी मार्ग काढणं उत्तम हे तिला ठाऊक होतं. विजी होतीच पण हळूहळू तिने तिथे असलेल्या दोन - तीन भारतीय सहकार्‍यांची मदत घ्यायला सुरुवात केली आणि अधेमधे अमेरिकन सहकार्‍यांचीही. पण कितीही नाकारलं तरी मनावरचा ताण वाढायला लागला. घरी आली की चिडचिड व्हायला लागली.
"हरी, निम्मा वेळ विजीला फोन करण्यात जातो माझा."
"काम घरी घेऊन येऊ शकत नाहीस का?" हरी असं का विचारतोय ते तिला समजेना.
"त्याने काय होईल?"
"मी मदत करेन."
"नाही. वर्ष झालं लागून की मगच घरुन काम करायची परवानगी मिळेल."
"पण इतकं कसं अडतं तुला?" हरीच्या प्रश्नावर ती वैतागलीच.
"तुझ्याइतकी हुशार नसेन म्हणून अडतं सारखं." तो काहीच बोलला नाही.
"तुला ठाऊक आहे ना, विजीच्या मदतीचे पैसे द्यायचे आहेत. निम्मा पगार त्यातच जाईल बहुतेक." तो काही बोलत नाही पाहून प्रशांतीच बोलत राहिली.
"ठीक आहे. तिच्यामुळेच कामातलं शिकते आहेस ना. एकदा जम बसला की लागणार नाही तुला विजीची मदत." हरीच्या शांतपणाचं तिला नवल वाटलं आणि रागही आला. हा नोकरी सोडून दे का नाही म्हणत हेच तिला समजत नव्हतं. पण भारतात कॉलेजसाठी पाठवलेल्या कार्तिकची फी, तिथले खर्च डोळ्यासमोर उभे राहिले की हरीच्या वागण्याला दोष देण्यात अर्थ नाही हे ही जाणवायचं. जे चालू आहे त्याला पर्याय नाही. आहे त्यातूनच जमेल तसा मार्ग काढायचा हे सत्य अंगावर कोसळायचं

