दरवाजा २

Submitted by अविनाश जोशी on 27 October, 2017 - 06:31

दरवाजा २
-९-
“एक मात्र झाले कि त्या दिवसापासून सुहास ला मुली सांगून यायच्या बंद झाल्या.”
अजून काही दिवस गेले आणि एक दिवस वाडीवरचा बजाबा कुडाळला आला. वाडीवर सर्व कळलेच होते आणि प्रत्येकजण आम्हाला कशी मदत करता येईल ते पाहत होता. तो आल्यावर म्हणाला
“ मालक तुम्ही तिघेही झारापला येऊन का राहत नाही. परिसरही बदलेल आणि तिथे दिवसागतीची कामेही बरीच असतात त्यामुळे तुमचा आणि छोट्या मालकांचा वेळ कसा जाईल हे कळणार सुद्धा नाही. आणि छोटे मालक भरपूर शेतीतील शिकून आले आहेत त्यांची प्रयोग करण्याची इच्छाही पूर्ण होईल.” बजाबा
“ कल्पना काही वाईट नाही” मी
सुहास आमच्याकडे लक्ष नाही असे दाखवत होता पण त्याचे कान मात्र आमच्याकडेच लागले होते.
“ काय रे सुहास जायचं का झाराप ला ?” मी
“ जाऊया पण तिघे नाही मी एकटाच” सुहास
“ हे बघा बाबा तुम्ही दोघेही थकलेले आहात. तुमचे वय आता स्वस्थ बसण्याचे आहे. मी अजून तरुण आहे, मानसिक व शारीरिकरित्या सक्षम आहे आणि सर्व गडी माणसं आपलीच आहेत ती तर केव्हाही मदतीला धावून येतील. माझे काहीही हाल होणार नाहीत” सुहास
“ ठीक आहे आपण तिघे झारापला जाऊ. दोन तीन दिवसात तुझी सर्व सोय लावल्यावर आम्ही परत येऊ.”
” ठीक आहे” सुहास

- मामा -
दुसऱ्या दिवशी मी, मंदा आणि सुहास दोन गाड्या घेऊन झारापला निघालो. एक गाडी तिथेच ठेवायचा विचार होता.
आम्ही येणार ही वार्ता वाडीवर कळल्यामुळे पंधरा-वीस गडी माणसं वाड्यावर येऊन साफ- सफाई करू लागली.
बऱ्याच दिवसात कोणाचेच वास्तव्य नसल्याने गढीवर धुळीचे साम्राज्य होते.
गढीच्या दहा - पंधरा खोल्या कायमच्याच बंद होत्या. उरलेल्या सात -आठ खोल्यामध्ये किचन, डायनींग हॉल, दोन मोठे सीटिंग हॉल व बेडरूम अश्या लख्ख स्वछ करून घेतल्या.
त्या दिवशी सकाळी व संध्याकाळी वाडीवरूनच जेवण आलं होत. मंदानं किचनचा ताबा घेतला. सुहासला लागणाऱ्या वस्तूची यादी झाली. फ्रीझ स्वछ करून सुरु केला आणि ड्रायव्हरकडे सामानाची यादी देऊन त्याला कुडाळला सामान आणायला पाठवलं.
गड्याच्या मदतीने शौचालय, न्हाणीघर तपासून सर्व चालू आहे याची खात्री केली.
किचन मध्ये आणि गॅस गिझरला सिलेंडर आहे हे बघितलं. बेड कव्हर्स, सोफा कव्हर्स, बेडशीट सगळं कस लख्ख केलं.
सुहास ला कसलीही कमतरता भासू नये याची आम्ही काळजी घेत होतो. एक -एक सामान आल्यामुळे किचन आणि इतर खोल्या राहण्यायोग्य झाल्या.
वाड्यावरचा फोन चालू करून घेतला. घरकामाकरिता आणि वाड्यातच राहण्यासाठी दोन गड्यांची आणि स्वंयपाक व धुण्याभांड्यासाठी एका बाईची नेमणूक केली. एवढे होऊनही मनात शंका येत होत्या.
माझी फेरी आठवड्यातून एक -दोनदा असणारच होती आणि कुडाळ अर्ध्यातासावरच असल्यामुळे गडीमाणूस कधीही येऊ शकत होता. एक गाडी वाड्यावरच ठेवायची हे आधीपासूनच ठरलं होत. स्टेशनजवळ पेट्रोल पंप ही होता. तसेच नवीन स्टेट बँक ही सुरु झाली होती. त्यात सुहासचे खाते उघडून पैशाची व्यवस्था केली. अडचणीच्या वेळी मी कुडाळवरुन केव्हाही पैसे पाठवू शकत होतो. दोन तीन दिवस थांबून सर्व व्यवस्थित आहे हे पाहून आंम्ही कुडाळला परत निघालो.
“ सुहास अजून कसलीही गरज असेल तर मनमोकळेपणाने सांग” बाबा
“ नाही बाबा जे आहे तेच भरपूर आहे आणि आता मला एकट्यानेच राहायची सवय करायला पाहिजे.” सुहास
“ बरं आम्ही निघतो अजूनकाही लागलं तर फोन कर” बाबा
“ बाबा अजून एक विचारायचे होते. मी लहानपणापासून बघतो आहे बऱ्याच खोल्याना कुलपं आहेत. असे काय आहे कि ती बंद ठेवली आहेत.” सुहास
“ खास असं काही कारण नाही पण आता तू बघशीलाच ह्या पाच -सहा खोल्याच नीट ठेवता ठेवता तुला दोन -तीन गडीमाणस पुरणार नाहीत. चाळीस -पन्नास वर्षांपूर्वी आई बाबा होते, तुझे काका तसेच आईच्या माहेरची माणसं ये-जा करत असायचे. मे मध्ये तर घर भरलेलं असायचं. मग हळूहळू सर्व कमी झालं आणि खोल्या बंद झाल्या.” बाबा
“ बाबा मला वाटत आता मला भरपूर वेळ आहे तर एक एक खोली उघडून साफ -सफाई करून घावी म्हणजे माझा ही वेळ जाईल आणि स्वच्छता ही होईल” सुहास
“ काहीच हरकत नाही” बाबा
“ पण बाबा किल्ल्या कुठे आहेत ?” सुहास
“ तुला शोधाव्याच लागतील. त्या दोन खोल्यातील दहा - बारा कपाट आहेत त्यातल्या एका कपाटात पितळेच्या डब्यात किल्ल्या असतील. प्रत्येक किल्लीच्या मागे कुलुपाचा नंबर चिटकवाला आहे त्यामुळे तुला किल्ल्या शोधाव्या लागणार नाहीत आणि हो त्यापूर्वी सगळ्या कुलुपांना, कड्याना एकदा तेल घालून घे. सगळंच जुन्याकाळच पितळेच असल्यामुळे गंजण्याची शक्यता नाही” बाबा
“ ठीक आहे बाबा तुम्ही निघा” सुहास
सुहास आम्हाला पोचवायला गाडीपर्यंत आला होता. काहीतरी करावे असे त्याला प्रथमच वाटू लागले होते. मी देवाचे आभार मानून तेथून निघालो.

