चला हवा येऊद्या.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 November, 2017 - 01:27

सोमवार आणि मंगळवार आला की संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर लवकर जेवण आणि कामे उरकण्याची लगबग चालू होते. कारण ह्या दोन दिवसांत आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील अख्ख्या कुटुंबाची हास्य विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हॉलमधील टीव्ही समोर बैठक बसणार असते. घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकत्रित बैठक जुळवून देणारा कार्यक्रम म्हणजे झी टीव्ही वर ९.३० ते १०.३० ला लागणारा चला हवा येऊद्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम. तसं टीव्ही वर माझ्या मुली श्रावणी, राधा आणि पुतण्या अभिषेक यांच राज्य असत व ते आपल्या वयानुसार लागणारे कार्यक्रम पाहत असतात. पण चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमासाठी मात्र ते आम्हाला टीव्हीचे राज्य एक तासासाठी घरातील सगळ्यांसाठी खुले करून सगळ्यांना सामावून घेतात. ह्या कार्यक्रमाचा आस्वाद एकत्रपणे घेतल्याने ह्या कार्यक्रमाबद्दल मनात आपुलकीचे व मानाचे स्थान निर्माण झाले आहे.

तसं झी मराठी म्हणजे मनोरंजनाचा एक उत्तम खजिना आहे. ह्या खजिन्यातील सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे चला हवा येऊद्या ही मालिका. आठवड्यातील दोनच दिवस लागणारी ही मालिका आठवडाभरच मनोरंजन प्रेक्षकांच्या पोतडीत भरून देते. ह्या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांच्यातील मौल्यवान कलेच जीव ओतून सादरीकरण करत असतात. प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करून आम्हा प्रेक्षकांचा दिवसभराचा थकवा, ताण-तणाव दूर करण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे. ह्या मालिकेचे सूत्रधार निलेश साबळे हे डॉ. असल्याने ते प्रेक्षकांच्या नसा ओळखून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाचे हास्यमय डोसच देत असतात. डॉ. निलेश साबळे यांना प्रसंगावधानाने कलाकार, येणारे मान्यवर व प्रेक्षक यांच्यात समांतर दुवा साधण्याची सूत्रसंचालनाची कला अवगत आहे त्यामुळे कार्यक्रमात कुठेही विचका होताना दिसत नाही तर कार्यक्रम अजून हवा हवासा वाटतो. सूत्रसंचालना बरोबरच त्यांचा कार्यक्रमातील एखाद्या नकलेचा अभिनय हा कार्यक्रमाचा बोनस मनोरंजन ठरतो. लेखन, सादरीकरण, सूत्रसंचालन तसेच अशा हुबेहूब नकला करणे ही तर दैवी देणगीच म्हणावी लागेल.

चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराकडे उत्तम विनोद करण्याची कला आहे. ह्या कलाकारांच्या टीम मध्ये श्रेया बुगडे ही एकटीच स्त्री कलाकार असून तिचा स्टेज वरील वावर आणि अभिनय इतका बिनधास्त असतो की त्या बिनधास्तपणातून तिचा अभिनय जास्त खुलतो. तिची एंट्री म्हणजे चला हवा येऊद्याच वादळच जणू. तिच्या बोलक्या नजरेतही अभिनय ठासून भरला आहे.

चला हवा येऊद्याच मुख्य नायक म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम ही व्यक्ती स्टेजवर उभी राहिली तरी प्रेक्षकांना हसू येत. भाऊचे सगळ्याच पात्रातील अभिनय अगदी सहज आणि नैसर्गिक असतात. कुठेही दुसर्‍याने हसावं म्हणून ओढाताण नसते. त्यामुळे त्याने केलेल्या विनोदांवर लोक मनापासून पोटभरूनं हसतात. भाऊचा शांताबाई बनून केलेला अभिनय हा दाद देण्यासारखा आहे.माझी पाच वर्षाची मुलगी राधाही भाऊ कदमला नावाने ओळखते व कुठेही भाऊ हे नाव घेतलं की ती पुढे कदम लावते इतका आमच्या घरात चला हवा येऊद्याच पगडा बसला आहे.

भारत गणेशपुरे ह्या कलाकाराची विदर्भातील बोली ही विनोदा बरोबर भाषेतील गोडी निर्माण करते. थुकरटवाडीतील सरपंच, दारूड्या ह्या त्यांच्या भूमिका सगळ्यांनाच आवडतात. किर्तनाद्वारे सामाज जागृती करण्याची कलाही ह्या कलाकारामध्ये आहे.

सागर कारंडे हा कलाकारही अष्टपैलू आहे. त्याच्या विविध अभिनयांतून तो प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, मग तो पोस्टमन काकातील भावनिक अभिनय म्हणा, साडीमधील विनोदी स्त्री अभिनय म्हणा की नाना पाटेकरांची नक्कल म्हणा. अनेकदा तो आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना पोटभर हसवून पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे डोळे पाणावतो. त्याने केलेली मिलिंद गुणाजीची नक्कल अप्रतिम होती.

कुशल बद्रीकेची एंट्रीच हास्याचा लोट घेऊन येतो. त्याचा संपूर्ण अभिनय विनोदी असतो. त्याचे हाव-भाव, नकला, कुठल्याही वेषातील अभिनय निखळ विनोदी मनोरंजनाचा स्पोट असतो.

