नुकतीच पाहिलेली काही लग्ने

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2017 - 11:32

नुकतीच चार लग्ने पाहिली. चारही लग्नांमध्ये जुन्या काळापासून चालत आलेल्या बहुतेक रुढी (वरमातेचे पाय धुणे वगैरे) एखाद्या उत्सवाप्रमाणे पाळल्या गेल्या. उत्सवाप्रमाणे म्हणजे असे की ज्या गोष्टीवरून पूर्वी रुसवे फुगवे होत असत (पायच धुतले नाहीत ह्यावरून मुलाकडच्यांनी रुसणे किंवा माझ्या आईला पाय धुवायला लावले ह्यावरून मुलीने रुसणे वगैरे) ती गोष्ट आता एक मजेशीर प्रथा म्हणून मोठ्या उत्साहाने पाळली जाते की काय असे वाटावे इतक्या थाटात साजरी करण्यात आली. ह्याशिवाय कार्यालयात येताना मुलाला फुलांच्या गालिच्यावरून चालत आणणे, त्याचे पहिले पाऊल पडताच मुलीकडच्यांनी टाळ्यांचा कडकडाट करणे, तुतार्‍या वाजणे, मुलीला डोलीत बसवून आणणे, मुहुर्ताची छापील वेळ अजिबात न पाळता केव्हाही लग्न लागणे वगैरे गोष्टीही पाहिल्या. मुहुर्ताच्या वेळेचे माझ्यामते महत्व इतकेच की निव्वळ अक्षता टाकायला म्हणून आलेल्यांचा जो खोळंबा होतो त्याची काही चिंताच नसणे हे घातक आहे. गुरुजींशिवाय उत्साही महिलांनी मंगलाष्टके म्हणणे हे खूप जुने झाले आहे पण तरीही तितकेच वैतागवाणे आहे. एक महत्वाचा भाग म्हणजे पैशाची अभूतपूर्व उधळपट्टी ह्या सर्व विवाह समारंभात प्रकर्षाने जाणवली.

अ‍ॅड सुप्रिया कोठारी म्हणून एक परिचित वकील आहेत त्यांनी एकदा सांगितले होते की आजच्या पिढीतील 'नवजात'पती-पत्नी हे विवाह टिकवण्याबाबत पूर्वीच्या पिढ्यांइतके गंभीर नसतात व त्याचे परिणाम सहजपणे दिसूनही येतात. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये 'विवाहसंस्थेबाबत'असलेले एक भय म्हणा किंवा तीवरील अवलंबित्व म्हणा किंवा विश्वास म्हणा, कशानेतरी लग्न टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले तरी केले जात असत. पण ह्या वकील बाईम्च्या मते आजकालच्या मुलामुलींचे प्री-मॅरेज काऊन्सेलिंग झालेले असूनही व घरातील वातावरण आणि संस्कार 'नॉर्मल'असूनही ह्यांची लग्ने टिकतील असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. अगदी लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी, इथपासून ते वर्ष दोन वर्षात विवाहबंधन झुगारून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिलेली आहेत. (तो त्यांच्या व्यवसायाचा एक भागही आहेच).

आता सुमारे वीस ते पंचवीस लाख खर्च, जुन्या प्रथांना अधिक उत्साहाने व कौतुकाने कवटाळणे, नवनव्या प्रथा आणणे आणि वधुवरांना वैवाहिक आयुष्य सुरू केल्यानंतर राहणीमान उंचावायला विशेष काही संघर्षच करावा लागणार नाही इतक्या भेटी वगैरे देणे हे सगळे झाल्यानंतर जर ते लग्न मोडले तर काय हशील?

लग्न व्यवस्थित राहिले तरी ह्या खर्चाबाबत वाढती बेफिकीरी येत आहेच.

एवढे करून आधीच्या पिढीच्या तुलनेत ह्या आत्ताच्या वधूवरांना वैवाहिक आयुष्य आरंभ केल्यानंतर खूप वेगळे कौटुंबिक वातावरण देऊ केले जाते असेही नव्हे! फार तर राहणीमानात फरक असेल, पण सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे घटक जे पारंपारीकरीत्या (बहुतेक वेळा) शत्रूपक्षात मोडतात ते सगळे तसेच्या तसे आजही आहेतच. त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या नुसत्या असण्यामुळे वाढणारा ताणतणाव, मानसिक समस्या, घुसमट, कुटुंबे विभक्त होत जाणे हे सगळे तसेच होत आहे. अवाढव्य खर्च करून एकच दिवस नाचण्याऐवजी तो पैसा घालून वधूवरांना स्वतंत्र राहण्यासाठी एखादे निवासस्थान बूक करून दिले तर बिचारे आनंदात तरी सोबतीचे आयुष्य सुरू करतील. शिवाय, मुलगी आपल्या क्षेत्रात भले डॉक्टर किंवा कोणीही मोठी पदस्थ असो, लग्नात ती शोभेची वस्तू आणि नजरा झेलत बसणारी बाहुलीच ठरते.

