नुकतीच पाहिलेली काही लग्ने

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2017 - 11:32

नुकतीच चार लग्ने पाहिली. चारही लग्नांमध्ये जुन्या काळापासून चालत आलेल्या बहुतेक रुढी (वरमातेचे पाय धुणे वगैरे) एखाद्या उत्सवाप्रमाणे पाळल्या गेल्या. उत्सवाप्रमाणे म्हणजे असे की ज्या गोष्टीवरून पूर्वी रुसवे फुगवे होत असत (पायच धुतले नाहीत ह्यावरून मुलाकडच्यांनी रुसणे किंवा माझ्या आईला पाय धुवायला लावले ह्यावरून मुलीने रुसणे वगैरे) ती गोष्ट आता एक मजेशीर प्रथा म्हणून मोठ्या उत्साहाने पाळली जाते की काय असे वाटावे इतक्या थाटात साजरी करण्यात आली. ह्याशिवाय कार्यालयात येताना मुलाला फुलांच्या गालिच्यावरून चालत आणणे, त्याचे पहिले पाऊल पडताच मुलीकडच्यांनी टाळ्यांचा कडकडाट करणे, तुतार्‍या वाजणे, मुलीला डोलीत बसवून आणणे, मुहुर्ताची छापील वेळ अजिबात न पाळता केव्हाही लग्न लागणे वगैरे गोष्टीही पाहिल्या. मुहुर्ताच्या वेळेचे माझ्यामते महत्व इतकेच की निव्वळ अक्षता टाकायला म्हणून आलेल्यांचा जो खोळंबा होतो त्याची काही चिंताच नसणे हे घातक आहे. गुरुजींशिवाय उत्साही महिलांनी मंगलाष्टके म्हणणे हे खूप जुने झाले आहे पण तरीही तितकेच वैतागवाणे आहे. एक महत्वाचा भाग म्हणजे पैशाची अभूतपूर्व उधळपट्टी ह्या सर्व विवाह समारंभात प्रकर्षाने जाणवली.

अ‍ॅड सुप्रिया कोठारी म्हणून एक परिचित वकील आहेत त्यांनी एकदा सांगितले होते की आजच्या पिढीतील 'नवजात'पती-पत्नी हे विवाह टिकवण्याबाबत पूर्वीच्या पिढ्यांइतके गंभीर नसतात व त्याचे परिणाम सहजपणे दिसूनही येतात. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये 'विवाहसंस्थेबाबत'असलेले एक भय म्हणा किंवा तीवरील अवलंबित्व म्हणा किंवा विश्वास म्हणा, कशानेतरी लग्न टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले तरी केले जात असत. पण ह्या वकील बाईम्च्या मते आजकालच्या मुलामुलींचे प्री-मॅरेज काऊन्सेलिंग झालेले असूनही व घरातील वातावरण आणि संस्कार 'नॉर्मल'असूनही ह्यांची लग्ने टिकतील असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. अगदी लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी, इथपासून ते वर्ष दोन वर्षात विवाहबंधन झुगारून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिलेली आहेत. (तो त्यांच्या व्यवसायाचा एक भागही आहेच).

आता सुमारे वीस ते पंचवीस लाख खर्च, जुन्या प्रथांना अधिक उत्साहाने व कौतुकाने कवटाळणे, नवनव्या प्रथा आणणे आणि वधुवरांना वैवाहिक आयुष्य सुरू केल्यानंतर राहणीमान उंचावायला विशेष काही संघर्षच करावा लागणार नाही इतक्या भेटी वगैरे देणे हे सगळे झाल्यानंतर जर ते लग्न मोडले तर काय हशील?

लग्न व्यवस्थित राहिले तरी ह्या खर्चाबाबत वाढती बेफिकीरी येत आहेच.

एवढे करून आधीच्या पिढीच्या तुलनेत ह्या आत्ताच्या वधूवरांना वैवाहिक आयुष्य आरंभ केल्यानंतर खूप वेगळे कौटुंबिक वातावरण देऊ केले जाते असेही नव्हे! फार तर राहणीमानात फरक असेल, पण सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे घटक जे पारंपारीकरीत्या (बहुतेक वेळा) शत्रूपक्षात मोडतात ते सगळे तसेच्या तसे आजही आहेतच. त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या नुसत्या असण्यामुळे वाढणारा ताणतणाव, मानसिक समस्या, घुसमट, कुटुंबे विभक्त होत जाणे हे सगळे तसेच होत आहे. अवाढव्य खर्च करून एकच दिवस नाचण्याऐवजी तो पैसा घालून वधूवरांना स्वतंत्र राहण्यासाठी एखादे निवासस्थान बूक करून दिले तर बिचारे आनंदात तरी सोबतीचे आयुष्य सुरू करतील. शिवाय, मुलगी आपल्या क्षेत्रात भले डॉक्टर किंवा कोणीही मोठी पदस्थ असो, लग्नात ती शोभेची वस्तू आणि नजरा झेलत बसणारी बाहुलीच ठरते.

