नुकतीच पाहिलेली काही लग्ने

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2017 - 11:32

नुकतीच चार लग्ने पाहिली. चारही लग्नांमध्ये जुन्या काळापासून चालत आलेल्या बहुतेक रुढी (वरमातेचे पाय धुणे वगैरे) एखाद्या उत्सवाप्रमाणे पाळल्या गेल्या. उत्सवाप्रमाणे म्हणजे असे की ज्या गोष्टीवरून पूर्वी रुसवे फुगवे होत असत (पायच धुतले नाहीत ह्यावरून मुलाकडच्यांनी रुसणे किंवा माझ्या आईला पाय धुवायला लावले ह्यावरून मुलीने रुसणे वगैरे) ती गोष्ट आता एक मजेशीर प्रथा म्हणून मोठ्या उत्साहाने पाळली जाते की काय असे वाटावे इतक्या थाटात साजरी करण्यात आली. ह्याशिवाय कार्यालयात येताना मुलाला फुलांच्या गालिच्यावरून चालत आणणे, त्याचे पहिले पाऊल पडताच मुलीकडच्यांनी टाळ्यांचा कडकडाट करणे, तुतार्‍या वाजणे, मुलीला डोलीत बसवून आणणे, मुहुर्ताची छापील वेळ अजिबात न पाळता केव्हाही लग्न लागणे वगैरे गोष्टीही पाहिल्या. मुहुर्ताच्या वेळेचे माझ्यामते महत्व इतकेच की निव्वळ अक्षता टाकायला म्हणून आलेल्यांचा जो खोळंबा होतो त्याची काही चिंताच नसणे हे घातक आहे. गुरुजींशिवाय उत्साही महिलांनी मंगलाष्टके म्हणणे हे खूप जुने झाले आहे पण तरीही तितकेच वैतागवाणे आहे. एक महत्वाचा भाग म्हणजे पैशाची अभूतपूर्व उधळपट्टी ह्या सर्व विवाह समारंभात प्रकर्षाने जाणवली.

अ‍ॅड सुप्रिया कोठारी म्हणून एक परिचित वकील आहेत त्यांनी एकदा सांगितले होते की आजच्या पिढीतील 'नवजात'पती-पत्नी हे विवाह टिकवण्याबाबत पूर्वीच्या पिढ्यांइतके गंभीर नसतात व त्याचे परिणाम सहजपणे दिसूनही येतात. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये 'विवाहसंस्थेबाबत'असलेले एक भय म्हणा किंवा तीवरील अवलंबित्व म्हणा किंवा विश्वास म्हणा, कशानेतरी लग्न टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले तरी केले जात असत. पण ह्या वकील बाईम्च्या मते आजकालच्या मुलामुलींचे प्री-मॅरेज काऊन्सेलिंग झालेले असूनही व घरातील वातावरण आणि संस्कार 'नॉर्मल'असूनही ह्यांची लग्ने टिकतील असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. अगदी लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी, इथपासून ते वर्ष दोन वर्षात विवाहबंधन झुगारून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिलेली आहेत. (तो त्यांच्या व्यवसायाचा एक भागही आहेच).

आता सुमारे वीस ते पंचवीस लाख खर्च, जुन्या प्रथांना अधिक उत्साहाने व कौतुकाने कवटाळणे, नवनव्या प्रथा आणणे आणि वधुवरांना वैवाहिक आयुष्य सुरू केल्यानंतर राहणीमान उंचावायला विशेष काही संघर्षच करावा लागणार नाही इतक्या भेटी वगैरे देणे हे सगळे झाल्यानंतर जर ते लग्न मोडले तर काय हशील?

लग्न व्यवस्थित राहिले तरी ह्या खर्चाबाबत वाढती बेफिकीरी येत आहेच.

एवढे करून आधीच्या पिढीच्या तुलनेत ह्या आत्ताच्या वधूवरांना वैवाहिक आयुष्य आरंभ केल्यानंतर खूप वेगळे कौटुंबिक वातावरण देऊ केले जाते असेही नव्हे! फार तर राहणीमानात फरक असेल, पण सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे घटक जे पारंपारीकरीत्या (बहुतेक वेळा) शत्रूपक्षात मोडतात ते सगळे तसेच्या तसे आजही आहेतच. त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या नुसत्या असण्यामुळे वाढणारा ताणतणाव, मानसिक समस्या, घुसमट, कुटुंबे विभक्त होत जाणे हे सगळे तसेच होत आहे. अवाढव्य खर्च करून एकच दिवस नाचण्याऐवजी तो पैसा घालून वधूवरांना स्वतंत्र राहण्यासाठी एखादे निवासस्थान बूक करून दिले तर बिचारे आनंदात तरी सोबतीचे आयुष्य सुरू करतील. शिवाय, मुलगी आपल्या क्षेत्रात भले डॉक्टर किंवा कोणीही मोठी पदस्थ असो, लग्नात ती शोभेची वस्तू आणि नजरा झेलत बसणारी बाहुलीच ठरते.