ह्याशिवाय एक वेगळेपण जाणवले ते असे! पूर्वीच्या लग्नांमध्ये फोटोग्राफर हा बर्‍यापैकी लक्झरीत मोडणारा आणि त्यामुळे थोडा अदब राखून वागणारा मनुष्य असे! आजकाल फोटोग्राफर्स हे गुरुजींच्या वरताण आवाजात बोलत सूचना देत असतात. प्रसंगी त्यांच्याकडून काही उपस्थितांचा नकळत अपमानही होतो. पण अत्युत्कृष्ट अल्बम असण्याला जे महत्व प्राप्त झालेले दिसते त्याच्यापुढे उपस्थितांची किंमतही घटत चालली आहे. बिदाई (!) सारख्या हळव्या प्रसंगीही फोटोग्राफर्स अत्यंत रुक्ष पद्धतीत सूचना देऊन त्या प्रसंगातील हवा काढून घेतात. आईच्या गळ्यात पडावे असे वाटणारी मुलगी तेव्हाही कसेबसे हसत असते.

फुलांच्या सजावटीवर झालेला खर्च असाच अमाप असतो. बुफे पद्धतीने अन्न ठेवण्यामुळे ते वाया जात नाही असे काहीच नाही. परत कोण रांगेत येणार किंवा 'काय माहीत आपण कदाचित तीन वडे खाऊही'असे वाटल्यामुळे अनेकदा जास्तच वाढून घेतले जाते. वाया गेलेले अन्न आणि पाच-पाचशेच्या घरात असलेली एक प्लेट ही भव्य उधळण पाहून डोळे दिपतात.

पूर्वीपेक्षा स्वच्छता वाढलेली आहे, सोयी वाढल्या आहेत आणि एवढ्या-तेवढ्यावरून कांगावा करणे घटले आहे हे सोडले तर आजकालचे विवाह सोहळे म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन, निव्वळ नावासाठी केलेला अनाठायी खर्च आणि कोणत्याही मूर्ख प्रथेपासून सुटका न झालेला असा सोहळा ठरतो.

हे सगळे खूप चुकीचे चाललेले आहे असे फार वाटत राहते. पै पै साठवून आणि कर्ज काढून घेतलेल्या टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तू आठवू लागतात. आपल्यापेक्षा नवीन पिढीला सगळे आधीच किंवा त्वरीत मिळते ह्याचा हा मत्सर नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील छोटे छोटे आनंदच काढून घेण्याचा हा प्रकार वाटतो. त्यातल्यात्यात एक बाब जरा बरी वाटते की झालेल्या बर्‍यापैकी जागृतीमुळे म्हणा किंवा कशाहीमुळे असेल पण मुलाकडचे लोक अगदी पूर्वीच्यांइतका आडमुठेपणा करताना आढळत नाहीत. बर्‍यापैकी समजदार आहेत असे दिसते. तसेच, हल्ली खर्च अर्धा अर्धा विभागण्याचे प्रमाणही बर्‍यापैकी आहे / असावे.

पण तरीही केली जाणारी उधळपट्टी, वधूवरांच्या आयुष्यातील लहान लहान आनंद हिरावून घेऊन त्यांना एकदम उत्तम राहणीमान देऊ करणे, जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे हे सगळे अचाट आहे.

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<एक विचारु का, हे लोक रग्गड खर्चाला नाकं मुरडतात तर कुणाच्या रग्गड कमाईलाही मुरडत असतील काय रे नाना?>>>
अहो दुसर्‍याला नाक मुरडणे हा एक जन्मजात स्वभावविशेष आहे. जास्त पैसे मिळवणार्‍यांनाहि नाक मुरडायचे नि कमी पैसे मिळवणार्‍यांनाहि.
खूप खर्च करणार्‍यांनाहि नि कमी खर्च करणार्‍यांनाहि.
अगदी मला जेव्हढे पैसे मिळतात, मी जेव्हढा खर्च करतो, मी जेव्हढी फॅशन करतो, मी जेव्हढे सिनेमे बघतो असे सगळे माझ्यासारखे करत नाहीत त्यांना मी ना़क मुरडणारच. उगाच माझ्यासमोर दुसर्‍याचे कौतुक कसे खपवून घेईन मी! (माझे कौतुक कुणीच करत नाहीत!)

अरे बापरे लग्नात एवढी उठाठेव असते!
आणि लग्न मोडल्यावर तर
गोष्टी ह्या थराला जात असतील तर मग जे लग्नाच्या उत्सवात मानपान घ्यायला पुढे पुढे असतात
ते काय करतात अशा वेळी?
त्यांची काहीच जबाबदारी नाही का?