पाहता पाहता जवळजवळ तीन महिने झाले होते तिला या कंपनीत रुजू होऊन. खुर्चीवर मान खाली घालून ती बसली होती. तिला विजीला फोन करायचा होता पण बाजूच्या टेबलाजवळून स्कॉटचा आवाज येत होता. तो कधीही इकडे येईल याची तिला खात्री होती. स्कॉट कधीही कुठूनही अचानक यायचा. त्यामुळे सतत सावध राहायला लागायचं. बाजूला बसणारे त्याला आपल्याबद्दल काही सांगत असतील का, आपल्याला काम जमत नाही अशी कुणी तक्रार केली असेल का अशा शंका तिच्या मनात तरळून जात. मिटींगमध्येही ती ऐकत बसायची. कोणत्याही प्रश्नावर तिच्याकडे उत्तर नसायचंच त्यामुळे सहभाग अर्थातच शून्य. महिनाभर तशी तिची कुणी विशेष दखलही घेतली नव्हती. पण आता तिलाही आवर्जून प्रश्न विचारले जायला लागले होते. आधी कुणी काय उत्तरं दिली असतील त्यावरुन ती स्वत:चं उत्तर तयार करायची. त्यात नवीन काही नसलं तरी कुणी तिला नाउमेद करत नव्हतं. पण आपण कुणाच्याच अपेक्षेत बसत नाही, इथे आपला निभाव लागणं कठीण आहे असं तिचं तिलाच वाटत राहायचं. प्रशांती मग स्वत:ला बजावयची. आपल्याला पैशाशी देणंघेणं आहे. बाकी आपल्याबद्दल कुणाला काय वाटतंय याचा विचार करायची आवश्यकताच नाही. आताही ती तोच विचार करत बसली होती. इतक्यात स्कॉट आलाच.
"बोलायचं होतं प्रशांती."
"स्कॉट?" तिने प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याने पाहिलं. इथे काही भारतातल्यासारखं नव्हतं. साहेबांना सर म्हणा, अदबीने वागा. प्रशांती स्कॉट काही बोलेल याची वाट पाहत राहिली. प्रशांतीच्या कामातील चुका, फोनवर असणं, फारसं कुणाबरोबर न मिसळणं या बाबत त्याला तिच्याशी बोलायचं होतं. तो काही बोलत नाही हे पाहून प्रशांती अस्वस्थ होत होती.
"बोल ना." हाताच्या तळव्यांना घाम फुटल्यासारखं वाटलं तिला.
"इथे नाही. माझ्या रुममध्ये."
"ठीक आहे. येते दहा मिनिटात." तो निघून गेला आणि ती तशीच बसून राहिली. काय वाढून ठेवलंय. काय बोलायचं असेल? ती खोलीत पोचल्यावर त्यानेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत.
"कितीतरी दिवस पाहतोय, ऐकतोय. कामाच्या बाबतीत तू फोनवरुन कुणाची मदत घेतेस?" प्रशांतीला पायाखालची वाळू सरकल्यासारखं वाटलं. कशीबशी ती पुटपुटली.
"कामासाठी मदत? फोनवरुन? छे काहीतरीच काय? "
"ठीक आहे. पण कामात चुकाही भरपूर आहेत. सतत तू कुणाची ना कुणाची मदत घेत असतेस."
"कमॉन स्कॉट. नवीन आहे मी इथे. इतक्या पटकन सगळं समजेल अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही का?"
"नक्कीच. पण तुझ्यावर कामंही साधं सोपंच सोपवतोय आम्ही. ते सहज जमायला हवं तुला." स्कॉटच्या नजरेला नजर देता येईना प्रशांतीला. तिने मान खाली घातली.
"प्रशांती, तुला खरंच तीन वर्ष टेस्टिंग मध्ये अनुभव आहे?" स्कॉटच्या स्वरात जरब होती.
"हो. आहे ना." कसंबसं प्रशांती पुटपुटली.
"हे घे." त्याने कागद पुढे केला. काय आहे हे तिला समजेना. कागद हातात घेतला तसा तिचा चेहरा पांढराफटक पडला.
"जमेल?" स्कॉटने दिलेलं काम तिच्या डोक्यावरून गेलं होतं. धीर करुन तिने विचारलं.
"उद्यापर्यंत करते पूर्ण. चालेल ना?" विजीची मदत लागणार होती. तिला जमलं नाही तर घरी घेऊन जायचं. हरीला विचारायचं. तिने पटकन मनातल्या मनात ठरवून टाकलं.
"इथेच माझ्यासमोर कर."
"पण कॉम्प्युटर..." ती पुटपुटली.
"मला फक्त तू हे काम पूर्ण करण्यासाठी काय काय करशील ते सांग. फार कठीण काम नाही. अर्धातास पुरेल? मी येतोच तेवढ्यात परत." स्कॉट तिथून बाहेर पडला. आणि प्रशांती त्या कागदाकडे टक लावून बघत बसली. तिला त्यातलं अक्षरही कळलं नव्हतं. तिने घेतलेल्या प्राथमिक धड्यातलंही तिला या क्षणी काही आठवेना. जे काही जमेल ते ती खरडत राहिली. स्कॉट परत आला तेव्हा ती निर्विकार नजरेने भिंतीकडे पाहत बसली होती. त्याने तिच्यासमोरचा कागद ओढला.
"प्रशांती...?"
"मला एक संधी दे स्कॉट."
"प्रशांती, हा तोच प्रयत्न होता. गेले कितीतरी दिवस प्रत्येकजण तुझ्याबद्दल कुरकूर करतोय. फोनवरची प्रशांती आणि प्रत्यक्षातली तू. जमीन अस्मानाचा फरक आहे. तू फारशी बोलत नाहीस. बाकीच्यांना तुझे उच्चार कळायला कठीण जातात. त्याचीही होईल सवय. तो महत्त्वाचं मुद्दा नाही. पण जवळजवळ तीन महिने झाली तरी सतत तुला कुणाची ना कुणाची कामात मदत लागते. त्यामुळे फोन इंटरव्ह्यू तूच दिला होतास का ही शंका बळावत चालली होती. तुला खरंच चार वर्षाचा अनुभव आहे का याचीही खात्री वाटत नव्हती. त्यामुळे ही शेवटची संधी मी तुला देऊ पाहत होतो. मला तुझ्याकडून कोणत्याच प्रकारचा कबुलीजबाब नकोय. पण तुला मी या कामातून मुक्त करतोय."
"म्हणजे?" कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत प्रशांतीने विचारलं.
"यापुढे कंपनीला तुझ्या सेवेची आवश्यकता नाही." प्रशांती डोळ्यातलं पाणी मागे फिरवीत ताडकन उठून स्कॉटच्या खोलीतून बाहेर पडली.

