भोज्या :- भाग २

Submitted by अतरंगी on 7 November, 2017 - 02:57

रेस्क्यूची वाट पाहत गाडी मधेच राहावे की रात्रीच्या थोड्या कमी तापमानाचा फायदा घेत चालत रस्त्याकडे निघावे हा निर्णय घेणे अवघड होते. खूप वेळ विचार करून पण नक्की काय करावे याचा निर्णय होत नव्हता.

आता सर्वात महत्वाचा आहे तो पेशन्स ! रिकामा वेळ, पोटात उसळलेला भुकेचा डोंब, तहान, जगण्याची इच्छा, काहीतरी करण्याची उर्मी माणसाला रोड, पाणी, माणसे शोधत बाहेर पडायला मजबूर करते आणि घात करते. आपल्याला किती अंतरावर मदत मिळू शकेल याची 100 टक्के खात्री असल्याशिवाय आपले ठिकाण कधी सोडायचे नाही, ट्रेनिंग मध्ये शिकवलेला पहिला नियम. त्यात गाडी तर नाहीच नाही.

मेन रोड इथून 35 ते 40 किमी असेल. उद्या रात्री चालायला सुरुवात करावी का गाडीतच रहावे? 35 किमी सरळ रस्त्यावर चालणं वेगळं आणि घोट्यापर्यंत पाय रूतणाऱ्या या वाळूत हे डोंगर पार करणं वेगळं. त्यात हा उन्हाळा. एका रात्रीत अंतर पार करता येणार नाही आणि दिवसा चाललो किंवा थांबलो तरी उन्हाचा सामना करावा लागेल.

या भयानक स्थितीत अजून काही दिवस जिवंत राहायचे असेल तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला हवा होता. माझा चुकीचा निर्णय जीवावर बेतू शकतो.

आधी अंगातला फायर रीटारडंट ड्रेस उतरवला. अंगातले फक्त कॉटनचे बनियन आणि अंतर्वस्त्र ठेवले. कंपनीच्या ड्रेस मुळे उगाच घाम जास्त येणार होता. ट्रेनिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे 18 ते 24 तास पाणी न पिता काढायला हवेत.

Let's start from beginning.
स्टीफन ने ईमेल कोणाला कोणाला केला होता ? बार्ट, इसिड्रो, सुरेश तीन जण. म्हणजे तिघांना मी सबखा 87 ला आलो आहे हे माहीत असायची शक्यता आहे. त्यातल्या कोणाला उद्या किंवा परवा लक्षात आलं की मी ऑफिस मध्ये नाही तर ते सिक्युरिटी आणि रेस्क्यू टीमला अलर्ट करतील रेस्क्यू टीम लास्ट पर्सन ईन कॉन्टॅक्ट म्हणून यासीन ला संपर्क करतील. यासीन लिव्ह रोटेशन साठी प्रवास करत असणार, त्याला संपर्क करायला किती वेळ लागेल माहीत नाही. तेवढ्यात ते सबखा 87 च्या आजूबाजूचे रुट्स धुंडाळायला सुरुवात करतील. जर यासिन शी संपर्क झाला नाही तर ते त्याच्या टीम मधल्या वर्कर्स ला विचारतील का ? वर्कर्स सांगू शकतील का की यासिन ने मला तिकडची एक वेल चेक करायची गळ घातली होती. मुळात त्यांना हे माहीत असेल का ? निदान मी कोणत्या दिशेला गेलो हे तरी त्यांच्यातल्या एकाने पाहिले असेल की...
यासीन म्हणाला होता की मी जायच्या आधी सबखा 67 ची इंस्पेक्शन रिक्वेस्ट टाकतो. त्याने ती टाकल्यावर बार्ट ला cc जाणारच. ते पाहून त्यांची ट्यूब पेटेल का ?