-१०-
-सुहास-
झाराप ला आल्यावर माझ्या मनावरची मरगळ दूर झाली होती.
वाडी वरचा प्रत्येकजण येऊन कामासंबंधी माहिती देत होता आणि काय काय करायचे विचारात होता. त्यामध्ये दिवस कसा गेला हेच कळले नाही.
घरकामासाठी ठेवलेल्या काशीने धुणीभांडी आटोपली होती आणि ती संघ्याकाळी परत जेवण करायला आली.
“ अग काशी दोनदा कशाला हेलपाटे मारतेस, संध्याकाळचे जेवण सकाळीच करून ठेवत जा” मी
“ असंकस दादानूं. सायचं काय गारढोण खाणार का? असं काय बी खाऊन तुमची तब्येत खराब झाली तर वरचा बाप्पा आणि कुडाळचाआप्पा दोघही मलाच बोल लावतील. ते काय नाय सकाळ संध्याकाळ तुम्हाला गरम गरम जेवणच वाढणार, सकाळी न्याहारी सुद्धा करून देणार” काशी
काशी मोठी बोलघेवडी होती आणि कोकणातील कुणबी बायका स्वछ आणि चटपटीत असतात. त्यांना भोंगळपणा खपतच नाही. आणि एकूणच जगणं कष्टाचं त्यामुळे कष्ट करायला ही त्या मागे पुढे पाहत नाही.
काशीच्या हातच्या जेवणाला चवही छान होती. त्यामुळे तब्येत खालावण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त होती.
संध्याकाळचे जेवण झाले आणि काशी सगळी कामं उरकून निघून गेली. वाड्यावरचे दोन्ही गडी सर्व खिडक्या दारे लावून घेऊन ओसरीत झोपले. नऊच वाजले होते त्यामुळे मला झोप आली नव्हती.
हॉलमध्ये जाऊन मी टी व्ही पाहत बसलो. अर्थातच कार्यक्रमात माझे लक्ष लागत नव्हते. आणि दिवसभर विसर पडलेल्या नी च्या आठवणीने मनात कल्लोळ उठला होता. लाडाने मी सुहासिनीला 'नी' म्हणत होतो. आणि ती मला ' स' म्हणत होती. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे नाव सनी ठेवले होते.
पूर्ण दिवस कामाच्या गडबडीत गेला होता तिच्याच आठवणीत मी टी व्ही समोरच झोपून गेलो.
जाग आली ती गड्याच्या उठवण्याने. उठल्या उठल्या चहाचा कप घेऊन काशी उभीच होती.
“ दादानूं उठा, मला मावशींनी सांगितलंय तुम्हाला उठल्या उठल्या चहा लागतो म्हणून. चहा घ्या, आवरा तोपर्यंत मी न्याहरी करते” काशी

तिला नकार द्यायच्या अगोदर ती निघून गेली होती. मग मुकाट्याने चहा प्यायला आणि अंघोळीला गेलो. अंघोळ करून कपडे घालेपर्यंत काशीने गरमागरम पोहे आणि भाजणीचे वडे केले होते. त्यावर ताव मारला आणि बाहेर येऊन बसलो.
दोन्ही गडी पण आवरून आले होते. त्यांना कुलपं लावलेली सर्व दारं बघायला सांगितली आणि त्या कुलपांना, कडीला, बिजागरीला तेल घालायला सांगितले. काशीही सगळं आवरून आली.
आणि मला म्हणाली 'जेवायला काय करायचं?
“ काशे सकाळीच एवढं झालाय कि अजून दोन तीन दिवस मी जेवणार नाही”
“ असंकस वाडीवर जाऊन या आपसूकच भूक लागेल. काय करायचं तेवढं सांगा.” काशी
“ तुला काय हवं असेल ते कर.”
“ मग सकाळच्या वड्याचं पीठ आहे, छान झणझणीत कोंबडीचा रस्सा करते” काशी
काशी निघून गेली आणि मी एका गड्याला बरोबर घेऊन वाडीवर चक्कर मारायला गेलो.
वाडीवर फिरताना असं लक्षात आलं की अडाणीपणा मुळे उत्त्पन्न कमी येत आहे. आणि ते थोड्याशा प्रयत्नांनी दुप्पट तिप्पट करता येईल. त्यामध्ये त्या गड्यांचा काही दोष नव्हता. त्यांना कोणी शिकवलंच नव्हतं.
माझ्या मनाशी मी कार्यक्रम आखून ठेवला. रोज सकाळी आठच्या आत न्याहारी उरकून गड्यांबरोबर वाडीचा आढावा घ्यायचा. एक वाजता गढीवर गेल्यावर अंघोळ करायची, जेवायचं आणि थोडी विश्रांती घ्यायची.
त्यानंतर संध्याकाळपर्यंत वाचन आणि गढीवरची कामं करायची. त्यादिवशी एक वाजता गढीवर पोहचलो तेव्हा चांगलीच भूक लागली होती. किचनमधून रश्याचा घमघमाट येत होता. जेवताना भुरके मारत कोंबडीवडा आणि रस्सा भात खाल्ला. साहजिकच जेवणानंतर डोळ्यावर पेंग येऊ लागला. छान पैकी एक दीड तास झोप काढली. चहा घेतला आणि गड्याना बोलाविले. सकाळीच गड्यानी सर्व दाराच्या कड्या कुलुपांना तेल घातले होते.
“ मालक एकंदर सोळा दरवाज्यांना कुलपं आहेत पण त्याच्या किल्ल्या कुठे आहेत.” गडी
कपाटातून किल्ल्या शोधायच्या म्हणजे दिव्यच होत. दोन्ही हॉल मिळून दहा बारा तरी कपाटं होती. त्यात काय भरलं होत हे सांगणं अवघडच होत.