सामान एकत्र करताना तिला हे सगळं आठवत राहिलं. कुणी काही विचारायच्या आत तिला इथून निघायचं होतं. स्कॉटने पुढे केलेल्या कागदांवर तिने सही केली आणि निमूटपणे त्याच्या खोलीत जाऊन तिने ते कागद त्याला दिले. येता येताच तिने कुणाचं कितपत लक्ष आहे याचा अंदाज घेतला. तसं सारं शांत होतं. ती बाहेर पडली. स्वत:च्या गाडीपाशी आली. गाडीत सामानाचा खोका ठेवला आणि दार बंद करत ऑफिसच्या दिशेने तिने नजर टाकली. तीन महिने काम केलेलं ते ठिकाण या क्षणी तिला परकं वाटायला लागलं होतं. आता पुढे काय? क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि तिच्या चेहर्‍यावर पुसटसं हसू पसरलं. मन शांत झालं. ऑफिस ते घर, सोळा मैलाचा तो प्रवास तिला फार लांबल्यासारखा वाटत होता. कधी एकदा घरी पोचतोय आणि चांगली डुलकी काढतोय असं झालं होतं.

संध्याकाळी हरी घरी आला तेव्हा ती उत्सुक होती. तिला इतकं प्रसन्न पाहून त्याला आश्चर्य वाटलं.
"उद्या कामावर जायचं नाही मला. काढून टाकलं." तिने शांतपणे सांगितलं.
"काढून टाकलं? आणि इतक्या आनंदाने सांगतेयस?" हरी चांगलाच बुचकळ्यात पडला.
"तू यायच्या आत रेझ्युमी अपटेड केला. या कंपनीत तीन महिन्याचा अनुभव मिळाला त्याचा फायदा होईल आता. तीन वर्ष अनुभव लिहिलंय. ठीक वाटतंय ना? दुसरी चांगली नोकरी मिळेल. पगारही वाढलेला असेल. बघ, गेल्या तासाभरात दोन फोनही आले. इंटरव्ह्यूची वेळ ठरवायला." तिने उत्साहाने म्हटलं आणि हरी आपल्याला पाहिजे तशी बायको मिळाल्याच्या आनंदात प्रशांतीकडे अभिमानाने पाहत राहिला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिती - मुळात पाया पक्का नसेल तर सुरुवातीपासूनच धडपडणं सुरु होत असावं. कारण टेस्टिंग शिकवणारेही, निदान मला माहित असणारे बरेच तेलगूच आहेत आणि तेच असा सल्ला देतात, तीन महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करा आणि लिहा ३ वर्ष. भारतात तुमच्या शिक्षणाची पार्श्वभूमी पूर्ण वेगळी असेल तर या ३ महिन्यात काय शिकणार. त्यामुळे अशा अनेक प्रशांती निर्माण झालेल्या आहेत. काही तगतात काही सोंग उघडकीला आलं की नोकरी गमावतात.

maitreyee - व्हेरीफेकेशन - तपासणी, फेरतपासणी?

