इंदौर चा सराफा

Submitted by kokatay on 3 November, 2017 - 12:40

सराफा असं म्हटलं कि ताबडतोप सोन्या –चांदी चे दागिन्यांच दुकान असंच आपल्याला माहित आहे पण इंदूर ह्या शहरात ‘ सराफा ‘ म्हणजे दिवसा दागिने खरेदी चे स्थान आणि रात्री खाण्याचे स्थान. माझ संपूर्ण बालपण ह्याच शहरात गेलं .मी मूळ ची इंदूर ची आणि पोस्टग्रेजूएशन करायला उज्जैन ह्या शहरात होते.
रात्री जेंव्हा दागिन्यांची दुकानं बंद होतात त्या नंतर तिथे खाण्या ची दुकानं लागतात .
काही खाण्याचे पदार्थ जे इंदूर ला मिळतात आणि जी चव त्या पदार्थांना असते, जगात कुठेच मिळत नाही असं मला वाटतं . तर आपण बघू इंदूर ला काय –काय ‘स्पेशल “ मिळत .
१ मावाबाटी: हा गोडाचा प्रकार आहे. साधारण गुलाब जाम सारखाच पण आकाराने त्याचा दुप्पट असतो आणि त्यचात दुधाचा “ मावा “ हा ही जास्त प्रमाणात असतो त्यामुळे चवीला जास्त चांगला लागतो. पण मात्र एकच दिवस भराला पुरतो ह्याची मात्र नोंद घ्यावी!
२. रबडी: हा पण गोडाचाच प्रकार आहे आणि बासुंदी सारखा असतो . दुधाला जरा जास्त आटवतात आणि घट्ट झालं कि साखर टाकतात.
३ भूटयाचा कीस : हा प्रकार तिखटाचा आहे . मक्या च्या कणसाला किसून त्याचा पासून साधारण पोहे सारखा प्रकार आहे पण अतिशय चविष्ट आणि खमंग लागतो.
४ कलाकंद : हा पण गोडा चा प्रकार आहे आणि मावा- दुध असं आटवून बनवतात.
५ मुगाची कचोरी : इंदूर ची कचोरी आकारानी मोठी [ पुरी ] सारखी असते आणि मात्र सबंद भरलेली असते . चांगली खूप तिखट आणि चटपटीत असते . आवडी प्रमाणे त्याचावर गोड चटणी आणि दही घालून खायची पद्धत आहे .
६. गराडू : हा प्रकार ही तिखटाचा आहे . गराडू हे एक प्रकार चे कंद आहे आणि थंडीत ते मार्केट मध्ये येत. त्याची कापं करून तळतात आणि त्याचावर एक स्पेशल मासला टाकतात आणि वरून लिंबू पिळून देतात .
७. मावा आणि खवा जिलबी : ही जिलबी मैद्याची नसून मावा आणि खाव्या ची असते, सुमारे १/२ पौंड प्रत्येकी असते म्हणून कॅलोरी मोजण्यात काहीच अर्थ नाहीये.
८. जोश्यांचे दहीवडे : फारच चविष्ट असतात आणि जेंव्हा ते तुम्हाला सर्व करतात तेव्हां चार बोटांमध्ये चार मसाले धरून असे गोल फिरकावतात कि तुमच्या वाटीत चार विभिन्न वर्तुळ दिसतात!
९. शिकंजी : तसं म्हटलं तर शिकंजी म्हणजे लिंबू शरबत हेच लक्षात येतं पण हा प्रकार अगदीच वेगळा आहे , हे दुध पासून बनलेलं पेय आहे , साधारण “लस्सी “ सारख दिसतं पण खूपच चविष्ट आणि गरिष्ट असं पेय आहे . ह्यात तीन –चार फ्लेवर असतात
मसाला शिकंजी , बदाम , आंबा , केसर असे प्रकार आहेत .
इंदूर ला एक दुसरं ठिकाण आहे त्याला “ छप्पन दुकान ‘ असं म्हणतात . एकाच लाईनित ५६ स्वादिष्ट खाण्याची दुकानं आहेत. गोड – तिखट सगळ्या प्रकार ची खाणी इथे मिळतात . इथे एक ‘विजय चाट हॉउस “ आहे , इथले पेटीस फारच चविष्ट असतात . जरा गोड- तिखट दोन्ही अशी मिश्रीत चव असते .
तर अश्या खाण्या पिण्याचा संस्कृतीतून मी लग्न करून जेंव्हा अमेरिकेत आले , तर मला घरात –बाहेर कुठेच मना सारख स्वादिष्ट भोजन मिळायचं नाही. तर एके दिवशी मी स्वतःच काही पदार्थ बनवायचं ठरवलं. मला गुलाब जाम बनवायचे होते तर मी माझ्या पतींना सांगितले कि मला “मावा” हवा आहे , तर मला कळले कि इथे हा प्रकार मिळतच नाही . तेव्हां समजलं कि मला इकडे गोडाचे प्रकार कां आवडत नाही?
अमेरिकेत गुलाबजाम :
इथे गुलाबजाम अगर दुसरे गोड पदार्थ दुधाच्या पावडरी पासून बनवतात. त्या कारणाने ते जरा वेगळे लागतात . ह्या चवीची सवय व्हायला थोडा वेळ ही लागतो .
असो ! पण आमच्या इंदूर ची मजा औरच आहे ! इंदूर माझं माहेर घर आहे म्हणून सांगत नाही परंतु तुम्हाला जर संधी मिळाली तर एकदा नक्कीच इंदूर ला जेऊन या आणि मग मला सांगा.
ऐश्वर्या कोकाटे
संपादिका
www.marathicultureandfestivals.com
sarafa2.JPGsarafa3.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इंदूरला खायला जायचं तर किती दिवसाची टूर करायला लागेल? हे सर्व एक दिवसात खाण्यासारखं दिसत नाही. किमान आठ दिवस राहावं लागेल.

