आम्ही दोघी ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 November, 2017 - 13:50

स्फूट - आम्ही दोघी

माझ्या अगदी समोरच्या घरात
अम्माचा कुंटणखाना !

लालभडक पिचकाऱ्या मारणारी
पन्नाशीची, भरल्या अंगाची अम्मा !
दिवसभर नातवान्मागे फिरणारी

गोरी-गोमटी नाजूक सून
घरकामात व्यग्र !

तरणाबांड राजबिंडा मुलगा
गिऱ्हाईकांच्या उस्तवारीत मग्न !

चार पाच वेश्या
पोरासोरांसोबत तिथेच रमणाऱ्या
गिऱ्हाईक सांभाळणाऱ्या

मी ..

नवऱ्याचा डबा करून देवून
मुलाला सांभाळत त्याची वाट पाहणारी !

कुंपणापलिकडचे आम्ही
कुतुहलाचा विषय असू परस्परांचा

तिचा नवरा कुठेच न जाणारा
माझा नवरा दमून भागून उशिरा घरी येणारा ...!

परिस्थितीचा केवढा हा विरोधाभास नाही ?

महत्वाचा विरोधाभास म्हणजे
तिचा नवरा माझ्याकडे
ढुंकूनही न बघणारा
आणि
माझा नवरा ..
तिने दटावून घरी परत पाठवलेला

मी गरतीची ती फिरतीची

आमच्यात साम्य एकच ...

दोघीही कमनशिबी !!!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users