भूताचं लचांड...हॅलोविननिम्मित!!!

Submitted by स्वप्नील on 31 October, 2017 - 20:54

भूताचं लचांड...हॅलोविननिम्मित!!!

"ठक...ठक……..ठक...ठक".....
लोखंडी दाराच्या कडीचा आवाज ऐकताच नील दाराकडे धावला. दार उघडून पाहिलं तर समोर वडील आणि त्यांच्या सोबत आजोबा. नील खूप खुश झाला. आजोबांचा थरथरता डावा हात अलगद धरत, त्यांच्या उजव्या हातातल्या काठीच्या चालण्याचा ठेका ओळखत त्यांना हळू हळू चालवत तो घरात शिरला आणि त्यांना पलंगावर बसवून त्यांच्या पाया पडला. त्याचे भाऊ-बहिणही त्या सोपास्काराला सामील झाले. आजोबांनी नातवांचा मुका घेतला आणि पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या असलेल्या नीलच्या आई कडून ग्लास घेत "जय हरी" म्हणत पाण्याचा एक घोट घेतला. आई "मामंजी पाया पडते" म्हणून वाकली आणि त्यांनी "सुखी राहा" बोलून तिला आशीर्वाद दिला.

पुंजाबाबा म्हणजेच नीलचे आजोबा यांनी आयुष्यातला मोठा काळ मंजूरला शेती करण्यात आणि कुटुंबाला सक्षम बनवण्यात घालविला. एका रांगड्या शेतकऱ्याचं व्यक्तिमत्व जसं असावं तसे त्याला ते साजेशे होते. शिक्षणशिवाय पर्याय नाही. माणूस त्यानेच शहाणा होतो हे त्याचं ठाम मत. ते कधी शाळेत गेले नाही पण आयुष्याच्या शाळेत जाऊन त्यांनी प्रचंड ज्ञानसाठा जमवून ठेवलेला. नीलला आजोबांकडून या गोष्टी, गावातले किस्से, वडिलांचे लहानपणाचे पराक्रम, खडतरीचे दिवस वगैरे ऐकायला भरपूर आवडायचं.

जेवणं झाली. मुलांनी आजोबांना गोष्टी सांगायचा हट्ट केला पण वडिलांनी "ते थकलेत. त्यांना आता झोपू द्या" सांगत हिरमोड केला. पण पुढचे दोन-तीन आठवडे आजोबा आहेत हे ओळखून मुलांनी थोडा धीर धरला आणि सगळे झोपी गेले.
....
"जागते रहो.......फुर्रर्रर्र.......जागते रहो.......फुर्रर्रर्र.......". रात्रीचे दोन वाजलेले. बाहेर काळाकुट्ट अंधार. चौक गाढ झोपलेला. गुरखा शिट्टी वाजवून आवाज देत रात्रीची पाळत ठेवून फिरत होता. त्याच्या आवाजाने चौकातली कुत्री हा नेहमीचा गुरखा आहे हे माहित असूनही भुंकू लागली आणि रात्रीच्या चिडीचूप शांततेत झालेल्या आवाजाने नील जागा झाला. थोडं भानावर येताच गुरखा आपल्या घराशेजारूनच चाललाय हे त्याच्या वाढत जाणाऱ्या आवाजाने जाणवलं आणि आपली लघुशंकेचीही वेळ जुळून आली याचा नीलला संकेत मिळाला. पण ती लघुशंका मिटवण्याचं त्याने टाळलं आणि चादर डोक्यावर पांघरून तो झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला.