नंद्या४३
<<<पैसे मिळवायला खोटे बोलावे लागत नाही. उलट खोटे बोलले नि कुणाला कळले तर, या भीतीने जगायचे?!>>> हे कळायला पाहिजे ना पण? मला असं वाटतं की सुरुवातीला भीती वाटत असावी नंतर सरावतात, स्वत:च्या मनाचं समाधान करुन घेतात की हे करावंच लागतं नाहीतर नोकरी मिळणार नाही वगैरे.

असे बरेच प्रसंग / किस्से पाहिले आहेत.
१) एका मित्राने (मराठी) असच खोटे रेफरन्सेस / अनुभव दाखवून नोकरी मिळवली. कसाबसा महिना काढला. ‘बरेच दिवस झाले, थोडा रस्टी आहे‘ वगैरे कारणं दिली. पण शेवटी पकडला गेला आणी नोकरी गेली.

२) ही च व्यक्ती पुन्हा एकदा ह्याच मार्गानं नोकरीला लागली. त्या एंप्लॉयर ला पहिल्याच महिन्यात मधल्या कन्सल्टंट ला बायपास करून डायरेक्ट एंप्लॉयमेंट देऊन ग्रीन कार्ड करता येईल का वगैरे विचारलं. मग तो कन्सल्टंट आणी एंप्लॉयर, दोघांच्या नाकदुर्या काढायला लागल्या.

३) एका परिचीतानं, तीन - चार खोटे रेझ्यूमे बनवले. (नाव+ आडनावातलं आद्याक्षर, आडनाव + नावाचं आद्याक्षर वगैरे). प्रत्येकात वेगवेगळा अनुभव वगैरे दाखवला. पण ह्यातले दोन फेक रेझ्यूमे एका देसी एंप्लॉयर कडे गेले. त्याने फोन करून सांगितलं, की असले प्रकार करू नकोस.

४) एका मुलाने बी. ई. चा प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवून आपण भारतात ईंजिनीअरींग मधे एक पुस्तक लिहील्याचा दावा केला होता. आमच्या एच. आर. ने ते मला आणून दाखवलं होतं. Happy

५) तीन महिन्याच्या टेस्टिंग च्या कोर्स मधे एच १ सकट नोकरी मिळवून देतो असं सांगितलं होतं. जी नोकरी ४ वर्षाचं बॅचलर्स + २ वर्षाचं मास्टर्‍स नाही देऊ शकत, ती नोकरी ३ महिन्याच्या कोर्स वर मिळेल आणी त्यासाठी रात्री १०:३० वाजता फोन ईंटरव्ह्यू आहे, ह्या घटनेवर विश्वास न बसल्यामुळे फोन बंद केला होता मी.

असे आणखीही किस्से आहेत. सध्या ईतकेच पुरे.

असे नका म्हणू हो!
भारतीय लोकांना फार राग येतो, काही काही लोक तर अद्वातद्वा लिहितात इथे. ते सगळे मुसलमानांसारखे झाले आहे, खरे असले तरी बोललो तर रागावतात.
सुधरत तर नाहीतच.>>>>>>>>>>>>+१०००
सॉरी पण अगदीच राहावलं गेलं नाही आणि ढीगाने अशी लोकं पाहिलीयेत म्हणून ते वाक्य लिहिलं..... Wink

असे प्रकार ’तेलगू’ लोकांमुळे वाढले आहेत आणि अजूनही सर्रास घडतात एकडे... त्यांनी सगळ्या भारतीयांचे नाव खराब ठेवले आहे ... काही ठिकाणी आता आंध्र म्हंटले कि consultant सरळ ओपनिंग नाही असे सांगायला लागले आहेत

सध्या h4 ead आल्यापासून असल्या लोकांचा सुळसुळाट झाला आहे. माझ्या बाजूलाच एक बाई बसते, नवरा सेम कंपनीत, 8 पैकी 7 तास तिच्याच डेस्क वर असतो. तिचे काम करत.
एका जेनुयीन अनुभव असणाऱ्याचा जॉब खाल्लाय.. नो वंडर अमेरिकन लोक आता चिडायला लागलेत.

