ग्राहकहिताय...

Submitted by झुलेलाल on 15 November, 2017 - 06:53

ग्राहक म्हणून आपल्याला असलेल्या हक्कांविषयी आपण जागरूक होत आहोत. बाजारातून खरेदी करावयाच्या प्रत्येक वस्तूचे पॅकिंग, ब्रॅंड, उत्पादनाची व एक्स्पायरीची तारीख हे सारे आपण सजगपणे तपासून घेत असतो. विशेषत:, खाद्यपदार्थांच्या बाबतीत ही काळजी घेणे आवश्यकही असते. खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर या बाबींची नोंद असणे बंधनकारकही असते. त्यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन कधीकधी बऱ्यापैकी जागरूकही दिसते. अधूनमधून धाडी घालणे, बेकायदा किंवा डुप्लिकेट पदार्थ जप्त करणे, भेसळयुक्त उत्पादनांवर कारवाई करणे, वेष्टनावर तपशील नसल्यास संबंधित उत्पादन बाजारातून मागे घेणे आदींबाबत हे प्रशासन कधीकधी हातपाय हलविताना दिसते.
तरीही, बनावट, भेसळयुक्त, बेकायदा उत्पादनांचा सुळसुळाट बाजारात दिसतोच. त्याचे कारण काय, प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही किंवा काय कारवाई करते हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. टिकाऊ पॅकमधील दूध दीर्घकाल टिकून रहावे म्हणून त्यावर जी प्रक्रिया केली जाते त्यामध्ये काहीजण, मृतदेह टिकवण्यासाठी वापरायच्या रसायनाचा वापर करतात असे मागे प्रशासनाच्या एका उच्च अधिकाऱ्यानेच सांगितल्यापासून, ‘दूध हे पूर्णान्न’ या संकल्पनेवरील माझा विश्वास पुरतां उडालेला आहे.
तरीही, प्रशासन (एफडीए) ही यंत्रणा आवश्यकच आहे!
पण कधीकधी प्रश्न पडतोच.
एवढा जागरूक ग्राहक, कार्यक्षम प्रशासन असतानाही, पाणीपुरीबाबत सारे गुंडाळण्याची मानसिकता कशी तयार होते?
पाणीपुरीच्या पॅकेटवर ब्रॅंड, मॅन्युफॅक्चरिंग व एक्स्पायरी डेट बॅच नंबर असा तपशील कधी कुणाच्या पाहण्यात आलाय का?
पाणीपुरीच्या स्टाॅलवर कधी हा जागरूक ग्राहक एवढ्या खोलात शिरतो का?
पाणीपुरीवरचे प्रेम हेच त्याचे कारण असले पाहिजे! मसालेदार, चटकदार पाण्याने ओथंबलेला तो गोळा तोंडात विरघळताना जी आत्मानंदी टाळी लागते, त्यापुढे हे सगळे प्रश्न फिझूल ठरतात!
... नाही का?
म्हणूनच, माणसाचे अफाट प्रेम लाभलेल्या या पदार्थाला कायद्याच्या कवेत घेण्यास प्रशासन फारसे उत्साही नसावे.
तुम्हाला काय वाटतं?

Group content visibility: 
Use group defaults

आपल्याकडे अगदी सगळे कायद्याचे सोपस्कार झालेल्या खाद्यपदार्थां बाबत ही मला कधी फार विश्वास वाटत नाही पण नाईलाज असतो .
पाणीपुरी , ओली भेळ हे पदार्थ मी अजून एकदा ही खाल्लेले नाहीयेत . माझ्या पुरता मी प्रश्न सोडवून टाकला आहे.