रात्रीच्या दोन ते तीनच्या वेळेस आलेल्या जागेने नील नेहमी अस्वस्थ व्हायचा. त्याला दोन कारणं होती - पहिलं कारण म्हणजे रात्री दोन वाजता येणारा नेपाळी गुरखा. तो नेमका कोण आहे आणि कसा दिसतो हे बघण्याची पण कधीही अमलात न आणलेली त्याची उत्सुकता. तसं दर महिन्याला तो गुरखा पैसे घ्यायला यायचा तेव्हा नीलचं एक मन त्याला बघत 'कशावरून हाच येतो रात्री' आणि दुसरं मन 'जर हा येत असेल तर या मनुष्याला थोर पदवी द्यावी' वगैरे विचार करत असे. दुसरं आणि भयानक कारण म्हणजे चौकात राहत असलेल्या जीवनचे वडील रात्री तीनला वारले ती घटना. त्याच्या आईवर नवरा गेल्याचा भरपूर परिणाम झालेला. ती बऱ्याचदा सांगायची "जीवनचे वडील रात्री तीनला दार वाजवतात. मी दार उघडलं तर दारावर कोण नसतं पण बाहेर जिन्यावर पाहिलं तर ते बसलेले असतात. मी त्यांना घरात या म्हणते पण ते निघून जातात". या दोन्ही घटनेचा धसका नीलने बराच काळ घेऊन ठेवलेला.
....
सकाळ झाली. आजोबांच्या सकाळच्या कृष्ण भजनांनी घर बुडून गेलं होतं. नील त्या प्रसन्न आवाजाने उठला आणि आजोबांना बघत बसला. तेवढ्यात बाहेरून काही तरी गडबड ऐकू आली. तो उठला आणि दारापाशी गेला तर चौकातले सगळे वळवींच्या दाराबाहेर उभे आणि वळवी मोठ्यांनी काहीतरी बोलत होते. नील त्या घोळक्यात जाऊन उभा राहिला आणि वळवी मोठ्यांनी "अरे गंग्या, मला माहितीये कुणीतरी येतं इथे रात्री" असं म्हणत होते. नील तो गोंधळ बघून मित्रांकडे गेला आणि थोडी डिटेक्टीवगिरी करून त्याला कळलं कि गेले काही रात्रं कोणीतरी वळवींच्या बजाज चेतक स्कुटरवर पांढऱ्या कपड्यात बसतंय आणि घाबरून त्यांनी आज सकाळी आकांडतांडव उभा केला.

वळवी मोठ्यांनी म्हणाले "काहीतरी भूताप्रेताची भानगड दिसतेय". तेवढ्यात थोरात म्हणाले "अहो वळवी, एवढे शिकलात तुम्ही. असं काही पण काय बोलता". वळवी म्हणाले "मग, तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते?” थोरात परत म्हणाले "नाही माहिती पण शोधूया आपण" आणि आम्हा मुलांकडे बघत "ए पोरांनो, नीट ऐका. आज दुपारी झोप काढून घ्या. रात्रपाळी आहे. बॅट, स्टंप घेऊन या. बघू साला कोण आहे ते". तेवढ्यात बंडूचे वडील म्हणाले "हो, शोधूनच काढू. घोळक्याने जाऊ. साला कोण काय वाकडं करतं ते बघू". सगळा चौक वळवींना मदत करतोय हे बघून ते खुश झाले आणि जणू काही स्कुटर भुताने मंतरलेली आहे हे समजून रिक्षा करून कामाला गेले. मात्र मोठ्यांचा हा भयानक प्लॅन ऐकून नील आणि त्याच्या मित्रांची हवा टाईट झाली. ते एकमेकांकडे बघत ‘आपल्याला आता काही बोलण्याची सोय नाही आणि ये नैय्या अब पार लगानीच पडेगी' एवढंच ओळखून स्थिर उभे राहिले.

दुपारची वेळ. आजोबा जेवण करून दारातील उंबराच्या सावलीत निवांत बसले होते. नील त्यांच्या कडे गेला आणि उत्सुकतेने म्हणाला "आजोबा, भूतं खरी असतात का?" आजोबा म्हणाले "असत्यात कि. गावाला लय असायची. रातीला शेतात फिरायची. माणसांच्या मागं बी लागायची आणि माणसं घाबरून ढुंगनाला पाय लावत पळत सुटायची". नील हे ऐकून गार पडला आणि त्याचा चेहरा बघून आजोबा हसत म्हणाले "आरं पोरा, भूतं बीतं नसत्यात. फक्त देव असतोय. हे भूताचं लचांड मानसानं बनावलं. आन मंग लिंबू काप, मिरच्या लाव अशा बारा भानगडी काढून पैका कमावलं". हे ऐकून नीलचा जीव भांड्यात पडला आणि तो स्थिर झाला. आजोबानी उत्सुकतेने विचारलं "तुला काय रं करायचं भुताचं?" नीलने आजोबाना वळवींच्या स्कुटरची गोष्ट आणि रात्रीचा प्लॅन सांगितला. ते ऐकून आजोबा हसू लागले आणि म्हणाले "च्यायला, मला वाटलं फक्त गावातलं लोक भुतांच्या नादात खुळी झालियात पण इथं तुमि बी." आणि वैतागून "हाट, काय उपयोग नाय पुस्तकं शिकून तुमचा. म्या सांगतो, काय बी गावणार नाय तुमाला. सगळं फुसकं निघल बघ. आरं मानुसच भूत होऊन बोकांडी बसतंय आज काल. खरं भुतं बी घाबरन तुमाला". नीलचा गोंधळ अजूनच वाढला पण रात्रपाळीचा विडा त्यांनी आधीच उचललेला म्हणून त्यातून सुटका होणं अशक्य होतं हे ओळखून तो रात्रपाळीची झोप काढायला घरात गेला.