ह्याशिवाय एक वेगळेपण जाणवले ते असे! पूर्वीच्या लग्नांमध्ये फोटोग्राफर हा बर्‍यापैकी लक्झरीत मोडणारा आणि त्यामुळे थोडा अदब राखून वागणारा मनुष्य असे! आजकाल फोटोग्राफर्स हे गुरुजींच्या वरताण आवाजात बोलत सूचना देत असतात. प्रसंगी त्यांच्याकडून काही उपस्थितांचा नकळत अपमानही होतो. पण अत्युत्कृष्ट अल्बम असण्याला जे महत्व प्राप्त झालेले दिसते त्याच्यापुढे उपस्थितांची किंमतही घटत चालली आहे. बिदाई (!) सारख्या हळव्या प्रसंगीही फोटोग्राफर्स अत्यंत रुक्ष पद्धतीत सूचना देऊन त्या प्रसंगातील हवा काढून घेतात. आईच्या गळ्यात पडावे असे वाटणारी मुलगी तेव्हाही कसेबसे हसत असते.

फुलांच्या सजावटीवर झालेला खर्च असाच अमाप असतो. बुफे पद्धतीने अन्न ठेवण्यामुळे ते वाया जात नाही असे काहीच नाही. परत कोण रांगेत येणार किंवा 'काय माहीत आपण कदाचित तीन वडे खाऊही'असे वाटल्यामुळे अनेकदा जास्तच वाढून घेतले जाते. वाया गेलेले अन्न आणि पाच-पाचशेच्या घरात असलेली एक प्लेट ही भव्य उधळण पाहून डोळे दिपतात.

पूर्वीपेक्षा स्वच्छता वाढलेली आहे, सोयी वाढल्या आहेत आणि एवढ्या-तेवढ्यावरून कांगावा करणे घटले आहे हे सोडले तर आजकालचे विवाह सोहळे म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन, निव्वळ नावासाठी केलेला अनाठायी खर्च आणि कोणत्याही मूर्ख प्रथेपासून सुटका न झालेला असा सोहळा ठरतो.

हे सगळे खूप चुकीचे चाललेले आहे असे फार वाटत राहते. पै पै साठवून आणि कर्ज काढून घेतलेल्या टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तू आठवू लागतात. आपल्यापेक्षा नवीन पिढीला सगळे आधीच किंवा त्वरीत मिळते ह्याचा हा मत्सर नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील छोटे छोटे आनंदच काढून घेण्याचा हा प्रकार वाटतो. त्यातल्यात्यात एक बाब जरा बरी वाटते की झालेल्या बर्‍यापैकी जागृतीमुळे म्हणा किंवा कशाहीमुळे असेल पण मुलाकडचे लोक अगदी पूर्वीच्यांइतका आडमुठेपणा करताना आढळत नाहीत. बर्‍यापैकी समजदार आहेत असे दिसते. तसेच, हल्ली खर्च अर्धा अर्धा विभागण्याचे प्रमाणही बर्‍यापैकी आहे / असावे.

पण तरीही केली जाणारी उधळपट्टी, वधूवरांच्या आयुष्यातील लहान लहान आनंद हिरावून घेऊन त्यांना एकदम उत्तम राहणीमान देऊ करणे, जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे हे सगळे अचाट आहे.

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण हौशीने लग्न करणे ही सगळ्यांचीच इच्छा असते. खुद्द मुलगी, तिची आई व आज्जी ...यांची तरी ! मग प्रसंगी याच्या त्याच्या कडून (मुख्यतः मामा कडून -आडून आडून व कधी उघड पणे - पैसे मागितले जातात..त्यावरुन मानपान, रुसवे इ इ)
मग मोठ्या प्रमाणात उधळपट्टी, दिखावा, भारी भारी कपडेपट -साड्या- ज्या कधीच पुन्हा नेसल्या जाणार नाहीयेत, पोषाख व तर्‍हेतर्‍हेचे ड्रेसेस. दागिने...यांचे प्रदर्शन असते. मग मेन्यू, अनेकविध 'स्टॉल्स' असणारा भव्य बफे, फुलं, सेट्स, महागडे परफ्यूम्स, कारंजी- फवारे, मेक अप्स, कृत्रिम हास्य व खुशी चे प्रदर्शन......करु तितकी सोंगं कमी!
आणी हे सगळं करुन...पुन्हा थोडं नमतं घेण्याची, संसार सावरुन तो न तोडण्याची अशी कुणाची काहीही मानसिकता नाही. हे सगळं अतर्क्य आहे.

