विश्वास.[सु]

Submitted by अविनाश जोशी on 1 November, 2017 - 03:18

विश्वास.[सु]
बंगल्याच्या दारातुन बाहेर पडणारी नेहा ताठ मानेने जात होती. पोरगी होती मोठी गोड लाघवी. कुणालाही चटकन खिळवुन ठेवणारी. पण मला मात्र तिने पुर्ण गोंधळात टाकले होते. अरे हो मी शैलेश साठे, डॉ. शैलेश साठे, प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ. बोरीवलीला असलेले माझे निलेश रुग्णालय पेशंटनी ओसंडुन वाहात असते. बोरीवलीतुनच नाही तर वसई विरार ठाण्यापर्यंतची रुग्णालये अवघड केसेस माझ्याकडे रेफ़र करत असतात.
ओबजीन तज्ञ हा प्रकार असतो मात्र जिकीरीचा. कुठल्या क्षणी पेशंट अडचणीत येईल काही सांगवत नाही. माझे शिक्षण झाले मुंबईतच. पदवी मिळाल्यावर स्वत:चे रुग्णालयाचे स्वप्न पाहाणे सुध्दा मला शक्य नव्हते. काही काळ केईम मधे काढल्यावर मला दादरला बापट हॉस्पीटल मधे नोकरी मिळाली. त्यावेळेस ते स्त्रीरोगाचे प्रख्यात धन्वंतरी होते. देशपरदेशात ते प्रख्यात होते. तेथे काम करणे हे एक अवघड कामच होते. सुट्टी सोडाच रात्रीची पुर्ण झोप मिळाली तरी नशीब. पहील्याच दिवशी डॉ बापटांनी बजावले होते. "हे बघ शैलेश, पेशंट जरी डॉ ला देव समजत असले तरी येथे देवाने भक्ताची सेवा करायची असते. दोन गोष्टी लक्षात ठेव. ह्या व्यवसायात कधी अळंटळं करू नकोस आणि फ़क्त पैशासाठी काम करु नकोस. तसेच पेशटच्या विश्वासाला कधी तडा जाउ देउ नकोस."
तरुणाईचा जोश होता. शिकायची जिद्द होती. जे अभ्यासक्रमात सात वर्षात शिकलो नाही ते तेथे सात महीन्यात शिकलो. वसईला रहाणे लांब पडते म्हणुन दादरलाच पीजी म्हणुन राहू लागलो. डॉ बापट माझी धडपड पहात होते आणि जास्त करायलाही लावत होते. चार वर्षात नाही म्हणले तरी तीन चार हजार मुलांना जन्माला घालायचे पुण्य माझ्या पदरात निश्चितच पडले होते. मी सिनीअर ही झालो होतो. हाताखाली नवीन बकरेही आले होते. वडीलही रिटायर झाले होते आणि बोरीवलीला निदान भाड्याने तरी फ्लॅट घेण्याईतका पैसा माझ्याकडे जमला होता. आईवडीलांसह बोरीवलीत रहायला लागलो. घरच्यांचा भाड्याच्या घरात रहायला तसा विरोधच होता पण एकत्र येतोयना म्हणुन त्यांनी समजाउन घेतले.
बोरीवला आल्यावर मात्र माझ्या लग्नाची भुणभुण सुरु झाली. वैद्यकीय महाविद्यालयात बरीच लग्ने जमतात. दोघेही डॉ असणे हे बरेच फायद्याचे ठरते. ओबजीन/ अनस्थेशीया ह्या जोड्या तर फारच योग्य ठरतात. माझे विचार मात्र मध्ययुगीन होते. मला ह्या व्यवसायातली सहचारीणी नको होती व तीने नोकरी करावी अशीही अपेक्षा नव्हती. एखादा छंद जोपासण्य़ास मात्र माझी काहीच हरकत नव्हती. घरच्य़ांनाही माझे विचार मी ठासुन सांगीतले होते. त्यामुळेच बेळगावची डॉ निलाक्षी पंडीत नावाची मुलगी दाखवायला आल्यावर मी गोंधळात पडलो. बेळगावहुन मुंबईपर्यंत माझ्याकरता ते आल्यामुळे अगोदरच नकार देणेही अवघड होते. दुपारी ती आल्यावर तर माझा गोंधळ अजुनच वाढला. मुलगी गोरीपान , लांबसडक केस आणि नावाला शोभणारे मिस्कील निळे डोळे. माझी चलबिचल सुरु झाली.
" पंडीत! तुमची मुलगी खरोखरच नक्षत्रासारखी आहे, पण आमच्या शैलेशचा एक वेगळाच ह्ट्ट आहे " इति आई
" अहो पत्रिका पाहुनच तुम्ही बोलवले ना! "
" पत्रिका जाउदेत हो. शैलेशला डॉ मुलगी नको आहे "
" का? " निलाक्षी. अथांग सागरात आगीचा वडवानल!!
" नाही . म्हणजे तसेच काही नाही " माझी विकेट
" हे बघा गुळमुळीत बोलु नका. काय ते स्पष्ट सांगा " एकाच वेळेस राग आणि अनुरागाच्या छटा. मी संभ्रमात.