दोन्ही गड्याना मदतीला घेऊन एक एक कपाटं शोधायला सुरवात केली. जुनी मासिकं, पंचांग, कॅलेंडर, कपडे, मुलांची खेळणी अशा विविध वस्तुंनी कपाटं भरली होती. आता या सामानात टाकून देणं आणि ठेवणं असे दोन भाग करणे आवश्यक होते. दोन तीन कपाटं आवरण्यातच तीन तास कसे गेले हे कळलंच नाही. बराच कचरा जमा झाला होता. गड्याना सांगून तो ज्याला हवा असेल त्याला देऊन टाकायला सांगितलं.
त्या दिवशी मात्र छान झोप लागली. म्हणजे मी 'नी' ला विसरायला लागलो होतो का?
तिसऱ्या दिवशीही अशीच पुनरावृत्ती झाली. तीन चार कपाटं सोडली तर सर्व कपाटं बघून झाली होती. एक कपाटं मात्र विचित्रच होत. म्हणजे कपाटाला दारं होत पण आत कपाटं नव्हतं. कपाटच कोणीतरी विटा लावून बंद केलं होत. आणि छानपैकी प्लास्टर लावून त्यावर गणपतीचे अतिशय सुंदर असं भव्य चित्र बसवलं होत. पुढच्या दिवशी बाबा आले. मला कामात व्यस्त पाहून आणि माझ्या मनोवृत्तीत झालेला बदल पाहून त्यांना आनंद झाला.
“काय सुहास कस काय काम चालू आहे ?” बाबा
“छान चाललंय मी स्वतःला बिझी ठेवत असतो” सुहास
“हो बजाबा सांगत होता की, तू रोज चार पाच तास बागायतीत घालवतोस. बऱ्याच सुधारणा हाती घेतल्या आहेत.” बाबा
“हो बाबा, हे काशी आणि गडी एवढी काळजी घेतात की मला वाटते माझे वजन महिन्याभरात दहा किलोंनी तरी वाढेल.” सुहास
“बरं तुझं ते खोल्या साफ करणं कुठं पर्यंत आलय?” बाबा
“अजून किल्ल्याच सापडल्या नाहीत. नाही म्हणायला दहा कपाटं मात्र साफ झाली. एका कपाटात तर मला अतिशय सुंदर चित्र सापडले.” सुहास
“किल्ल्या सापडल्या नाहीत?” बाबा
“नाही ना. अजून तीन चार कपाटं बघायची आहेत. पण दुसरीच एक गंमत सापडली” सुहास
“काय? बाबा
“हे गणपतीचे सुंदर चित्र. कुणी काढलं असेल?” सुहास
“अरे हे चित्र तर तुझ्या काकांनी गावातल्याच गणपतीच्या मूर्तिकाराकडून रेखाटून घेतले आणि इथे बसवलं. अर्थातच चित्र खराब होऊनये म्हणून दाराच्या मागे बसवलं. बरं आज मी इथेच राहणार आहे. बघू काशी कसा स्वयंपाक करते.” बाबा
त्या दिवशी बाबाना मी वाडीवर घेऊन गेलो आणि संध्याकाळी काशीच्या हातचे सुरेख जेवण जेवत्यानंतर गप्पा मारत बसलो. गप्पाचे विषय अर्थातच शेतीविषयक, गड्यांचे प्रश्न, पैशाची व्यवस्था या बद्दलच होते.
राजकारणात किंवा एकंदरच समाजकारणात मला किंवा बाबांना फारसा रस कधीच नव्हता. आठवड्याभरात माझ्यात झालेले बदल पाहून बाबांना फारच आश्यर्य वाटले. आणि घरात गडगंज श्रीमंती असताना मी बाहेर कुठेतरी नोकरी करणं हे ही त्यांना पसंत नव्हते. दोघांनी कटाक्षाने ते विषय टाळले.
सकाळी न्याहरी करून बाबा परत कुडाळ ला गेले आणि माझा दिनक्रम सुरु झाला. दुसऱ्याच दिवशी एका कपाटात बाबानी सांगितलेला किल्ल्यांचा डबा सापडला. कुलपं जरी सोळाच असली तरी किल्ल्या मात्र बावीस होत्या. किल्ल्या सापडल्यावर उरलेली कपाटं ही आम्ही साफ सफाई करून घेतली.
किल्ल्या सोडल्यास कुठल्याच कपाटात महत्वाचे असे काहीही नव्हते. अपघात होऊन आता महिना उलटून गेला होता. पण नी च्या आठवणी मात्र मनात ठाण मांडून बसल्या होत्या.
नैनिताल, रानीखेत, डेहराडून ला घालविलेले दिवस, केलेली भटकंती, आणि डेहराडून मध्येच केलेले लग्न हे मला कधीच विसरता येणं शक्य नव्हतं. लोक लग्नानंतर हनिमूनला नैनिताल, रानीखेत, अलमोडा ला जातात तर आम्ही नैनिताल वरून मुंबईच्या उकाड्यात आणि कुडाळच्या खाऱ्या हवेत आलो होंतो.
दुसऱ्या दिवशी दोन्ही गड्याना घरातच थांबवलं. दोन प्रश्न सोडवायचे होते. या सोळा खोल्यांमध्ये काय आहे आणि उरलेल्या सहा किल्ल्या कसल्या आहेत. दुपारची विश्रांती झाल्यावर रोज खोल्या बघायचे ठरले.
पहिली खोली उघडली ती बहुतेक पाहुण्याकरिता असावी. पलंग, ड्रेसिंग टेबल आणि छोटीशी बाथरूम अशी ती छोटीखानी खोली होती. खोलीत कुबट वास होता कारण कित्येक वर्ष ती खोली उघडलीच नव्हती. आत गेल्यावर सर्व खिडक्या उघडल्या आणि गड्याला साफ साफई करायला सांगितलं.
पुढच्या दोन तीन खोल्याही अशाच प्रकारच्या होत्या. सध्या तरी या चार खोल्यांचा काहीच उपयोग नव्हता. कारण हॉल शेजारील दोन बेडरूम पाहुण्यांसाठी सुसज्ज होत्या. गणपतीच्या चित्रांच्या मागे ह्या दोन खोल्या होत्या. त्याची दारे हॉल मधूनच होती. समोरच्या भिंतीच्या मागे माझी बेडरूम होती. हेच करता करता संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही.
उत्सुकता तर भरपूर होती पण सगळ्याच खोल्या उघडण्यापेक्षा उघडलेल्या खोल्याची आधी साफ सफाई करून घ्यावी व नंतर पुढच्या खोल्या उघडावे असं ठरवलं.
