पुन्हा कसायाचे दार ....

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 09:39

पिढ्यापिढ्याची जागीरी, वारेमाप शेती-भाती
चारी दिशात दरारा, घर जपे नाती-गोती
काका-काकू, आत्या-मामा होत नावाजल कूळ
आत्ये-चुलत भावंड वाड्यावरी धुमाकूळ

माय गढे रांधण्यात बाप राबे शेताकडे
लाडा-कौतुकाची पोर गोतावळ्यामधे वाढे

डोळा लवता-लवता पोर उफाड्याची झाली
जशी पूनवेची कोर ऐन भरामंदी आली
तिचा रंग गोरापान जणू केवडा मातला
अंग-अंग भरलेल, उस आला कापणीला

पोर होती खालमानी तिला ओढ शिकायाची
कधी काका कधी मामा तिची तालिम घ्यायची

एकाएकी काय झाले कुणा काही आकळेना
पोर रोडावली पार ध्यान कुठशी लागेना
सगे सोयरे म्हणती हिला उजवून टाका
नको एवढ्यात नको होता पुऱूषांचा हेका

जाती बघून पावणे वाटे जुळे सोयरीक
येई नकार सार्यांचा घडे कुठे आगळीक ?

सोन्यावाणी लेकीसाठी माय बाप चिंतातूर
तिला कवेत घेवून माय पुसे तिचा नूर
बोल ऐकता लेकीचे डोई आभाळ कोसळे
पाणी तोंडचे पळाले पुरे अवसान गळे

तालिमिच्या नावाखाली काका मामा लावी दार
बोळे कोंबूनी तोंडात होत राही अत्याचार !

पार गांगरली पोर धाय मोकलून रडे
माय बाप हतबल घर-दार एकीकडे !
जरी कळून चुकले नाती गोती सारी झूट
होते आपलेच दात आणि आपलेच ओठ !

माय झाली निरूपाय शोधे लांबचे सासर
गाय गोठ्यातली मूक पुन्हा कसायाचे दार !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

बलुतेदाराना शेती नसायची ते गावकीची कामे करायचे जसे कुंभार, मोची ,न्हावी इत्यादी व शेतकरी त्याना बाजरी , ज्वारी , गहू काढल्यावर पेंढ्या किंवा ठरावीक मापे धान्य देत . भाज्या सुध्दा देत . लग्नकार्यात पैसे दिले जात एक एकाला बोलावून. असे एका गावात बारा बलूतदार असत .
पूर्वी शेतजमीन सरकारी इनाम म्हणून मिळत . शिवकालीन अशा जमीनी दिल्या जात .
त्या अर्थी इनामदार अथवा जागीरदार शब्द योग्य वाटावा . कृपया गैरसमज नसावा .

ओह्ह्ह हे महिती नव्हते कवितेच्या अंगाने विचार आणि योग्य तो बदल करते .

मनापासून आभार आपले .