काथ्याकूट: इराची तऱ्हा (भाग चार)

Submitted by चैतन्य रासकर on 26 November, 2017 - 11:05

काथ्याकूट: भाग एक
काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
काथ्याकूट: मोघम अमोघ (भाग तीन)
........................

"कोण शरद?"
"नित्याचा बॉयफ्रेंड.. " इरा मेनूकार्ड बघत म्हणाली.
ही बातमी रिचवायला चार-पाच सेकंड्स गेली, मी नीरवकडे बघितले, तो फेसबुकवर आता शरदला शोधू लागला, नित्याचा नवीन बॉयफ्रेंड प्रकट झाला होता, त्याचं प्रकरण सुरु झालं होतं!!

"नित्याचा बॉयफ्रेंड अमोघ होता ना?" मी इराला विचारले.
"कोण अमोघ?"
"सिक्स पॅक्स आहेत, यूएसला जातोय?" नीरवने फोनकडे बघत विचारले.
इराने 'माहित नाही' म्हणून मान डोलावली.
पण खरा बॉयफ्रेंड कोण होता? अमोघ का शरद? नित्याचे दोन बॉयफ्रेंड होते? यात मॅरीड कोण होतं? सिक्स पॅक्स कोणाला होते? शरद मॅरीड होता का? युएसला कोण जाणार होतं?आम्हाला आयुष्यात काही काम का नव्हतं? ही सगळी उत्तर नित्याचं देऊ शकली असती.

"नित्याला शरद कुठे भेटला?" मी इराला विचारले.
"नोटाबंदीच्या वेळी...एटीएमच्या लाईनमध्ये" इरा म्हणाली.
"एटीमच्या लाईनमध्ये?"
"हो..लाईनमध्ये नित्या पुढे होती, शरद मागे होता, उन्हामुळे नित्याला चक्कर आली, शरदने तिला सावरलं, तिथेच ओळख झाली" इरा म्हणाली.
शरदला एटीमच्या लाईनमध्ये आयटम मिळाली!
नोटाबंदीत एक प्रेम मुक्त झालं!

काय झालं असेल बरं? मी विचार करू लागलो, उन्हामधून आलेला शरद, नित्याने बघताच तिच्या मनामध्ये गेला असेल, नित्या चक्कर येऊन पडली असेल, शरद तिच्या प्रेमात पडला असेल, त्यांना पासबुक बघून एकमेकांची नावं, पॅनकार्ड बघून वाढदिवस कळाले असतील, इंटरेस्ट रेटवर गप्पा मारताना, इंटरेस्ट वाढला असेल, जुन्या नोटा भरण्यासाठी, ते रोज जोडीने बँकेत भेटू मग खेटू लागले असतील, हळूहळू एटीएमच कपल, केटीम बाईकवर फिरू लागलं असेल, जुन्या नोटा उधळताना, प्रेमाला उधाण आलं असेल, सेविंग्सच जॉईंट अकाउंट झालं असेल, दोन हजाराची नोट सुट्टे करताना, प्रेम घट्ट झालं असेल.

नोटाबंदीत माझे काहीच हाल झाले नाहीत, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते.
"माझे पैसे तुझ्या अकाउंट मध्ये ठेवशील?"असं मला प्रेमाने, रागाने, कळकळीने, आळीपाळीने कोणी विचारलं नाही, त्यावेळी थोडं वाईट वाटलं, पण मनाची समजूत काढली, आयुष्यात काही नसलं ना तरीही, हक्काने स्वतःचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये ठेवणारं माणूस हवं! याचबरोबर, स्वतःच पार्किंग वापरून देणारा शेजारी, वेळेला पैसे देणारा नातेवाईक, दोन हजाराचे सुट्टे देणारा दुकानदार, रस्ता क्रॉस करताना, आपल्यासाठी थांबणारा कारवाला, वायफाय शेअर करणारा घरमालक, पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या पिक्चरला येणारा मित्र, पाहिजे त्या मुलीचा नंबर देणारी मैत्रीण, अशी इतर हक्काची माणसं सुद्धा हवीत!