एका आणि एका शब्दाशी सहमत आहे बेफी. अगदी माझ्याच मनातले विचार तुम्ही इथे मांडले आहेत. तुम्ही मांडलेल्या गोष्टींव्यतिरिक्त आजकाल मेहेंदी फन्क्शन पण आपल्यात धामधुमित साजरे केले जाते. वेडिंग सॉन्ग्ज प्ले केली जातात. मग त्यावर नवथर तर नाचतातच पण म्हातारे कोतारे ही हौस म्हणून नाचतात आणि (इतकं वय असलं तरी हौस आहे हो) म्हणत त्यांचे ही कौतुक होते. वारेमाप पैसे म्हणजे मेंदी काढताना वेगळा पेहेराव, हळद, घरातल्या लग्नापुर्वीच्या काही पूजा अर्चा, विधिला वेगळी, रिसेप्शन ला वेगळी, केक कापताना वेगळी... इ. इ.
आजकाल लग्न एकदाच होते, आहे आमच्याकडे पैसा तर का करू नये आम्ही हौस मौज? आम्हाला एकुलता एकच मुलगा आहे/मुलगि आहे तर कशाला थोडक्यात आवरू?
केळवणाचे तर विचारूच नये. पुर्वी लग्न सोहळा हा नातेवाईकांनी एकत्र येऊन, एकत्र वेळ घालवून तो पार पडावा असा एक अ‍ॅडिशनल हेतू असावा पण आजकाल तो स्टेटस चा एक भाग झाला आहे. परतीचे आहेर, दागिने, मेकप यावर पैसा, वेळ, शक्ती इतकी वापरली जाते की त्यात लग्न किम्वा त्याची पवित्रता हरवते कधी तेच कळत नाही.
प्रत्येक इव्हेन्ट्ला फोटो काढणे आणि सेल्फ्या घेणे इतके अनिवार्य झाले आहे की त्यात खरा आनंद लोप पावून 'उरलो फोटोपुरता' अशी त्या आनंदाची अवस्था झाली आहे.

जग पुढे चालले आहे, खूप व्यवस्था हाताच्या अंतरावर उपलब्ध झाल्या आहेत आणि पैसे ही खूप आहेत लोकांकडे सर्व मान्य आहे. पण दान जसे सत्पात्री असावे तसा खर्च पण योग्य ठिकाणी व्हावा असे मला ही वाटते.

वावे ची पोस्ट खूप आवडली. आणि सशल ची पण. कोकणस्थांना लोक नावं ठेवतात, खरंतर त्यांचा कल बर्‍यापैकी 'वाया न घालवण्याकडे' असतो पण लोक त्याला कंजूषपणा म्हणतात.

Enjoy while it lasts अशी मानसिकता होतं चाललेली आहे. ही मानसिकता बऱ्यापैकी भांडवलशाही व्यवस्थेचा परिणाम आहे. बाकी आता बायका शिकून-सवरून, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यात त्यामुळे इतकी वर्षे जे मन मारून संसार रेटले जात होते, ते आता होत नाही. त्याच्या लग्नाच्या खर्चाशी काही संबंध नाही. लग्नाचा खर्च मटेरिअल गोष्ट आहे. बायका कमावतात, आणि स्वतःला हवा तसा स्वतः:वर खर्च करुन एन्जॉय करतात. आता 5लाख रुपये लग्नावर घातले म्हणून पटत नसलं, मन:सताप देणाऱ्या नवऱ्याबरोबर संसार करायचा का! हे म्हणजे wasting good money after bad money Happy

मला काय म्हणायचे आहे ते कदाचित मला नीट लिहिता आलेले नाही. रेटलेला संसार म्हणजे यशस्वी आणि काडीमोड झाला म्हणजे संसारात नापास हे काही बरोबर नाही. त्याचा लग्नाच्या खर्चाशी आणि हौशीशी तर त्याहून संबंध नाही. लग्न समारंभ एक दिवसाचा आणि संसार आयुष्यभर.

पूर्ण लेख पटला.
आंबट गोड ,दक्षिणा यांचे प्रतिसाद आवडले.

