मिशन टेलरिंग

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 9 November, 2017 - 01:29

आमच्या गल्लीत केव्हा काय फॅड येईल सांगता येत नाही. अशीच एकदा क्रिकेटची रणधुमाळी आमच्या गल्लीत घुसली. टीव्हीवर टी20 चा वर्ल्डकप चालू होता, तो फिवर गल्लीकरांच्या अंगात भिनला, क्रिकेट खेळायला प्रत्येकाचे बाहु फुरफुरू लागले.
क्रिकेट खेळायचं म्हणजे आधी स्टेडियम पाहिजे. आमच्या घरासमोरच गांधीनगरातलं सगळ्यात मोठं ग्राउंड होतं... पाटोळेचं पटांगण. ही रिकामी जागा पाहून सफाई कामगारांनी तिथे आपलं बस्तान मांडलं होतं.
पण क्रिकेटच्या किड्यांपुढे त्यांची काय बिशाद. गल्लीतले सगळे चिल्लेपाल्ले, मोटे खोटे, दुंडे गुंडे गोळा झाले. त्यांची चाहूल लागताच आपल्याच मस्तीत पेंगत असलेली वराहझुंड पळून गेली. उरलेल्यांना टिप्या कुत्र्याने पळवलं. नंतर सर्वांनी एकजुटीनं अन मोठ्या प्रेमानं लेंडकांना हात घातला. गाजरगवताची हजामत सुरू झाली. पाहता पाहता ग्राउंड साफ होऊ लागलं. मोट्या उम्याच्या पोटावरचं ओझं पहिल्यांदाच थोडं हलताना दिसलं. रोहीत्याचा लंगडा पाय सरळ झाल्याचा मला भास झाला. नेहमी भांडणं करणारा मन्याचा बारीक गळा आज गप्प झाला होता. या मानवी सफाई कामगारांवर वाशा लक्ष ठेवून होता. काय उपटायचं, कसं उपटायचं, कुठं अन कसं टाकायचं याच्या सूचना तो देत होता. या बाबतीत तो बराच पारंगत होता.

दुपारपर्यंत सगळं काम संपलं, ग्राउंड सफाचाट झालं. सगळे गडी कधीच बाशिंग बांधून तयार होते. एका टीमचा कॅप्टन मी होतो अन दुसऱ्याचा होता मन्या. अर्धेअर्धे गडी वाटण्यात आले, खेळाचे नियम ठरले. डावीकडं टेलरच्या भिंतीला बॉल लागला की दोन रन, उजवीकडं ठगच्या पत्र्याच्या कंपाउंडला एक रन अन पत्र्याच्या भोकातून पलीकडं गेला की दोन रन. कुठंही मारा टेन्शन नाही, फक्त टेलरच्या टिनावर मारला की आउट.

नियम ठरले म्हटल्यावर लगेचच टॉस करण्यात आला. सोन्यानं एक सपाट दगड उचलला अन त्याच्या एका बाजूनं पचकन थुकलं. वल्ली का सुकी करण्यात आली. वल्ली पडताच मन्याच्या बाजूचे सगळे पोट्टे चड्डीफाड आवाजात चिल्लावले. त्यांची बॅटींग आली होती.
बस्स ! फटाफट स्टंप आले. एकदोन म्हणता म्हणता पाचसहा बारके मुतले. कडक जमीन मऊसूत झाली अन त्यात ठकाठक स्टंप ठोकण्यात आले.
खेळाला एकदाची सुरुवात झाली. ओपनिंग बॅट्समन मन्या उतरला. बॉलर म्हणून बुट्टा आन्या आला. रनअप घ्यायचा प्रश्नच नव्हता कारण बॉलरच्या जवळूनच सकल पापक्षलक नाली वाहत होती. त्यानं जागच्या जागी घोड्यासारख्या एकदोन उड्या मारल्या अन बॉल टाकला. जसा टाकला तसा तो मन्यानं उचलला. चेंडू गरगर गरगर गिरगिरत गाढवे साहेबाच्या गच्चीच्या दिशेनं गेला. पोरं बॉलच्या दिशेनं पाहणार त्याच्या आत, गेला त्याच्या डबल स्पीडनं बॉल वापस आला. कुठून आला, कोणं फेकला या भानगडीत कुणी पडलं नाही.