पण माझे जास्त लक्ष इमारतीच्या दुरुस्तीकडे आणि व्यवस्थेकडे होते. पुढच्या दोन खोल्यात वीस पंचवीस गाद्या, तेवढीच जाजम, सतरंज्या आणि उश्या होत्या. इतक्या वर्षात कापड जीर्ण होऊन उश्यांचे नुसते कापसाचे गोळे राहिल होते. नशिबाने त्या तिन्ही खोल्या सर्व बाजूने बंद असल्यामुळे उंदीर, घुशींनी धुमाकूळ घातला नव्हता.
अशारितीने सोळापैकी सहा खोल्यांचा तपास झाला. मी गड्याना सांगून त्या तीन खोल्यातील सर्व सामान काढून ते भंगारात विकून टाकायला सांगितलं.
ह्या पहिल्या सहा खोल्यात आठ दहा दिवस गेले. पण त्या खोल्या चकचकीत झाल्या. त्याचवेळी खोल्यातील वायरिंग व प्लम्बिंग नीट आहे का ते पाहिलं व साधा पांढरा रंग देऊन टाकला आता त्या खोल्या आनंदी व उत्साही वाटू लागल्या.
गड्याना एक एक काम नेमून दिले, की त्यातील रोज एका खोलीची दारंखिडक्या उघडायची व संध्याकाळी बंद करायची त्यामुळे त्या सहा खोल्यातील वातावरण स्वछ राहील.
माझ्या डोक्यात एक फ्रुट प्रोसेसिंग युनिट ची कल्पना घोळत होती त्या करिता ह्या खोल्यांचा उपयोग झाला असता.
खर म्हणजे खोल्या उघडताना माझा वेळ जाईल तसेच त्यांचा उपयोग करता येईल अशी मला कल्पना होतीआणि उत्सुकता होती की या खोल्यांमध्ये काही रहस्य दडलेले नाही ना.
सातवी खोली मात्र वेगळीच होती एकतर त्या खोलीला आत जायचा दरवाजा सोडल्यास बाकी खिडक्या दारे काही नव्हते. खोली बंदिस्त होती. ती खोली बहुतेक कोठ्याची खोली म्हणून वापरत असावेत. आठव्या खोलीत वेताची आणि मातीची तीन मोठी बळद होती. गड्याना ती बळद काढून दोन्ही खोल्या साफ करून घ्यायला सांगितल्या.
मध्ये एक दोनदा बाबा येऊन गेले. त्यांनाही या खोल्या दाखविल्या. त्यातील पाहुण्यांसाठी असणाऱ्या खोल्या त्यांना आठवत होत्या. मी माझ्या फ्रुट प्रोसेसिंग प्रकल्पाबद्दल ही त्यांच्याशी बोललॊ आणि त्यांनी उत्साहाने संमती दर्शवली व लागेल ती मदत देण्याचे कबुल केले.
दिवस जातच होते. बारा खोल्या बघून झाल्या होत्या. कशातच काही विशेष असे नव्हते.
तेरावी खोली मात्र वेगळीच होती. एकतर ती कोपऱ्यावरची होती. अतिशय मोठी व सुस्थितीत होती. तसेच त्या खोलीतून पुढच्या खोलीत जायला एक दार होते.
तेरा चौदा ह्या जोड खोल्या होत्या. तेराव्या खोलीत जमिनीवर एक मोठे जाजम व त्याच्यावर सुंदर कार्पेट होते. भिंतीच्या तिन्ही बाजूला पुस्तकांनी भरलेली कपाटं होती.
एका कोपऱ्यात रायटिंग टेबल होत. मध्ये एक सुंदर सोफा व टी पॉय होता. पुस्तकं काचेच्या कपाटात होती. त्याला वाळवी लागू नये म्हणून मारलेला औषधांचा वास खोलीभर पसरला होता.
चौदाव्या खोलीत गेल्यावर कळले की पंधरावी खोली पण त्याला जोडलेली आहे. थोडक्यात तेरा, चौदा, पंधरा ह्या खोल्या एकमेकांना जोडलेल्या होत्या.
चौदाव्या खोलीत फोरपोस्ट बेड होत. दुसऱ्या भिंतीशी चेस्ट ऑफ ड्रावर होते. दोन्ही अस्सल शिसवी लाकडाचे आणि व्हिक्टोरियन टाइप फर्निचर होते. खोलीतच एक डुलणारी खुर्ची होती. भिंतीवर सुरेख पेंटिंग लावली होती. त्यातील एक पेंटिंग गणपतीचे होते.
तिसरी खोलीपण कपाटांनी भरून गेली होती. पण त्यातील वस्तू वेगळ्याच होत्या. या तिन्ही प्रशस्त खोल्यांचा उपयोग निश्चितच काका करत असावेत. चौदाव्या खोलीतून पंधराव्या खोलीत जायला एक दार होते. बावीस पैकी एक किल्ली त्या दाराची होती.
तिसऱ्या खोलीत एक प्रशस्त देवघर होते. देवाच्या पूजेचे सर्व साहित्य एका मांडणीत होत. तर दुसऱ्या मांडणीत रुद्राक्ष, शंख, शिंपले अशा तांत्रिक गोष्टी होत्या. पुस्तकही वेगळ्याच विषयाची म्हणजे तांत्रिक विषयावरची होती.
पहिल्या खोलीतील पुस्तक मंत्रांनी भारलेली तर पंधराव्या खोलीत कृष्णगणपती व काल भैरवाच्या मूर्ती होत्या. या दोन्ही मूर्ती तांत्रिक विदयेसाठी वापरल्या जातात.
पण बाबांच्या बोलण्यातून कधी काकांच्या तांत्रिक विद्येबद्दल काही ऐकले नव्हते. त्यामुळे मला खोल्या पाहून आश्चर्यच वाटले. वर्षानुवर्षे दारे खिडक्या जरी बंद असल्या तरी सुवासिक वस्तूचा साठा असल्यामुळे खोलीत सुगंध दरवळत होता.
सोळावी खोली खोली नसून ती दक्षिण पूर्वेकडे असलेली एक यज्ञवेदीच होती.
चार फूट बाय चार फूटचा यज्ञ कुंड खोलीच्या मध्यभागी होता. चारी बाजूनी मोझॅक टाइल्स बसवल्या होत्या. यज्ञकुंडाच्या वर धूर जाण्यासाठी एक धुराडे बसवलं होत आणि हवनाला लागणाऱ्या वस्तूंचा साठा ही होता.
वेगवेगळ्या प्रकारची लाकडे, तूप, तीळ, असे सामान होते. गंमत म्हणजे चाळीस वर्षानंतरही न वापरता ह्या खोल्या स्वच्छ होत्या. सावकाश कधीतरी त्या खोल्या बघायचे ठरवलं.