छान लिहिले आहे बेफी, नेहमी प्रमाणेच Happy
वर राहुल१२३ ह्यांनी एक मुद्दा लिहिला आहे... ते तुम्ही पाहिले नाही का ? प्रि वेडींग फोटोशुट !!!!!!!!
नाही म्हणजे करा ना खर्च..लग्न का पुन्हा पुन्हा होते ?? वगैरे वगैरे ठीक आहे, पण पब्लिक सध्या पार गंडलय ह्या प्रकारात.
आमच्या हापिसातील जवळपास ५-१० जोडप्यांनी हे प्रकरण करुन घेतले आहे. मुळात आपण त्या फिल्मी हिरोंसारखे किंवा हिरवणींसारखे झाडाच्या मागे मागे धावून गाणी म्हणू शकत नाही, कुणी यश चोप्रा किंवा करण जोहर इ. मंडळी आपल्याला नेत्रसुखद आणि प्रचंड महाग लोकेशन्स वर घेउन जाउ शकत नाही, किंवा पंढरी दादा जुकरांसारखा श्रेष्ठ रंगभूषाकार आपली थोबाडे रंगवून आपल्याला आकर्षक करु शकत नाही म्हणून पब्लिक पार चेकाळल्यासारखे सध्या ह्या प्रि वेडींग फोटोशुट च्या मागे लागले आहे, पार स्टुडीयो मधे तश्या लोकेशन्स चा सेट लावून, किंवा बागांमधे, तळयाकाठी, हाती गिटार वगैरे घेउन हे फोटो काढले जातात.
अती बोअरींग काम म्हणजे हे तयार झालेले अल्बम समक्ष पाहणे, मला तर प्रत्येक वेळी हे अल्बम पाहताना पु. लं. ची मी आणि माझा शत्रुपक्ष मधली वाक्य अन वाक्य आठवत होती...
वर लिहिले आहे ते खरे आहे, कोकणस्थांना लोकं नावे ठेवतात, पण अनावश्यक ठिकाणी पैसा कसा वाचवायचा आणि योग्य ठिकाणी च तो कसा खर्च करायचा हे त्यांच्या कडूनच शिकावे Wink

दुसर्‍यांच्या लग्नांचे अल्बम पहाणे आणि वरुन त्यात कुणी सांगत बसणे ही त्या पिंकीची मावस सासू, आणि हा तिच्या नवर्‍याचा बॉस आणि ती मोरपंखी ओढणीवाली तिची चुलत नणंद... महा महा बोअरींग! Sad

माझे लग्न हे नोंदणी पद्धतीने झाले. विधी व तत्सम प्रकाराला फाटा. फक्त छोटेसे स्नेहभोजन. आता मुलीच लग्न आहे परवा. ते पारंपारिक पद्धतीने आहे. माझ्यावेळी राहिलेली हौसमौज आता नातेवाईक इथे भागवून घेत आहेत नाकावर टिच्चून. आता माझे लग्न माझ्या विचारांनी झाले. मुलगी ही स्वतंत्र व्यक्ती आहे. तिचे लग्न तिच्या विचारांच्या पद्धतीने. लग्न हा तुमच्या एकट्याचा समारंभ नसतो. तो तुमच्या हितचिंतक नातेवाईक मित्र यांचाही सोहळा असतो त्यामुळे काही तडजोडी कराव्या लागतात.

नवीन येऊ घातलेला प्रकार म्हणजे sponsored wedding. फॅशन डिझायनर, ज्वेलर्स इ. ब्रॅंड्स तुम्हाला ' गिफ्ट्स' देणार आणि तुम्ही त्यांच्या ब्रॅंडची सोशल मिडियावर जाहिरात करायची तुमच्या लग्नाच्या फोटोंच्या वगैरे माध्यमातून! अर्थात त्यासाठी तुम्ही सोशल मिडियावर तेवढे प्रसिद्ध असला पाहिजेत.

जग पुढे चालले आहे, खूप व्यवस्था हाताच्या अंतरावर उपलब्ध झाल्या आहेत आणि पैसे ही खूप आहेत लोकांकडे सर्व मान्य आहे. पण दान जसे सत्पात्री असावे तसा खर्च पण योग्य ठिकाणी व्हावा असे मला ही वाटते.<<++१

चांगले निरीक्षण नोंदविले आहे.

मला स्वतः एवढा खर्च करायला आवडत नाही. पण लग्नाचा खर्च वगैरे हौसेचा भाग असतो. ते प्रत्येकाने आपापले ठरवावे असे मला वाटते. अर्थात एका बाजूवर संपूर्ण लग्नाचा आर्थिक बोझा टाकणे चूक आहे.

मनीमोहोर ह्यांचा प्रतिसाद पटला.

