तोल साधते खुबीने

Submitted by पुरंदरे शशांक on 3 November, 2017 - 04:28

तोल साधते खुबीने

दोरावर डोंबारीण
तोल साधते खुबीने
सुगरण घरासाठी
पाय रोविते नेटाने

पहाटेस झरझरा
हात चाले देह पळे
घरच्यांना डबा द्याया
घड्याळही मागे वळे

अॉफिसात ढीग मोठा
खेळीमेळी, खंतावणे
लेकराचा फोन येता
जरा हासते सुखाने

सायंकाळी घरीदारी
पुन्हा हालते वेगाने
गृहपाठ घेताघेता
डाळ-भात कुकरणे

झाली जेवणे सर्वांची
उद्या काय करू नवे
झटपट निवडीते
भाजी नित्य निगुतीने

सुखदुःखाचेही कढ
टाके पिऊन मुकाट
साथ असो किंवा नसो
तिचे कळेना गुपित

दिस, मास, वर्षे गेली
दोर अजून तसाच
नातवंड संगतीने
तोल सावरते खास...

Group content visibility: 
Public - accessible to all site users