सगळ्या नुसता शक्यता. पण या शक्यता जास्त आहेत. गाडीमध्येच रहावे. गाडी सोडून गेलो तर सगळेच अवघड आहे. गाडीचे फायदे खूप आहेत. AC, पेट्रोल, ऑइल, सावली...... गाडी सोडून रस्त्याकडे चालत जाणे मूर्खपणा होईल. पण मी AC साठी गाडी चालू केल्यावर पेट्रोल जाणारच, नंतर मग ऑइल, सावली, जाळायला सीट्स एवढाच काय तो गाडीचा फायदा.

च्यायला या वाळवंटात कोणीतरी ac लावून किती वेळ गाडी चालू ठेवली तर किती पेट्रोल खाते याचा हिशोब करायला हवा. आपणच लिहून ठेऊ या का गाडीत किती पेट्रोल होते? किती किती वेळ गाडी चालू ठेवली? इथे मेलो तर निदान मरता मरता सर्व्हायव्हल टेक्निक मध्ये अजून एक पॉईंट तरी वाढेल. माझ्या नावाने. ते मोठ्या मोठ्या शोधांना आणि ताऱ्यांना वगैरे ज्याने त्याचा शोध लावला त्यांचे नाव देतात तसे ह्या गोष्टीला माझे नाव देतील का ????

या शिवाय सगळा घटना क्रम लिहून ठेवावा का ? जर मी इथे रेस्क्यूची वाट पहात पहात मेलोच तर, इतक्या सगळ्या फॅसिलिटी आणि टेक्नॉलॉजि असून सुद्धा एक इंजिनिअर डेझर्ट मध्ये कसा अडकला आणि मेला याची एक केस स्टडी म्हणून शिकवतील का ?

जाऊ दे च्यायला डिप्रेसिंग विचार करत बसण्यापेक्षा फावला वेळ आहे तर सर्व्हायव्हल ट्रेनिंग मधले आत्ता उपयोगी येण्यासारखे काय काय आहे ते बघायला हवे....

१. पाणी थोडे थोडे प्यायला हवे, एकदम जास्त पाणी प्यायलो तर घाम आणि लघवी मध्ये त्याचा निचरा होईल. पाणी किती दिवस पुरवायचे आहे ते ठरवून ठराविक वेळात ठराविक ml प्यायला पाहिजे, म्हणजे पाणी पण संपणार नाही आणि डीहायड्रेशनची रिस्क पण कमी होईल. स्निकर्स आणि ड्राय फ्रुट चे पण रेशनिंग करायला पाहिजे.

२. कंपनीचे कपडे वापरून ड्रायव्हर सीटवर सावली करून घ्यावी आणि खाण्यापिण्याचा सगळा स्टॉक तिथे घेऊन बसलो म्हणजे मग पेट्रोल संपल्यावर सगळी दारं खिडक्या उघडून तिथे कमीत कमी हालचाल करून पडून राहता येईल.

३. वायपर साठी जे पाणी वापरतात ते काढता येते का बघायला पाहिजे. सगळं पाणी संपल्यावर ते पिण्यापेक्षा आताच्या चांगल्या पाण्यात ते थोडे थोडे मिक्स करून प्यायलो तर पोट खराब होण्याचे चान्सेस कमी आहेत.

४. पहाटे पहाटे काहीतरी सपोर्ट बघून आरसा रोड च्या दिशेने तोंड करून लावून ठेवायला हवा. पण मेन रोड आणि सबखा 87 चा रोड वेगवेगळ्या दिशेला असतील दोन्ही कडे तोंड करून दोन आरसे लावायला हवेत. आपला आरसा आपल्याकडेच ठेऊन गाडीतले आरसे खोलून नाहीतर तोडून काढता येतील.

५. कोणते प्राणी मारता येतील का ? मारले तरी आपल्याला कच्चे खाता येतील का ? सीट वगैरे फाडून आग लावून भाजता येतील का ? बघायला पाहिजे. प्राणी मारायचे तर रात्रीच मारायला हवेत. दिवसा इतक्या उन्हात ते पण बाहेर पडत नसतील. त्यांना पण काही टॅन वगैरे होण्याची भीती असेलच की.....

६. गाडीतले ऑइल किंवा पेट्रोल जाळून धूर करता येईल जो लांबून दिसू शकेल.