Social media ब्रँड प्रसिद्धी प्रकरण गेल्याच महिन्यात पहिल्यांदा बघितलं. दिवाळीत सहसा बहुतेक कंपन्यात social days असतात आणि त्या निमित्त fashion शो करुन कोणाला miss/mr beautiful / handsome असे awards देतात. एकीने असा अवॉर्डस जिंकल्यावर तिनी कुठून साडी आणि accessories घेतल्या होत्या त्यांना फोटो सकट tag केला आणि जाहिरात केली. त्या दुकानाच्या फेसबुक page our clothes are grand, isnt she beautiful असा पुर्ण locality ला टॅग, त्या market place ला टॅग, अँड what not. आता कोणी facebook वर नुसता इंदिरानगर सर्च केला तर तिचा फोटो येणार, नुस्ता टिप्पसंदरा सर्च केला तर तिचा फोटो :O

पण तरीही केली जाणारी उधळपट्टी, वधूवरांच्या आयुष्यातील लहान लहान आनंद हिरावून घेऊन त्यांना एकदम उत्तम राहणीमान देऊ करणे, जुनाट निरर्थक प्रथा उत्सवासारख्या पाळणे आणि एवढे करूनही वैवाहिक नाते भक्कम होईल ह्यासाठी वेगळे काहीच न केले जाणे हे सगळे अचाट आहे.>>>>>>

सहमत. पैशाच्या उधळपट्टीबद्दल काहीच बोलायचे नाहीय, मी त्याकडे उधळपट्टी म्हणून पाहत नाही तर त्या निमित्ताने कुजत पडलेला पैसा वापरला तरी जातो हेमावैम. कर्ज काढून कोणी करत असेल तर धन्य!!

पण एवढा खर्च करून जे नाते तयार केले जाते, त्या नात्याच्या जोपासनेचा, वृद्धीचा विचार केला जात नाही, ना आधी ना नंतर. लग्नानंतर काही दिवसातच एकमेकांची उणीदुणी काढणारी माणसे बघितली की वरातीत इतक्या धुमधडाक्याने ही मंडळी नाचत होती ती आनंदाने की नाचायची हौस भागवायची होती म्हणून हा प्रश्न पडतो.

लग्नाआधी भावी सून गोरी व सुंदर हवीच म्हणून आग्रह धरणारी सासू नंतर 'इकडची काडी तिकडे करत नाही, तिचा गोरा रंग काय चाटायचाय काय?' म्हणते तेव्हा मला तरी फिसकन हसायला येते.

लग्न हे नाते, जे यशस्वी ठरो वा अयशस्वी, दोन्ही घटनांमध्ये संबंधितांवर दूरगामी परिणाम करते, ते आपण खूप उथळ, वरवरचा विचार करून जुळवतो. ज्या गोष्टी कायम टिकतात जसे गुण, स्वभाव यांना काडीचेही महत्व आपण देत नाही आणि रंग, रूप, पैसा, नोकरी यासारख्या अस्थिर, काळाबरोबर बदलणाऱ्या गोष्टींना अवाजवी महत्व देतो. धूमधडाक्यात फारसा विचार न करता नाते जुळवायचे आणि मग आयुष्य भर त्याचे ओझे वाहायचे. लोक कधी शहाणे होणार?

मुंज आत्ता नाही केली तरी लग्नाच्या आधी करावी लागेल. मग यथायोग्य वय असताना केली तर मुलांच्या मुंजीबरोबर आपली पण हौस होते> रजिस्टर लग्न केल तरिही? Happy

समजा एखाद्याचे वार्षिक उत्पन्न सहा लाख आहे. तो एखाद्याच्या लग्नावर झालेल्या दहा लाखाच्या खर्चाकडे पाहून म्हणतो काय ही उधळपट्टी. आमच्या लग्नात तर आम्ही चारच लाख खर्च केला. पण ज्याने दहा लाख खर्च केला त्याचे वार्षिक उत्पन्न पन्नास लाख असेल. तर मग दोघांत उधळपट्टी करणारा कोण?

हे एवढ्यासाठीच सांगितले की आपल्याला परवडत नाही तर लोकांना नावे ठेवा असाही प्रकार समाजात अस्तित्वात असतो.

तसेच हुमायुन नेचरचा विचार करता जो आपल्यापेक्षा जास्त खर्च करतो तो उधळ्या आणि जो आपल्यापेक्षा कमी खर्च करतो तो कंजूष. हे एवढे सिंपल असते.

असो!
कर्जावरून आठवले,
आमच्या कंपनीमध्ये लग्नासाठी झिरो परसेण्टने कर्ज मिळते. चार महिन्यांची ग्रॉस सॅलरी. म्हणजे माझा पगार लाखभर असेल तर मला पाच लाखाचे कर्ज झिरो ईंटरेस्टने मिळणार जे चार वर्षात फेडायचे. मधल्या काळात जॉब सोडला तर एकरकमी फेडायचे. झिरो परसेंट ईण्टरेस्ट याचाच अर्थ गरज असो वा नसो कर्ज घ्या. जे रजिस्टर लग्न करतात ते देखील एक खोटी पत्रिका छापून या योजनेचा फायदा उचलतात.