रात्रीची जेवणं झाली. नील घरातून बाहेर पडत होता तेवढ्यात आई "तू जास्त पुढे पुढे करू नकोस" असं म्हणाली. पण तिने सांगितलं नसतं तरीही आपण तसेच करणार होतो हा मनातला निश्चय आईने बरा ओळखला हे समजून तो खुश झाला. आजोबा जाता जाता "काय बी नाय गावणार" म्हणाले आणि नील "तुमचं बोलणं खरं हो" असं बोलून निघाला. चौकातल्या सगळ्यांनी मिळून जंगी प्लॅन आखला. चार पोरांसोबत एक मोठा माणूस असे सगळे चौकात जागोजागी लपून राहणार. जर काही दिसलं तर मोठ्यांनी ठरवलेल्या आवाजाच्या खुणा ओरडून सगळे एकत्र ‘त्याच्याकडे’ धावून जाणार असा प्लॅन ठरला. फिल्डिंग लागली. मध्यरात्र उलटून रात्रीचा एक वाजला. नील वळवींच्या ग्रुप मध्ये होता आणि त्यांनी कोपऱ्यातील जिन्यावर तळ ठोकला होता. त्यांची उत्कंठा ताणत होती. नील आणि मित्रांकडे बघत वळवी म्हणाले "साला आज पकडलं नं भुताला तर उद्या पेपरात बातमी छापू. चौकाचं नाव काढू" आणि मुलं 'आपण ते बघायला जिवंत राहू का नाही' याची शाश्वती नसलेला चेहरा घेऊन उभे होते. तो बघून वळवी म्हणाले "पोरांनो, घाबरू नका. फक्त त्या भुताला बघून चड्डी ओली करू नका म्हणजे झालं. आपण आहोत ना". नीलला खूप हसू आलं आणि जणू काही वळवीच जास्त घाबरलेत आणि स्वतःला सांत्वन देण्यासाठी हि बडबड करताय असं त्याला जाणवू लागलं.

...आणि तेवढ्यात सगळ्यांना चौकात कोणीतरी आत येताना दिसलं. वळवींच्या स्कुटरच्या दिशेने तोंड करून आड जागी बसलेल्या गॅंगला अंधाऱ्या रात्री दिसणं जरा कठीण जात होतं. थोड्या वेळाने 'ती' प्रतिकृती स्पष्ट दिसू लागली आणि वळवी मुलांना "आलं वाटतं. तयार राहा" बोलून सज्ज झाले. सगळे मिटमिटल्या डोळ्यांनी बघू लागले आणि खरंच कोणीतरी पांढऱ्या कपड्यात होतं आणि वाकड्या-तिकड्या चालीने चालत वळवींच्या स्कुटरवर जाऊन बसलं. चार ग्रुपमध्ये तळ ठोकून बसलेल्यांपैकी एकही जण आवाज देत नाही हे बघून वळवी चिडले आणि "काय सटारली का सगळ्यांची?" बोलून "याsssss" असं जोरात ओरडत स्कुटरच्या दिशेने धावू लागले. त्यांचा आवाज ऐकताच उरलेले सगळे धावून आले. चौकातला मोठा हॅलोजन लाईट लागला आणि पाहतात तर बाजूच्या चौकातला राना बेवडा पांढऱ्या कपड्यात फुल टाईट होऊन स्कुटरवर दोन्ही हात हँडलवर ठेऊन बसलेला!!! एवढ्या मोठ्या जमावाला अंगावर येताना बघून तो घाबरला आणि जमिनीवर पडला. हे भूत नसून राना बेवडा आहे बघून वळवी प्रचंड खवळले आणि त्याला झोडु लागले. चौकातल्या इतर मोठ्या माणसांनीही आपला हात साफ करून घेतला. नील आणि त्याचे मित्र हे सगळं बघून अवाक पडले.

