मुलींनी शिक्षण सोडण्याची कारणे

Submitted by बेफ़िकीर on 26 November, 2017 - 11:53

शीर्षक लांबलचक नसावे म्हणून नुसते 'मुलींनी शिक्षण सोडण्याची कारणे'असे लिहिले.

मात्र हे लेखन प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण सोडावे लागण्याबाबत आहे.

ऐकलेली, पाहिलेली कारणे अशी:

१. फी परवडत नाही. त्यापेक्षा (मुलीला भाऊ असल्यास) मुलाच्या शिक्षणावर खर्च करणे रास्त वाटते. (एक उदाहरण - मुलगी आरक्षणाअंतर्गत जुजबी फी भरण्यास पात्र आहे. एम फार्मच्या दुसर्‍या वर्षाला आहे. एक लाख वीस हजारापैकी एक लाख दोन हजार फी शासनातर्फे यथावकाश क्रेडिट होते. पण उरलेले अठरा हजार देण्याचीही मुलीच्या घरच्यांची कुवत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. रुपये ७७५० नाहीत म्हणून बारावीच्या मुलीचे लग्न लावायला निघणारे पालकही आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्व माहीत असतेही पण जी काही फी आहे ती परवडत नाही).

२. लग्नाच्या बाजारात मुलीचा भाव वधारावा म्हणून शिकवले जाते, शिक्षण पूर्ण होण्याआधीच चांगला मुलगा मिळत असला तर शिक्षण दुय्यम ठरते.

३. कॉलेजमध्ये, जाण्या-येण्याच्या रस्त्यावर किंवा वाहनांमध्ये छेडछाड होते म्हणून मुली स्वतःच शिक्षणात रस दाखवत नाहीत. काहीवेळा मुलींचा हा निर्णय पालकांकडून सहर्ष स्वीकारला जातो, हे आणखीन विचित्र आहे.

४. कॉलेजमध्ये बाथरूम व्यवस्थित नाही म्हणून शिक्षण सोडणार्‍या काही मुली आहेत.

५. पालकांना आर्थिक मदत म्हणून शाळा / कॉलेज बुडवून शेतमजुरी करणार्‍या व कालांतराने शिक्षण सोडून देणार्‍या काही मुली आहेत.

६. एक उदाहरण काल पाहायला मिळाले. एक बारावीची मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेशी संबंध नसलेला एक मुलगा तिला छेडत असे. काही वेळा तर शाळेतच येऊन छेडत असे. ह्या मुलाच्या जाचाला कंटाळून मुलीने व पालकांनी तक्रार केली पण प्रथम त्या तक्रारीवर शाळेने विशेष कार्यवाही केली नाही. तोवर मुलाचे धाडस वाढल्यामुळे मुलीच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला व पालकांनी घाईघाईत तिचे लग्न ठरवून टाकले. नंतर शाळेने मुलाला शाळेत बोलावून झापले व तक्रार करण्याची धमकी दिली. ही एक 'वन-ऑफ'केस म्हणता येईल पण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या केसेस होतही असाव्यात.

७. मुलगी एकदा नापास झाली तर तिचे खच्चीकरण करून तिला शिक्षण सोडायला प्रवृत्त केले जाते.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबत पालक, शिक्षक ह्यांच्यात गांभीर्य कमी असण्याची उदाहरणे सर्रास दिसत आहेत. हा भागच वेगळा की जे काही शिक्षण ह्या मुली किंवा त्यांच्या सोबतची मुले घेत असतात त्या शिक्षणाचा नोकरीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी, स्पर्धात्मक जगात पाय रोवण्यासाठी होऊ शकणारा उपयोग नगण्य असतो. पण तो विषयच निराळा आहे. शिक्षणाचा असमान दर्जा ह्यावर एक संस्था काम करत आहे.

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाबाबत मुलींच्या शिक्षणापेक्षा थोडी अधिक आस्था जाणवते पण अनेकदा मुले टवाळखोर निघणे, गंभीर नसणे, टाकणे टाकल्यासारखी शिकत असणे किंवा इतर अनेक प्रकार दिसून येतात.

शिक्षण अर्धवट सोडून सासरी गेलेल्या मुली 'मुलगी शिकली, प्रगती झाली'ह्या उक्तीला कितपत न्याय देऊ शकत असतील कोण जाणे!