ज्या गोष्टी कायम टिकतात जसे गुण, स्वभाव यांना काडीचेही महत्व आपण देत नाही आणि रंग, रूप, पैसा, नोकरी यासारख्या अस्थिर, काळाबरोबर बदलणाऱ्या गोष्टींना अवाजवी महत्व देतो. >> इतरांचे गुण, स्वभाव खरेच कळू शकतात का? आणि समजा जरी कळाले तरी तेपण अस्थिरच असतात, काळाबरोबर बदलत राहतात.

===
आपल्याला परवडत नाही तर लोकांना नावे ठेवा असाही प्रकार समाजात अस्तित्वात असतो. >> +७८६ Wink

इतरांचे गुण, स्वभाव खरेच कळू शकतात का? आणि समजा जरी कळाले तरी तेपण अस्थिरच असतात, काळाबरोबर बदलत राहतात.---- अनुमोदन

रजिस्टर लग्न केल तरिही? ---मुलीकडच्याच मत असू शकत मुंज झालेली पाहिजे Happy

बाकी माझ्या पाहण्यात एक उदाहरण आहे जिथे आईवडिलांचा काडीमोड झाला होता. धाकटा मुलगा आईबरोबर. तिथे त्या मुलाची मुंज काही केली नव्हती. लग्न नोंदणी पद्धतीने. तिथे बहुतेक मुलाची लग्नाआधी मुंज, ग्रहमक असे काही प्रकार नव्हते.
नवऱ्याच्या एका माजी बॉसचे वडील कम्युनिस्ट झाले होते मुलं लहान असताना. मुलांच्या मुंजी काही झाल्या नव्हत्या. प्रेमविवाह होता आई-वडिलांच्या परवानगीने आंतरभाषिक. मुलीचे वडील म्हणे मुंज झाली नसेल तर काही लग्न-बिग्न होणार नाही. गुपचूप चार दिवस आधी मुंज केली Happy

इतरांचे गुण, स्वभाव खरेच कळू शकतात का? आणि समजा जरी कळाले तरी तेपण अस्थिरच असतात, काळाबरोबर बदलत राहतात
>>>>>

सहमत आहे.
आणि ते कळण्यासाठी लग्नाच्या बंधनात अडकण्याआधी काही काळ एकत्र राहणे गरजेचे. नुसते स्वभाव गुण दोष बघण्याऐवजी दोघांतील केमिस्ट्री किती जुळते हे बघणे जास्त गरजेचे. पण आपल्याकडे वर्षानुवर्षे अरेंज मॅरेज करत आलेत आणि मग पटो न पटो नाईलाजाने रेटत आलेत. सध्याची पिढी मात्र या बाबतीत नशीबवान आहे.

 ते कळण्यासाठी लग्नाच्या बंधनात अडकण्याआधी काही काळ एकत्र राहणे गरजेचे. ----तरीही स्वभाव कळतीलच असं नाही. कारण स्वभाव पण कालानुरूप, परिस्थितीनुसार बदलतात. दोघांकडे समजूतदारपणा असला तरी पुरतो.
लिव्ह-इन साठी पाहिजे तर वेगळा धागा काढा. इथे फक्त लग्नाची, related धार्मिक विधींची, आपल्या- लोकांच्या हौशीची आणि त्याच्या खर्चाची आणि त्याच्या फायद्या-तोट्याची चर्चा करू.

मग पटो न पटो नाईलाजाने रेटत आलेत. >> स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्याने बरीच लग्न टिकून राहायची.

===
तरीही स्वभाव कळतीलच असं नाही. कारण स्वभाव पण कालानुरूप, परिस्थितीनुसार बदलतात. दोघांकडे समजूतदारपणा असला तरी पुरतो. >> समजूतदारपणादेखील बदलतो Lol

खरंतर कशाचीच खात्री देत येत नाही. त्यामुळे हुशार लोकांनी यापुढे मूल जन्माला घालणे आणि एकत्र वाढवणे एवढयापूरतीच contract करावीत.

मला स्व्तःला माझं लग्न झालं तेव्हा जवळ भरपूर पैसे असते तरी प्रि वेडिंग फोटो शूट(व्हिडिओ),डोलीतून मुलगी,ऑर्किड च्या डेकोरेशन आणि कमानींवर केलेला प्रचंड खर्च यापेक्षा पैसे सेव्हिंग ला ठेवायला आवडले असते.अर्थात स्वतःचे पैसे कुठे कसे वापरावे हा ज्याचा त्याचा चॉइस.प्रि वेडिंग फोटो बघायला मस्त वाटतं.(प्रि वेडींग व्हिडिओ बोअर होतात.)