"शरद फेसबुकवर तर नाहीये" आमचे जिम कैवारी, फेसबुक संशोधन करून झाल्यावर म्हणाले.
शरद फेसबुकवर का नाहीये?मग तो सेल्फीज काय करतो? स्वतःची मतं कुठे प्रदर्शित करतो? का त्याला स्वतःची मतचं नाहीत? कसं शक्य आहे?
"त्याचं फेक अकाउंट असेल.." इरा म्हणाली.
"लोकं फेक अकाउंट का काढतात?" मी बोलून गेलो.
"हो ना...काही फेक लोकांची अकाउंट्स सुद्धा खरी वाटतात" इरा म्हणाली.
आयला डायलॉग!! कायच्या काय डायलॉग होता, यावर काय बोलणार? इथे डायलॉगची गरजच नव्हती, पण ही इरा आहे, लोकं विचार करून डायलॉग मारतात, इरा डायलॉग मध्येच विचार करायची!! त्या दिवशी रात्री जेवताना, भात जास्त झाला होता, म्हणून मी "भात संपव" असं इराला म्हणालो, त्यावर इरा एकदम जेवायची थांबली, स्थिर झाली, कुठेतरी तिसरीकडे बघत, शांतपणे "काय काय संपवू अजून?" असं म्हणाली, हे ऐकल्यावर, मी साडे सहा मिनिटात भात, वरण, आमटी, चपाती, जे दिसेल ते सगळं संपवलं.

इरा कॉलेज मध्ये असताना "इराची तऱ्हा" नावाचा ब्लॉग लिहायची, "स्वतःला अनब्लॉक करायला ब्लॉग"अशी त्या ब्लॉगची टॅगलाईन होती, त्या टॅगलाईनची टॅगलाईन "माझ्या रागावर माझा ब्लॉग आणि वाईस वर्सा" अशी होती, त्या ब्लॉगला साधारण दीड हजार फॉलोवर्स होते, इरा या ब्लॉगवरची प्रत्येक नवीन पोस्ट, आम्हाला वाचून दाखवायची, त्यावर "आम्हाला काय वाटलं?" असं विचारायची, तो ब्लॉग ऐकून आम्ही ब्लँक व्हायचो, त्यानंतर "माणूस म्हणून जाणीवा बोथट होणं किती धोक्याचं आहे..." असं काहीतरी म्हणायची, ते ऐकून माझा मेंदू बोथट व्हायचा.
सामान्य माणूस हा पैसे, सुख, संपत्ती, यश, प्रतिष्ठा, सन्मान अशा गोष्टींच्या मागे असतो, इरा 'लॉजिक'च्या मागे असायची, ती सामान्य गोष्टी मागचं अतिसामान्य लॉजिक शोधायची, सांगायला "वाचन" पण तिचा खरा छंद "लॉजिक शोधणे" हा होता.
'हे असं का?' हा तिचा आवडता प्रश्न होता.
'हाय हॅलो...कसा आहेस?' नाही तर 'असं का चालू आहे?' असं इरा विचारायची, तिला उत्तर नाही पण कारणं आवडायची, रात्री एखादा मुलगा बुलेटवर, मस्त जोरात हॉर्न वाजवत, रस्त्यावरून जात असेल, तर इरा त्या मुलाला थांबवून "का....?" असं विचारायची, बरं एवढा त्या मुलाने विचार केला असता, तर बुलेट घेतलीच नसती, केटीएम बाईक घेतली असती, केटीएम कधी पण बुलेट पेक्षा भारी.