ह्याशिवाय एक वेगळेपण जाणवले ते असे! पूर्वीच्या लग्नांमध्ये फोटोग्राफर हा बर्‍यापैकी लक्झरीत मोडणारा आणि त्यामुळे थोडा अदब राखून वागणारा मनुष्य असे! आजकाल फोटोग्राफर्स हे गुरुजींच्या वरताण आवाजात बोलत सूचना देत असतात. प्रसंगी त्यांच्याकडून काही उपस्थितांचा नकळत अपमानही होतो. पण अत्युत्कृष्ट अल्बम असण्याला जे महत्व प्राप्त झालेले दिसते त्याच्यापुढे उपस्थितांची किंमतही घटत चालली आहे. बिदाई (!) सारख्या हळव्या प्रसंगीही फोटोग्राफर्स अत्यंत रुक्ष पद्धतीत सूचना देऊन त्या प्रसंगातील हवा काढून घेतात. आईच्या गळ्यात पडावे असे वाटणारी मुलगी तेव्हाही कसेबसे हसत असते.

फुलांच्या सजावटीवर झालेला खर्च असाच अमाप असतो. बुफे पद्धतीने अन्न ठेवण्यामुळे ते वाया जात नाही असे काहीच नाही. परत कोण रांगेत येणार किंवा 'काय माहीत आपण कदाचित तीन वडे खाऊही'असे वाटल्यामुळे अनेकदा जास्तच वाढून घेतले जाते. वाया गेलेले अन्न आणि पाच-पाचशेच्या घरात असलेली एक प्लेट ही भव्य उधळण पाहून डोळे दिपतात.

पूर्वीपेक्षा स्वच्छता वाढलेली आहे, सोयी वाढल्या आहेत आणि एवढ्या-तेवढ्यावरून कांगावा करणे घटले आहे हे सोडले तर आजकालचे विवाह सोहळे म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन, निव्वळ नावासाठी केलेला अनाठायी खर्च आणि कोणत्याही मूर्ख प्रथेपासून सुटका न झालेला असा सोहळा ठरतो.

हे सगळे खूप चुकीचे चाललेले आहे असे फार वाटत राहते. पै पै साठवून आणि कर्ज काढून घेतलेल्या टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तू आठवू लागतात. आपल्यापेक्षा नवीन पिढीला सगळे आधीच किंवा त्वरीत मिळते ह्याचा हा मत्सर नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील छोटे छोटे आनंदच काढून घेण्याचा हा प्रकार वाटतो. त्यातल्यात्यात एक बाब जरा बरी वाटते की झालेल्या बर्‍यापैकी जागृतीमुळे म्हणा किंवा कशाहीमुळे असेल पण मुलाकडचे लोक अगदी पूर्वीच्यांइतका आडमुठेपणा करताना आढळत नाहीत. बर्‍यापैकी समजदार आहेत असे दिसते. तसेच, हल्ली खर्च अर्धा अर्धा विभागण्याचे प्रमाणही बर्‍यापैकी आहे / असावे.

पण तरीही केली जाणारी उधळपट्टी, वधूवरांच्या आयुष्यातील लहान लहान आनंद हिरावून घेऊन त्यांना एकदम उत्तम राहणीमान देऊ करणे, जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे हे सगळे अचाट आहे.

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहे ही पध्दत. मावशी तु मला वॉशिंग मशीन दे. काका मास्टर बेड दे, दुसरी मावशी कपाट दे, आत्या फ्रीज दे अशी
>>>>

त्याला संसारसट म्हणतात! संसारसट लग्नात देणे ही वा त्याची खरेदी ही बस्त्यासारखी एक खरेदी आयटम असे

