मृगजळाचे चषक भरुनी

Submitted by अनन्त्_यात्री on 17 November, 2017 - 05:24

मुखवटे त्यांचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी
मात्र ते अपुलाच चेहेरा बघू न धजती दर्पणी !

मृगजळाचे चषक भरुनी पाजले त्यांनी तुला
स्वार्थ अन भोगात केवळ, पाय त्यांचा गुंतला

प्रेषितांचे पाय कसले? मातीची ती ढेकळे !
पूज्य ते बनले तुझ्या त्या आंधळ्या भक्ती मुळे !

अजुनी नाही वेळ गेली, सोड त्यांची संगत
सोड ते हतवीर्य जगणे, सोड उष्टी पंगत

आतला आवाज सांगे, ऐक त्याचे सांगणे,
“कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे”
"तूच धर्ता तूच कर्ता, दास्य श्वानाचे जिणे"

Group content visibility: 
Use group defaults

अर्रे व्वा! सुरेख अनंतजी!
अगदी अचूक टिपलेत भोंदूबाबा!
सदगुरु शब्दाला कलंक लावणार्या तथाकथित बाबा, महाराज, बापू, बुवा, मॉं,माता अशा भोंदूंनी जगात उच्छाद मांडला आहे. त्यांना समाजप्रबोधन करून मुळापासून उखडून टाकायलाच हवं.. महापुरुषांची लक्षणे एकदमच वेगळी असतात.

दत्तात्रयजी, प्रतिसादाबद्दल आभार!
दुसरी ओळ आपणास खटकली, पण माझ्या मते भोंदू लोकांचा निर्लज्ज सुखीपणा हा एक देखावाच असतो - (स्वतःचे दुकान अबाधित चालू राहावे म्हणून केलेला). मात्र स्वतःचे खरे रूप पहाण्याची ना त्यांची इच्छा असते ना धैर्य. त्या अर्थाने "अपुलाच चेहेरा बघू न धजती दर्पणी"असं लिहिलंय.

अर्रे व्वा! सुरेख अनंतजी!
अगदी अचूक टिपलेत भोंदूबाबा! >>>> +111

आतला आवाज सांगे, ऐक त्याचे सांगणे >>> याची कोणालाच इच्छा नाहीये हीच मोठी खंत आहे...

- धन्यवाद शशांकजी !
<<<याची कोणालाच इच्छा नाहीये हीच मोठी खंत आहे...>>> खरंय ! भोंदूंचा आवाजच इतका कानठळी असतो की त्यांच्या कह्यात गेलेल्यास आतला आवाज ऐकू येणेच बंद होतं

भोंदूंचा आवाजच इतका कानठळी असतो की त्यांच्या कह्यात गेलेल्यास आतला आवाज ऐकू येणेच बंद होतं >>>
आतल्या आवाजाकडे लक्ष दिले तर बाहेरची कानठळी आपोआप विरून जाईल.... Happy
गॉड फिअरिंग खूपच आहेत, गॉड लव्हिंग जवळजवळ नाहीतच... Happy

>>> गॉड फिअरिंग खूपच आहेत, गॉड लव्हिंग जवळजवळ नाहीतच... Happy>>> खरंय शशांकजी. भोंदू गॉडमेनचे उद्दिष्टच अंध भक्तांना गॉड फिअरिंग बनवणं आणि त्यांची ती अवस्था कायम ठेवणं असतं .