खालील विधाने पुराव्यानिशी आहेत का?
>>>
टिकाऊ पॅकमधील दूध दीर्घकाल टिकून रहावे म्हणून त्यावर जी प्रक्रिया केली जाते त्यामध्ये काहीजण, मृतदेह टिकवण्यासाठी वापरायच्या रसायनाचा वापर करतात असे मागे प्रशासनाच्या एका उच्च अधिकाऱ्यानेच सांगितल्यापासून,

पाणीपुरीच काय तर आपल्या पोटात जाणार्‍या कोणत्याही अन्नपदार्थाचा काहीही भरवंसा नाही हे अखंड सत्य आता ग्राहकांनी 'पचवले' पाहिजे.

खालील विधाने पुराव्यानिशी आहेत का?
नाहीत. एफडीए च्या एका तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्य माहितीवर ते विधान आधारित आहे.

लेखक महोदय, आपण ज्या ते मांडलंय त्यामुळे जो गैरसमज होत आहे त्याकडे आपले लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न आहे.

दोन मुद्दे आहेत.

हे खरे आहे की दूधामध्ये भेसळ म्हणून अस्वच्छ पाणी, युरिया, साबण इत्यादी मिश्रण करण्याचे प्रकार भारतात सर्रास होतात. पण त्याचप्रमाणे दुधाचे संकलन आणि वितरण ह्यात बहुतांश प्रमाणात पारदर्शकता आहे. गुरांचे दूध काढल्यापासून ते किती तासात प्रोसेस होऊन दुसर्‍या शहरातल्या विक्रेत्याच्या फ्रीज मध्ये पोचतं, ग्राहकाच्या घरी गॅसवर तापेल्यात तापत असतं ह्याची एक टाइमलाईन आपण इथे सांगावी अशी आपणांस विनम्र विनंती करत आहे.

आता दुसरा भाग. तुमच्या विधानाप्रमाणे 'टिकाऊ पॅक यातले दूध' हा शब्द आपण वापरला आहे. तुम्हाला टेट्रापॅक म्हणायचे असेल असे मला वाटते. तसेच "मृतदेह टिकवण्यासाठी वापरायच्या रसायनाचा वापर करतात" अस शब्द वापरले आहेत. माझ्यामते हा जाणूनबुजून सनसनाटी व दहशत पसरवण्याचा प्रकार वाटतो. जणू मृतदेहांपासून कसलेतरी रसायन काढून थेट दूधात टाकतात. तर सनसनाटी विधानांच्या प्रेमात पडून सामान्य अनभिज्ञ जनतेत भीती पसरवू नये असे मला वाटते.

१. ट्रेट्रा पॅक मध्ये असलेले दूध गेल्या सत्तर वर्षापासून जगात सर्वात सुरक्षित व शुद्ध समजले जाते. कारण ती बनवण्याची प्रोसेस. गुरांपासून मशिनने काढलेले दूध कुठलाही मानवी स्पर्श न होता प्रोसेसींग युनिटमध्ये जाते, तिथे ते दोन सेकंदासाठी उच्चतापमानावर तापवले जाते. जेणेकरुन त्यातले सर्व बॅक्टेरिया मरतील. त्यानंतर ते सहा लेयरच्या टेट्रापॅकमध्ये कुठल्याही हवेशिवाय बंद केले जाते. एकदा बंद झालेले हे दूध बाहेरच्या कुठल्याही फॉरेन बॉडीच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे खराब होत नाही. जेव्हाही पॅक उघडून ग्लासात ओताल तेव्हा ते तितकेच ताजे असते. त्यात कोणतेही प्रिजर्वेटीव वापरायची गरज नसते. तसेच एकदा पॅक उघडला की ते दूध दोन दिवसात खराब होतं.