" हे बघा. माझा व्यवसायात मला किती वेळ जाईल कधी घरी येउ शकेन याचा अजीबात भरवसा नाही. माझ्या बायकोच्या पायालाही अशी भींगरी लागली तर घराला घरपण उरणार नाही. मला हवा आहे एक भोज्या, स्थिर असणारा " माझा स्ट्रेट्द ड्राईव्ह
" म्हणजे तुम्हाला नोकर हवा आहे तर " हे वाक्य माझ्यावर डोळे रोखुनच
" नाही. मला स्वत:च माणुस हवे आहे "
" जाउदेरे! कशाला भांडताय? तुला नको आहे ना डॉ. ? " माय माउलीचा गुगली. निळ्या डोळ्यात मिस्कील छटा.
" मला जरा विचाराला वेळ द्या "
" विचार कसला करतोस? उगीचच त्रास झाला त्यांना. या हं पंडीतराव, तुम्हाला परत जायचे असेल ना? " आईचा दुसरा
मी गारद! जमलेल्या सर्वांच्या माझ्यावर नजरा रोखलेल्या.
" बराय शैलेश. या कधी बेळगावला आलात तर " पंडीत
" नाही थांबा. मला मुलगी आवडली आहे " ह्या वाक्यात काय विनोद होता. मला कळलेच नाही. वडीलांची पंडीताना टाळी. निला आईच्या जवळ. सर्वजण खदखदुन हसत आहेत आणि मी मात्र येडचाप सारखा उभा.
" अरे वेड्या!! आम्ही पत्रिका सुध्दा छापायला टाकल्या आहेत. पंडीत् कार्यक्रम ठरवायला आलेत. " आई
" म्हणजे ? मी नकार दिला असता तर? " आईच्या आडुन एक लालचुटुक वेडावणे
" अरे काय पोरीत कमी आहे? आता ती डॉ आहे, पण साहीत्यात. " या लोकांनी माझा ठरवून सरळ मामा केला होता तर.
लग्न पार पडले. माझ्या दादरच्या खेपा सुरुच होत्या. मी डॉ आहे समजल्यावर जवळपासचे रोगी घरीही येऊ लागले होते. बोरीवली त्या वेळेस सुसज्ज हॉस्पीटल नव्हतेच. जवळ्च एक बंगला विकायचा होता. बंगला छोटाच होता पण जागा भली मोठी होती. घरची सर्व जबाबदारी निलाने कधीच उचलली होती. जवळच स्वत:चे हॉस्पीटल असावे अशी तिचीही इच्छा होती. डॉ बापटांजवळही मी माझे विचार बोललो. त्यांनी पुर्ण पाठींबा दिला.
" हे बघ शैलेश, रुग्णालय चालवणे सोपे आहे पण बांधकाम आणि लागणाऱ्या परवानग्या यात प्रचंड वेळ जातो. मी ह्या सर्व चक्रातून गेलॊ आहे. त्यामुळे आपल्याकडे सर्व माणसांची टीम तयार आहे. तु ती वापर. मी शब्द टाकल्यावर कोणी नाही म्हणणार नाही "
" पण डॉक्टर? "
" अरे शैलेश. आपण ज्यात तज्ञ असतो तेच काम करावे. शस्त्रक्रीयेच्या वेळेला आपण भुल देणाऱ्याची मदत घेतोच ना? का आपणच भुल देतो? "
" बर "
" आणि हे बघ. पैशांची अडचण आली तर अजीबात संकोच करु नकोस."
त्यांचा सल्ला किती योग्य होता त्याचा अनुभव मला थोड्याच दिवसात आला. प्रथम चांगला बिल्डर, आराखडे, तीस एक तरी परवानग्यांचे अर्ज, फर्निचर, ओटी आणि पॅथॉलॉजी इक्विपमेंटस, लिनन आणि सतराशे साठ गोष्टी. पण निलाने त्या सहज सुरळीत केल्या. अगोदर पासुनच "निलेश" नाव ठरवले होते. पैसा कसा खर्च होत होता कळत नव्हते. वसईचे घर, माझी शिल्लक, बॅंकेचे कर्ज आणि सर्वात शेवटी डॉ बापटांनी केलेली मदत यात निदान ओटी , लॅब आणि १६ बेड्स असे रुग्णालय आकार घेऊ लागले. तात्पुरता काही भाग राहाण्यासाठी राखुन ठेवला होता. निला आता घरापेक्षा साइटवरच जास्त असायची. रुग्णालय आकाराला आले आणि निलाने गोड बातंमी दिली. बाळाचा जन्म आपल्याच रुग्णालयात डॉ बापटांनी करावा अशी आमची दोघांची ईच्छा होती.