जी काय हौसमौज करायची ती करा पण लग्न वेळेवर लावले गेले पाहिजे. सीझनमध्ये बऱ्याचदा एकाच दिवशी २-३ ठिकाणच्या लग्नांचे आमत्रण असते. कुठलीच लग्न दिलेल्या वेळेप्रमाणे न लागल्यामुळे लोकांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे लग्न वेळेवर लागणे हे मस्ट.
लग्नाच्या सोहळ्यात फोटोग्राफीवर खर्च हा पूर्वीही केला जायचा. आता फोटोग्राफीचे वेगवेगळे तंत्रज्ञान सहज उपलब्ध झाल्यामुळे सोहळ्याचे स्वरूप वेगळ्या पद्धतीने टिपता येऊ लागले आहे,त्यात प्री वेडिंग, वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूटिंग लोकं अावडीने करून घेऊ लागले आहेत. पूर्वीही डोहाळ समारंभाचे फोटो हौसेने काढले जात. माझ्या आत्याचे फुलांचे धनुष्यबाण हातात घेवून, चंद्राच्या कोरेवर बसून, होडीत बसून काढलेले फोटो आहेत आमच्याकडे.
एकदाच एका मैत्रिणीच्या लग्नात प्रि वेडींग फोटोग्राफीला मी थोडी मदत केली होती. पोस्ट वेडिंगसाठी काही नवीन कल्पना आहे का तुझ्याकडे असं तिने विचारले? मी म्हटलं आहे की , " अरे, संसार संसार, आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर ! " ह्या गाण्यावर करू की... लोकांच्या हौसेला लिमिट नाही. परंतू हे व्हिडिओ पूर्णपणे कोणी बघत असतील ह्याबद्दल शंकाच आहे.

छान विषय....

ज्यान्च्याकडे पैसे आहेत त्यान्नी ते उधळले तर मला त्यात काही चुकीचे वाटत नाही. अनेकान्ना (पोळ्या करणारे, वाजन्त्री, बॅन्ड, डेकोरेशन, फोटोग्राफर, कपडे शिवणारा... ) त्यात रोजगार मिळतो... कष्टाने कमावलेला पैसा आनन्दाने खर्च करा.

{पण तरीही केली जाणारी उधळपट्टी, वधूवरांच्या आयुष्यातील लहान लहान आनंद हिरावून घेऊन त्यांना एकदम उत्तम राहणीमान देऊ करणे, जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे}

२. आर्थिक उत्क्रांतीसोबत स्वप्नंही मोठी होत जाणार. पगाराच्या काही भागात टीव्ही फ्रीज घ्यायची ऐपत असणार्‍या पिढीला त्याचं अप्रूप असायचं कारण नाही. त्यांची स्वप्न मोठं घर, मोठी गाडी, परदेश प्रवास अशी असणार. पैसा असला तरी राहणीमान साधं ठेवावं हे एकंदरच जगण्यात असेल, तर तो भाग वेगळा. फक्त लग्नसमारंभापुरताच तो कशाला आणायचा?
३. निरर्थक प्रथा जाच न वाटता गंमत म्हणून पाळत वा निर्माण करत असतील तर त्यातही काही वावगे नाही.

४.आता समारंभांत माणसांपेक्षा कार्यक्रमाला आणि तो रेकॉर्ड करण्याला अधिक महत्त्व असल्याचं जाणवत असेल, तर तो सुलभ तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे आलेला दोषही आपल्या एकंदर जगण्यातच आला आहे. पर्यटनाला गेल्यावर तिथला निसर्ग पंचेद्रियांनी भोगण्यापेक्षा त्याला कॅमेराबद्ध करून परिचितांमध्ये शेअर करायचे, प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून बोलण्याऐवजी संदेशांची देवाणघेवाण करण्याचे दिवस आहेत. तेच अनेक समारंभांतही होत असावं.
(कोणी वरवधूने माळ घालताच बोहल्यावरून रिलेशनशिप स्टेटस अपडेट केलं की नाही?

शेवटी लग्न टिकवण्यासाठी काहीही न करणं सासरच्यांना शत्रूपक्ष मानणं हे जरा जास्तच सरसकटीकरण वाटलं. व्यक्तीस्वातंत्र्याच्या (यात विशेषतः स्त्रीस्वातंत्र्याच्या) विस्तारलेल्या कल्पना, लोक काय म्हणतील याचं दडपण न वाटणं, ब्रह्मदेवाने बांधलेल्या गाठी कशा बुवा तोडायच्या असले प्रश्न नसणे याचा परिपाक.

आधी काहीही झालं तरी लग्न मोडायचंच नाही हे कंडिशनिंग असे, तसं आता केलं जात नसेल. शिवाय लग्न टिकवायची जबाबदारी एकाच बाजूची असायची, हे बदललंय, हे दुसर्‍या बाजूच्या पुरेसं लक्षात आलं नसेल.