२. मृतदेह टिकवण्यासाठी फार्मलडिहायड हे रसायन वापरले जाते. हे बॅक्टेरिया वाढण्यास अटकाव करणारे जहाल रसायन आहे व प्राशन केल्यास विषारीही आहे. ह्याचा आणि दूधाचा काय संबंध येऊ शकतो? तर प्रयोगशाळेत जे दूधावर प्रयोग केल्या जातात त्यात ते दूध टिकून राहावं म्हणून फार्मलिन (फार्मल्डिहायड) चा वापर होतो. १ लिटर दूधात १० एम एल फार्मलिन असेल तर ते दूध उघड्यावर बारा दिवस टिकतं. अगदी ०.१ एम एल फार्मलिन असलेलं दूध किमान तीन दिवस टिकतं. कोणतेही प्रिझर्वेटीव नसलेले, न तापवलेले धारोष्ण दूध हे उघड्यावर ठेवल्यास पाच तासात खराब होतं.

तर आता मुद्दा १ आणि २ ची सांगड घालायची तर टेट्रापॅकमध्ये सहा महिने दूध खराब न होता राहू शकतं, आणि फार्मलिनचा हाय डोज दिलेलं दूध बारा दिवसाच्या वर टिकत नाही ते आंबट होतं, तेव्हा टेट्रापॅकवाल्या दूधात फार्मलिन चा वापर शक्य नाही, कारण तो उपयोगीच नाही.

अन्नपदार्थात होणारी भेसळ व त्यातला भ्रष्टाचार अमान्य करण्याचा कोणताही दावा मी इथे करत नाही. पण आपण जे काही बोलतो ते सप्रमाण वैज्ञानिक पुराव्यांवर आधारलेले असावे असे वाटते, सांगोवांगीच्या गोष्टी, राजकारण-व्यावसायिक स्पर्धा यातून पेरल्या जाणार्‍या बातम्या, कोणा व्यक्तीच्या लूज स्टेटमेंट्स वर आधारून बायस्ड विधाने करणे योग्य नव्हे असे वाटते. शेवटी आपण ग्राहकहितासाठी बोलत आहात. ग्राहक हित म्हणजे ग्राहक घाबरवणे नव्हे तर त्याला शिक्षित करणे असते असे मला वाटते.

नानाकळा छान माहिती आणि पोस्ट.

ग्राहक हित म्हणजे ग्राहक घाबरवणे नव्हे तर त्याला शिक्षित करणे असते असे मला वाटते >> +१

अवांतर - लहानपणापासून थेंब थेंब प्यायलो तर विषही पचते. तसेच ठराविक भेसळयुक्त वा ठराविक हलक्या दर्जाचे खायची बॉडीला सवय लागली तर ते बॉडी पचवू शकते. अर्थात हा काही युनिवर्सल फंडा नाही जो प्रत्येक पदार्थाला लागू होईल. मात्र वडापाव किंवा पाणीपुरी बॉडीला पचत असेल तर खात जावी. सोबत बीएमसी नळाचे पाणी पित जावे. सध्याच्या काळात बॉडीने थोडफार ईकडचं तिकडचं पचवायची सवय ठेवायला हवी. सगळंच शुद्धतेचा हव्यास धरला तर कधीतरी नॉर्मल भेसळही विष बनत तुमचा जीव घेऊ शकते.

नानाकळा - टेट्रा पॅक मधलं दूध इतके दिवस टिकतं म्हणजे त्यात भरपूर प्रिजर्वेटिव्ह असले पाहिजेत असा माझा समज होता, ही तुम्ही वर दिलेली माहिती इन्टरेस्टिंग आहे.

नानाकळा, छान पोस्ट! टेट्रापॅकमधील दूध अतिशय कमी कालावधीसाठी उच्च तापमानाला तापवले जात असल्याने जीवनसत्वाचा र्‍हासही फार कमी होतो.