आणि झाले ही तसेच. रुग्णालय सुरु झाल्यावर एका महीन्यातच ईशा आली. आईची प्रतिकृतीच. बेटी आली ती नशीब घेउनच. १६ चे २५ आणि २५ चे ५० बेडस कधी झाले हे लक्षातही आले नाही. संपुर्ण पाचवा मजला आमचा निवास झाला होता. रुग्णालयाचे मॅनेजमेंट निलाने अप्रतीम सांभाळले होते. गाड्या , रुग्णवाहीका आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ’निलेश’ सुसज्ज होते. सात आठ वर्षे कशी गेली कळले सुध्दा नाही. मधे विजयचा जन्म झाला तेवढेच नवे. निलेश मधे आता बराच वैद्यकीय स्टाफ झाला होता. निलानेही हळुहळु कामे इतरांवर सोपवायला सुरुवात केली होती. विकएंड ला आता बाहेर पडु लागलो होतो. क्वचीत मुलांना घेउन ट्रिप्स होउ लागल्या. अशाच एका ट्रिप मधे अचानक पुण्यात बाणेरला एक बंगला घेउन टाकला. बंगला होता ४ बेडरुमस चा टुमदार आणि बगीचा व सर्व्हंटस क्वार्ट्र्स असणारा. मग काही विकेंड्स त्याला सजवण्यात गेले. पुण्याचा विस्तारही झपाट्याने होत होता. बाहेरील वस्तीतुन बरीच रुग्णालये सुरु होत होती. शनीवार रवीवार मुंबईच्या रगाड्यातुन पुण्याला यावे आणि नवोदीत रुग्णालयांना जमेल तशी मदत करावी असा कार्यक्रम सुरु केला. कुठल्याही मोबदल्याशिवाय मी मदत करत असल्याने बरीच मित्रमंडळ गोळा झाले.
ईशाला पहील्यापासुनच वैद्यकीय क्षेत्राची आवड. आता तर ती एम डी संपवुन रुग्णालयात काम करु लागली. दोन वर्षात तिने मेडीकल परंपरेला अनुसुरुन वर्ग मित्राशी लग्न केले. दोघेही आता हॉस्पीटल सांभाळू लागली आहेत. विजय मात्र या क्षेत्राच्या एकदम विरुद्ध दिशेला होता. त्यामुळे त्याने सरळ इंजिनीअरींग गाठले. त्याला पुण्यातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्याने हॉस्टेल मधे रहावे असे माझे मत होते. विद्यार्थ्यांनी घराबाहेर दोन तीन वर्षे काढली तर ती जास्त चांगली तयार होतात असे मला वाटते. पण बाकी सर्वांनी त्याला छान मोडता घालुन त्याला बंगल्यातच स्थिर केले. एवढेच नाही तर आमच्या हरकामी बबनलाहि त्याच्या बायकोसकट तेथे नेउन ठेवले. नशीब ज्याचे त्याचे.
यथावकाश तो पदवी घेउन बाहेर पडला. सर्व सोपस्कार पार पाडून अमेरिकेला रवानाही झाला. निलेश मधुन हळूहळू मी अंग काढून घ्यायला सुरुवात केली. पुण्याचा मुक्काम वाढू लागला. अशाच एका रात्री एका मित्राचा फोन आला.
" अरे शैलेश! जरा येतोस का? जरा अडचणीची केस आहे." ह्या ऑर्थोपेडीक मित्राला माझी काय जरुर पडली हे मला कळेना.
" एवढ्या रात्री काय काम काढलेस? आणि तुझ्या हाड मोड्तोडीत माझा काय उपयोग? "
" तु ये तर"
बबनला घेउन मी त्याच्याकडे पोहोचलो. मला पाहताच त्याचा चेहरा उजळला.
" एका मुलगी रस्त्यात घसरुन पडली म्हणुन येथे दाखल केले. बाकीचे आम्ही संभाळले पण तिच्या पोटातही मार बसला आहे आणि ती प्रेग्नंट असल्याचे आत्ता तपासणीत दिसत आहे. मुलगी बेशुद्ध्च आहे. तिचे नाव गाव काहीच माहीती नाही. "
" पर्स नव्हती का? "
" भाजीची पिशवी होती आणि चिल्लरचे पाकीट. "
" चांगल्या घराची दिसतीय. "
" हो ना! आता जरा मला प्रॉब्लेम वाटला म्हणुन तुला बोलावले "
मी मुलीला तपासले. शेलाटी आणि ह्या अवस्थेतही सुंदर दिसत होती. तपासणी अंती असे लक्षात आले की गर्भपात करणे आवश्यक आहे. गर्भाची अवस्था नाजुक आहे. गर्भ ६/७ आठवड्याचाच असावा. गर्भपात न केल्यास कॉम्प्लिकेशन वाढलीच असती.
" तातडीने गर्भपात करायला पाहीजे "
" ते खर रे पण ती शुद्दीवर येईपर्यंत वाट नाही का पाहता येणार? लिगल प्रॉब्लेम हल्ली फार वाढलेत रे "
" पेशंटचा जीव महत्वाचा. माझा सल्ला आहे की लगेच करावे. फारसा धोका नाही. उद्या सकाळ्पर्यंत ती ठणठणीत असेल. फारतर उद्या सकाळी ती शुद्दीवर आल्यावर तु तिला परीस्थिती समजाऊन सांग "
" तु करणार का? "
" हो " त्याची बायकोच भुलतज्ञ असल्याने एका तासातच सर्व संपवून मी घरी गेलो.