पुढच्याच आठवड्यात बाबा आले मी त्यांना या खोल्यांबद्दल विचारलं. “हो. काका त्या खोल्या वापरत होते.” बाबा
पण त्यांच्यात व काकांच्यात बरेच अंतर असल्यामुळे त्यांना काका हे निश्चितच आठवत नव्हते. ते सदैव वाचनात व पूजा अर्चनेत मग्न असायचे आणि बोलविल्याशिवाय लहान मुलांना तेथे जाण्यास बंदी घातली होती.
यज्ञवेदीच्या दक्षिण दिशेला एक मोठे दार होते. आजही तो परिसर वृक्षराज व फुलांच्या बागांनी संपंन्न होता लहानपणी त्या बागेत आई गवती चहा, तुळस, आले, पुदिना, दुर्वा अशा घरगुती वस्तूंचे वाफे लावायची.
अरे काका गेले तेव्हा आम्ही फारच लहान होतो. कोणी म्हणाले ते अपघातात गेले, कोणी म्हणाले ते हिमालयात तपसाधनेला गेले, कोणी म्हणाले ते बेपत्ता झाले. आम्हाला खरं कारण कधी समजलंच नाही आणि काकांविषयी घरात बोलायलाही बंदी होती.
“तू एक काम कर उद्या बजाबाला वाड्यावर बोलवून घे. काकांचा तो त्यावेळी मदतनीस होता. आता जरी त्याचे वय सत्तर असले तरी त्याची स्मरणशक्ती आणि अंगकाठी शाबूत आहे.” बाबा

त्यानंतर आम्ही दोघे कमाविषयीच बोलत होतो.
फ्रुट प्रोसेसिंग साठी लागणाऱ्या मशिनरीचा अभ्यास करून मी हव्या असलेल्या मशीनची एक यादी केली होती. कोकम, काजू, आंबा, नारळ अशा वेगवेगळ्या फळांचे मला प्रोसेसिंग करायचे होते.
त्याचप्रमाणे वाडीत व्हॅनिला, वेलदोडे, लवंग याचेही वेल लावायचे होते. केरळप्रमाणेच हवामान असल्यामुळे आमच्या वाडीतही हे वेल चांगले येतील असा माझा अंदाज होता त्यातून हे वेल नारळ फोफळीच्या झाडावर वाढत असल्यामुळे वेगळ्या जमिनीची गरज नव्हती.
त्याचप्रमाणे मँगोस्टीन सारखी एक्झॉटिक फळांची झाडे लावायची. या सर्वाचा खर्चाचा अंदाज साधारणपणे चाळीस लाखाच्या घरात जात होता. त्याशिवाय जागेसाठी वेगळा खर्च आला असता, मी बाबांच्या समोर हे सर्व अंदाजपत्रक ठेवलं.
“अरे ही रक्कम काही फार नाही. आपल्या एका वर्षाच्या उत्त्पन्नापेक्षा थोडी अधिक आहे एवढेच. पण काही नवीन करायला काही हरकत नाही. आता जागेचे म्हणशील तर वाड्याचा काही भाग पाडून आपण तो वापरू शकतो किंवा जमत असेल तर सोळा पैकी हव्या असंतील तेवढ्या खोल्याही तू वापरू शकतो. जरा एकदा नीट आराखडा तयार कर म्हणजे तो फायनल करू.” बाबा
“ठीक आहे. मी सर्व यंत्रसामग्रीची कोटेशन मागवतो तसेच वीज, पाणी इत्यादी खर्चाचा अंदाज तयार करतो. कामगारवर्ग तर आपल्याकडे आनंदाने येतील साधारण चार पाच आठवड्यात माझे सर्व तयार असेल.” सुहास

-११-
बाबा निघून गेल्यावर मी याच विचारात गुंतलो होतो आणि काका व बजाबा यांचा विचार माझ्या डोक्यातून गेला होता.
तीन चार दिवसांनी अचानक मला बजाबाची आठवण झाली. व दुपारी मी त्याला बोलावून घेतले. तो आल्यावर त्याला घेऊन मी काकांच्या खोलीमध्ये गेलो. तो मोठ्या नाखुशीनेच माझ्या बरोबर आला. त्या खोलीतील स्वच्छता आणि सर्व आवरलेले पाहून त्याला बरे वाटले.
“काय बजाबा काकांच्या वेळेस तू त्यांचा मदतनीस होता म्हणे.” सुहास
“होय मालक तुमचा काका म्हणजे भला देवमाणूस होता. अडीअडचणीला बाई बापड्याना मदत करायचा. म्हणजे पैशाची नाही तर इतर बऱ्याच गोष्टीची मदत करायचे.” बजाबा
बोलत बोलत आम्ही देवघरात आलो. देवघरात आल्यावर तो गप्प झाला. तेथील मूर्ती व यज्ञकुंड पाहून तो गप्पच बसला.
थोडावेळ शांततेत गेल्यावर मी त्याला मूर्तीबद्दल विचारले.