नानाकळा, तुमची माहिती नक्कीच उपयुक्त आहे. टेट्रापॅक
दुधावरील रासायनिक प्रक्रिया किंवा त्या संबंधीची
माहिती माझ्याकडे नाही व मला मिळालेल्या माहितीची मी शहानिश केलेली नाही. केवळ एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितल्यामुळ हे दूध वापरणे मी बंद केले, एवढ्याच व्यक्तिगत स्वरूपाच्या मुद्द्यापुरता तो विषय मी मांडला. ते पौष्टिक असेल तर मी माझे गैरसमज पुसून टाकून टेट्रापॅक दूध वापरेन. भीती पसरविण्याचा माझा हेतू नाही. उलट, या निमित्ताने माझी भीतीही दूर झाली याबद्दल धन्यवाद. मी शहानिशा केलेली नाही हे वरील प्रतिसादातही स्पष्ट केले होते. शेवटी या प्रश्नाकडे मीदेखील एक ग्राहक म्हणूनच पहातो. या उपयुक्त चर्चेमुळे माझ्यासह अनेकांच गैरसमज दूर होतील!

अरेवा छान!
चला, हे उत्तम झाले म्हणायचे.
धन्यवाद!

धन्यवाद
माझ्या वाचनात आलेला किंवा एखाद्या क्षेत्रातील माहीतगाराकडून कळलेला एखादा विचार पुढे सरकविताना, तो विचार पुरावा देऊन सिद्ध केलाच पाहिजे असा माझा आग्रह नसतो, जर पुरावा मी अनुभवला नसेल तर त्या विचाराशी मी सहमत असतोच असे नाही. त्यामुळे त्या संदर्भातील इतर सर्व विचारही मी स्वीकारतो.

>माझ्या वाचनात आलेला किंवा एखाद्या क्षेत्रातील माहीतगाराकडून कळलेला एखादा विचार पुढे सरकविताना, तो विचार पुरावा देऊन सिद्ध केलाच पाहिजे असा माझा आग्रह नसतो.
एक वरिष्ट वृत्त पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतोय. तो आग्रह एक पत्रकार म्हणून असावा असं नाही तुम्हाला वाटत? कमीत कमी तो पुरावा मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं? कारण तो विचार पुढे सरकवताना , तुमच्या व्यवसायामुळे इतरांपेक्षा अधिक लोकांपर्यंत तो पोहोचतो. नंतर जरी तुम्ही व्यक्तीशः त्याच्या विरूद्ध विचार स्विकारला, तरी मूळ चूकीच्या विचाराने काही जणांच्या मनात घर केलं असेल त्याचं काय? म्हणजे जो मूळ कोण माहितगार आहे हे तुम्ही सांगणार नाही, तुम्ही म्हणाल "मी तो भारवाही, मी फक्त दुसर्‍यांचं एकून सांगितलं" म्हणजे मूळ शोधून त्याचं खंडणही शक्य नाही आणि तुमच्या नकळत तुम्ही एक चुकीचा विचार पसरवला.

अगदी याच पानाचं पहा. हे पान कदाचित फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केलं जाईल. पण त्यावर खाली प्रतिसादात वेगळी माहीती आहे हे काहीजण कदाचित वाचणारही नाही. म्हणजे तुम्हाला विरोधी विचारांची जाणीव झाली असली तरी मूळ विधानाने जी हानी व्हायची ती होतच राहील.

मला मायबोलीवर आणि इतत्रही तुमचं लेखन आवडतं, आवर्जून वाचतो. तुमच्या व्यासंगाचा आदर आहे. पण ही वरची प्रतिक्रिया खूपच खटकली. तुम्ही पत्रकार आहात म्हणून जास्त खटकली.
माझी प्रतिक्रिया तुमच्या मूळ पाणिपुरीच्या मुद्द्यापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे विषयांतर झाले आहे त्या बद्दल क्षमा मागतो.

टेट्रापॅक मधील दुधात प्रिझर्वेटिव नसले तरी त्याबाबत एक महत्वाची माहिती ( संदर्भः https://www.quora.com/Why-does-milk-not-get-spoiled-for-90-days-when-sto...)
It is worthy of note, however, that there’s some serious science showing that ultra-pasteurized milk has already lost a significant amount of its nutritional value simply due to being ultra-pasteurized. Ultra-pasteurization affects milk in a variety of negative ways, including ripping apart some of of the proteins and burning some of the fats.