खूप छान जमलिये कथा.
आमच्या (सिडनी) कंपनीची एका भारतीय आयटी कंपनीशी खूप मोठ्ठी व्हेंडर पार्ट्नरशिप आहे. इंतर्व्ह्यू कुणी दुसर्‍यानेच दिल्यासारखा निवडलेला एक जण टीममधे होता. मला हा एक अनुभव आधी आल्यानं मी टेलेकॉन्फरन्स वर टेक्निकल इंटर्व्यू घेण्याबद्दल हटून बसले होते. खूप वादावादी झाल्यावर व्हेंडर पर्ट्नरने कँडिडेटच बदलला. तेव्हापासून माझ्याबाबतीत जरा जपून आहेत.. खारही खाऊन आहेत त्या व्हेंडर पार्ट्नरची माणसं... इथे आणि ऑफशोअर सुद्धा.

गंमत म्हणजे... 'व्हॉट मॅम.. यू आर देसी टू' असं निर्लज्जपणे मला बोलून दाखवण्याचा प्रकार एकाने केला होता.
असो....
कथा उत्तम जमली आहे

मोहना ही कथा नसून व्यथा आहे. Happy छान लिहिलीस.

स्वतः या त्रासातून गेले आहे. सर्व अनुभव खरा असूनही नोकरी मिळवाय्ला त्रास झाला खूप्च. तेही एक्दा नाही तिन वेळा. एकदा रेझ्युम बदलून पाहिला म्हणजे वेगळ्या प्रोफाईल साठी पण ते जमनार नव्हतं मग नाद सोदून दिला आणि प्रयत्न करत राहिले. अजूनही नवीन नोकरी कधी पहावी लागली तर त्रास होणार आहे. Sad
मी तर माझ्ञा एका कॉम्प एम्जिनियर मैत्रीनीला(३ वर्षे खरा अनुअभव) विझा रिजेक्ट झालेला आणि ब.कोम. झालेल्या शेअजार्च्या बाईला विजा मिळालेले पाहिले आहे. ती आता एच आर म्हणून लोकांचे रिझ्युम बघते. Happy काय नशिब आहे.
असो. खोटं पार पाडायला धाडस लागतं, ते हे लोक करतात. पण त्याचा त्रास भयानक होतो खर्या लोकांना. त्यामुळे ट्रंपने जास्त बंधने आणली विझा साठी तेव्हा वाटले ते योग्यच आहे.

खरंच अवघड आहे . शेवटचा पॅरा तर जबरदस्त. मला वाटलं सोडून देईल हे सगळं . एक शंका अमेरिकेत राहूनही भारतातल्या शिक्षणाचा खर्च एकट्याच्या पगारात परवडत नाही ?