खेळाला पुन्हा सुरुवात झाली. बॅटींग साइडचे गडी मांड्या मारून बॅट्समनच्या बाजूच्या गटाराजवळ बसले होते. त्यांच्या चियरिंगनं खेळाला रंग चढत होता. बॉलवर बॉल पडत होते. काही बॅटनं टोलावले जात होते तर काही स्टंप उडवत होते. बॉलनं किपरपासून घटस्फोट घेतला होता, एकही बॉल त्याच्या हातात लागत नव्हता. बॉल नालीपलिकडच्या रस्त्यावर जाताच बारके पोरं आतंकवाद्यांना पकडायला पळावं तसे बॉलमागं पळत होते. काही बॉल बाउंड्रीपलीकडं जाणार असं वाटत असतानाच रस्त्यावरून पळणाऱ्या डुकराला अडायचे.
अशा पद्धतीनं गल्लीक्रिकेट ऊतरत्या उन्हाबरोबर अधिकाधिक रंगायला लागलं. चौक्याछक्यांची बौछार होत होती, एकेका रनासाठी पोट्टे गध्यासारखे दौडत होते. असं करता करता एक इनिंग संपली. बसलेले उठले अन उभे असलेले बसले. सगळ्यात पहिल्यांदा परागेचा संजा बॅटींगवर उतरला. त्यानं क्रिकेटसाठी स्पेशल हॅण्डग्लोज अन पॅड आणले होते, एमआरएसची बॅट होती. त्याचा चेला असलेला दिन्या बॉलिंगला उतरला. त्यानं हातातलं कडं मागं सारलं, फाटकं बनियन पॅंडीत खोचलं अन बॉल टाकणार तेवढ्यात... संजानं त्याला थांबवलं. तो चार पावलं समोर आला अन सचिन तेंडुलकरसारखी पिचची ठोकठाक केली, रस्त्यातलं लेंडूक बाजूला सारलं. नंतर स्टंपजवळ जाऊन धोनीसारखे हॅण्डग्लोज काढले अन पुन्हा घातले. शेवटी बॉल पडला अन… अन पहिल्याच बॉलात दांडी गुल. सगळेजण भयान खुश झाले. रस्त्यावरचे फिल्डर जोरात दौडत आले, खुशीनं एकमेकांच्या अंगाखांद्यावर खेळले.
संजाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तो एका रननं शतक हुकलं असा चेहरा करून गटाराजवळ बसला. त्याच्या जागी नवा गडी उतरला. बॉलरच्या डोळ्यांत अंगारे होते, बॅट्समनच्या हातात हॅंडल तुटलेली बॅट होती. साक्षीला सगळे गांधीनगरातले रिकामटेकडे लोक होते. हा हा म्हणता गल्लीक्रिकेटचा महासंग्राम रंगात आला. बॅटला बॉल भिडला. काही बॉल सीमेपार गेले, काही स्टंपचा वेध घेऊन गेले. सगळीकडं एकच रणधुमाळी माजली. खेळ रंगात आला, पोरासोरांचे आवाज आकाशाला भिडले, साऱ्या गांधीनगराला कुरुक्षेत्राचं स्वरूप आलं होतं. इथे कुणी मित्र नव्हता का भाऊ नव्हता. होता फक्त बॅट, बॉल अन बाउंड्रीलाइन जवळून वाहणारी नाली. बॅट्समन चुस्त होते, बॉलर मस्त होते, फिल्डर तंदुरुस्त होते. एकही बॉल त्यांच्या हातातून सुटत नव्हता, उड्या मारूमारू क्याचा घेतल्या जात होत्या. नालीत बॉल गेला की बिनधास्त हात भरवले जात होते. चुकून एखाद्यानं क्याच सोडली तर त्याच्या नावानं शिव्यांचा पाऊस पडत होता. बॉल कुठही गेला तरी चिंता नव्हती, कारण टीममधे बऱ्याच घरचे मेंबर होते. बघता बघता म्हणता बारा ओव्हरची मॅच अंतिम टप्प्यात येऊन पोहचली. ३ बॉल ८ रन. पुल्ला बॅटींगवर अन येडा विजा बॉलिंगवर. पुल्लानं शर्टाच्या बाह्या मागं घेतल्या, चड्डी वर ओढली, त्यावर करदोडा बसवला. येड्या विजानं बॉलची पप्पी घेतली अन खीखी खिंकाळत सनान वेगानं बॉल फेकला. पुल्लानं पाय फाकवले अन डोळे लावून बॅट घुमवली. बॉल भयान उंच उडला अन भिरभिर भिरभिर भिरभिरत टेलरच्या टिनावर जाऊन आदळला. पाठोपाठ पुल्लाची बॅट हातातून निसटली अन उडून जाऊन टेलरच्या अंगणात जाऊन पडली. क्षणभर काय झालं कुणाच्याच लक्षात आलं नाही. आलं तेव्हा बेधुंद झालेल्या सगळ्यांची नशा एका झटक्यात उतरली. सगळीकडं पिनड्रॉप सायलेंस. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच सगळे भूकंप झाल्यासारखे सैरावैरा पळू लागले. टिप्या कुत्रं कावरंबावरं झालं. मला थांबणं भाग होतं कारण बॅटबॉल माझे होते.