सध्याच्या लग्न वा कोणत्याही समारंभांत लोकांच्या एकत्र येण्यालाही वेगवेगळे पदर असतात, असं जाणवतं.
नवी पिढी तो इव्हेंट सेलिब्रेट करायला आलेली असते. अगदी जुनी पिढी यानिमित्ताने आपल्या नातलगांना भेटून घेते. मधली पिढी या दोहोंच्या मध्ये.
नात्यांचे पट जर विरळ होत चालले असतील, तर फक्त लग्नसमारंभांतच ते वेगळे कसे दिसतील?

हा मुद्दा शेवटी घेतोय.
१. उधळपट्टी : अनेकांनी म्हटलंय तसं, ज्यांची पैसे खर्च करायची ऐपत आहे, त्यांनी केली तर त्यात काही वावगं नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहत असेल तर बरेच आहे. पण बदलत्या परिस्थितीनुसार हा खर्च रोखीने केला की चेक वा डिजिटल मनीच्या रूपात, तसंच त्यावर जीएसटी भरला गेला की नाही, हेही पाहायला हवे होते असे वाटले.
गेल्या वर्षी साधारण याच काळात लग्नसमारंभांत खर्च करायला रोख रक्कम कशाला लागते? काळा पैसा खर्च करूनच समारंभ साजरे केले पाहिजेत, असं कुठे लिहिलंय? असे प्रश्न आदरणीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विचारले होते आणि लोकांनी त्यावर जोरदार टा़ळ्याही वाजवल्या होत्या.

अन्नाच्या नासाडीबद्दल अनेकदा लिहिलं गेलंय. ती टाळली गेली पाहिजे याबद्दल दुमत नसावं. इथेही तो रेस्टॉरंटसारखा पोर्शन साइझचा नियम लोकांनी स्वतःहून पाळायला हवा.

<<<मग "आहेर आणू नका" ऐवजी ओळखीपाळखीच्यांना कुणी काय गिफ्ट आणायचं ते ठरवून देऊन लग्न करायची पद्धत येईल. >>>

हे तर आमच्याकडे गेली १५-२० वर्षे चालू आहे. त्याला रजिस्ट्री म्हणतात, म्हणजे नवरा बायको आधीच निरनिराळ्या दुकानात जाऊन स्वतःला काय पाहिजे याची यादी, फोटो, किंमत यासह वेब साईटवर लिहितात. अहेर देणार्‍यांनी त्यातल्या गोष्टी निवडायच्या. आम्ही जर एखादी गोष्ट द्यायची ठरवली नि पैसे देऊन, ऑर्डर केली तर ती परत दुसर्‍या ला घेता येत नाही. तरी द्यायचीच असेल, (कारणे: छे:. हे काय निवडलाय, आम्ही याच्या पेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचे, व महागाईचे देऊ. शेवटी आम्ही देणार ते इतके स्वस्तातले कसे लोकांनी म्हणायला नको. आम्हाला इज्जत आहे. इ.)
न्यू यॉर्क सिटी त अत्यंत महागड्या दोन खोलाच्या फ्लॅटमधे रहाणारे नवरा बायको सरळ लिहीतात की आमच्या घरी वस्तू ठेवायला जागा नाही तर रोख पैसेच द्या.
आम्ही नुकतेच एका लग्नाला जाऊन आलो, तिथे लिहीले होते, अहेर आणण्याची गरज नाही पण द्यायचेच असेल तर रोख पैशाचे पाकीट एका मोठ्या लाल रंगाच्या खोक्यात टाका. नंतर लग्नाचे जेवण जेवताना, "अग, तुम्ही केला का ग आहेर?" "नाही" "पण आम्ही केला बाई. असे कसे आहेर दिल्याशिवाय जायचे? बरे नाही वाटत आम्हाला!" असे संवाद झाले. मग मुद्दाम ती मैत्रीण बघत असताना, किंवा नसल्यास लक्ष वेधून, आपण त्या खोक्यात एक पाकीट टाकायचे!!
या असल्या आमच्याकडल्या भारतीय लग्नातल्या पद्धती!