दुसऱ्या दिवशीच मित्राचा फोन आला.
" शैलेश कालची मुलगी आज सकाळी उठल्यावर भांबाऊन गेली होती. चहा झाल्यावर बायकोने तिची तपासणी केली. सर्व व्यवस्थीत दिसल्यावर तिने तिचा अपघात झालेल्या जखमा हे सर्व सांगितले"
" अरे पण तिचे नावगाव ?"
" तिनेच वडीलांना लोणावळ्याला फोन केला. कालच तिचे आईवडील तिकडे गेले होते. ते आता दोन तीन तासात येतीलच. खरी गम्मत तर पुढेच आहे. तिचा फोन झाल्यावर मिसेस ने तिला गर्भपाताची जाणीव करुन दिली. "
" मग? "
" ती बायकोच्या खांद्यावर रडतच सुटली. म्हणाली मॅडम मलाही करायचाच होता पण मनाची तयारी होत नव्हती. कृपया आई वडीलांना हे सांगु नका "
" हल्ली असे प्रकार फारच वाढलेत. जाउ देत. त्यांचे पाप त्यांच्यापाशी "
" बाय आणि थॅक्स "
दिवस जातच होते. विजय जाताना परत येणारच असे सांगुन गेला होता. पण एम एस झाल्यावर त्याला तिथेच एम बी ए करायची हुक्की आली. ईशा आणि तिच्या नवऱ्याने रुग्णालयाची सर्व जबाबदारी व्यवस्थीत सांभाळली होती. निला आणि मी दोघेही आता पुण्यातच स्थाईक झालो होतो. स्थाईक म्हणायलाच, शरीर साथ देत आहे तोपर्यंत भ्रमण करत होतो, जगप्रवास करत होतो. घराचे हळुहळु संग्रहालय होत होते. पुण्यातल्या वास्तव्यातही मित्रांबरोबरचे विकेंड होतेच.
गेल्यावर्षीपासुनच विजय करता मुली सांगुन येत होत्या. निला त्यांना शॉर्टलीस्ट करण्यात गर्क होती. ईशा तीला मुंबईतुन सामुग्री पुरवतच होती. मी ह्या सर्व विषय़ांपासुन अलीप्तच होतो. एकदा मी निलाला बोल्लो सुद्धा
" अग तुम्ही दोघी एवढा उपद्व्याप करताय पण तो तिकडनच लग्न करुन आला तर? "
" काहीतरी बोलू नका "
" त्याची अगोदरच काही भानगड असली तर ? "
" हे बघा, मी विजयला चांगली ओळखते. त्याच्याशी मी फोनवर बोलुन खात्री करुन घेतली आहे. तोच म्हणाला कि तुम्ही अगोदर पसंद करा. मग त्यातुन मी सिलेक्ट करीन "
" अरे ईतका वडीलांच्या वळणावर गेला आहे ? "
" त्याचे लॉजीक फार सोपे आहे. तो म्हणतो तुम्ही पसंत केलेल्यातुनच मी पसंत केली तर ती दोघांच्याही पसंतीची असेल"
विजय आला तोच एक गलेलठ्ठ पगाराची नोकरी घेऊनच ! नोकरी हींजवडीमधे होती आणि बाणेरचा बंगला सोईस्करच होता. शनिवार रविवार वधुपरिक्षांचा घोळ सुरु झाला. आपल्याच बंगल्यावर मुली बघाव्यात हा माझा सल्ला धुडकावला गेला. मी अव्यवहारी आणि आळशी असल्याचा शिक्का बसला. अशातच नेहाचा आमच्या आयुष्यात प्रवेश झाला.
" हे बघा रविवारी सावरकर त्यांच्या मुलीला नेहाला घेऊन येणार आहेत. कुठे भटकायला जाउ नका " निळ्या डोळ्यांची जरब
" कोण सावरकर ? आणि ते मुलीला घेउन कशाला येणार आहेत? मी घरी पेशंट बघत नाही माहीतीय ना तुला ? " माझे वेडेपणाचे सोंग
" कठीण आहे तुमच्यापुढे. ते विजयकरता मुलगी दाखवायला घेउन येत आहेत. मी तिला केंव्हाच पाहीली आहे. विजयलाही घेऊन गेले होते. आत्तापर्यंत पाहीलेल्यात सर्वात छान मुलगी आहे "
" मुलीने संगीतात एम ए केले आहे, शिवाय घरची ही सुस्थीती आहे. हा बघा फोटो "
फोटो हातात घेतल्यावर माझ्या मनात कुठेतरी पाल चुकचुकली.
" छे अग काहीतरीच काय? मला नाही मुलगी आवडली "
"हे बघा. रविवारी ईशा, सुनंद, आई असे सर्व येणार आहेत. मुलगी आवडली तर लगेच मुहुर्त ठरवायचा आहे."