पाचव्या सेकंदाला टेलरिन अन झिप्री फरी शिव्यांचा वर्षाव त्यांच्या खोपटातून बाहेर पडल्या.
“कौन है रे वो सुवरा, चैनसे जीने भी नही देते”
“हरामके लौंडे, कौन है रे वो बैला” अशा शिव्यांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. ह्या दोघी रस्त्यावर यायच्या आत (मी सोडून) सगळे पोरं गायब झाले. क्रिकेटचा हैदोस संपून टेलरीनचा हैदोस सुरू झाला.
“खाला, आमचा बॉल गेला टीनके उप्पर. आणू क्या काढके ?” मी चेहऱ्यावर खोटंखोटं, राजकारणी हास्य आणत म्हणालो.
“बॉल नहीं बम आके गिरा”
“इत्तुसाक तर बॉल होता.”
“कायका इत्तुसाक ? पुरे घरमे मट्टी गिर गई. कित्ता बड़ा आवाज आया व मा.”
“द्या ना काकू. बॅटतर द्या.”
“कायकी बॅट ?” म्हातारी बॅट उचलत म्हणाली. घराच्या आतून टेलर अन त्याचा पोरगा हा तमाशा पाहत होते अन खी: खी: हसत होते.
“तुम्ही रोज इत्ता धिंगाना करते है, माझा अभ्यास होता नहीं, तब बोलता क्या मै ? मग एकदा माझा बॉल गया तर काय झालं.”
“बॉल कायका, बम गिरा बम. पुरे टिन हल रहे”
“दे दो न खाला”

पण बराचवेळ प्रयत्न करूनही बॅट अन बॉल परत मिळाले नाही. दोघीजणी घरात चालल्या गेल्या.

मी भयान चिडलो, लालेलाल झालो पण काही करू शकत नव्हतो. थोडावेळ मी तिथेच उभा होतो.

“बॉल मिल गया” टेलरीनचा नातू आमीर्या ओरडला, तो
टिनावर उभा होता, अन त्याच्या हातात माझा बॉल होता
मी लगेच संधी साधली “शाबास पिके, फेक बॉल खाली.”
पोरगं विचार करू लागलं
“फेक तुले चॉकलेट देतो” मी अजून आमिष दाखवलं. त्यांनं बॉल फेकायला हात वर उचलला. तेवढ्यात घराच्या आतून आयजानं बाहेर झेप घेतली
“उसकी तरफ नै, मेरी तरफ फेक” तो आपल्या चिरक्या आवाजात ओरडला
“इधर फेक, मी तुला गोट्या देतो”
“आमीर्या, उसका मत सून”
पोरानं बॉल बापाकडं फेकला. खाल्ल्या डल्ल्याला तो जागला होता.