पण याची दुसरी बाजू:
पूर्वीच्या काळी 'कोण मोठी खोली घेणार','आम्ची सोसायटीची माणसं आली तेव्हा तुमची महत्वाची माणसं स्वागताला दरवाज्यावर नव्हती''आम्हाला जाताना लाडू चिवडा मिळालाच नाही' अशी नावं ठेवणारी माणसं(यात समानता असते.वधू वर दोन्ही पक्षाचे कटकटे नातेवाईक हातभार लावतात), मुलीच्या जाण्याचं दु:ख करण्या इतकाही वेळ नसलेली आहेर उपसून आणि देणी घेणी करुन मागच्या खोलीत दमून गेलेली वधुमाय्,एकमेकांच्या मंगलाष्टकाला नावं ठेवणार्‍या अपोझिट पार्टी, या सगळ्यात प्रचंड हैराण आणी स्ट्रेस्ड नवरा बायको यापेक्षा आताची फेसबुक आणि पिक्चर परफेक्ट, बर्‍याच इव्हेंट आउटसोर्स केलेली लग्नं छान वाटतात.

गेल्या ४ वर्षात(फेसबुक आणि प्रि फोटो शुट पोप्युलर झाल्यापासून) बरीच छान मॅनेज केलेली लग्नं, बारशी,डोहाळेजेवणं पाहून मनातल्या मनात 'आता पैसे आणि डिसिजन पॉवर आहेत तर परत या गोष्टि आपल्या मनासरख्या कराव्या का' असा विचार मनात एका सॅड सुस्कार्‍यासह येतोच.

'आता पैसे आणि डिसिजन पॉवर आहेत तर परत या गोष्टि आपल्या मनासरख्या कराव्या का' असा विचार मनात एका सॅड सुस्कार्‍यासह येतोच. ---+1 पण ते वय आणि त्या भावना कुठून आणणार Happy

म्हणून माझा जे काय कौटुंबिक विधी , समारंभ असतात, ते साजरे करण्याकडे कल असतो. कपडे, दागिने, मेनू, रिटर्न गिफ्ट, कार्यालय ह्या सगळ्यात माझ्या म्हणण्याला वजन असतं Happy

बेफि जी ;
मनुष्याची सगळी धडपड आनन्दी हो ण्यासाठी असते. तो आनन्द आपापल्या पद्धतीने व्यक्त करण्याची प्रत्येकाला मुभा आहे.
तुम्ही स्वतहाच म्हणताय कि चुकीच्या रूढी लोकानी टाळल्या आहेत; तर मग आनन्द आणि सोह ळा साजरा कर।याला विरोध का असावा हे कळत नाही.
आनन्दी राहणे आणि तो भरपूर रसरसलेपणाने व्यक्त करणे हा जणू गुन्हा असल्यासारखे तुम्ही बोलताय !!
उलट तुम्हीही आनन्द घ्या.... नाहीतर नुकसान तुमचे आहे.
"अनाठाइ खर्च " हा विचार द्रुष्टीकोन सापेक्ष आहे. उलट मला तर वाटते की आपल्याजवळ असलेला पैसा वापरून आपल्या आनन्दात लोकाना समाविष्ट करून घेण्याची आताची समाजात दिसणारी व्रुत्ती ही स्वागतार्ह आहे!

इतरांचे गुण, स्वभाव खरेच कळू शकतात का? आणि समजा जरी कळाले तरी तेपण अस्थिरच असतात, काळाबरोबर बदलत राहतात.>>>>>

खूप मुली केवळ रंगाने काळ्या आहेत, रूपाने डाव्या आहेत म्हणून लग्नाच्या बाजारात मागे पडतात. दुर्दैवाने माझ्या ओळखीत अशा मुली आहेत ज्या लग्नाची वाट पाहताहेत, त्यांचे वागणे कसे आहे हे सगळ्यांना दिसतेय पण (लग्नबाजारच्या दृष्टीने) त्यांच्या रुपात खोट असल्याने कोणीही नातलग त्यांच्यासाठी स्थळे सुचवत नाहीय न कोणी लग्नासाठी स्वतः पुढे येतोय . लग्न हीच इतिकर्तव्यता मानावी का हा वेगळा प्रश्न आहे पण ज्यांना करायचे आहेच त्यांना मार्गात पैसे व रूप आडवे येते त्याचे काय? लग्नाआधी गुणांना काहीही मोल नाहीय, रूपावर सगळे भाळतात. लग्न झाले की रूप नकोसे होते आणि गुण हवेसे वाटतात. हा विरोधाभास का? तुम्ही आधीच ठरवा ना काय हवे ते. याचा अर्थ रूपवान लोक गुणवान नाही असे नाही. पण तुम्ही जर रुपाचीच अपेक्षा प्रमुख अपेक्षेत ठेवता तर नंतर त्यात बदल करू नका. आपल्याकडे लोक आपल्या सोयीने कोलांट्या उड्या मारत राहतात.