आहो माझ्या स्वतःच्या लग्नावेळी मी रजिस्टर लग्न करून एक reception देऊ म्हणून प्रस्ताव दिला होता ... पण सासरच्या मंडळी नि हाणून पाडला ना राव ..
उगा किती खर्च करतात लोकं ज्याच्याशी इतरांना काहीही देणे घेणे नसते ... आपले पैसे मात्र उगीच उडतात ... परंतु लोकांना हे पटत नाही हा स्वानुभव ...

एक पटतंय का बघा सर्वांना,
जर तुम्हाला असे वाटत असेल की मी माझे लग्न साधेपणात करणार तर ईतर लोकांनी मोठेपणात केलेल्या लग्नाला जाऊन जेवायचे सोडायला हवे. जर आपण ईतरांच्या थाटामाटात केलेल्या लग्नात बागडलो असू. आणि मस्त चापून जेवलो असू तर आपणही त्याची परतफेड आपल्या ऐपतीनुसार का होईना तशीच करायला नको का?

अन्यथा मी ऑफिसमध्ये सर्वांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या खातोय पण माझा बर्थडे येताच मला बाबा हा वायफळ खर्व वाटतो असे बोलण्यात काय अर्थ आहे.

मी वर सोशल प्रेशर म्हणालो होतो ते हेच्च!...
तू यापुढे लग्नाला जाताना घरून पोळीभाजीचा डबा घेऊन जा आणि सर्वांना सांग, माझ्या लग्नात वायफळ खर्च करायचा नाही म्हणून मी कोणाची उधारी ठेवत नाहिये!

Submitted by नन्द्या४३ on 27 November, 2017 - 21:12

>> हे जबरा पटलं.... कांदा सोललाय!

-------------

वाह्यात गृहस्थ, आयडिया भारी !!

तू यापुढे लग्नाला जाताना घरून पोळीभाजीचा डबा घेऊन जा
>>>>
अक्षता टाकायच्या आणि मुलामुलींना अशिर्वाद देऊन निघायचे. महत्वाचे हे आहे ना?
बाकी अगदीच उशीर झाला आणि भूक लागली तर बाहेर कुठेही चार घास खाता येतीलच. त्यासाठी लग्नाची चारपाचशे रुपयांची थाळीच खायची गरज नाही. खाल्लीच तर मग आपण आपल्या लग्नात कोणाला न बोलावता पैसे वाचवून रजिस्टर करायचे हे पटत नाही.

अरे ऋ, पण तू सांगतोस का मला बोलवा लग्नाला आणि जेवायला म्हणून ?
मांडवशोभेला यजमानाला चार माणसं हवी असतात म्हणून बोलावतो तो तुला.

मनीमोहोर, हो ते जरा गंमतीनेच लिहिले आहे. पण आणखी एक गंमत म्हणजे तुम्ही अश्यांच्या लग्नात जाऊन मनसोक्त जेवून येत असाल आणि बाहेर येऊन ढेकर देत किती खर्च करतात लोकं, किती ही उधळपट्टी अशी त्यांनाच नावे ठेवत असाल तर ते देखील चूकच नाही का Happy

आपल्याकडे म्हणतात ना, खाऊन माजा पण टाकून माजू नये. याचा अर्थ हाच. लग्नात खर्च करायची हौस आहे तर करा. चमचमीत पदार्थांचे हजार रुपयाचे ताट ठेवा, पण अन्नाची नासाडी करू नका. अन्यथा कंजूषीत केलेल्या बेचव जेवणाच्या पंगतीतही बरेचदा अन्नाची नासाडी पाहिली आहे.

लग्न मोडल्यावर तर
गोष्टी ह्या थराला जात असतील तर मग जे लग्नाच्या उत्सवात मानपान घ्यायला पुढे पुढे असतात
ते काय करतात अशा वेळी?
त्यांची काहीच जबाबदारी नाही का?
>>
सुख के सब साथी दुख मे न कोई!!