तेवढ्यात नीरव अचानक उठला, तसे मी मागे वळून बघितले, कॅफेमध्ये एक मोठा व्यक्ती आला होता, त्या एक्सएल साईझ व्यक्तीने स्मॉल साईझचा राऊंड नेक टी शर्ट घातला होता, एवढा घट्ट टी शर्ट कदाचित अंगावरच शिवला असावा. त्याच्या टी शर्टवर "ईट स्प्राउट्स देन वर्क आऊट" हा विचार मांडला होता, एवढे मोठे दंड मी पहिल्यांदा बघत होतो, माझ्या मांडी एवढे त्याचे दंड होते, माझ्या माने एवढं त्याच मनगट होतं, माझी मान बारीक होती का त्याचं मनगट एवढं मोठं होतं? त्याला बघून कॅफे मधली दोन तीन मुले एकदम उभं राहत त्याला "हॅलो सर..." म्हणाली, नीरव अक्षरशः धावत त्या दंडवान व्यक्तीकडे गेला, त्याला दंडवत घालत, त्याच्या पाया पडला. नीरव आणि तो व्यक्ती बोलू लागले, मला त्यांचं बोलणं, लांबून नीट ऐकू येत नव्हतं, पण "खा एग्ज व्हाईट...मसल्स लगेच टाईट" असं काहीसं कानावर पडलं.

त्या व्यक्तीच्या भोवती लोकं जमू लागली, नीरव परत आला, आमच्या समोर बसत म्हणाला "बघितलंत?"
ती प्रेक्षणीय व्यक्ती बघून झालेली होती, म्हणून मी आणि इराने 'हो' म्हणून मान डोलावली.
"यांना मी खूप मानतो.." नीरव म्हणाला, सामान्य माणूस जात, धर्म, अंधश्रद्धा मानतो, आमचा नीरव ट्रेनर मानायचा.
"का?" इराने विचारले.
"ते हाताच्या बोटांवर पुश अप्स मारायचे" नीरव म्हणाला.
"पुश अप्स? बोटांवर?" मी हळूच त्या व्यक्तीच्या बोटांकडे बघत म्हणालो.
"पण एकदा पुश अप्स मारताना करंगळी मोडली.. " नीरव म्हणाला.
"बाप रे..मग..?"
"मग त्यांनी जिम कमी केली, आता पण पुश अप्स मारतात, पण पूर्वीसारखी बोटांमध्ये ती जादू राहिली नाही" नीरव चेहरा पाडून म्हणाला "भला माणूस..." असं पुटपुटला.
माणूस भला नाही, भलामोठा होता!!
"पण ते बोटांवर पुश अप्स का करायचे?"इराने विचारले.
"पंज्यावर तर सगळेच करतात.." नीरव म्हणाला
"नेक्स्ट लेव्हल म्हणजे बोटांवर.." मी नीरवचं वाक्य पूर्ण केलं.
"बरोबर.."
"पण बोटांमध्ये कुठले मसल्स असतात?" इराचे प्रश्न संपत नव्हते.
"खूप मसल्स.." नीरव पुढे काही बोलणार, तेवढ्यात इराने विचारले "पण बोटांचे मसल्स स्ट्रॉन्ग कशासाठी करायचे?"
"डब्याचं झाकण उघडायचं असेल तर.." नीरव म्हणाला
"हो..चिप्सच पॅकेट उघडायचं असेल..." मी म्हणालो.
"काहीही पटकन उचलायचं असेल...तसाही रोज पंज्यावर पुश अप्स करून कंटाळा येतो..काहीतरी नवीन.." नीरव इराला समजून सांगत होता.
"एखाद्याला आवड असू शकते..." मी म्हणालो, नीरवने 'हो' म्हणून मान डोलावली, इराला आमचं लॉजिक काही पटलं नव्हतं.

"पण तुला शरद बद्दल कसं कळालं?" इरा पुढे काही विचारणार तेवढ्यात मी विषय बदलला.
"केतकीने सांगितलं" इरा म्हणाली.

केतकी...

धुक्यातलं चांदणं.. त्यातून तुझं चालणं..
तुझं मागे वळून पाहणं.. माझं असं..

"हा ट्रान्स मध्ये गेला.." नीरव माझ्याकडे बघत म्हणाला, इरा पुढे होऊन माझा चेहरा बघू लागली.
"अरे हो..." इरा माझ्याकडे बघत, हसत म्हणाली..
केतकीच नावं ऐकून माझ्यातल्या कवीचा पूर्वजन्म होतो आणि मग तो एका क्षणात प्रौढ होतो.