रविवार उजाडला. बऱ्याच दिवसांनी घर गजबजले होते. सकाळीच सावरकर सहकुटुंब नेहाला घेऊन आले. नेहा होती विजयला साजेशी उंच, शेलाटी बांधा आणि चेहऱ्यावरचा करारीपणा. आल्या आल्या तिने सर्वांना नमस्कार करुन जिंकुनच घेतले. ईशाचीच नव्हे तर तिच्या मुलांबरोबरही तिची गटटी जमली होती. निला , ईशा विजय, आई सर्वांच्याच चेहऱ्यावर छान सुन मिळत असल्याचे भाव दिसत होते. निलानेतर मधेच आत जाऊन देण्याघेण्याची तयारीही केली होती. सर्वजण मीच आता सावरकरांना होकार कळवावा अशा आविर्भावात दिसत होते.
" हे बघा सावरकर नेहा छानच आहे पण जरा आम्हाला दोन दिवसांचा वेळ द्या "
" ठीक आहे. तुमचे देण्याघेण्याचे तर काही नाही ना? "
" नाही हो. देवाच्या कृपेने भरपुर आहे. पण आयुष्याचा प्रश्न आहे"
"बरोबर आहे. चला भेटुया "
सावरकर बाहेर पडताच माझ्यावर चॊफेर हल्ला झाला.
" बाबा तुम्ही होकार का नाही कळवलात? " ईशा
" त्यांची सवयच आहे. मला होकार देतानाही त्यांनी असेच आढेवेढे घेतले होते" निळे डोळे
त्यांच्याकडे लक्ष न देता मी पोर्चवरच्या गच्चीत गेलो. अस्वस्थ अवस्थेत झोका घेऊ लागलो. निलाला माझी ही सवय परीचयाचीच होती. मागोमाग ती टपकलीच.
" काय हो? काही होतय का? "
" नाही आज जरा अस्वस्थ वाटतय "
" ईशा कींवा सुनंद्ला बोलावु का?"
" नको. मी आता झकासपैकी बियर घेतो, जेवतो आणि ताणुन देतो. जरा माझा मोबाईल दे बर "
निलाचे एक बरे आहे. अशा वेळेला ती काही बोलत नाही.
नेहाने मला ओळ्खायचा प्रश्नच नव्हता. फोटो बघीतल्यावर मला शंका आलीच होती ती प्रत्यक्ष बघीतल्यावर खरी ठरली. त्या रात्री गर्भपात केलेली अनामिका नेहाच होती. मोबाईलवरुन मित्राला फोन करुन मी नावाची खात्री करुन घेतली. मुलाचे भवितव्य का पेशंटचा विश्वास ? डॉ बापटांचे शब्दही आठवत होते. पण अशा लांछीत मुलीशी मी विजयला लग्नाला कशी परवानगी देऊ ? शैलेश वि डॉ साठे असा हे द्वंद्व होते. मन असेही म्हणत होते कि जी मुलगी ठरेल तिचे ही असे झाले नसेल कशावरुन ? नेहाचे तु केलेस म्हणुन ती टाकावू आणि माहीत नाही म्हणुन दुसरी पसंद ? खरे तर हा डाग सोडला तर मुलीत नाव ठेवायलाही जागा नव्हती. नकार द्यायचा झाला तर कारण काय देऊ ? विचार करताच झोप कशी लागली कळलेच नाही.
सध्याकाळी निला बरोबर निवांत जाऊन बसलो. तिने अवाक्षरानेही नेहा बद्दल विचारले नाही. फ़क्त परत येताना एवढेच सांगितले की नेहाला मला एकट्याला भेटायचे आहे आणि ती उद्या सकाळी येणार आहे. दुसऱ्या दिवशी नेहा बरोबर आली. बाल्क्नीत आली आणि समोरच बसली.
" बोल बेटा , असे काय बोलायचे आहे ?"
" काका तुम्ही विचारासाठी दोन दिवस मागीतले आहेत. तुम्ही निर्णय घेण्यापुर्वी मला काही स्पष्ट
बोलायचे आहे. "
" बोल "
" तीनेक वर्षापुर्वी मला गर्भपात करावा लागला होता. का? कुणामुळे? हे कृपया विचारु नका. "
" पण मग तु त्याच्याशीच का नाही लग्न केलेस ?"
" त्या वेळेला ते शक्य नव्हते आणि आता होईल की नाही माहीत नाही. त्याच्यात आमच्या घरी कुणालाच कल्पना नाही. "
" मग मला का सांगतेस ? "
" मला ईथे जन्म काढायचा आहे. पुर्ण विश्वासानेच मला या जगात पाउल टाकायचे आहे. मोहाच्या एका क्षणाच्याकरता मी बरेच सोसले आहे. मला पुर्ण कल्पना आहे की तुम्ही मला हे कळल्यावर पुर्ण नकार देणार. आणि घरीही लग्न ठरल्यावर सांगणारच आहे. अगोदर नाही सांगितले म्हणजे लग्न ठरवताना त्यांना कमीपणा वाटायला नको. "
मुलगी तेजस्वी आणि बाणेदार होती. तिला काय कल्पना की हे सर्व मला अगोदरच माहीती होते.
" निला आणि विजयला ह्याची कल्पना आहे ? "
" नाही "
" मला एक सांगशील की हे माहीती असुन मी होकार का द्यावा? "
"माझ्यात काय कमी आहे ? रुप शिक्षण बुद्दी सर्व काही आहे. आत्तपर्यंत मीच सगळीकडे नकार दिला आहे."