बाकी गुण, स्वभाव हे कळण्यासाठी त्या माणसाबरोबर काही काळ घालवावा लागतो, जे आपल्या सध्याच्या सामाजिक सेटअप मध्ये कठीण आहे. या संदर्भात चि व चिसौका चित्रपटात जी कल्पना मांडलीय ती मला या खूप आवडली.

'आम्हाला जाताना लाडू चिवडा मिळालाच नाही' >>> अशी पुर्वीच्या प्रत्येक लग्नात पदधत होती का ??? लाडु चिवडा ची पाकिटे देणे.म्हणजे आधी लोक लांब गावांवरुन यायची म्हणुन ते जाताना पोटाला आधार म्हणुन अशी पाकिट द्यायची की एक पदधतच आहे ???
पण ते वय आणि त्या भावना कुठून आणणार>>>> +१
आपल्याला परवडत नाही तर लोकांना नावे ठेवा असाही प्रकार समाजात अस्तित्वात असतो. >> +१००

वधुवरांना वैवाहिक आयुष्य सुरू केल्यानंतर राहणीमान उंचावायला विशेष काही संघर्षच करावा लागणार नाही इतक्या भेटी वगैरे देणे हे सगळे झाल्यानंतर जर ते लग्न मोडले तर काय हशील? >>> मला वाटत ,आताच्या पिढीतल्य लोकावर ही वेळ आली तरी त्यांचा रोखठोक व्यवहार पण होत असेल कुठल्या गोष्टीचे काय करायचे ते ??? आधीच्या काळी लोकांमधे जे बैठक नामक गोष्ट होऊन काडीमोड व्ह्यायचे, ते आता नवरा-बायको स्वतःच ठरवतात.वाटणी, वसुली कशी करायची.
जास्तीत जास्त लोक लग्नांला बोलावु नका.कोनाला नीट भेटता येत नाही.ह्या म्हणन्ञावर आम्ही इतक्या इतक्या लोकांची लग्न जेवलो आहोत, आमच्या घरातल्या पहिल्या लग्नाला सगळ्यांना बोलावलच पाहिजे.असा पण एक विचार माझ्या वडिल पिढीचा आहे.त्यामधे आम्ही एवढ्या लोकांना बोलावल ,जेवु घातल ह्यापेक्षाही कुठल्या ना कुठल्या कारणाने आयुष्यात तयार झालेल्या नांत्याना आपुलकीने आपल्या कार्यक्रमात बोलवाव हा पण एक हेतु असतो.

आम्ही इतक्या इतक्या लोकांची लग्न जेवलो आहोत, आमच्या घरातल्या पहिल्या लग्नाला सगळ्यांना बोलावलच पाहिजे.
>>
याबरोबर आम्ही इतक्या लोकांना आहेर दिलाय, तो आमच्या एकुलत्या एक मुलाच्या/मुलीच्या लग्नातच लोक परत करणार ना? या उद्देशाने "आहेर आणू नका" ही एक ओळ पत्रिकेवर छापू न देणारी लोक आहेत.

बरेच तरुण आधीच होमलोनच्या ओझ्याखाली दबलेले असतात, त्यात निव्वळ समाजातील स्टेटस जपण्यासाठी अजुन टॉप अप लोन काढून असा अमाप खर्च केला जातो.
<<

थोडे थांबा. तुमच्या मुलांच्या काळापर्यंत यात एज्युकेशन लोनची भरभक्कम भर पडलेली असेल.

मग "आहेर आणू नका" ऐवजी ओळखीपाळखीच्यांना कुणी काय गिफ्ट आणायचं ते ठरवून देऊन लग्न करायची पद्धत येईल. Wink

मग "आहेर आणू नका" ऐवजी ओळखीपाळखीच्यांना कुणी काय गिफ्ट आणायचं ते ठरवून देऊन लग्न करायची पद्धत येईल.>>>>
खेड्यापाड्यांनी गरीब घरची लग्न पार पाडताना खुप आधीपासून ही ठरवून वस्तू देण्याची रित प्रचलित आहे. फक्त 'गिफ्ट' ऐवजी संसार करण्यासाठीच्या आवश्यक वस्तू दिल्या जातात! कित्येक संसार असेच ऊभे होतात.

ओळखीपाळखीच्यांना कुणी काय गिफ्ट आणायचं ते ठरवून देऊन लग्न करायची पद्धत येईल. >>> आहे ही पध्दत. मावशी तु मला वॉशिंग मशीन दे. काका मास्टर बेड दे, दुसरी मावशी कपाट दे, आत्या फ्रीज दे अशी देणार्याची ऐपत बघुन मागणी करतात.

Pages