आमच्याकडे काम करणार्‍या एका बाईच्या दोन मुलींपैकी एक कुटुंबाला मदत म्हणून शिक्षण सोडून शिवण शिवू लागली आहे. दुसरी शिकत आहे पण सुट्टीच्या दिवशी आईला मदत म्हणून घरकाम करते. ज्याचे जळते त्याला कळते हे खरे असल्यामुळे त्यांनी काय करावे हे आपण सांगू शकत नाही. पण त्या बाईच्या मुलाला व्यवस्थित शिकवले जात आहे हेही खरे!

कमी शिकलेल्या ग्रामीण मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यवसाय सुरू व्हायला हवेत. मुळात लग्न म्हणजे मुलीच्या जन्माचे कल्याण हा विचारही मागे पडायला हवा आहे.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख पटला बेफीजी Happy
आणखी एक कारण म्हणजे नुकत्याच दहावी सुटून शहरी वातावरणात कॉलेजला जाऊ लागलेल्या खेड्यातील मुलींची (सगळ्याच नव्हे) सुरू होणारी प्रेमप्रकरणे.. सध्या यांचं प्रमाण बरंच आहे. शिक्षण बंद करून घरचे लग्न करून टाकतात. किंवा मग आहेच 'सैराट.'
[याबाबतीतलं माझं आणखी एक निरीक्षण असं आहे, खेड्यातील नुकतीच दहावी पासाऊट झालेली टिनेजमधली मुलगी तिच्या घरातील वातावरण कडक असेल, ती लहानपणापासून दडपणाखाली वाढलेली असेल तर शहरात कॉलेजला जाऊ लागताच ती तेथील खुल्या वातावरणामुळे बरोबर शिकणार्या किंवा थोड्या सिनीयर असलेल्या मुलांमध्ये एखाद्याला आपला भावनिक आधार बनवते. मुलं तर टपलेलीच असतात. प्रेमप्रकरण(??) चांगलंच रंगतं. घरच्यांना माहित झाल्यावर शिक्षण बंद होतं. ]

छान लेख. सारे मुद्दे योग्य आहेत.
मागे मी एक धागा काढलेला, मला मुलगीच हवी .. . शहरी भागात, शिकलेल्या आणि शिकून अक्कल आलेल्या कुटुंबात, शिक्षणाबाबत तरी मुले मुली असा भेद केला जात नसावा. किंबहुना माझ्या निरीक्षणानुसार हल्ली बहुतांश लोकांना मुलगी हवी वाटते. एक फक्त ते मुलींबाबत विशेष काळजी घ्यावी लागते हे सोडल्यास ईतर बरेच बाबतीत मुलगी असणे सुखावह असते.
पण ग्रामीण भागात मुळातच मुलगी पेक्षा मुलगाच हवा असतो. त्यामुळे वर आपण नमूद केलेल्या समस्या सोडवण्यातही कोणाला रस नसतो. अन्यथा अपवाद वगळता ईच्छा दाखवल्यास पालक प्रशासनाची मदत घेत या समस्या सोडवू शकतात. आजच्या तारखेला नक्कीच हे अवघड वाटेल, मात्र मुलगा मुलगी एकसमान झाल्यावर चित्र वेगळे असेल. अर्थात हे खूप अवघड आहे, किंबहुना सुधारणेत बराच काळ जावा लागणार. मात्र जोपर्यंत तळागाळातल्यांचे विचार सुधारत नाही, तोपर्यंत शासनही काही करू शकणार नाही, कारण शेवटी त्या शासनात तिथलेच आणि त्याच विचारसरणीचे लोकं असतात.

एक शंका - एक लाख वीस हजारापैकी एक लाख दोन हजार फी शासनातर्फे यथावकाश क्रेडिट होते. मग उरलेले अठरा हजार का देत नाहीत?

लेखकाशी सहमत.. मुद्दा 2 हा मेन कलप्रीट आहे.
रूनमेश - शहरातही मुलगाच हवा असे म्हणणारे खूप सापडतील..

रुपये ७७५० नाहीत म्हणून बारावीच्या मुलीचे लग्न लावायला निघणारे पालकही आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्व माहीत असतेही पण जी काही फी आहे ती परवडत नाही). >>>>>> अरे मग लग्नाचा खर्च कसा परवडतो ह्यांना ??? काहीतरी चुकतय नक्की.सगळे नातेवाईक अनि बाकीच्यांनी जरी मदत केली किंवा कर्ज जरी काढले तरी नक्कीच ७७५० पेक्षा जास्त रक्कम असणार ना.