“काय रे बजाबा? ह्या मूर्ती कसल्या? काका मांत्रिक होते का?” सुहास
“मालक तीस चाळीस वर्षांपूर्वीचा हा भाग लक्षात घ्या. प्रवासाची अपुरी साधन, अपुरा पैसा, गरिबी तर पाचवीला पुजलेली. तसेच टीव्ही, वर्तमानपत्र या पासून सर्वात दूर असलेला हा भाग. कोकण कितीही गरीब असला तरी जमिनीवरून भांडण चालू असायची त्यात मग भानामती, मूठ मारणे, बाहुल्यात खिळे ठोकणे असे प्रकार चालायचे. त्यातून भुताखेतांबद्दल गैरसमजुती वर लोकांचा चटकन विश्वास बसायचा” बजाबा
“मग काका काय करायचे?” सुहास
“अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करायचे. ते मला नेहमी म्हणायचे ह्या सगळ्या मनाच्या समजुती असतात. आपलं मन खंबीर ठेवलं तर तुम्हाला कशाचाच त्रास होऊ शकत नाही. पण जर का एकदा मन ढासळल तर ते स्वतःच्याच कल्पनांना घाबरायला लागत. मग त्याला साधा दोर सुद्धा सापासारखा वाटतो. किंवा विहिरीतून चेटकिणी बाहेर येतात असं वाटत” बजाबा'
“पण बजाबा काका ह्या मूर्ती आणि कुंडाचं काय करायचे?” सुहास
“मी एकदा काकांना विचारलं भूत, चेटकीण याच्यावर तुमचा विश्वास आहे का ? ” बजाबा
“मग ते काय म्हणाले?” सुहास
“तुम्ही ज्या अर्थी समजता, त्या कल्पनांवर माझा विश्वास नाही पण जगात काही जशा सुष्ट शक्ती आहेत तश्याच दुष्ट शक्ती पण आहेत. कित्येक वेळा एखादी शक्तीचा आपण उपयोग किंवा दुरुपयोग करू शकतो. जसा विजेचा वापर पंखे चालवायला होतो तसाच तो शॉक द्यायला ही होतो. त्यामुळे ह्या शक्ती कोणी कस वापरत आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. थोडक्यात म्हणजे शक्ती सुष्ट किंवा दुष्ट नसून वापरणारे सज्जन किंवा दुर्जन आहेत त्याच्यावर ठरत.” बजाबा
“पण या मूर्तीच आणि कुंडाचं काय?” सुहास
“ते हि मला काकांनी समजावून सांगितलं होत. आजूबाजूच्या गावातून तुम्हाला माहित नसल एकशे पन्नासहून अधिक खेडी आहेत, आपल्यासारख्या वाड्या अजून वेगळ्याच. तालुक्याबाहेरून अनेक गांजलेले, पिडलेले लोकं त्यांचा सल्ला मागायला यायचे. अशा लोकांना यायला जायला हा मागचा दरवाजा होता. काका म्हणायचे कोण कुठल्या हेतूने आपल्या घरात येईल हे माहित नाही तर त्यांना मुख्य घरात कशाला घ्यायचं. त्यांनी आपलं बाहेरच्या बाहेर आलं गेलेलं बर” बजाबा
“अच्छा म्हणजे मागचा दरवाजा त्याच्यासाठीच होता तर.” सुहास
“काका म्हणायचे या शक्तीचा परिणाम मनावर होत असतो त्या मनावर आघात करतात. एखादी मानसिक दुबळेपणा त्यांना सापडला कि ते तुमचा फायदा घेऊ शकतात. याकरिता तुमचं मन तुम्हाला ताब्यात ठेवणं भाग असत. या पूजा, मंत्रउच्चार, हवंन त्याची मानसिक स्थिती उंचावण्यासाठी असतात. जस पावसामुळे आपण ओले होऊ नये म्हणून रेनकोट घालतो तसेच हे उपाय म्हणजे सुरक्षा असते. काका इतकं छान समजावून सांगायचे कि लगेच मनाचे समाधान व्हायचे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही विद्या वाईट कामाकरिता वापरली नाही. त्यांचं लोकांच्या भल्याकडेच लक्ष असायचं आणि या कामासाठी ते जे पैसे घ्यायचे ते सर्व गावातील शाळेला दान करायचे.” बजाबा
“मग पैसे कशाला घ्यायचे? अगोदरच तो माणूस पिडलेला असतो” सुहास
“त्यांनी लोकांना अडवून कधीच पैसे घेतले नाहीत आणि लोक त्यांना पैशा ऐवजी जे काही देतील ते सर्व ते गरिबांना वाटून टाकायचे त्यातला एकही पैसा किंवा एकही कण त्यांनी स्वतःकरता किंवा घरासाठी वापरला नाही.” बजाबा
“अरे पण घ्यायचेच कशाला?” सुहास
“लोकांना प्रत्येक गोष्टीचा मोबदला देण्याची सवय लागायला पाहिजे, एखादी गोष्ट फुकट मिळत्येय म्हंटल्यावर त्याची किंमत लोकांच्या दृष्टीने कमी असते.” बजाबा
तेही बरोबरच आहे. मलाही असा अनुभव आहेच.
“काकांचा जोतिषाचा व मंत्रांचा अनुभव व ज्ञान फारच दांडगे होते. कुठल्या कुठल्या जुन्या पोथ्या आणून ते संदर्भ लिहत बसायचे. लांबलांबून लोकं त्यांच्याकडे पत्रिका पाहायला, मुहूर्त काढायला किंवा प्रश्न सोडवायला यायची” बजाबा
“अरे पण त्या मूर्तीचे आणि कुंडाचे काय? आपला विषय भलतीकडेच चाललाय.” सुहास
“कुणाकरताही उपाय करताना ते देवापुढे मंत्रोच्चार करून अभिषेक घालायचे आणि यज्ञ कुंडात हवन करायचे. यात वेगवेगळ्या फुलांचे, पानांचे, मुळांचे, लाकडाचे तसेच वेगवेगळे हविष्य गोळा करणे, निवडणे, तयार ठेवणे माझे काम असायचे.” बजाबा

“अरे बजाबा तुझी भाषा फारच चांगली आहे. तुझ्या बोलण्यातले कित्येक शब्द मलाही कळत नाहीत.” सुहास
बजाबा हसून म्हणाला “ही सगळी काकांची देणगी. नाहीतर माझ्यासारख्या अडाण्याला कुठल काय माहित असणार. हविष्य म्हणजे हवनाकरिता लागणाऱ्या वस्तू उदा. तीळ, तूप, बेलफळ, दहीभात, मोदक, उसाचे कांड. ज्या प्रकारचा यज्ञ असेल त्या प्रमाणे पदार्थ बदलायचे.” बजाबा
“म्हणजे देव देवतांना सुद्धा आवडीनिवडी असतात का?” सुहास
“नाही तस नाही आपल्याला जस फळ अपेक्षित आहे तसे पदार्थ हवन करावे लागतात. आपण कधी श्रीखंडात तिखट घालतो का? तसेच हे वेगवेगळे पदार्थ” बजाबा
“अरे वा तुला बरीच माहिती आहे की.”
“इथे आल्यावर सगळ्या आठवणी जागृत झाल्या, हा या जागेचा परिणाम आहे. ही सर्व जागाच एका शक्तीने भारलेली आहे. दुष्ट शक्तींना इथे प्रवेश मिळणं अवघडच आहे.” बजाबा
“असं आहे तर”
“कधी कधी काका एकटेच हवन करत बसायचे. त्यांना विचारल्यावर एकदा ते म्हणाले 'अरे रेनकोट नाही का वापरून वापरून खराब होतो आणि दुसरा घ्यावाच लागतो तसेच आहे हे . लोकांना मदत करता करता माझ्याही शक्तीवर आघात होतच असतात. त्या क्षीण होऊ लागतात. त्याच शक्ती परत आणण्यासाठी मला असे हवन व तप करावेच लागते. त्यामुळेच कोणत्याही शक्तीला तोंड द्यायचे धैर्य माझ्यात येते.” बजाबा
“अरे या शास्त्राचा एवढा खोलवर अर्थ असेल असे कधी मला वाटलंच नाही. याला मी भंकसपणा समजत होतो. काका खरच तपस्वी व सिद्ध पुरुष होते.”