झाल्या प्रकाराचा मी बदला काढणार होतो… पण योग्य वेळ आल्यावर.

“बस्स ! यावर एकच उपाय आहे – टेलरिंग… मिशन टेलरिंग.” बराचवेळ विचार करून मी एक जालीम उपाय शोधला होता. आमच्या घराच्या मागच्या बाजूनं गच्चीवर जायला पायऱ्या आहेत, त्या मागून फिरुन थेट पुढील बाजूनं येतात. या पायऱ्यांचा एक टप्पा चढला की समोर टेलरचं घर दिसतं. शिवाय इथे उभी असणारी व्यक्ती त्याच्या घरातून दिसू शकत नाही. या भौगोलिक रचनेचा मी फायदा करून घेणार होतो.
अखेर चढाईची रात्र उगवली. मी माझ्या घराच्या गडातून बाहेर आलो, सोबत दोनतीन मोठे दगड घेतले अन त्याच नियोजित पायऱ्यांच्या टोकावर जाऊन पोहोचलो. रात्रीचे साडेअकरा वाजले होते, आतापर्यंत आमची येडी गल्ली झोपी गेली होती. सगळं सुनसान होतं. मी बारीकसं हसलो. एक मध्यम आकाराचा दगड मी हाती उचलला. दोनचार वेळा हवेतच क्याच क्याच खेळून, उजवा हात कानाच्या मागे शक्य तेवढा ताणून जोSरात दगड भिरकावला. नेम तर आधीच घेतलेला होता.
‘धडाम्मS’
एक मोठा आवाज आला. मी पाठोपाठ अजून दोन दगड भिरकावले.
“”कौन है रे हरामजादो S आऊ क्या उधर ?” टेलरच्या घरातून आवाज आला. बुट्टा आयजा तणतणतच बाहेर आला. मी आतापर्यंत मागच्या बाजूनं पळत येऊन घरात पोहचलो होतो. माझा डोळा खिडकीच्या छिद्रावर टेकला होता. आमच्या आजानं ही मस्त व्यवस्था करून ठेवली होती. म्हणजे दगड मारायचा अन घरात येऊन बाहेर चाललेला लाइव्ह शो पहायचा. मी सध्या तेच करत होतो. आयजा अन त्याचा भाऊ बबल्या रस्त्यावर येऊन सगळीकडं शोधाशोध करत होते. त्यांना वाटलं की कुणीतरी रस्त्यावर येऊन दगड फेकला असेल.
“कहाँ गया क्या मालूम. एक बार मिलने तो दे… सामने तो आ बोलना.” असं आपल्या अत्यंत बेसुऱ्या आवाजात ओरडत आयजा निघून गेला. पाठोपाठ ढेरी खाजवत बबल्यापण गेला.

भांडण झाल्यानंतर सातआठ दिवसांनी मी दगड फेकले होते, मुद्दामच. कारण त्यामुळं कुणाला संशय येणार नव्हता अन हा किस्सा एवढ्यातच थांबणार नव्हता. दुसरा बॉंबगोळा रात्री एक वाजता पडला. दगड जरा जास्त मोठे होते. पण यावेळी फक्त घरातूनच ओरडायचा आवाज आला, बाहेर कुणी आलं नाही.