प्रत्येक कलाकाराकडे हसविण्याचे वेगवेगळे स्किल आहे. कोणाच्याही विनोदात अतिशयोक्ती नसते. स्त्री पात्र करणार्‍या पुरुषांचा अभिनय अगदी हुबेहूब असतो आणि विशेष म्हणजे त्यात इतर कार्यक्रमात दाखवतात तसा फाजीलपणा नसतो ह्या मालिकेतील साइड अ‍ॅक्टरही कधी कधी खूप हसवतात. त्यातील जाडा पिंकी आणि सरड्यासारखे केस असणारा पात्र हे तर मुलांचे आवडीचे झाले आहे. कार्यक्रमाला प्रसंगानुसार म्युझिक, आवाज देणार्‍या कलाकारांचे कौतुक वाटते. ह्या आवाजांमुळे, म्युझिक मुळेच अभिनय जास्त रंगतो. सगळ्यात जास्त कौतुक वाटत ते वेषभूषा करणार्‍या वेषभूषाकारांच. एखादं पात्र किती हुबेहूब नटवून देतात ते. ओळखावे लागतच नाही की हा कलाकार कोणाची नक्कल करणार आहे ते.

कार्यक्रमाची रूपरेखाही व्यवस्थित मांडलेली असते. येणारे चित्रपट व नाटके यांची टीम ह्या मालिकेत आणून त्यांची ओळख करून दिल्याने आम्हा प्रेक्षकांना येणार्‍या चित्रपटांची, नाटकांची व त्यातील कलाकारांची माहिती होते व त्या नाटक, जाहीरातही उत्तम पद्धतीने होते. झी वरीलच रोज घरात वावरणार्‍या मालिकांतील कलाकार जेव्हा आपल्या मालिकेच्या टीम सोबत येतात तेव्हा त्या भागात एक आपलेपणा जाणवतो आणि त्यांची मिमिक्री केली जाते तेव्हा निर्माण होणारा हास्यस्पोटस्फोट हा अवर्णनीय असतो. चला हवा येऊद्याचे विशेष भागही खरंच विशेष मनोरंजनात्मक असतात. कार्यक्रमात उभारलेली थुकरटवाडी नियमित दाखवत असले तरी तिचा कधीच कंटाळा येत नाही उलट ती कधी अवतरेल ह्याची वाट पाहिली जाते. येणार्‍या कलाकार पाहुण्यांना खेळ खेळवून त्यांचेही मनोरंजन केले जाते. ते स्टेजवर खेळत असतात पण चढाओढ प्रेक्षकांच्या मनातही होत असते.

ह्या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे स्टेज. प्रसंगाला धरून पाठी उभे केलेले सीन त्या प्रसंगाला एकरूप करण्यात स्टेजचा मोलाचा वाटा असतो. ह्या कार्यक्रमात उभारलेल्या सीन मुळे कार्यक्रमाला चेतना निर्माण होते. मग त्यात सैराट साठी उभारलेली विहीर असो, प्रेस कॉन्फ़रन्स साठी केलेली बैठक असो की इतर स्थळांचे सीन असोत ह्या मालिकेत जीव आणतात.

हा कार्यक्रम आवडण्यामागे अजून एक कारण म्हणजे ह्या कार्यक्रमाने जपलेली सामाजिक बांधिलकी. चांगले सामाजिक कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींना ह्या कार्यक्रमाने मदत, सन्मान देऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले आहे. ठुकरटवाडीत एकाच बुकेने केलेला पाहुणचार ह्यामागेही निसर्गाच्या घटकांची अनावश्यक लूट नसावी हाच असावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व्हाही ह्या उद्देशाने सर्व मान्यवरांना गिफ्ट म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी झाडांची रोपे दिली जातात. म्हणजे दर आठवड्याला कमीत कमी ७-८ झाडांची लागवड ह्या कार्यक्रमामार्फत होऊन हरीत क्रांती होण्यास मदत होत आहे चला हवा येऊद्या मध्ये कधीच राजकारण दिसले नाही. ह्या मालिकेमार्फत विविध सामाज घडवणूकीचे उपयुक्त संदेश दिले जातात.

आता वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर हा कार्यक्रम म्हणजे आजच्या युगातील आम्हा नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत त्रस्त असणार्‍यांसाठी एक वरदानच आहे. माझ्या मिस्टरांचा वकिली पेशा व समाज कार्य, माझी नोकरीची-घरातील धावपळ, जाऊबाईंच्या दिवसभराच्या घरातील जबाबदार्‍या, दिरांचे नोकरी, घरातील वडीलधार्‍यांच्या स्वास्थतेच्या चिंता, मुलांचे अभ्यासाचे दडपण ह्या पासून आम्हा लहान थोर सगळ्यांनाच चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमातून थोडा चेंज मिळून आमच्या मनावरचे ताणतणाव दूर होतात. ह्या टीम मुळे आम्ही मनापासून खळखळून हसतो व आमचे एक तासाचे निखळ मनोरंजन होते. ह्या एक तासामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो व आठवडाभरासाठी उत्साह निर्माण होतो. त्यामुळे चला हवा येऊद्याच्या पडद्यावरच्या व पडद्या मागच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार व हा कार्यक्रम इतक्याच दर्जेदारपणे पुढे चालू राहूदे ह्यासाठी मनापासून शुभेच्छा.

सौ. प्राजक्ता प. म्हात्रे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रवी जाधव चे सिनेमे ओव्हर हायीप असतात... बी पी आणि ती पी 2 अत्यंत फालतू दर्जा होते... >> च्र्प्स अनुमोदन.

बी पी आणि ती पी 2 अत्यंत फालतू दर्जा होते..
>>>>>

या दोन्ही चित्रपटांना एका गटात बसवणे मजेशीर वाटले Happy

Pages