“हो ना” बजाबा
“अजूनही जुनी लोकं त्यांची आठवण काढली की हात जोडतात.” बजाबा
“बजाबा या खोलीमध्ये आले की असे वाटते की काका नुकतेच बाहेर गेले आहेत आणि केव्हाही परत येतील.”
बजाबा यावर काहीच बोलला नाही. त्याची या विषयावर बोलायची तयारी नव्हती. मग मी विषय बदलला.
“बजाबा इथे जे गणपतीचे चित्र आहे तसेच चित्र मागच्या हॉल मध्ये एका कपाटात आहे. खरं म्हणजे ते कपाट नाहीच आहे चित्रालाच कोणीतरी दार बसवले आहे असं वाटत.”
“मला काही माहिती नाही बुआ. पण काका नेहमी म्हणायचे की ज्या गोष्टीचे आपल्याला पूर्ण ज्ञान नसेल तर त्यात आपण शिरू नये. आणि मालक, खरं म्हणजे या खोल्या तुम्ही बंदच करून ठेवा कारण चाळीस वर्षानंतर ही कशाचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही.” बजाबा
“अरे मी सर्वच खोल्या साफ करायला घेतल्या आहेत एवढंच आणि खरं म्हणशील तर या गोष्टीत मला रस हि नाही, आणि गती ही नाही.”
“तेच बर आहे मालक, जातो आता जपून राहा.” बजाबा
“अरे बजाबा मुख्य विचारायचेच राहीले?”
“काय?” बजाबा
“अरे काकांचा शेवट कसा झाला? ते आत्ता जिवंत आहेत का?”
बजाबा गप्पच बसला त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीतीची छाया उमटून गेली.
“काय रे बजाबा? काय झालं? कसली भीती वाटते का?”
“नाही साहेब. काकांनी मला भरपूर मानसिक धीर दिला आहे आणि मला कशाचाही त्रास होऊ नये म्हणून गळ्यात घालायला हा ताईत पण दिला आहे.” बजाबा
“अरे पण काकांचे काय झाले?”
“मालक मी एकदाच सांगतो मला परत काहीही विचारू नका. काकांचं काय झालं हे सांगणं कठीण आहे. काका अजून जिवंत आहेत का मेले आहेत हे सांगणं त्याहून कठीण आहे. आणि असतील तर त्यांचं वय किती असेल आणि कशा अवस्थेत असतील हे मी सांगू शकत नाही. एक मात्र सांगेन ज्या दिवशी किंवा ज्या रात्री काका नाहीसे झाले, त्या रात्री त्यांनी सांगितलेले एक काम मी केले.” बजाबा
“याचा अर्थ काय?”
“थोडक्यात काकांना ते नाहीसे होतील हे माहित होत आणि जर तसे झाले तर मी काय करायचे हे हि त्यांनी सांगून ठेवलं होत. मी त्यांचे काम केले या सर्व खोल्या बंद केल्या आणि गेलो” बजाबा
“मग तुला कोणी विचारलं नाही?”
“विचारलं. प्रत्येकजण विचारात होतो पण मलाच माहित नव्हते तर मी काय सांगणार. खरं म्हणजे मला अंधुक कल्पना आली होती. पण ठाम पणे काही सांगता येत नव्हते. काकांना बायका मुलं नसल्यामुळे त्यांचा विषय मागे पडला आणि काही दिवसांनी लोक त्यांना विसरून गेले. नव्या पिढीला असे कोणी आहे हेच माहित नाही” बजाबा
“असे आहे तर बरीच माहिती दिलीस काही लागलं तर मी तुला बोलवेन.”

-१२-
एकूणच काय तर काकांची जास्त माहिती बाबांपेक्षा बजाबालाच होती. आणि त्याच बरोबर तो बऱ्याच गोष्टी लपवत आहे हे ही जाणवत होते. पण त्याला आत्ताच छेडण्यात काही अर्थ नव्हता. तसेच बावीस पैकी अठरा किल्ल्यांची कुलुपं सापडली होती. मात्र चार किल्ल्या कसल्या आहेत हे कळले नव्हते.
सगळ्या खोल्या आवरून तर झाल्या होत्या आणि काकांच्या खोल्या सोडल्या तर बाकीच्या रिकाम्या होत्या. काकांच्याच खोलीचे निरीक्षण करण्याचे मी ठरवले. पहिली खोली म्हणजे त्यांची अभ्यासिकाचं होती. त्यातील बहुतेक पुस्तक आध्यात्माची आणि तत्वज्ञानाची होती. काकांना सर्व धर्म सारखेच दिसत होते. कुराण, बायबल, गीता, ग्रंथसाहेब, झेंद अवेस्ता असे सर्वच एकमेकांच्या गळ्यातगळे घालून कपाटात होते. ती पुस्तक चाळण्यापलीकडे मला विशेष रस नव्हता. मला वाचायला आवडेल असे काहीच त्या कपाटात नव्हते.
पूजेच्या खोलीत मात्र वेगळ्याच विषयांवरच्या पुस्तकांनी कपाटं भरून गेली होती जसे जोतिष, मंत्रसाधना, तंत्रसाधना, ब्लॅक मॅजिक, रमलशास्त्र इत्यादी..
त्यांच्या शेजारच्या कपाटात पूर्वी म्हंटल्याप्रमाणे पूजेचे विविध साहित्य ठेवले होते. भविष्यावरचीच एक दोन पुस्तक वाचावीत म्हणून मी ती बाहेर काढली. त्या पुस्तकांच्या मागे मला एक चोर कप्पा असावा असे वाटले. त्यात किल्ली जाईल असे एक छिद्र ही होत.
दिवाणखान्यात जाऊन मी उरलेल्या चार किल्ल्या आणल्या त्यातली एक किल्ली त्या चोर कप्प्याला चालली. आत एक मखमली पेटी होती त्याला ही राहिलेल्या किल्लीतील एक किल्ली चालली. पेटी उघडल्यावर आत एक जुने भूर्ज पत्र होते. ते मोडी लिपीत लिहलेले होते. लहानपणी मोडी शिकलेली असल्यामुळे मी क ला काना का करत तो कागद वाचला. अर्थातच मला अर्थ कळला नाही. मग तो कागद पेटीत ठेऊन ती पेटी आणि चोर कप्पा बंद केला. ती पेटी इतक्या बंदोबस्तात का ठेवली होती? आणि त्यात फक्त भूर्जपत्रच का ठेवले होते? हे एक कोडेच होते. शेवटी काहीतरी विचार करून ते पत्र बजाबाला दाखवण्यासाठी बाहेर काढले. संध्याकाळी बजाबा आलाच.