वाह, मलाही २ वर्षंपूर्वी प्रथम तिकडे गेल्यावर सराफा ला जावू असा मंडळींचा सूर निघाल्यावर जाम टेंशन आले होते, वाटले आता अर्थव्यवस्था बिकट होणार बहुतेक. परंतू तेवढ्यात माझा मामेभाऊ म्हणाला, सकाळपासून भूक ठेवून आहे त्यासाठी. हुश्श.. वाटले ते ऐकून. अजूनही इंदौर म्हणले की प्रथम सराफाच आठवतो. धन्स!

हे सर्व एक दिवसात खाण्यासारखं दिसत नाही. किमान आठ दिवस राहावं लागेल.>> खरं आहे नाना, आम्ही तिकडे ३ दिवसांसाठी गेलो व त्यातील २ संध्याकाळ तिथेच घालवल्या तरीही वरच्या ४/५ पदार्थांशिवाय जास्त नाही खाऊ शकलो.
सराफाशिवाय अजून एक मिठाई/नमकीन चे दुकान आहे शहरात, खूप प्रसिद्ध. नाव आठवत नाही त्याचे..जाणकार सांगू शकतील कदाचित.

@अजब ती एक वेगळी गल्ली आहे नावं " छप्पन दुकान " त्यात विजय चाट हाउस म्हणून पेटिस आणि कचोरी साठी प्रसिद्ध आहे ......

छान लिहिलंय.
या सराफाबद्दल खूप ऐकलंय, त्यामुळे इंदूरला जाऊन ही खाद्यसंस्कृती अनुभवणं हे बकेट लिस्टवर आहेच!

मस्त लिहीलय.
मी पण ह्या साठीच इंदौर ची ट्रिप केली होती . काही पदार्थ मी दोन दोन चमचेच खाल्ले केवळ टेस्ट बघण्यासाठी तरी पोट खूपच भरलं होतं. पण मी एरवी ही जास्त तिखट खाऊ शकत नसल्याने आणि नमकीन पदार्थ मला जरा जास्त तिखट लागल्याने खाऊ नाही शकले पण भुट्टा कीस आणि दहिवडा मस्त होता.