शिवाय आमच्याकडे बरेचदा वधू भारतीय व नवरा विदेशी असा प्रकार असतो. तेंव्हा नवरे लोक हटून बसतात की आम्हाला लग्नाला घोड्यावरून नाचत, वा़जत गाजत आणा. एका लग्नात भर फिलाडेल्फिया डाऊन टाऊन मधील रस्ता एक तास बंद करून तिथून नाचत, गाजत वाजत नवरदेवाला घोड्यावरून आणण्यात आले.
या गोष्टी करायला इथे परवाना, नि बराच खर्च लागतो. अर्थात् वधू पक्षाने.
भारतात काय, कुणीहि उठावे नि रस्ता बंद करावा - परवाना लागत असेल तर तो खाजगी रीत्या सरकारी अधिकार्‍याशी बोलून काहीतरी करून (त्याला लाच म्हणतात, असे ऐकले आहे) जमून जाते. बाकी कुणि तक्रार करत नाही - भारतात काय, पब्लिक! कुणिहि यावे, लाथा घालाव्या, आम्ही समजून घेऊ. लग्नाची वरात! राजकीय पुढार्‍याची मिरवणूक. अर्धा रस्ता अडवून उभारलेल्या कमानी, काही पण चालते. परवाना, फी वगैरे सगळे दाम, दंड या मार्गाने मिळते.

रजिस्ट्री पद्धत कॅनडात पण आहे....

निव्वळ रोख पैसे/ गिफ्ट कार्ड देणे हे मला आवडते. अजुन एक पर्याय मला आवडतो. आम्हाला गिफ्ट नकोतच, बुके/ फुलान्चा खर्च करणारच असाल तर "स्थानिक फुड बॅन्क" किव्वा अजुन काही सेवाभावी सन्स्था येथे चेक/ पैसे/ खाद्य पदार्थ पाठवा. प्रत्येक ठिकाणी फुड बॅन्क असते आणि तिथे खाण्याची सोय होते पण मागच्या काही वर्षात देणार्‍यान्नी हात अखडता घेतला आहे (कॅनडात सध्या जॉब मार्केट खुप वाईट आहे). फुड बॅन्केत काही ठराविक पदार्थच स्विकारले जातात.

भारतात अनेक सेवाभावी सन्स्था आहेत, त्यान्ना हवी असलेली मदत मिळेल, आणि उगाच १७५० अनावश्यक वस्तू तुमच्या कडे जमा होणार नाहीत. लग्नाला लाखो रुपये खर्च करताना सामाजसेवा केल्याचे समाधान.

माझ्या परिचितान्मधे खर्चाला थोडा फाटा देत एका जोडप्याने ५ लाख रुपये शाळेसाठी दिलेत...

लिव्ह-इन साठी पाहिजे तर वेगळा धागा काढा Happy
>>>

राजसी, लग्नाआधीचे समजून घेणे वा त्यासाठी काही काळ एकत्र राहणे म्हणजे लिव्ह ईन नव्हे.
असो, तरी मला जे म्ह्णायचेय त्यासाठी वेगळा धागा काढतो. सध्याच्या पिढीला याची गरज आहे.

छान लिहिलंय. माझ्या मते लग्न कोर्टात केलं, मंदिरात केलं किंवा एखाद्या महागड्या लाॅनमध्ये भव्य महालाचा सेट उभारून केलं तरी लग्नाची परीभाषा एकच असणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अवाढव्य खर्च केला तर हरकत नाही पण त्यांच अनुकरण मध्यमवर्गाने करू नये असं मला वाटतं.
मेमध्ये माझ्या मामाच्या मुलीचं लग्न झालं. मुलीनं स्वतः हे द्या, ते द्या म्हणून सगळ्या संसारोपयोगी वस्तू आई-बाबाकडून घेतल्या. मला अजिबात नाही आवडलं. आई-बाबांचा तर नाही पण दोन लहान बहिणींचा विचार करू नये का? तेही पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलीनं.

अशा लग्नांमुळे रोजगार निर्माण होतो, अनेकांना पैसे मिळतात. चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी थाटामाटाची लग्नं उपयुक्त आहेत.

सैराट फेमस झाला तेव्हा त्याच्या गाण्यावर केलेले pre wedding शूट चे किमान 3 विडिओ पाहिलेत मी,
एक अगदी त्या त्या लोकेशन वर जाऊन केलेला,
दुसरे व्हिडीओ म्हणजे ऍक्शन त्याच पण लोकेशन वेगळे, >> लॉल Lol
बायकांचं जाऊदेत एकवेळ पण पुरुषपण हे करायला तयार होतात??>>>
आता बायको मिळण्यासाठी जो पुरुष लग्नासारखी सजा भोगायलासुद्धा तयार झाला आहे, त्याला असल्या छोट्यामोठ्या शिक्षांचं काय?