" मग सगळीकडे हे बोललीस ?"
" अर्थातच नाही. ईथे माझा होकार आहे कारण घरातील सर्वांशी माझे चांगलेच जुळेल. त्यामुळेच मी तुमच्याशी बोलले. "
" समजा मी होकार दिला आणि लग्नानंतर विजयला कळले तर ?"
" काका तुम्हाला तुमच्या घरातील माणसे चांगलीच माहीती आहेत. त्यामुळे तुमचा निर्णय सर्वांना पटेल असाच असणार."
चिमुरडी खरच व्यवहार चतुर आणि मनात शिरणारी होती.
" काका, विचार करायला तुम्ही वेळ का मागीतलात ? असे काय वैगुण्य दिसले ?"
" अग सहज. खास असे काही नाही. "
" काका कृपया सांगाना. "
स्वत:चा कमीपणा दाखवुन शेवटी पोरीने मला हरवले होते. मी ही बिनधास्त व्हायचे ठरवले.
" तुझी तयारी आहे का? "
" हो "
" नेहा तुझा गर्भपात करणारा सर्जन मी होतो. मला तुझे नाव माहीत नव्हते, कारण तु त्यावेळेस बेशुद्ध होतीस. पण फोटो आणि तुला प्रत्यक्ष पाहील्यावर खात्री पटली. मी मित्राला फोन करुन नावाची खात्रीही करुन घेतली. "
" मग लगेच नकार का नाही दिलात ? "
" एकतर कारण सांगणे अवघड होतेच. त्यातुन मी मोठ्या पेचात पडलो होतो. मी कधीही माझ्या आयुष्यात व्यवसायाशी प्रतारणा केली नाही. तुझा गर्भपात हा मला डॉ साठे म्हणुन माहीती होता. शैलेश साठेंनी त्याचा उपयोग करणे हे चुकीचे झाले असते "
" काका you are great!! . तुमचा काहीही निर्णय असो तुम्ही मला फारच आवडला आहात. बर येते मी. "
ताठ मानेने पोरगी बाहेर पडली. माझा एक गोंधळ सुटला होता तर दुसऱ्यात अडकलो होतो. तिनेच सांगीतल्यामुळे आता मी घरच्यांना सांगायला मोकळा झाले होतो, पण अशा पोरीला नाकारावी का हा प्रश्न सुटत नव्हता.
शेवटी मी निला आणि विजयशी चर्चा करायचे ठरवले. विजय कुठेतरी बाहेर गेला होता पण निला लगेचच आली. चेहऱ्यावरुन मी गंभीर आहे हे तिला जाणवले.
" काय हो? एवढे काय सिरीयस ? आणि नेहा कशाकरता आली होती ? "
" सर्व सांगण्या अगोदर मी एक सांगतो की नेहाशी लग्नाच्या प्रस्तावाला मी होकार द्यायचे ठरवल्रे आहे "
" अहो मग एतका सुतकी चेहरा करुन काय सांगता ? चला मी सावरकरांना फोन करते " निळी आतिषबाजी.
" थांब ! काही गोष्टी तु समजवुन घे. विजयचे मत घे आणि मगच त्यांना फोन कर "
" का ? "
" नेहा आत्ता येउन गेली. तिने संगितलेली गोष्ट जरा नाजुक होती. मुलगी मोठी धीराची."
" असे काय झाले "
" नेहाने तीन वर्षांपुर्वी गर्भपात करुन घेतला आहे. तिच्या घरी हे माहीत नाही "
निला चट्कन वाईट विचार करत नाही.
" बिच्चारी. काय भोगले असेन पोरीने कोण जाणे ? आणि अशा गोष्टी सासरकडे बोलणे ह्याला खरच धैर्य पाहिजे. नसते सांगीतले तर ? "
" निला मला माहीत होते. "
" कसे काय ?"
" कारण गर्भपात करणारा सर्जन मी होतो. मला नाव माहीत नव्हते, कारण त्यावेळेस ती बेशुद्ध होती. पण फोटो आणि प्रत्यक्ष पाहील्यावर खात्री पटली. मी मित्राला फोन करुन नावाची खात्रीही करुन घेतली. "
" तरीच तुम्ही कालपासुन एवढे डीस्टर्ब होता. "
" हो. "
"तुमचा निर्णय मला पटला. पोर ईनोसंट आहे हो. कशामुळे हा प्रसंग तिच्यावर आला असेल कोण जाणे? "
" मला आता विजयचीच काळजी आहे. "
" खरय हो ! पण हल्ली मुलांना ह्या गोष्टींची फार फीकीर वाटत नाही. पण त्याला नेहाच्या ईमेजला तडा गेल्यासारखे वाटेल खरे. त्यातुन तिला तो कॉलेजमधे असल्यापासुन ओळ्खतो. "
" ठीक आहे. विजय आलेला दिसतोय. त्याला तु नकार देत आहोत असे सांग आणि कारण विचारल तर सांग. नाहीतरी अशा फीरक्या घेण्यात आपण हुशार आहातच. "