हे अनुभव रोजचे असल्यामुळे ही कथासदृश (शब्द बरोबर आहे का ? चू. भू. द्या घ्या!) सत्यकथा आवडलीच. शेवटचा परिच्छेद तर खासच, मोहना! जबरी निरीक्षण !!
असले जुगाड करणारे बहुधा तेलगूच असल्यामुळे आतापर्यंत ज्या दोन कंपन्या /ऑफिसमध्ये काम केले तिथे यांचा उबग येईल इतका सुळसुळाट पाहिला. इंग्लिश नाही आले तरी चालेल पण तेलगू यायलाच हवे अशी परिस्थिती. नवरा- बायको, भाऊ - बहीण, भाऊ - भाऊ, आई- वडील आणि मुलगी (कहर!) सगळी नाती एकाच कंपनीत एकमेकांचे काम सुखाने करताना याची देही याही डोळा पाहिली. त्यांच्या गटबाजीमुळे अनेकदा फार त्रास सोसावा लागला आणि अगदी तडफड, चिडचिड झाली कारण मी अल्पसंख्यान्क मराठी. आता प्रमाण कमी झाले असले तरी सध्याच्या ऑफिसात दोन सख्खे भाऊ आहेतच. मोठा नव्याने आलेल्या धाकट्याचे काम करतो! ...आणि गेल्या महिन्यापर्यंत एक नवरा - बायकोही होते त्यापैकी बायकोला नारळ दिला कारण दोघेच सतत एक कॉन्फरन्स रूम अडवून दार बंद करून 'चर्चा' करत असत Happy

भयानक आहे हे सगळे.... आणि वस्तुस्थिती सुद्धा ?? !!
अशाने देशाचे नाव खराब... लायक उमेदवाराची संधी जाते.... प्रामाणिक प्रयत्न आणि अभ्यास करणारे नाउमेद होतात...

अशांना फक्त काढून टाकतात? त्यांना व्हिसा / नोकरीसाठी कायमचे अपात्र म्हणून नोंदवले जात नाही (ब्लॅकलिस्ट) ?
ज्यांनी खोटी मुलाखत दिली, ज्यांनी ओळखीचा लायक उमेदवार म्हणून आणले अशा व्यक्तींना, ज्यांनी ३-३ महिने पैसे घेऊन काम केले त्यांची नावे विचारून त्यांचा व्हिसा तातडीने रद्द करून ४८ तासात देश सोडा नाहीतर कायदेशीर कारवाई / तुरूंगवास होईल असे काही होत नाही? तर ही कीड निपटली जाईल.... की अमेरिकन कायद्यात असे करायला परवानगी नाही, मानवाधिकार वगैरेमुळे?

ओळखीचा माणूस त्याच कंपनीत आणायचा असेल तर स्किलसेट पूर्ण वेगळा हवा असा नियम नाही करता येणार? म्हणजे भाऊ भावाचे काम करतो हे होऊच शकणार नाही...

" 'व्हॉट मॅम.. यू आर देसी टू' असं निर्लज्जपणे मला बोलून दाखवण्याचा प्रकार एकाने केला होता." - ग्रूज्युएट असिस्टंट म्हणून एकदा एक टेस्ट मॉनिटर करत असताना, एका ईंडियन मुलानं बॅगमधून डायरेक्ट पुस्तकच काढलं होतं. त्याला हटकल्यावर, 'क्या यार, ईतना तो चलता है|' अशी मखलाशी पण केली होती. आधी थक्क झालो, मग राग आला गृहित धरला गेल्याचा आणी नंतर त्याला पुस्तक परत ठेवायला लावून रिपोर्ट केलं होतं.

नॉन-देसी प्रोफेसर्स च्या टेस्ट्स च्या वेळी हिंदीतून बोलत चाललेली कॉपी पण पाहिली आहे.

हेच लोक्स पुढे जाऊन हे 'कन्सल्टंसी' प्रकार वगैरे करून स्वतःच्या, देशाच्या आणी कम्युनिटी च्या नावाला चार चाँद लावतात.

दुसरा एक प्रकार - जो फसवणुकीशी संबधित नाहीये - पण वैय्यक्तिक स्वच्छतेच्या अभावाचा.

एक ईंटरव्ह्यू ला आलेला मुलगा, तो दारात आल्याचं खाली बघून काहीतरी वाचत असताना सुद्धा, ऑफिसभर पसरलेल्या सांबाराच्या दरवळावरून लगेच समजलं होतं.