"काही काय...किती वर्ष झाली...मी सगळं विसरलोय.." मी असं म्हणून विषय टाळू लागलो.
"ए तुला आठवतं तुझ्या लग्नात हा कोपऱ्यात बसून रडला होता.." नीरव हसत इराला म्हणाला.
"अरे हो..माझी नणंद..." इरा बोलत असताना..
"एक्स नणंद.."
"हो..एक्स नणंद..मला म्हणत होती की..तो तुझा मित्र रडतोय..काय करायचं..पण तू का रडत होतास?" इराने हसत मला विचारले, मी उत्तर दिले नाही, फोनमध्ये लक्ष घुसवलं.
नीरव हसत बोलू लागला..."हा फुल्ल जोश मध्ये शेरवानी घालून आला होता, याला केतकी बरोबर फोटो काढायचा होता, हा तिच्या शेजारी जाऊन थांबायचा, ती हळूच निघून यायची..."
"मग फोटोशॉप करून घेतलास का?" इराने हसत मला विचारले.
"एक फोटो आहे ना..हा तिच्या मागे उभा आहे..ती पुढे आहे.." नीरव हसत म्हणाला,या दोघांचं हसणं थांबत नव्हतं, नीरवपुढे बोलू लागला.."मी नंतर बघितलं..तर हा कुठेतरी कोपऱ्यात बसून, एकटाच बासुंदी खात बसला होता.."
"खारट नव्हती ना रे बासुंदी..." असं म्हणून इरा आणि नीरव दोघ एकमेकांना टाळ्या देऊन मोठयाने हसू लागले.
"मी काय रडत नव्हतो.." मी म्हणालो.
"फुल्ल खच्ची झाला होतास..केतकी स्वतःला केट विन्स्लेट समजते का? असं म्हणाला होतास, चांगलं आठवतेय.." नीरव हसत म्हणाला.
इरा हसत होती, मला राग येतं होता, पण मी काही बोललो नाही, आता काय बोलणार? पण इराने माझा पडेल चेहरा बघितला, तशी ती हसायची थांबली, नीरवच सुद्धा हसून झालं होतं, थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही.

त्या दिवशी केतकी इतकी काटा दिसत होती की, इराच्या लग्नानंतर, दुसऱ्या दिवशी, "क्युटी केतकी" नावाचं स्वतंत्र फेसबुक फॅन पेज सुरु झालं!! त्या पेजला केतकीचे आऊट ऑफ फोकस फोटो सुद्धा शेअर झाले होते, एकाने केतकी जेवत असतानाचा अर्धा तासाचा, 4K फॉरमॅट मधला व्हिडीओ शेअर केला होता, "केतकी..की टू माय हार्ट.." अशा नावाखाली केतकीचे फक्त हसतानाचे फोटो शेअर झाले, पहिल्याच दिवशी त्या पेजला तीनशे तेरा लाईक्स मिळाले होते, पण नंतर केतकीने तक्रार केल्यावर, या फॅन पेजच्या ऍडमिनला पोलिसांनी फण्याक करून वाजवली, त्याला रीतसर अटक करून, तडीपार करण्यात आले.