विजय धावत धावत वर आलाच. आमचे दोघांचेही सुतकी चेहरे पाहुन तो दचकला.
" अरे विजय नेहाला नकार द्यायच ठरतय. "
" का पण " विजय कावराबावरा
" अरे तीने काही दिवसांपुर्वी गर्भपात करुन घेतला आहे "
" शक्यच नाही. ती अतिशय सालस आणि मुलांपासुन फटकुन राहाणारी आहे. आणि लोक काय काहीही अफवा पिकवतात. "
" नाही ही अफवा नाही. आत्ता नेहा स्वत: येऊन गेली. तिनेच सांगीतले."
" काय ? तिनेच सांगीतले? "
" हो. आणि बाबांनीच ते ऑपरेशन केले होते. तिचे नाव त्यांना माहीती नव्हते. पण फोटो आणि प्रत्यक्ष पाहील्यावर खात्री पटली. "
" हो बाबा? " विजय संभ्रमात.
" खर आहे रे. मुलगी कशी सर्व गुण संपन्न आहे. स्वत:च ही गोष्ट सांगण्याइतकी ती प्रामाणिक आणि निर्भिडही आहे. तिच्या म्हणण्यानुसार "मोहाच्या एका क्षणाच्याकरता मी बरेच सोसले आहे. मला पुर्ण कल्पना आहे की तुम्ही मला हे कळल्यावर पुर्ण नकार देणार. " अशी मुलगी सापडणे खरेच कठीण आहे "
विजय अजुनच संभ्रमात पड्ला. आम्ही दोघेही त्याच्याकडे बघत होतो. अचानक त्याने विचारले
" बाबा हे कधी झाले ? म्हणजे काही सांगता येईल का ? "
" साधारण तीनेक वर्षे झाली असतील. का रे ? "
मोबाईल वरुन विजयने नेहाला फोन लावला.
" नेहा ! तु असशील तशी ये ..हो हो मला माहीती आहे की तु येथे येऊन गेलीस पण तरीही लगेच ये. आणि एकटीच ये "
" अरे विजय अस कुणाही मुलीला काय बोलवतोस? " निला
" मला तिला प्रत्यक्षच विचारयचय "
नेहा येईपर्यंतचा अर्धातास फार ताणतणावाचा होता. निला तर कधी नव्हेत ढासळली होती.
" काय हो? विजय तसा तिरसट आहे. त्या बिचारीला भलतच बोलला म्हणजे"
" काळजी सोडुन दे. मला मन सांगतेय की सगळ ठीक होईल. "
नेहा आली ती थोडीशी गंभीर होउनच. ती दिसताच विजयने धावत जाउन आमच्यासमोरच नेहाला मीठीत घेतले.
" नेहा किती सोसलस ग ? आणि मला एका शब्दाने कधी कळवले नाहीस. "
नेहाला जोरात रडु फुटले होते. विजयच्या कुशीत शिरुन ती हुंदके देत होती. या नाट्याकडे आम्ही दोघेही पहातच होतो.
" आई बाबा. मीच त्याला जबाबदार आहे. आम्ही दोघेही एकमेकांना आवडत होतो. एकत्र फ़िरत होतो. दोघेही घरी सांगणार तेवढ्यात माझे अमेरिकेला जायचे ठरले. मला कुठल्याही बंधनात अड्कवण्याची नेहाची ईच्छा नव्हती. त्यामुळे तिने वाङ्गनिश्चयला नकार दिला. मी परत आल्यावर जर माझ्या भावना तशाच असल्या तर एकत्र यावे असे तिचे म्हणणे होते. त्यावेळच्या एका क्षणाचे पुढे एवढे होईल हे मला माहीत नव्हते. "
निला तरातरा उठली आणि धावतच त्या दोघांकडे गेली. तिला अशी रागावलेली मी प्रथमच पहात होतो. निलाने नेहाला खस्सकन ओढुन आपल्या मीठीत घेतले. रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता.
" विजय तुला नेहा कधी कळलीच नाही. आज माझ्या नजरेतुन पार उतरलास. तुझ्या बाबांनी हे कळल्यावर सुद्धा होकार द्यायचा मनाचा मोठेपणा दाखवला. नेहा तर माझ्या नजरेत उत्तुंगच ठरली. तिने अवाक्षरानेही कधी तुझे नाव घेतले नाही. तुलाही तिने कळवले नाही कारण तु ह्या गोष्टीने अड्कावास असे तिला वाटत नव्हते. तु मात्र तिच्यावर अविश्वास दाखवलास. ज्या क्षणी तु बाबांना कधी हा प्रश्न केलास त्याच क्षणी तुझी किम्मत शुन्य झाली. शैलेश सावरकरांना फोन कर आणि सांग की आजपासुन नेहा आमची मुलगी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आधीही टाकलीय साडेपाच वर्षांपूर्वी. त्यातल्या काही भाग लोकांना बदलून हवा होता. २०१२ ची कथा संपादन होत नसल्यामुळे हा उपद्व्याप