वाचूनच तोंडाला पाणी सुटलं. थोपुवरही कोणीतरी याबद्दल लिहीलं होतं आणि खाली कमेंट्समध्ये एका बाईने लिहीलं होतं की जाऊन निराशा झाली, जे जे ऐकलंं होतं ते सगळं खोटं निघालं. मला खात्री आहे की असं होणं शक्यच नाही. माझा एक कलीग नेहेमी गजक म्हणून आणायचा, तेही फार छान लागायचं. बाहेरून आलेल्या माणसाने नक्की कुठल्या भागात मुक्काम करावा म्हणजे हे जवळ पडेल, छप्पन दुकान या सराफाबाजारापासून किती लांंब आहे, दिवसा चागलं जेवण मिळेेल अशी ठिकाणंपण सांगाना प्लीज. अवांतर: फक्त खादाडीसाठी मला एकदा अमृतसर आणि कोलकातालाही जायचं आहे Wink

@चंपा छप्पन दुकान हे थोडं स गाव बाहेर च्या परीधीत म्हटले तरी चालेल पण सराफा अगदी जुन्या इंदूर मध्ये आहे. तुम्ही जर पलासिंया च्या एखाद्या हॉटेल ला थांबलात तर दोन्ही कडे जायला सोपं जाईल. मलातर अजूनतरी कुणी भेटलं नाही ज्यांना हि पदार्थ आवडली नाही , मी तुम्हाला एक रंजक गोष्ट सांगते : मी जेंव्हा अमेरिकेत लग्न करून आले, तेंव्हा एका सकाळी माझ्या सासू बाईनी कांदे पोहे केले, तेव्हा मी म्हटले कि आमच्या इंदूर मध्ये तर पोह्यात कांदा घालतच नाही पण इतके मस्त लागतात, पण ह्याचावर त्यांची आणि आमच्या ह्यांची प्रतिक्रिया इतकी विचित्र होती कि जणू मी काहीतरी मंदबुद्धी ची तर नाही नं ? असे त्यांना वाटले असावे .......अजिबात खरं वाटलं नाही, आणि त्या सांगुन मोकळ्या झाल्या कि" छे " कांदेशिवाय पोहे होऊच शकत नाही, मी हि त्यावर पुढे काही वाद घातला नाही. मग काही वर्षांनी जेंव्हा आमचे "हे " पण माझ्याबरोबर भारताच्या दौर्यावर आले तेव्हा इंदौर चे पोहे खाल्ले आणि मग मात्र त्यांना कळल कि मी काय म्हणत होते .....इथे अमेरिकेत आल्यावर ते जो भेटेल त्याला इंदौर च्या फूड बद्दल सांगतात .......

ऐश्वर्या,
छान लिहिलं आहेस, इंदूरला माहित नाही कधी जाणार पण तुला यातल्या कशाचं अमेरिकन देसी व्हर्जन जमत असेल तर मज्जा आमची Proud

रंजक/तोंपासू माहिती, खूप ऐकलं आहे इंदूर च्या खाऊ गल्ली बद्दल

आमच्या इंदूर मध्ये तर पोह्यात कांदा घालतच नाही पण इतके मस्त लागतात >> ती रेसिपी द्या नं, काही वेगळी पद्धत आहे का? पोह्यांचे वेगवेगळे प्रकार ऐकायला/करायला नक्की च आवडतील

मस्त आठवणी kokatay,
आम्ही आत्ताच इंदूर ला जाऊन आलो, त्यामुळे 2 आणे माझ्या कडून.
A) सराफा,
चालू होण्याची वेळ रात्री 845 9 नंतर,
रिक्षाने सराफा चौपाटी सांगून गल्लीच्या जवळ उतरावे आणि आत चालत जावे, टॅक्सी तिथं पर्यंत जात नाही,
पालसिया, साऊथ तुकोगंज, RNT रोड इकडून अंदाजे 4 km च्या आत. इंदोर मध्ये ओला, जुगनू च्या अँप रिक्षा मिळतात.सो रिक्षाचा प्रॉब्लेम नाही.
संपूर्ण एरिया अतिशय गजबजलेला आणि सेफ आहे महत्वाचे म्हणजे स्वच्छ आहे, सगळे फेरीवाले कचऱ्याचा डबा ठेवतात आणि वापरायला सांगतात.
गराडू, हा प्रकार फक्त थंडीत मिळतो, घेण्या अगोदर गाडीच्या बाजूला थांबून पाहावे, तो माणूस व्यवस्थित लाल झाल्यावर बाहेर काढत असेल तर घ्यावे, नाहीतर दुसरी गाडी पहावी,
मस्त लाल, कुरकुरीत गराडू थंडीत खायला मज्जा येते Wink