या संपूर्ण प्रकरणात रात्रीचे दोन वाजले आणि "जागते रहो....फुर्रर्रर्रर्र” म्हणत गुरखा चौकात शिरला. नीलच्या एवढ्या दिवसांच्या उत्सुकतेचा निकाल आज लागणार होता. अंधारातून हॅलोजनच्या प्रकाशात गुरखा जसा पुढे येत होता तसं त्याला तो स्पष्ट दिसू लागला आणि हा तोच माणूस आहे जो दर महिन्याला पैसे नेतो हे ओळखून नीलने निश्वास सोडला. त्याच्या मनात त्या गुरख्याबद्दलचा आदर अजून वाढला आणि त्याने 'थोर' हि पदवी अखेर मनातल्या मनात त्याला बहाल केली. गुरखा जवळ येऊन रानाला चोपलेल्या अवस्थेत बघून म्हणाला "क्या हो गया साहब?” वळवी त्याच्यावर चिडले आणि म्हणाले "क्या रे, तुमको दिखता नही ये रात को मेरे स्कुटरपे बसता है? साला हमको घाबरया ना कि भूत-बीत है". गुरखा हसला आणि म्हणाला "साहब, ये ऐसाच है. मैने इसको बहोत बार बोला पर ये सुनताच नहीं. मेरे को बोला उसकी बीवी दो महिने पेहले गुजरी. उसने बीवी को एक दिन स्कुटर पे बिठाने का वादा किया था लेकिन उसके पेहलेच वो मरी. अब रोज रात को दारू पीकर ये स्कुटरपे बैठके उसको घुमाने का नाटक करता है. टेन्शन मत लो साब वो थोडीही देर बैठता है और चला जाता है". गुरख्याचं हे ऐकून सगळे निःशब्द झाले. भरपूर मार खाल्लेला राना कळवळत जमिनीवर पडला होता. त्याच्या पांढऱ्या कपड्यावर रक्ताचे आणि मातीचे डाग होते. मोठ्या माणसांनी त्याला उचललं, पाणी पाजलं, मलमपट्टी केली आणि घरी नेऊन सोडलं.

त्याला घरी नेताना नीलला आजोबानी सांगितलेलं "आरं मानुसच भूत होऊन बोकांडी बसतंय आज काल. खरं भुत बी घाबरन तुमाला" हे प्रकर्षाने आठवलं. राना परिस्थितिकारण गमावलेल्या बायकोची आठवण म्हणून 'माणसासारखा' त्या स्कुटरवर बसला आणि आम्ही 'भुतासारखा' त्याचा छळ केला असा समज करून नील निराश झाला आणि स्वतःबद्दलचा द्वेष करत घरी निघाला.

थोड्या वेळाने तीन वाजणार होते. नील झोपताना जीवनची आई आता कदाचित तिच्या नवऱ्याच्या आठवणीपोटी बाहेर येईल आणि "अहो घरात या" असं दोन अश्रू गाळून म्हणेल अशी कल्पना करू लागला. झोपलेल्या आजोबांना बघत त्यांच्या पायाला हात लावून ते पण किती 'थोर' आहेत वगैरे मनात बोलून त्यांनी शाळेत न जाऊनही माणुसकीच्या ज्ञानाचा किती मोठा साठा जमवला याचा त्याला हेवा वाटू लागला आणि आपल्याला तो धडा कसा शिकता येईल याचा विचार करत सकाळच्या कृष्ण भजनांची वाट बघत तो झोपी गेला.

- स्वप्निल पगारे

Group content visibility: 
Use group defaults

परिस्थितिकारण गमावलेल्या बायकोची आठवण म्हणून 'माणसासारखा' त्या स्कुटरवर बसला आणि आम्ही 'भुतासारखा' त्याचा छळ केला>> खुपच छान लिहिलं आहे..

मस्तच लिहीले आहे.
Detailing चांगले असते तुमच्या गोष्टिमधे.
सगळा प्रसंग डोळ्यापुढे उभा रहातो.