छान कथा.

हो तेव्हा पण वाचली आणी आत्त पण.

छान कथा.
हो तेव्हा पण वाचली आणी आत्ता पण. >>> +१

निला , ईशा विजय, आई सर्वांच्याच चेहऱ्यावर छान सुन मिळत असल्याचे भाव दिसत होते. >> ह्यातले विजयचे नाव काढा.

मस्त कथा आहे.

एक शंका - नेहाने जी ही सासर्‍याला आपला गर्भपात झालाय म्हणायची हिंमत दाखवली ते त्यांच्याच मुलापासून असल्याने दाखवली, जर दुसराच कोणी असता तर दाखवली असती का?

काहीही कथा आहे.
तिला बघुन लग्नाची बोलणी होईपर्यंत विजयने तिला ओळख दाखवली का नाही? दोघांमधे काही बोलण्म वैगेरे झालं नाही?
आणि विजयला अचानक आठवलं का की आपलं असं झालं होतं ते?

शैलेशला सगळं माहित असुन / मुलीने सगळं सांगुनही तो तिला सुन करुन घ्यायचा निर्ण्य घेतो इतपतच असती तरी छानच होतं की. उगीच विजयची आणि तिची ओळख होती , मैत्री होती (जी शेवटी अचानकच आठव्ली असं वाटतंय) आणि ते विजयचंच मुल होतं अशा शेवटाची गरज नव्हती.

पुरुषी अहंकाराची कथा वाटते... अशा मुलीला होकार द्यायचा कि नाही... अशी म्हणजे कशी?

निसर्गाने मातृत्व स्त्री ला दिले आहे पण पुरुषांच्या सहभागाशिवाय मी आई होऊ शकत नाही म्हणजेच जितकी ती जबाबदार आहे तितका तो ही... पण ईथे निर्णयात त्याच्याबद्दल काही ऊहापोह केला गेला नाही. मुलीने सांभाळावे, किती गोष्टीतुन हेच ठसवणार आहेत, देव जाणे.. लग्न ही अत्यंत खाजगी बाब आहे. यात खरतर आईवडिलांना ही निर्णयात स्थान असु नये. पण ईथेतर अनोळखी असण्याचे नाटक केले त्यांच्यासाठी.. याचे प्रयोजन कळले नाही.

आधी वाचली होती तेव्हा नव्हती आवडली, काय बदल केला बघायला आता ही वाचली तर ही सुद्धा नाही आवडली.

Submitted by सस्मित on 2 November, 2017 - 10:28 >> + १११११११११

शैलेशला सगळं माहित असुन / मुलीने सगळं सांगुनही तो तिला सुन करुन घ्यायचा निर्ण्य घेतो इतपतच असती तरी छानच होतं की. उगीच विजयची आणि तिची ओळख होती , मैत्री होती (जी शेवटी अचानकच आठव्ली असं वाटतंय) आणि ते विजयचंच मुल होतं अशा शेवटाची गरज नव्हती. >>>
मलाही असंच वाटलं.

शैलेशला सगळं माहित असुन / मुलीने सगळं सांगुनही तो तिला सुन करुन घ्यायचा निर्ण्य घेतो इतपतच असती तरी छानच होतं की. उगीच विजयची आणि तिची ओळख होती , मैत्री होती (जी शेवटी अचानकच आठव्ली असं वाटतंय) आणि ते विजयचंच मुल होतं अशा शेवटाची गरज नव्हती. >>> +१
उलट शैलेशने निर्णय घेण्यापेक्षा नेहाने विजयला सत्य सांगून त्याने तो निर्णय घेतला असता तर जास्त आवडली असती. शेवटी नेहा आणि विजय यांना एकत्र संसार करायचा आहे, शैलेश काय ठरवेल त्याला फारसे महत्व नाही.

Chan ahe
Pan shailesh chya bhutkalacha ani mul kathecha kahi samband nahi. Bhutkal sangun katha ugich vadhavliye