अरे मग लग्नाचा खर्च कसा परवडतो ह्यांना ??? >>> लग्न करुन टाकले कि आपली जबाब्दारी संपली अशी मानसिकता असते ना !

अंकू.. कर्ज कोणी आणि का काढेल.. आणि खर्च काढून शिकवले तरी रिटर्न्स मिळणार का त्याना.
तेच कर्ज लग्नाच्या खर्चाला काढेल ना म्हणजे लग्नाचे टेन्शन संपेल

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबत पालक, शिक्षक ह्यांच्यात गांभीर्य कमी असण्याची उदाहरणे सर्रास दिसत आहेत. >>> हे खूप गंभीर आहे.

कमी शिकलेल्या ग्रामीण मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यवसाय सुरू व्हायला हवेत. मुळात लग्न म्हणजे मुलीच्या जन्माचे कल्याण हा विचारही मागे पडायला हवा आहे. >>> +१

३. कॉलेजमध्ये, जाण्या-येण्याच्या रस्त्यावर किंवा वाहनांमध्ये छेडछाड होते म्हणून मुली स्वतःच शिक्षणात रस दाखवत नाहीत. काहीवेळा मुलींचा हा निर्णय पालकांकडून सहर्ष स्वीकारला जातो, हे आणखीन विचित्र आहे. <<< उपलब्ध सोयी, जीवनशैली आणि त्यातून आलेली मानसिकता याबाबतीत शहरी आणि ग्रामीण आयुष्यं ही अगदी भिन्न प्रतलावर चालत असतात असे म्हणण्याइतकी दोन्हींमध्ये तफावत असते. शहरात अगदी मूलभूत वाटणारी आणि सहज उपलब्ध असणारी सोय/सुविधा ग्रामीण भागात दुरापास्त वाटण्याइतकी दुर्लभ असू शकते. त्यामुळे वरचा मुद्दा विचित्र वाटू शकतो, पण त्यामागची कारणं/हतबलता जितकी उघड होईल तेवढे ते "नॉर्मल" किंवा "उपलब्ध पर्यायांपैकी उत्तम पर्याय" वाटू लागेल. उदा. प्रत्येक गावात किमान दहावीपर्यंत तरी शिक्षणाची सोय उपलब्ध असतेच असे नाही. एका गावातून दुसर्‍या गावात जाण्यासाठी उपलब्ध असणारी भरवशाची साधनं काही तासांच्या अंतरानेच उपलब्ध असतात. दोन गावांमध्ये मैलच्या मैल निर्मनुष्य असतात. आणि शिक्षणाला दुय्यम स्थानावर ढकलण्याइतके अधिक भेडसावणारे इतर प्रश्न ग्रामिण आयुष्यात अस्तित्त्वात असू शकतात.

शिक्षण अर्धवट सोडून सासरी गेलेल्या मुली 'मुलगी शिकली, प्रगती झाली'ह्या उक्तीला कितपत न्याय देऊ शकत असतील कोण जाणे! <<< ठामपणे 'हो'च अथवा 'नाही'च असे म्हणता येणार नाही. अश्या मुली जास्त चांगल्या प्रकारे शिक्षणाचे महत्त्व जाणू शकतील आणि त्यासाठी उपाययोजना करून ठेवतील, असेही होऊ शकते.

किमान सोयी असणारे स्वच्छतागृह नसणे ही बाब मुलींसाठी गंभीर आहे.

कॉलेजमध्ये, जाण्या-येण्याच्या रस्त्यावर किंवा वाहनांमध्ये छेडछाड होते म्हणून मुली स्वतःच शिक्षणात रस दाखवत नाहीत. काहीवेळा मुलींचा हा निर्णय पालकांकडून सहर्ष स्वीकारला जातो, हे आणखीन विचित्र आहे. >>>>माझ्या मामाची मुलगी आणि तिच्या ७-८ मैत्रिणी सगळ्याजणी एकत्र (वेळेवर बसची सोय नसल्यामुळे)दुसर्‍या गावी सायकलने कॉलेजला जात होत्या. एके वर्षी दुसर्‍या मुलीसोबत जायला असा ग्रुप नव्हता त्यामुळे तिला एक वर्ष घरी बसावे लागले होते.