अशा लग्नांमुळे रोजगार निर्माण होतो, अनेकांना पैसे मिळतात. चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी थाटामाटाची लग्नं उपयुक्त आहेत.>>>

हे लॉजिक डान्सबारसाठी सुद्धा वापरता येईल. मुळात लग्नासाठी केलेल्या खर्चातला खरोखरच हौस म्हणून केलेला किती आणि सोशल प्रेशर, वरपक्ष (किंवा वधूपक्षाकडूनही) आणलेले दडपण किंवा आपल्याच लोकांचे इमोशनल ब्लॅकमेल याचा वाटा किती हा संशोधनाचा विषय आहे. बेहिशेबी पैसा असलेल्यांना त्यांचा पैसा या निमित्ताने वापरून घेण्याची ही संधी असते. त्या दृष्टीने चांगल्या समांतर अर्थव्यवस्थेसाठी थाटामाटाची लग्नं उपयुक्त आहेत. मात्र मध्यमवर्गीय नोकरदारांना या 'इव्हेंट' साठी आयुष्यभर हौस मारून पूंजी जमवून ठेवावी लागते. त्यासाठी वर्षानुवर्षे बॅंक अकांउंटमध्ये साचून राहिलेला पैसा कोणता रोजगार निर्माण करत असतो? हाच खर्च जर त्यांनी वेळोवेळीच मोठे घर, पर्यटन, गाडी, इत्यादिंसाठी खर्च केला असता तर त्याने रोजगार निर्माण झाला नसता का? आणि शेकडो किलो अन्नाची नासाडी, वराती , डोल्यांच्या निमित्ताने होणारी पैशांची उबगवाणी उधळण, अशा 'अनप्रॉडक्टिव्ह' रोजगारापेक्षा वधू/वरपित्यांना आपल्याच पैशाचा उपयोग 'आपले' आयुष्य थोडे जास्त जगण्याजोगे करणारा रोजगार निर्माण झालेला केव्हाही बरा नाही का?

छान लिहिलंय..
मला वाटतं यात जनरली एका व्यक्तीची हौस असते आणि बाकीचे खेचले जातात त्यात.
१. एका नातलगांचे व्याही राजकारण, समाजकारण यातील मोठं प्रस्थ. त्यामुळे त्यांच्या वर्तुळातील लोकांना त्यांना बोलवायचं होतं. सकाळी १००० , रात्री १००० + लोक. अर्धा अर्धा खर्च केला. ठाण्याच्या टिपटॉपमध्ये. जेवण भारी होतं ! मुलीकडच्यांना इतकं करायचं नव्हतं पण काय करणार!
२. एक मित्र कट्टर नास्तिक त्यामुळे त्याला घरी रजिस्टर लग्न उरकायचं होतं. पण मुलीच्या घरच्यांनी हट्ट धरला की आम्हाला थाटामाटात लग्न हवंय, सगळं आम्ही करतो , सर्व पैसा आम्ही खर्चतो तू फक्त लग्नाला उभा राहा. मुलगा नाईलाजाने तयार झाला.
३. एका मुलाचा ब्रेकअप झाला होता, त्याचवेळी नोकरीही गेली. नन्तर दुसरी नोकरी व दुसरी छोकरी मिळाली.त्यावेळी त्याने हट्टाने राजेशाही लग्न केले कारण काय तर म्हणे ज्यांनी ज्यांनी त्यावेळी माझी कुचेष्टा केली त्यांना दाखवून देईल आता माझं कसं उत्तम चाललं आहे!

हे हट्ट कमी होतील तेव्हा होतील, मुळात मुलीनी सांगायला हवं की एकटं राहावं लागलं तरी चालेल पण फालतू खर्च मी करणार नाही.

<<त्यासाठी वर्षानुवर्षे बॅंक अकांउंटमध्ये साचून राहिलेला पैसा कोणता रोजगार निर्माण करत असतो? >>
----- तोच पैसा बॅन्क लोकान्ना किव्वा सरकारी कामान्ना कर्ज देण्यासाठी वापरत असते ना? तो पैसा अर्थव्यावस्थेत गुन्तवला जातो, पर्यायाने रोजगार निर्माण होण्यास हातभार लागत असतोच.

<<हे हट्ट कमी होतील तेव्हा होतील, मुळात मुलीनी सांगायला हवं की एकटं राहावं लागलं तरी चालेल पण फालतू खर्च मी करणार नाही.>>
----- खर्च फालतू आहे हे ठरवण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असेल. मला ते आवश्यक वाटते तेच तुम्हाला तेव्हढे आवश्यक नाही वाटणार.