"तुझी ती नणंद रावस दिसत होती.." मी म्हणालो.
"कुठली नणंद?"
"ती नाही का..तिने तो सब्यसाची लहंगा घातला होता.." मला चांगलंच आठवत होतं.
"ई..ती ना.. ती कसली माजोरडी होती, तिचा सगळा कारभार...मी भारी तुम्ही सॉरी असा होता” इरा वैतागून म्हणाली
"तू तिचा नंबर घेतला होतास ना?" मी नीरवला म्हणालो, तसा नीरव एकदम ताठ बसला, काही बोलला नाही.
"ए..हो?” इराने डोळे मोठे करत विचारले.
"मी तिच्याशी जनरल बोलत होतो..नंबर नव्हता घेतला" नीरव म्हणाला.
“ऐ..जनरल..सरळ सांगना..काय झालं होतं?” इराने विचारले, पण ही कथा नीरव इराला काही सांगणार नव्हता.
“तू तिला नंतर भेटला होतास ना?” मी अगदी साळसूदपणे, एखादी सासू उशिरा घरी आलेल्या सुनेला जशी विचारते, तसं विचारलं, तसा नीरव माझ्याकडे रोखून बघू लागला, त्याने हळूच "काही सांगू नको" म्हणून मान हलवली.
“ऐ काय रे.. सांगा ना.. काय झालं होतं?” इराने परत विचारले.
“मला काहीच माहीत नाही” मी अगदी सहज म्हणलो, पण मला सगळं माहीत होतं, मी मनातल्या मनात मोठ्याने, राक्षसी हसलो.
तेवढ्यात माझा मोबाईल वाजला, इराकडून मेसेज आला होता!! "नंतर मला सगळं सांग.." असा मेसेज होता, भारी पोरगी आहे राव!!
मित्राचं सीक्रेट, वाय फायच्या पासवर्ड सारखं असतं, सगळ्यांबरोबर नाही, पण जवळच्या व्यक्तीं बरोबर शेअर कराव लागतं.

"अरे मला लवकर जायचं.." मी फोन खिश्यात ठेवत म्हणालो.
"डोन्ट टेल मी तुला बिग बॉस बघायचंय.." इरा माझ्याकडे बघत म्हणाली.
आज एलिमिनेशन होतं, मी कसं मिस करू?
तुम्ही टीव्हीवर काय बघता किंवा टीव्हीसमोर कसे बसता हे लपवावं लागतं, नाहीतर लोकं लगेच जज करतात.
"तू काहीही बघतोस.." नीरव मला म्हणाला.
"तू 'डब्लूडब्लूई' बघतोस"
"ऐ ते खरं असतं...."
"गाईज... सावधान इंडिया सोडून काहीच खरं नसतं" इरा म्हणाली.

पण तेवढ्यात नीरवचा फोन वाजला, नीरवने फोनवरचं नाव बघून माझ्याकडे बघितलं, त्याने न सांगताच माझ्या लक्षात आलं.
अमोघ? परत? का?
"स्पीकर" मी एवढंच नीरवला म्हणालो.
"कोणाचा आहे?" इराने विचारले, नीरवने फोनवरचं नाव इराला दाखवलं.
"कोण आहे हा अमोघ?" इराने विचारले.
आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, कारण आमच्याकडे उत्तरचं नव्हतं. पण मला वाटतं की इरा बरोबर सांगत होती, शरदच नित्याचा बॉयफ्रेंड असणार, पण मग त्या दिवशी नित्या अमोघला सारखा मेसेज का करत होती?
नीरवने कॉल घेतला, स्पीकरवर ठेवला.
"हॅलो.."
दुसऱ्या बाजूने कोणाचा तरी रडण्याचा आवाज येतं होता, आम्ही तिघे ते रडणं ऐकू लागलो.
अमोघ का रडतोय?
एक मिनिट..अमोघ मुलीच्या आवाजात का रडतोय?
नाही..कोणीतरी मुलगी रडतं होती, हो..नक्कीच, मुलीचाच आवाज होता.
पण ही मुलगी अमोघच्या मोबाइलवरून का रडत आहे?
"हॅलो कोण बोलतंय?" नीरवने त्याच्या ट्रेडमार्क एचआर आवाजात विचारले, तसं त्या मुलीचं रडणं थोडं थांबलं.
फोनवर रडणं ही एक कला आहे, आपलं रडणं आपल्या बाजूच्या माणसाला ऐकू न जाता, तो आवाज दुसऱ्या बाजूला असणाऱ्या माणसापर्यंत पोहचवणं हे सगळ्यांना जमतचं असं नाही, वर्षानुवर्ष त्यासाठी फोनवर असं रडावं लागतं.
"हॅलो.." तिकडून आवाज आला.
"हॅलो.."
"हॅलो.."
दोन मिनिटं हे दोघ हॅलो हॅलो.. करत खेळत बसले, पुढे काही होईना, शेवटी त्या मुलीने विचारलं...
"तुम्ही आत्ता अमोघला फोन केला होतात ना..."
नीरवने काय उत्तर देऊ या अर्थाने माझ्याकडे बघितलं, मी 'हो' म्हणून मान डोलावली.
"हो..मी फोन केला होता" नीरवने सांगितले, नीरवने इराकडे बघत आवाज न करता "नित्या?" असे विचारले, इराने 'नाही' म्हणून मान डोलावली, हा नित्याचा आवाज नव्हता, मुळात नित्या एवढ्या हळू आवाजात रडतच नाही.
"त्या नित्याचं अमोघबरोबर काय सुरु आहे?" त्या मुलीने विचारलं.
ते आम्हाला पण माहित नाही, हिला काय सांगणार? अरे पण ही कोण आहे?
"सॉरी..बट..हू इज धिस?" नीरवने विचारले.
"हू आर यु??" त्या मुलीने उलट प्रश्न केला. हे असं आहे, फोन तुम्ही करायचा, मग माज पण तुम्ही करायचा, असं असतं का? पण ही मुलगी आधीच रडतं होती, म्हणून नीरवने उत्तर दिले.. "नीरव..नित्याचा फ्रेंड.."