शाळेत असताना एका मुलीचे शाळा बंद करुन लग्न जमवण्याचे चालू होते. तेव्हा माझ्या मामाच्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणींनी या गोष्टीला खूप विरोध केला होता. अगदी तिच्या आई-बाबाना भेटून त्यांना समजावून, शेवटी पोलीसात तक्रार करु अशी धमकीही दिली होती. त्यांना तिचे ठरवलेले लग्न मोडावे लागले आणि तिची शाळाही त्यांनी पुन्हा सुरु केली. Happy

सध्या मी एका पुस्तकानिमित्त मोठ्या शहरांपासून शेकडो किमी दूर असलेल्या लहान मोठ्या खेड्यांतून, गावांतून शिकून डॉक्टर झालेल्या मुलींच्या मुलाखती घेत आहे. त्यातून असे आढळले की बर्‍याच गावांत फक्त ४थ्या इयत्तेपर्यंत शिक्षण आहे, तरी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी गाव सोडून शहरात शिफ्ट होण्याची तयारी बर्‍याच पालकांनी दाखवली. मुलींना पुढचे शिक्षण घेणे सोपे जावे म्हणून घरच्यांकडून अनेक तडजोडीही केल्या गेल्यात. या सार्‍या कुटुंबांमध्ये कोणतेही साम्य नाही, जसे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक. केवळ मुलींना हवे ते करु देण्याची इच्छाच एक समान धागा वाटला. अनेक मुली ह्या त्यांच्या घराण्यातून, अख्ख्या गावातून पहिल्याच डॉक्टर (केवळ महिला नाही, तर एकूणातून) झाल्या आहेत.

खेड्यांतली अंतरे, शाळांची कमतरता हे मुद्दे नैसर्गिक आहेत. कारण मोठ्या शहरात दहा वीस कीमी काही वाटत नाही. पण लोकवस्ती नसल्याने दोन खेड्यांतले ५ किमीचे अंतर पन्नास किमी वाटते. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात शाळा आहेत. प्रत्येक गावात दहावी बारावीपर्यंत शिक्षण असले पाहिजे हे प्रॅक्टिकल अपेक्षा नाहीत.

मुलींसाठीच्या आरोग्यव्यवस्था व सॅनिटेशन सुविधांच्या कमतरता याबद्दल सहमत आहे. मुलींच्या अब्रूंची सुरक्षा केवळ त्या शाळेत जातात म्हणुन धोक्यात येत नाही. त्या गावाचे व भागाचे एकूणच वातावरण कसे आहे यावर अवलंबून आहे. शेतात जाणार्‍या, पाण्याला जाणार्‍या मुलींवर बलात्कार होणे ह्या घटना दुर्दैवाने होत असतातच.

मुली शहरात जाऊन बिघडतात वगैरे हा सर्वसाधारण बायस इथे एक दोन प्रतिसादात दिसला त्याबद्दल आश्चर्य वाटले. सोकॉल्ड बिघडणे हे जागेवर नव्हे तर व्यक्तीवर अवलंबून असते.

सरतेशेवटी असे म्हणेन की जेवढा महाराष्ट्र मी आतून बाहेरुन बघितलाय, कोणत्याही पद्धतीने त्याला जनरलाइज करणे चुकीचे ठरेल. शिक्षणात खूप प्रश्न आहेत, तशीच खूप अशी उत्तरेही आहेत. सर्वच बाजू तपासून पाहणे उत्तम.

ठामपणे 'हो'च अथवा 'नाही'च असे म्हणता येणार नाही. अश्या मुली जास्त चांगल्या प्रकारे शिक्षणाचे महत्त्व जाणू शकतील आणि त्यासाठी उपाययोजना करून ठेवतील>>>>>>>
गजानन सहमत,
आमच्या घरी मुलींना सांभाळायला येणाऱ्या काकु,
शिक्षण जवळपास अक्षर ओळखीवरच थांबले आहे,
गावातून लवकर लग्न होऊन पुण्यात आल्या,2 वर्षा पूर्वी त्यांचे यजमान गेले,
पण त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांनी शिकवतायत,
मोठी 2न्ड इयर बीकॉम ला , नोकरी करून शिकतेय,
धाकटी यंदा 10 ला आहे.
मुली ऑड जॉब करणार नाहीत हे त्यांच्यामनात स्पष्ट आहे.
तेव्हा शिक्षण घेतले तरच शिक्षणाचे महत्त्व कळेल असे नाही