पूर्णपणे पैशांची उधळपट्टी असे कसे म्हणता येईल त्या निमित्याने फुलवाला, decoration, हॉल, आचारी, कापड व्यापारी , या सर्वांच्याकडे काम करणारे यांचे पोट तर भरत आहे. असेल पैसा आणि इच्छा तर करू देत खर्च त्या निमित्याने तो मार्केटमध्ये तर येईल. आणि लग्न टिकणे न टिकणे खर्चावर अवलंबून नसते नाहीतर परदेशातील बरीचशी लग्ने टिकायचे चान्सेस वाढले असते. त्यामुळे लेख पूर्णपणे पटला असे म्हणता येणार नाही

Sorry, marathi type karnya cha khuuuup prayatna kela pan yash aale nahi.. pan pratikriya denyachi khup ch ichha zali, karan sadhya mazya ghari mazya lagna sathi baghne suru aahe ani yaa prakar che waad roj ch hot aahet .
waadacha mul mudda Dene-Ghene aahe. mazya matoshri ni peti bhar sadya gheun thevalya aahet mazya lagnaat vatayala. mazya drustine toh ati wayfal kharcha aahe. pan hey karavech lagty, pratham karya aahe- lok kaay mhantil vagere vagere dialogue aikun kaan kitale.
ani yaach bhandanan madhe mazya chulat bahini che lagne jamale ani agadi 15 diwasant paar padale tyatala kissa asa ki, navra mulga pardeshat asto navri la 1-2 mahinyat tikade ch nenaar,. ithe bharatat mula che aai-vadil agadi shena-matichya gharat sheta ver rahtat, tari hi lagnat fakt lok mhantil ki mulikadil pariwara ne kahi dile nahi mhanun purna kitchen chi bhandi, tv-fridge-oven-ac-purna bedroom set magitala gela ani dila gela.. ya serv vastu aivaji rokh rakkam kiva tya rakame che sone nakarale gele.. aani aaj tyanchya ghrata ya vastu thevayala jaga hi nahi ani ac-oven sathi lagnaare power circuit points pan nahi... nivaal mothepana ani lok kaay mhantil ya vicharane Rs.2-3 lakh cha churada zala..
ya lekhaya suruvati pramane sadhya me dekhil recently 4-5 lagna attain kele aahet ani maaze observesion ase aahe ki sadhya lagna madhe mothe pana karne ani ek dusarya ver mothepanat kadi karne hi mansikata banat aahe.. koni 1 aamdaar lagnala bolavala ki dusaryane khasdaara la bolvave, tisarya ne mag koni mantripad bhushawanaare bolavave.. eka lagnat 2 sweets tr lagech dusrya lagnaat 4... navrichi sadi kuthy rs.25000 tr kuthy rs.40000. sadhya che lagna samramb nivval mothypana karnyaat ani motha soyara pahanaare aahet. Yamule lagnacha 2 jiv - 2 family ektra yenyacha uddesh maage padto aahe ani dikhava karnyaat dhanyata manali jaat aahe. paay dhune-flowral decoration-dj dance-photograhers chi mothi team-pre wedding shots sarkhe prakar hous/parmpara kiva bandhan na rahata show off karnyache sadhan banale aahe.

दोन जीवांचे मिलन दोन घरांची सोयरिक यासाठी संबंधित कुटुंबांनी व जवळच्या मोजक्याच नातलगांनी मित्रमैत्रिणीनी आनंदाने एकत्र येऊन ते क्षण साजरे करणे म्हणजे लग्न. पण जेंव्हा हे एकत्र येणारे लोक आपल्याबरोबर मानापमान, इगो, इर्षा, बडेजाव असली नको असलेली पॅकेजेस बरोबर घेउन येतात तेंव्हा आनंद उत्साह खिलाडूवृत्ती या गोष्टी इवलासा चेहरा करून कोपऱ्यात बसून राहतात. लग्नाच्या निमित्ते होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण हे सुद्धा आजकाल चिंताजनक आहे.

लग्नाला न बोलवणे हा एक भयंकर अपमान समजला जातो. परिणामी गर्दी वाढते आणि आपसूकच हे समारंभ उबग आणणारे होतात. मग खर्च मानापमान वगैरे सगळे ओघाने आलेच. पण मुळातच गर्दी कमी असेल तर पुढील अनावश्यक प्रकार होणारच नाहीत. अरे नाही बोलवले तुला. आम्हाला सोयीचे नाही वाटले. आजच्या काळात मेसेज पाठवून सांगितले कि लग्न करणार आहोत तर तितके पुरे आहे ना. नंतर तुला वेळ असेल तेंव्हा कधीही येऊन निवांत गप्पा मारून जा ना. त्यात काय इतके? पण नाही.

आणि इतके सगळे करून पैशाचा वेळेचा श्रमाचा चुराडा करून ज्या हेतूने लग्नउत्सव साजरा केला जातो तो हेतू साध्य होईलच असे नाही. परक्या घरी नांदायला गेलेल्या मुलीला अनेक कुटुंबांमध्ये नंतर काय काय गोष्टीना तोंड द्यावे लागते हे सर्वश्रुत आहेच. एकंदर सगळे उबग आणणारे आहे. तरीही पूर्वीपेक्षा आजकाल रुसवेफुगवे वगैरे कमी झालेत हि त्यातल्यात्यात थोडीशी समाधानाची बाब.

Pages