दोन सेकंड काही आवाजच आला नाही.
"या दोघांचं कधी पासून सुरु आहे?" त्या मुलीने एकदम घुश्यात विचारले.
"अगं असं काही नाहीये.." फोनमधून एका मुलाचा आवाज आला, बहुतेक तो अमोघ होता "दे इकडे फोन.." अमोघ त्या मुलीला म्हणाला.
"डोन्ट टच मी..मला हात नको लावू.." ती मुलगी अमोघवर ओरडली, मुलगी कॉन्व्हेंटची आहे वाटतं.
"तुम्ही अमोघला असे का म्हणाला?" तिने नीरवला विचारले.
"काय?"
"की अमोघ मॅरीड आहे हे नित्याला माहित नाही" त्या मुलीने स्पष्ट केले.
"सॉरी..ताई..दीदी..आमचा थोडा गैरसमज झाला होता..." नीरव गडबडला, त्या मुलीला समजावू लागला.
ताई..दीदी..का वहिनी? अरे हो!! अमोघची बायको तर नाही ना?
"खरं सांगा..की नित्याचं यांच्या बरोबर काय सुरु आहे..तुम्हाला तुमच्या आईची शपथ.." ती मुलगी गंभीरपणे म्हणाली.
इरा खुद्कन हसली, आई शपथ..ही कितवीत आहे? आता नीरव आई, बाबांची शपथ घेतो का त्याच्या ट्रेनरची? हे मला बघायचं होतं.
"अहो खरंच सांगतोय..असं काही नाहीये..तुम्ही.." नीरव पुढे काही बोलणार तेवढ्यात, अमोघची बायको म्हणाली.. "हे बघा..जे काय तुम्हाला माहिती आहे ते सांगा..नाहीतर.."
"अहो खरंच.."
"नाहीतर मी सरळ नित्याच्या हजबंडला विचारीन"
"कोणाचा हजबंड?"
"नित्याचा हजबंड"

काथ्याकूट: उरातला केर (भाग पाच)

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__ Rofl

धन्यवाद पवनपरी11 आणि र।हुल Happy

>>>>
"यांना मी खूप मानतो.." नीरव म्हणाला, सामान्य माणूस जात, धर्म, अंधश्रद्धा मानतो, आमचा नीरव ट्रेनर मानायचा.
"का?" इराने विचारले.
"ते हाताच्या बोटांवर पुश अप्स मारायचे" नीरव म्हणाला.
"पुश अप्स? बोटांवर?" मी हळूच त्या व्यक्तीच्या बोटांकडे बघत म्हणालो.
"पण एकदा पुश अप्स मारताना करंगळी मोडली.. " नीरव म्हणाला.
"बाप रे..मग..?"
"मग त्यांनी जिम कमी केली, आता पण पुश अप्स मारतात, पण पूर्वीसारखी बोटांमध्ये ती जादू राहिली नाही" नीरव चेहरा पाडून म्हणाला "भला माणूस..." असं पुटपुटला.
माणूस भला नाही, भलामोठा होता!!<<<<<< Lol Lol