स्टुडंट असताना, एका देसी प्रोफेसर ने एका तेलगू मुलाला, 'झोपेतून उठल्यावर किमान ब्रश करून, तोंड धोवून तरी येत जा' असं सांगितल्याचं आठवतं.

हे गचाळ लोक व्हिसा मुलाखतीत कसे पास होतात? कितीतरी चांगले / लायक उमेदवार पुन्हा पुन्हा मुलाखत देतात असे ऐकून आहे. तिथेही काही सेटिंग असते?

अकटुली, जेवण बनवताना सुटलेला वास कपडे लगेच कॅच करतात. म्हनून, बेडरूम चा दरवाजा बंद असावा जेवण बनवताना.
करी smell आपल्याला येत नाही पण अमेरिकन ला लगेच येतो.

’अनुभव’ कथेमुळे इथे सर्वांनी लिहिलेले अनुभव वाचून अजून एक कथा होऊन जाईल असं वाटायला लागलंय :-). धन्यवाद सर्वांना.

कारवी - <<<ज्यांनी खोटी मुलाखत दिली, ज्यांनी ओळखीचा लायक उमेदवार म्हणून आणले अशा व्यक्तींना, ज्यांनी ३-३ महिने पैसे घेऊन काम केले त्यांची नावे विचारून त्यांचा व्हिसा तातडीने रद्द करून ४८ तासात देश सोडा नाहीतर कायदेशीर कारवाई / तुरूंगवास होईल असे काही होत नाही? >>> होईल कधीतरी असं, व्हायला हवं. ही जी प्रशांती आहे ना ती भेटली आणि कामाबद्दल बोलायला लागली की मला फक्त तिने मुलाखतीसाठी दिलेले ५०० डॉलर्स दिसत राहतात. फार त्रास होतो.

विद्या <<<मोहना ही कथा नसून व्यथा आहे.>>> अगदी!

फेरफटका <<<एक ईंटरव्ह्यू ला आलेला मुलगा, तो दारात आल्याचं खाली बघून काहीतरी वाचत असताना सुद्धा, ऑफिसभर पसरलेल्या सांबाराच्या दरवळावरून लगेच समजलं होतं.>>> माझ्या नवर्‍याच्या कार्यालयात मसाल्यांचा वास येतो म्हणून एका बाईंना काढून टाकलं कामावरुन.

च्रप्स <<<अकटुली, जेवण बनवताना सुटलेला वास कपडे लगेच कॅच करतात. म्हनून, बेडरूम चा दरवाजा बंद असावा जेवण बनवताना.>>> थंडीत जॅकेटला येतात हे वास Happy

अभि_नव ही लिंक पण पहा.

Andhra Pradesh leads in IIT race, UP keeps second position - Times of ...

नक्की कुठलं चित्र खरं?

त्यांचे चांगले गुण पण पहा. फेक रेझ्युमेवर आले तरी इतर सतरा गुलट्यांची मदत घेऊन ऑन द जॉब फटाफट शिकतात. तेलगु आहे म्हणून अनोळखीसुद्धा एकमेकांना संभाळून घेतात. त्याउलट आमचे लोक. कोणाशी मराठीत बोललं तर इंग्लिशमधून उत्तर देतात. मैत्रीसुद्धा शक्यतो जात बघून करतात. 'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा जपत भरपूर मोडून घेतात.

वाह्यात गृहस्थ <<<<<<तेलगु आहे म्हणून अनोळखीसुद्धा एकमेकांना संभाळून घेतात.>>> आता हे ही चित्र बदलत चाललं आहे. आता खूप जास्त माणसं त्यांचीच असल्याने आपापसात स्पर्धा सुरु झाली आहे.

"तेलगु आहे म्हणून अनोळखीसुद्धा एकमेकांना संभाळून घेतात. " - मलाही आधी असं वाटायचं. पण त्यात सुद्धा बरेच प्रांतीय / जातीय भेदभाव आहेत हे अनेक ओळखीच्या लोकांच्या अनुभवातून कळलय.