लग्न म्हटले म्हणजे तडजोड आलीच. तडजोड करायची तयारी नसेल तर दोन जिवान्ची (त्यान्च्या सोबत मुलान्ची) फरफट होते.

२. एक मित्र कट्टर नास्तिक त्यामुळे त्याला घरी रजिस्टर लग्न उरकायचं होतं.
>>>>>
ईथे नास्तिक असल्यामुळे हे लॉजिक चुकीचे आहे. नास्तिकता आणि हौसमौज यांचा आपसात संबंध नाही. तो मित्र नास्तिक असणे आणि त्याचा लग्नाच्या उधळपट्टीला विरोध असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

तोच पैसा बॅन्क लोकान्ना किव्वा सरकारी कामान्ना कर्ज देण्यासाठी वापरत असते ना? तो पैसा अर्थव्यावस्थेत गुन्तवला जातो, पर्यायाने रोजगार निर्माण होण्यास हातभार लागत असतोच>>>
ज्याच्या घामाचा पैसा त्याला त्याचा कितीसा फायदा होत असतो? पैशाचा चांगला विनिमय / वाईट विनिमय हा मुद्दा होता.

{{{अशा लग्नांमुळे रोजगार निर्माण होतो, अनेकांना पैसे मिळतात. चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी थाटामाटाची लग्नं उपयुक्त आहेत.
Submitted by चिनूक्स on 26 November, 2017 - 15:24 }}}

https://www.maayboli.com/node/1567

{{{ न्यायधीश आरोपिला :: तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ??




आरोपी :: साहेब,आज आमच्यामुळेच

पोलिसआणि कोर्टात हजारो लोकांना नोकर्या मिळाल्यात...

( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं)
न्यायधीश:: याला सोडून द्या रे...
नवीन Submitted by VB on 21 November, 2017 - 21:59 }}}

थाटामाटाची लग्ने करणे म्हणजे चोर्‍या करणे ही तुलना बघून माज्याबी डोल्यात पानी आलं बगा.....

--------------
(स्वगतः नाना, जळतात रं लोक, लोकांना कोणी आपलाच पैसा आपल्याच हौसेमौजेसाठी खर्च करतं तर ते बघून जळफळाट होतो रे... स्वतःच्या हौसेमौजेला पैसे नसतात म्हणून.... सामाजिक भान बिन सगळ्या ढोंगी गफ्फा... नाहीतर सगळे सामाजिक भानवाले गांधीसारखे एका कापडात फिरले असते आणि दही भात खाऊन एकभुक्त राहिले असते. एक विचारु का, हे लोक रग्गड खर्चाला नाकं मुरडतात तर कुणाच्या रग्गड कमाईलाही मुरडत असतील काय रे नाना? अरे पण हे कम्युनिस्टी लालविचार झाले की रे?)

ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी तो कसाही खर्च करावा; इतरांनी काही बोलायलाचे कारण नाही; बोलले तरी त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही पण

लग्नखर्च अर्धाअर्धा नव्हे तर ttmm व्हायला हवा.

हे हट्ट कमी होतील तेव्हा होतील, मुळात मुलीनी सांगायला हवं की एकटं राहावं लागलं तरी चालेल पण फालतू खर्च मी करणार नाही. >> आमच्या जवळच्या नात्यातील एका मुलीने नुकतंच लग्न मोडल. "आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात 25 लाख खर्च केलेत! तर तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नात 30 लाखतरी खर्च करायला हवा" असे मुलाची आई म्हणाली. रामराम ठोकला. आमच्या बाजूचे लग्नात फारच कमी लोक असणार होते.

ता.क. : मुलगा परराज्यातला, परजातीतला, परकॅटगरीतला होता.

बाकी, मी बेफींच्या मूळ मुद्द्यांशी पूर्ण सहमत आहे, दणदणीत खर्च असलेली लग्न बघून असे प्रश्न पडतात कि पुढचे आयुष्यतले सगळे दिवस याच उत्साहाने यांनी साजरे केले पाहिजेत, तर या सोहळ्याला काही अर्थ आहे. पण असं वाटण्याच्या मागेही आपणच कुठेतरी असूया बाळगून आहोत की काय हि शन्का उद्धभवते...