पाणीपुरी- बऱ्याच गाड्या असतात 7 स्वाद मै, 10 स्वाद मै वगैरे फ्लेवर्स असतात, गर्दी असेल ती गाडी निवडावी.
पहिली प्लेट प्रत्येक फ्लेवर ची एक, आणि आवडलेल्या 1 2 फ्लेवर्स ची हवी असल्यास दुसरी प्लेट अशी स्ट्रॅटेजी चांगली राहते. लसूण वगैरे प्रकार आवडत नसतील तर पहिल्यांदाच त्याला नको सांगा Happy
जिलबी गल्लीच्या शेवटी एक छोट्या देवळा जवळ एक जिलबी वाला आहे, किती जण खाणारे असे विचारून तितकी मोठी एकच एक जिलबी बनवून देतो. चांगली करंगळी इतकी जाड असते, पण तो प्रकार अति होतो, 2 जण असतील तर हा प्रकार टाळावाच.

भुट्टे का किस बाजूला उभे राहून आधी टेक्चर बघा, काही ठिकाणी त्यात पोहे घालतात असे वाटले.मऊ लुसलुशीत टेक्चर वाटले तर घ्या

पान 3 4 गाड्या दिसल्या पानाच्या,
नॉर्मल पाने होतीच पण एक गुंडी पान म्हणून प्रकार होता, खाल्ल्यावर नाकातून एक्दम थंड वाफ निघतात. बाकी चॉकोलेट कोटेड पान वगैरे एक्दम बकवास

मानचुरीयन, नूडल वगैरे अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे, पण बेटर to अव्हॉइड

प्रतिसाद 2 56 दुकान आणि नमकीन

सराफा contind..
2 3 ठिकाणी कोकोनट क्रिम शेक च्या गाड्या दिसल्या,
शहाळे सोलून मलई, पाणी, साखर आणि दूध मिक्सर मध्ये खूप वेळ फिरवून हा शेक बनवतात,
चव छान होती पण बनायला खूप वेळ लागतो, एक 5 6 ग्लास ची बॅच बनायला 5 6 नारळ सोलायचा वेळ+मिक्सर चा वेळ.

56 दुकान
हे एरिया चे नाव आहे, खाऊ, कपडे, दागिने अशी सगळी दुकाने इकडे आहेत.खाण्याची दुकाने साराफाच्या तुलनेत थोडी मोठी आहेत, प्रत्येक दुकानात 1 2 बाकडी तरी आहेतच बसायला.
पण इकडे सगळी सरमिसळ आहे, चाट, डोसा, पनीर आयटम, सँडविच hotdog सगळे मिळते.
इंदोर मधल्या ओळखीच्या लोकांच्या सांगण्या नुसार इकडे इकडचे नॉनव्हेज hotdog इंदूर मध्ये वर्ल्ड फेमस आहेत.पण ते दुपार संध्याकाळ पर्यंत संपून जातात, आम्ही veg hotdog मागावलेला, पण तो अगदीच धन्यवाद कॅटेगरी होता.
मधुरम नावाचे एक मोठे दुकान आहे तिकडे व्यवस्तीत बसून खाता येते. डाळ बाफल्यांचे नाव खूप ठिकाणी पाहिलेले म्हणून ते ऑर्डर केले, 130 रु मध्ये 2 बाफले, डाळ, कढी, एक भाजी, ताक पापड असे भरलेले ताट समोर आले, आमच्या दोघांचे 80%जेवण त्यातच झाले.
बाकी नॉर्मल मिठाया, चाट मिल्कशेक्स वगैरे आहेतच, पण आवर्जून नाव घेऊन सांगावे असे मला तरी काही वाटले नाही.