७. सीट फाडून रात्री डोंगरावर मशाल टाईप काहीतरी करून पेटवून ठेऊ या.

८. सर्व्हायव्हल ट्रेनिंग मध्ये बाटली वाळूत पुरून ठेऊन त्याचे moisture गोळा करता येते हे शिकवले होते, पण अमेरिकेत वगैरे जिथे आद्रता आहे तिथे ते जमत असेल. या ड्राय वाळूत अवघड दिसतंय. प्रयत्न करून बघायला हरकत नाही. अगदी शेवटचे एक दीड लिटर पाणी राहिले की ट्रेनिंग मध्ये दाखवले होते त्याप्रमाणे युरिन पिण्याचा पर्याय सुद्धा आहे.
उन्हाचा वापर करून युरिनचे डीस्टीलेशन करता येईल का ? सकाळपासून ज्या घामाच्या धारा चालू होतील त्या पण वापरता येतील. घामाचं आणि लघवीचे डीस्टीलेशन करून जे पाणी मिळेल त्याला ना वास असेल ना रंग ना बाकी इम्प्युरीटीज. हा एक प्रयत्न करता येईल. एका बाटलीला भोक पाडून एक ट्यूब दुसऱ्या बाटलीत सोडून सगळं व्यवस्थित सील करायचे. पण सील कसं करणार ? इमर्जन्सी किट मध्ये एक अढेसिव्ह आणि एक duct टेप ठेवायला हवी. ट्यूब कुठून आणणार ? गाडीतली एखादी काढता येईल, पण कोणती काढणार. इंजिन आणि ac दोन्ही बंद न पाडता कोणती ट्यूब काढता येईल ? पण जरी ट्यूब मिळाली तरी ज्यात व्हेपर गोळा करणार ती बाटली थंड झाल्याशिवाय लिक्विड कसे तयार होईल? बाटली थंड कशी करणार? वाळूत पुरून ठेऊन ? AC चा कुलंट वापरून ? एक बाटली उन्हात आणि एक सावलीत ठेऊन ?

च्यायला कंपनीचे सेफ्टी ऑफिसर पण च्युत्ये साले! कुठे तरी अमेरिकेत बनवलेले सर्व्हायव्हल व्हिडीओ इथे दाखवतात आणि कुठून तरी स्टडी मटेरियल गोळा करून कॉपी पेस्ट करतात. तिथलं जे इमर्जन्सी किट आहे तेच इथे पण पॅक करायला सांगतात. या ड्राय डेझर्ट मध्ये काय उपयोगी पडेल ते सांगायला नको का ? तिकडे वाळूत बाटल्या पुरतात, झाडांच्या पानातून आणि बाकी गोष्टीतून पाणी मिळवतात. पण इथे या अरबी शुष्क वाळवंटात आम्ही काय करायचं ते कोण शिकवणार. इथं ना झाड, ना प्राणी, ना वाळूत moisture. इथून गेलो की सेफ्टी ला एक मोठ्ठा ईमेल लिहायला हवा.

चला फटफटायला लागलं. सूर्य उगवून भाजून काढायच्या आत कपडे घालून डोंगरावर आरसे लावून बॉनेट मध्ये कापण्यालायक एखादी ट्यूब सापडते का बघू या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा..व्वा.. मस्त Happy
तुमच्याच वेगाने आमच पण डोक विचार करु लागल आहे.

उत्कंठावर्धक..... कल्पना करवत नाही काय होत असेल अशा सगळ्याच ठिकाणी जिथे असा जिवन मरणाचा प्रश्न येतो.... आपली बुद्धी शाबुत ठेवून
सारासार विचार करून निर्णय घेणे अवघड आहे.

<<उत्कंठावर्धक..... कल्पना करवत नाही काय होत असेल अशा सगळ्याच ठिकाणी जिथे असा जिवन मरणाचा प्रश्न येतो.... आपली बुद्धी शाबुत ठेवून
सारासार विचार करून निर्णय घेणे अवघड आहे.>>+१००