असो,

उगीच सरांना अनुमोदन म्हणून नव्हे पण तेच लिहायला आले होते. खूप लोकांना रोजगार मिळतो मोठ्या लग्नांमध्ये.
फार लहान पणी पुण्यात वराती निघायच्या तेव्हा ग्यासबत्ती डोक्यावर ठेवून वरातीच्या पुढे व बँड च्या कडेने उभे असलेले लोक बघितले आहेत काळवंडलेले थकलेले सुर कुतलेले चेहरे. डोक्यावर फक्त चुंबळ व ती ग्यास बत्ती, घामेजलेला चेहरा. सुरकुतलेले पाय. साधे कपडे. अ‍ॅज अपोज्ड टू फॅन्सी ड्रेसिंग ऑफ् वेडि ग गेस्ट्स. त्यांना फक्त हे कधी संपते आहे व रोजगार मिळून त्यापुढे घरी कधी जातो ही एकच चिंता मनात असणार. ही सत्तरच्या दशकातली कथा.

आता हॉटेले मॅरेज प्लान्गिग वाले, फूलवाले डेकोरेशन वाले केटरर्स, व इतर भरपूर प्रकारच्या लोकांना रोजगार मिलतो. लहंगा साडी भरून देणारे कला कार, दागिने बनव नारे तसेच त्या स्पेशल बांगड्या, मुंडावळ्या बनवणारे लोक
ताज्या फुलांचा सेहरा सुद्धा भारतातून दुबईला नेला जातो विमानाने.

शेफ्स मेंदीवाले फोटोग्राफर कार रेंटल इत्यादि.

आमच्या घरा समोरचा डबल फ्लॅट रिकामा आहे. तिथे आठ दिवस केटर ब्रेफा लंच डिनर सर्व्ह करत होता. लग्नाची पाहुणे मंड ळी खा लच्या मजल्यावर उतरली होती काल ते सर्व लोक म्हणजे केटरर चे, सामान पॅक करून घर बंद करून निघून गेले. असे अनंत प्रकारचे सर्विस प्रोवायडर असतात. पूर्वी हे गावकीत् ले लोक, बाया करत असत. आता
प्रोफेशनली होते इतकेच.

पण एक आहे जितका समारंभ ग्रेट व उत्साहित ़ करणारा तितके वैवा हिक जीवन असते का कोण जाणे. इट ऑल सीम्स लिटिल बोअरिंग टु मी. रोज नवरा तौलिया लाओ म्हणणार. बायको वैतागलेली मुले फ्रस्ट्रे टेड.

फिर इतका फिकिर काय को करनेका. उधर जाके विश करने का दावत का खाना खाके कट लेनेका बाकी वो लोग देख लेते.

ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी लग्नात वारेमाप खर्च केला तर काही हरकत नाही, पण लोक त्यांचे बघुन कर्ज काढून हे सगळे उद्योग करु पाहतात त्यांची मला तरी कीवच येते.
असे एक उदाहरण माझ्या जवळच्या मित्राचे आहे. आधीच ४५ लाखांचे होमलोन, त्यात लग्न कसे "ग्रँड" असायला पाहिजे म्हणून त्याच होमलोन वर १० लाखांचे टॉप अप लोन काढले. मस्तपैकी फॉरीनला हनीमुन केला. सहा महिन्यातच नवरा बायको विभक्त झाले. आता घटस्फोटाची केस चालली आहे. मुलीकडच्यांनी १५ लाख नुकसानभरपाई मागितली आहे, तडजोड करुन १० लाख पर्यंत होतील असा ह्या भाऊंचा होरा आहे. ही रक्कम द्यायला पण हातात काही शिल्लक नाही. पुन्हा लोन काढून १० लाख जमवेल. Sad
आयटीमध्ये १२-१३ वर्षे नोकरी असलेल्या (जी आता रिस्की पोझिशन असते) ह्या माणसाच्या डोक्यावर हा भलामोठ कर्जाचा डोंगर आणि हातात काही शिल्ल्क नाही. आईवडिलांनी जमवलेले सोने पण घटस्फोटित बायकोला स्त्रीधन म्हणून द्यावे लागणार आहे.
काय अर्थ आहे ह्या "ग्रँड" आणि "रॉयल" लग्नाला?

१५ लाख म्हणजे शेपटीवर निभावलंय तरी.
मी पाहिलेल्या एका केस मध्ये ही नुकसानभरपाई ९० लाखाचा फ्लॅट आहे.

ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी लग्नात वारेमाप खर्च केला तर काही हरकत नाही, पण लोक त्यांचे बघुन कर्ज काढून हे सगळे उद्योग करु पाहतात त्यांची मला तरी कीवच येते.>>> सहमत! अंथरूण पाहून पाय पसरावेत.

Pages