नमकीन
इंदूर मध्ये नमकीन आणि थंडीत गजक ची खूप दुकाने दिसतात, जवळपास सगळीकडे चांगले प्रकार मिळतात,
शेवेचे सिंगल , डबल, ट्रिपल लॉंग शेव असे व्हेरिअशन आहेत तिखट प्रकारच्या चढत्या भाजणी नुसार.
कोणावर खुन्नस काढायचा असेल तर ट्रिपल शेव आवर्जून घेऊन जावी Wink
सिंगल शेव पोह्यांवर घालून मस्त लागते, पुणेरी नायलॉन शेवापेक्षा तर 1000 पट छान.
बऱ्याच दुकानात आधी चव दाखवून मग गोष्ट विकतात, इतकी व्हरायटी असते की फक्त चव पाहून पोट भरेल.

गजक आवर्जून गुडवाला घ्यावे, काही ठिकाणे शक्कर वाला देतात ते तितके खमंग नसते.

In ऑल इंदूर मध्ये खाण्याच्या बाबतीत सुख आणि स्वताई आहे.

तुम्ही इंदूरच्या आहात म्हणताय, तर खूपच त्रोटक लिहिलंय.
तुमच्या यादीत शिकंजी नवव्या क्रमांकावर असल्याचं पाहून नवल वाटतं. माझ्या ओळखीचे इंदूरकर ती मस्ट हॅव म्हणतात. आणि माझ्यासारख्याला एक ग्लास प्याल्यावर, खरं तर खाल्ल्यावर, जेवणाची गरज नसे.

मला आठवलेले आणखी पदार्थ
सकाळच्या नाश्त्यासाठी पोहा जलेबी आणि रस्त्यावर ठेल्यावर मिळणारी साबुदाणा खिचडी. पोहे तर सगळा माळवाभर. म्हणजे रतलाम स्टेशनपासून ते इंदूर भोपाळ रस्ते प्रवासात.
छोले टिकी.
कानातून धूर काढणारी तिखटजाळ भेळ.

शिवाय सराफ्याच्याच रांगेत असलेल्या मिठायांच्या दुकानातल्या विविध रंगसंगतीच्या, आकारांतल्या, पीस ऑफ आर्ट वाटाव्या अशा मिठाया.

संक्रातीला लाडू छान नाही मिळाले, पण गजक आणि रसपापडी मस्त.

सोनपापडी (यात खोबरे, आंबा चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेवर्स आणून वाट लावलीय असं माझं मत)

वेगवेगळ्या प्रकारचं नमकीन - रतलामी शेव, पोह्यांवर घालायची बारीक शेव.

जुन्या इंदूरात एक हॉटेल आहे जिथे फक्त दालबाटी असे. म्हणजे दालबाटी, बटाट्याची कोरडी भाजी, चटणी, कढी आणि चुरमे का लड्डू. बहुतेक घरगुती विशेष प्रसंगीही हाच बेत असे.

सिटी सेंटरजवळ आइसक्रीमचं एक दुकान होतं तिथली आइसक्रीम्स घशाआधी डोळ्यांना गारवा द्यायची.

सिंबा, मला पान अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे फक्त मीठा पानच खाल्लंय. काय काय पानवाले डायरेक्ट खाणार्‍याच्या तोंडात पानाचा घास भरवायचे, त्याचे हात खराब होऊन नयेत म्हणून ते विचित्र वाटायचं.

मस्त याच वर्षी गेले होते आणि सराफा एरिया ला भेट देऊन आले. इतकं गाजलेला ठिकाण आहे ना . बऱ्याच पदार्थांची थोडी थोडी चव घेतली. रबडी, भूटयाचा कीस, गराडू आणि जोश्याचे दहीवडे इतकंच खाऊ शकले. सगळे पदार्थ असतात पण जे हटके किव्वा नेहमी नेहमी खाण होत नाही असेच असतात तेच ट्राय केले. ग्रुप असला कि सगळेच आपापल्या आवडीची घेतात . त्यातली फक्त टेस्ट केली तरी बास आहे . येताना गजक मात्र विकत घेतलं . नातेवाईकांना देण्यासाठी Happy

ऐश्वर्या, मस्त लिहिले आहेस. वाचून तोंडाला पाणि सुटले.
Next India visit ला काहि पदार्थ आमच्यासाथ्हि घेउन ये. Happy

वॉव खुप छान लिहील आहात. आत्ताच त्या खाऊ गल्लीत जावस वाटतय. काही प्रकार नव्यानेच वाचले.

Pages