नाण्याची दुसरी बाजू सांगतो - फेक रिसुमे सगळेच बनवतात, काही लोक फेक अनुभव टाकतात, तर काही फेक टेक्नॉलॉजी. म्हणजे काम एका टेक्नॉलॉजी मध्ये केले असेल पण मार्केट मध्ये जिला डिमांड आहे ती लोक ऍड करतात रिसुम मध्ये.
गुलटे असं करून करून टॉप लेव्हल ला गेले आहेत इथे. मराठी माणूस मागे पडतो.

malaa alelya anubhavatil manus dekhil gulatee ch hota.
mala ha prakar tatpurvi aikunahi mahit nasalyane farach ascharyaacha dhakka basala hota.
Tyala swatahala dekhil anek performance issues hote.

apan Marathi manus mage padato asala vichar na karata - apalya vivekbuddhila dharun vagave.

नन्द्या४३,
फोरट्रान, कोबोल प्रोग्रामिंग!! साष्टांग नमस्कार.(मी १-२ महिने केल्यावर येडी झाले आहे)

याला(वरील तेलुगु केसेस ना) अपवादः आमच्या कंपनीत खूप स्त्रगल करुन वर आलेला, हुशार तेलगु मॅनेजर आहे.कायम नव्या नव्या टेक्नॉलोजि शिकत असतो.त्याने त्याच्या एरिया मधल्या चर्च साठी अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप बनवले आहे.

मोहनाच्या कथेमुळे हे जे काही कळलंय ते फारच भयंकर आहे. शॉकिंग.
माझा तर अमेरीकेसारख्या देशात हे असलं काही होत असेल ह्यावर इतर कुणी सांगुन किंवा आणि कुठे वाचुन विश्वास बसला नसता जर हे माबोवरच्या मोहना, मैत्रेयी, विद्या, फेरफट्का ह्या बाहेरच्या देशात राहणार्‍या लोकांनी लिहिलं नसतं तर.

सस्मित, हे प्रकार काही मर्यादित क्षेत्रात घडतात. मला आय-टी मधले तेलगू (मोठ्या प्रमाणात) आणी मॉटेल बिझनेस मधले गुजराथी ही दोन उदाहरणं पटकन आठवली.

गुजराथी समाज हा एक वेगळा विषय आहे. ते अतिशय निर्मळपणे 'हम लोग यहॉ इल्लिगल आये, लेकिन बच्चे सब यहीं पैदा हुए है' असं सांगतात. त्यांच्या समूहात रहातात. अतिशय रन-डाऊन मॉटेल्स चालवतात आणी बाकी कधीही दिसले नाहीत तरी गरबा नाईट च्या दिवशी 'आपल्या गावात ईतके गुजराथी रहातात!! कधी दिसत कसे नाहीत' असं वाटून आश्चर्यानं तोंडात बोट (स्वतःच्या) घालण्याईतक्या संख्येनं शहराच्या कन्व्हेंशन सेंटर / सिटी हॉल मधे उपस्थित रहातात.

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. सगळे तेलगू / गुजराथी ह्या कॅटेगरीज मधे नाहीत. पण 'कन्सल्टंसी / मॉटेल' प्रकरणात मोठ्या प्रमाणात हे तेलगू / गुजराथी दिसतात हे देखील खरय. बाकीच्या क्षेत्रात (ईंजिनियरींग, मेडिसीन, बिझनेस ई.) असणारे तेलगू आणी गुजराथी सुद्धा काही कमी नाहीयेत.

फेरफट्का, अर्थातच सगळेच भारतीय किंवा सगळेच तेलगु, गुजराथी असं करत नसतीलच.
पण जे काही लिहिलं आहे ते खरंच गुन्हा ठरावा इतकं वाईट आहे.
आश्चर्यानं तोंडात बोट (स्वतःच्या) >>>>> Lol

Pages