दूसरी रात्र उजाडली. दहा, अकरा वाजले, बारा वाजले. आज बारा वाजूनपण टेलरच्या घरातलं कुणी झोपलं नव्हतं, सगळे जागी होते. आवाज आल्याबरोबर ते चोराला पकडायला धावणार होते. सगळे दाराजवळ उभे होते. पायऱ्यांवर उभ्या उभ्या मला याचा अंदाज आला. मी मुखरी मुखरी हसलो. आज मी एकाच्या ऐवजी चारपाच दगड हातात घेऊन एकदमच टिनावर फेकले. फेकले न फेकले तोच सगळे धावत रस्त्यावर आले. “कौन है रे साल्ला ? आज नहीँ छोड़ता” असं म्हणत बबल्या अन आयजा अक्षरशः रस्त्यानं पळत सुटले. पण काहीच फायदा झाला नाही… होणार नव्हता. छिद्र्याला लागलेला माझा डोळा हा लाइव्ह शो पाहून आनंदानं चमकत होता.

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी ( म्हणजे आठ वाजता ) कसल्यातरी आवाजानं मला जाग आली.मी डोळे चोळत उठलो अन बाहेर येऊन उभा राहलो. समोर रस्त्यावर टेलर त्याचा पंचरंगी बनियन घालून उभा होता, बाजूला त्याचा बारदाणा घेर धरून उभा होता. सातआठ माणसं, बाया, चिल्लेपाल्ले, पोरं जमले होते. विषय एकच होता – टिनावरच्या दगडांचा. सगळेजण वेगवेगळे सल्ले देत होते. मीपण त्या चर्चेत सहभागी झालो. मले काही मालूमच नाही अशा अविर्भावात घटनेचा वृत्तंत विचारला. दोन दिवसांपासून त्या सगळ्यांची झोप उडली होती, भंभेरी उडली होती. एखादा माणूस गाडीवरून जात असला की गाडी थांबवून विचारायचा “काय झालं ?” अन गर्दीतला एखादा माणूस फीदीफीदी हसत उत्तर द्यायचा “फत्तर आये फत्तर… हत्ते बडे फत्तर.” असं सांगताना तो दोन्ही हात पसरवून आकार सांगायचा.

त्या रात्री बबल्या, वाशा, आयजा, मन्या यांनी मिळून रात्रभर पाळत ठेवल्या, चौघांनी चार गल्ल्यांत गाड्या फिरवल्या. मला ही गोष्ट समजली. मग मी आरामात झोपून राहलो आणि सकाळी साडेचार वाजता उठलो. रात्रभर ती चौकडी चारी गल्ल्या हिंडली. सकाळी केव्हातरी ते झोपले असतील. पण त्यांना झोपा लागायच्या आत मी जबरदस्त बॉंबवर्षाव केला. आजचे दगड खूपच मोठे होते. सगळी गल्ली दणाणून गेली. “अब क्या चौबीस घंटे पहारा करे” असंच आयजाला वाटत असणार. तो दिवस दिवसभर डोक्याला हात लावून बसू लागला. सगळे लोकं टेलरच्या फजितिवर हसून थकले.
अजून दोन दिवस दगड फेकून मी मिशन टेलरिंग थांबवलं. माझा धडा पूर्ण झाला होता. आता कोणाचाही बॉल टेलरच्या टिनावर गेला की कुणीच ओरडत नाही. कारण.. इतके तोफगोळे खाल्ल्यावर त्यांना बॉल चा आवाज सहाजिकच टिकलीच्या आवाजासारखा वाटायला लागला होता.

--------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिशन टेलरिंग आवडल. भन्नाट झाल आहे.
"आता कोणाचाही बॉल टेलरच्या टिनावर गेला की कुणीच ओरडत नाही. कारण.. इतके तोफगोळे खाल्ल्यावर त्यांना बॉल चा आवाज सहाजिकच टिकलीच्या आवाजासारखा वाटायला लागला होता". भारीच

भारी Lol

या शैलीतील येऊद्या आणखी लिखाण..

मजा आली वाचायला... Proud
<<<ओपनिंग बॅट्समन मन्या उतरला. >>> आणि <<<जसा टाकला तसा तो गण्यानं उचलला. >>> इथे तेवढी नावाची गडबड झालीये...

Pages