बोटांवर पुशअप्स मारणारा ट्रेनर हा प्रकार कहर आहे... Lol

ती कसली माजोरडी होती, तिचा सगळा कारभार...मी भारी तुम्ही सॉरी असा होता" ........। काय भारी शब्दप्रयोग आहे.

जबरा! भन्नाट पंचेस!!

शरद फेसबुकवर का नाहीये?मग तो सेल्फीज काय करतो? स्वतःची मतं कुठे प्रदर्शित करतो? का त्याला स्वतःची मतचं नाहीत? कसं शक्य आहे?>> Lol

भावड्या लै भारी लिहितोस,मी जाम फॅन झालोय.

बोटावर पुशअप आणि सेल्फीचं काय करतो वर अफाट हसलोय

असाच लिहीत रहा, बरीच कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे, लवकर नाही संपली पाहिजे

माझे पैसे तुझ्या अकाउंट मध्ये ठेवशील?"असं मला प्रेमाने, रागाने, कळकळीने, आळीपाळीने कोणी विचारलं नाही, त्यावेळी थोडं वाईट वाटलं, पण मनाची समजूत काढली, आयुष्यात काही नसलं ना तरीही, हक्काने स्वतःचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये ठेवणारं माणूस हवं! याचबरोबर, स्वतःच पार्किंग वापरून देणारा शेजारी, वेळेला पैसे देणारा नातेवाईक, दोन हजाराचे सुट्टे देणारा दुकानदार, रस्ता क्रॉस करताना, आपल्यासाठी थांबणारा कारवाला, वायफाय शेअर करणारा घरमालक, पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या पिक्चरला येणारा मित्र, पाहिजे त्या मुलीचा नंबर देणारी मैत्रीण, अशी इतर हक्काची माणसं सुद्धा हवीत! <<<<< खूपच मस्त ...खूप आवडली Happy Happy Happy

Lol Lol Lol

मस्तच.

जरा लवकर लवकर भाग टाका....

पुभाप्र.

लई च झ्याक..
मस्त चाललीय कथा... पंचेस फारच भारी.....

भारीये ही सीरीज... सगळेच पंचेस सुपर्ब.. Rofl
सकाळच्या पारी ही (म्हण्जे मी) का एवढी हसतीये म्हणुन ३-४ जण डोकावुन गेली डेस्क वर.\
मस्त लिहतो आहेस चैतन्य.

चै, मस्तच !!! आवडला भाग.
हे नित्याचं प्रकर्ण काय ते संपवा बरं लवकर. डोकं भंजाळलं आता Happy
नंतर इरा आणि कथानायकाचं काय ते स्पष्ट करा. Happy

___/\___ जबरदस्त.. खूप खूप आवडली..
सगळेच पंचेस फार भारी.. Lol Lol Lol

मित्राचं सीक्रेट, वाय फायच्या पासवर्ड सारखं असतं, सगळ्यांबरोबर नाही, पण जवळच्या व्यक्तीं बरोबर शेअर कराव लागतं.___/\__

माबोवरील नवीन सुविधेमुळे मी तुमच्या लि़खाणाची चाहती झाली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!

मस्त. मस्त. मस्त.
पंचेस तर एक नंबर आहेत. तुफान.
लिहित रहा.
पुभाप्र.

अरे काय महान आहे हे सगळं...मला जोराजोरात हसता पण येत नाहिये ऑफिस मद्धे बसुन...
पुढे काय झालं मग नित्याच्या हजबंड चं ते लिहा अता प्लीज लवकर...

Pages