'आठवणीतील मैत्रिण'

Submitted by र।हुल on 24 November, 2017 - 07:53

"आठवणीतील मैत्रिण"

तिची न् माझी ओळख मी बारावीनंतर इंजिनियरिंग डिप्लोमा करण्यासाठी कॉलेजमध्ये एडमिशन घेतलं तेव्हाची. एकदम पहिली नजर वैगरे नाही म्हणता येणार पण तिला बघून मला ती जाम आवडली होती. तसं बघायला गेलं तर तिचं वर्णन काहीसं असं करता येईल; गव्हाळ वर्ण, मध्यम उंची, मस्त मोहक डोळे आणि गुटगुटीत चेहरा. दररोज एकच पोशाख मिरवायची. दिसायला बर्यापैकी चांगली असूनही बहुतांशजण तिचा तिरस्कारच करायचे. मला असल्या तिरस्कार करणार्यांचा भयंकर राग यायचा. असं वाटायचं, एक सणकन् कानाखाली ठेऊन द्यावी पण तसं कधी केलं नाही. एकदा सेकंड इयरला असताना वर्गातीलच एका मुलाने सगळ्यांसमोर तिच्यावर अश्लील कॉमेंट केली आणि मी जाम भडकलो होतो. आमच्यामध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. उघड दोन गट पडले. एक खेडेगाव बैकग्राउंड असलेल्या आणि शहरातील लो (?) प्रोफाइल मध्यमवर्गिय बैकग्राउंड असलेल्या मुलांचा तर दुसरा तथाकथित उच्चभ्रू हाय प्रोफाइल वाल्यांचा! अर्थात् माझी बाजू योग्यच होती. चांगल्या गोष्टींना फॉलो करताना मी कधी कुणाच्या बापाला घाबरत नसायचो. त्यावेळचा तो विषय तेथेच संपला. त्यानंतर पुढे दोन वर्ष ती माझी खास मैत्रिण बनून राहिली. मी कॉलेजला नसेन तेव्हा ती अस्वस्थ व्हायची. कावरीबावरी होऊन सर्वत्र माझा शोध घेत हिंडायची. तिचं नाव होतं राणी. दररोज मधल्या जेवणाच्या सुट्टीत बरोब्बर दहा वाजता ती माझ्या वर्गात मला भेटायला यायची म्हणजे यायचीच! अगदी न चुकता. तिच्या डोळ्यांत मला कारुण्य, ममता असले दोन्ही भाव दिसायचे. फक्त तिच्या एकटीसाठी मी कध्धीच कॉलेजच्या कैन्टीनवर जेवायला जात नसायचो. आणि त्यामुळे असेल कदाचित माझे पाच-सहा मित्र सुद्धा माझ्याबरोबरच क्लासरूम मध्ये जेवण करण्यासाठी थांबत असत. आमच्या वर्गातील सहा-सात मुलीसुध्दा वर्गातच जेवण करत असत. त्या मुलींना मात्र तिचा खुप राग यायचा. त्या ती क्लासरूममध्ये येऊ नये म्हणून नाना उपाय करायच्या. आतमधून दरवाजा लॉक करून घेणे, दरवाजाला आतमधून बेंचेस आडव्या लावणे वैगरे. त्या मुलींच्या उपाययोजना करून झाल्यानंतर मी सावकाश दरवाजाजवळ जायचो त्या बेंचेस दूर करायचो आणि लॉक काढायचो. बाहेर येऊन थांबलेली ती माझ्याकडे बघून हलकेच गालांत हसायची असं मला नेहेमी जाणवायचं आणि मग ती आनंदित होऊन माझ्यामागोमाग आम्ही जेवत असलेल्या बेंचेस जवळ येऊन बसायची. ज्या मुली ती येऊ नये यासाठी उपाययोजना करायच्या त्यांचे चेहरे माझ्या कृतीवर खरोखर बघण्यालायक बनायचे. त्यांतील एकदोघीजणी माझ्याकडे 'मारक्या म्हशीवानी' बघायच्या पण मला त्यांनी कधीही विचारलं नाही की, 'राहुल तू असं का करतोस?' त्यांनी जर तसं विचारलं असतं तर नक्कीच माझे त्यांच्याशी वाद झाले असते. तिने वर्गात प्रवेश केल्याबरोबर माझे सगळे मित्र ओरडायचे, 'आली रे आली राहुलची गर्लफ्रेंड आली!' हे ऐकून आमच्या वर्गमैत्रिणी फिदीफिदी मोठ्यानं हसायच्या पण त्या सर्वांना काय माहिती, निरागस प्रेम कशाला म्हणतात किंवा ते काय असतं ते!! ती यायची, बसायची. मी माझा जेवणाचा डब्बा उघडून त्यातून दोन चपात्या काढून तिला द्यायचो, दररोज! एक चपाती ती तेथेच खाऊन घ्यायची अन् थोडा वेळ तेथेच रेंगाळून दुसरी चपाती तिच्या ग्राऊंडवरील पिल्लांसाठी जिना उतरून घेऊन जायची, तेव्हा मला किती समाधान वाटायचं! कॉलेजचं शेवटचं वर्ष मी नियमितपणे कॉलेज केलं. ते संपुर्ण वर्षभर मी घरी तिच्या वाट्याच्या दोन चपात्या देण्यासाठी आईला सांगूनच ठेवलं होतं आणि न चुकता मी तिला दररोज खाऊ घालत होतो. क्लासरूम बाहेर तिला मी कुठेही दिसलो तर ती अचानक माझ्याजवळ यायची. कित्येकदा ती कॉलेजच्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत मिरवली. वर्कशॉप, प्रैक्टीकल लैब्जमध्ये सोबत वावरली. घट्ट् मैत्रीच होती आम्हा दोघांची. पुढे कॉलेज संपलं. मी बाहेर पडलो तिथून. ती हळूहळू विस्मृतीत गेली. आज सकाळी कऊचा एक मेसेज बघून तिची आठवण झाली आणि मी हे लिहीलं.
ही मुकी जनावरं जिवाभावाची सोबती असतात-बनतात. आपण केलेलं निरपेक्ष प्रेम, त्यांच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञता बनून झळकत असतं. ते निरखताना मनाला लाभणार्या समाधानापुढे पैसा-आडका, तुमचं सामाजिक स्टेट्स वैगरे सगळं तुच्छ वाटत राहतं.

―आत्मस्तुतीचा दोष पत्करून,
तुमचा र।हुल / २९ ऑक्टोबर १७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आबा, अदिती, ऋ, पियू, अनिरुद्धजी,शशांकजी, अक्षय मनापासून आभार आपल्या सगळ्यांचे Happy

मस्त !!

छान