“बजाबा हे पत्र तू कधी पहिले आहेस का?”
“नाय बा आणि मला कुठे वाचायला येणार” बजाबा
“अरे हे पत्र मला देवघरात सापडले. तिथल्या कपाटात एक चोर कप्पा होता आणि त्यातील एका मखमली पेटीत हे पत्र होते.”
बजाबाच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरलेली माझ्या लक्षात आली.
“मालक त्या देवघरात जाऊ नका. तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. काकांचे कुठं काय असेल ते सांगता येत नाही.” बजाबा
“म्हणजे बजाबा तुला त्या पत्राबद्दल माहिती आहे”
“नाही पण ती पेटी मीच चोर कप्प्यात ठेवली होती. अर्थात आत काय आहे याची मला कल्पना नव्हती. काकांच्या आज्ञेप्रमाणे त्यानीं सांगितलेल्या अनेक गोष्टीं पैकी ही एक गोष्ट होती.” बजाबा
“अजून तुला काकांनी काय काय सांगितले होते?”
“नाही मालक मला तेवढ विचारू नका. कारण काकांनी मला गुप्ततेची शपथ दिली आहे. मी जर काही बोलायला लागलो तर माझाच जीव जाईल. असं ते म्हणाले होते” बजाबा
त्या दिवशी बजाबाला मी फारसे ताणले नाही. पण त्या रात्री माझे विचार त्या पत्राभोवतीच घुटमळत होते. रात्री झोपल्यावर मला कोणीतरी दार वाजवल्याचा आवाज आला पण बाहेर कोणीच नव्हते.
परत झोप लागल्यावर ओळखीच्या आवाजात हाक ऐकू आली.
“अरे स उठ मी केव्हाची वाट पाहत दाराबाहेर उभी आहे.”
आवाज तर नी चाच वाटत होता. म्हणून मी दारापाशी धावलो व बाहेरच दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं. मला भास झाला असावा हे निश्चित नंतर मात्र गाढ झोप लागली.

-१३-
दुसऱ्यादिवशी दुपारी मी सहज हॉलमध्ये बसलो असताना मला कपाट नसलेल्या दाराच्या खाली भिंतीचे पोपडे पडलेले दिसले. हातात घेऊन पहिले तर ते रंगाचे पोपडे होते मग माझ्या लक्षात आले कि तिथे भिंत नाहीच. गणपतीचे नीट निरीक्षण केले तर सोंडेच्या इथला भाग पडला होता आणि तिथे एक की होल दिसत होते पण माझ्याकडे उरलेल्या किल्ल्यांपैकी एक ही किल्ली त्याला बसत नव्हती.
माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. काकांच्या खोलीतपण असेच एक चित्र होते. तिथे ही एक चोरकप्पा आहे कि काय हे बघायचे ठरविले.
दुसऱ्यादिवशी दुपारी त्या चित्राचे बारीक निरीक्षण केल्यावर त्याच ठिकाणी एक किल्ली करिता की होल दिसत होते तो कप्पा उघडल्यावर आत अजून एक किल्ली होतीआणि पेटीतल्यासारखेच भूर्जपत्र होते. तेही वाचून मला काही पत्ता लागला नाही.
संध्याकाळी वाडीवरून तातडीचा निरोप आला कि बजाबा अतिशय आजारी पडला आहे आणि मला तो बोलावतोय.
रात्र फार झाली होती त्यामुळे दुसऱ्यादिवशी वाडीवर गेल्यावर त्याच्या घरी जायचे ठरवले व तसा निरोपही पाठवला. रात्री जेवण झाल्यावर हॉलमधील गणपतीच्या चित्राला त्या चोर कप्प्यातील किल्ली लावून बघितली तर ती लागली आणि गणपतीचे चित्र दारासारखं उघडलं. पण आत भिंत होती. पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या चित्राच्या मागे दोन खोल्या होत्या. शेवटी दुसऱ्यादिवशी दोन-तीन गडी आणून शोध घ्यायचे ठरवले.
उत्तर रात्रीपर्यंत व्यवस्थित झोप होती पण नंतर मला कोणीतरी उठवतंय अशी जाणीव झाली. बघतो तर माझ्या बेड शेजारी नी उभी होती. आणि ती मला हलवून उठवत होती.
“अरे उठ ना, मी केव्हाची तुला उठवतेय” नी
शेजारचा पाण्याचा तांब्या घेऊन मी पाणी प्यायलो आणि तोंडावर शिंपडले.
“अरे तू स्वप्नात नाहीस. खरंच मी आले आहे” नी
“अग पण तू त्या अपघातात वाहून गेली होतीस ना? तुझे प्रेतसुद्धा सापडलं नाही”
“स, इतके हिंदी चित्रपट तू पाहिलेत त्यात कितीतरी जण वाहून जातात कोणालातरी सापडतात आणि बरे झाल्यावर परत येतात” नी
“पण तुला कोणी सांगितलं कि मी झाराप ला आहे.”
“त्यात सांगायला कशाला पाहिजे तू कुडाळ किंवा झाराप ला असणार अशी माझी खात्री होती. त्यातून मी खारघरला फोन केला होता पण कोणीच उचलला नाही.” नी
“मग तू कुडाळला जाऊन आलीस का?”
“नाही रे मी सरळ तुझ्याकडेच आले.”
माझी बुद्धी बधिर झाली होती. एक मन म्हणत होत हे शक्य नाही. पण नी चा सहवास ही हवाहवासा वाटत होता. त्यात सकाळ केव्हा उजाडली हे कळलेच नाही. काही दिवस तरी नी च अस्तित्व जाहीर करायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होत. काही दिवसांनी बाबा आले की त्यांना भेटल्यावर पुढचे ठरवू असे वाटत होते.
दुसऱ्या दिवशी वाडीवर गेल्यावर बजाबाच्या घरी गेलो तर बजाबा निधन पावल्याचे कळाले. म्हणजे माझा भूतकाळाचा शेवटचा दुवा ही निखळला होता. त्याचा मुलगा फारच प्रेमळ होता. त्याने बजाबाचा एक निरोप सांगितला
“मालक बजाबा जाताना तुम्हाला निरोप ठेऊन गेला आहे.”
“काय ? "
“तुम्ही ते गणपतीचे चित्र उघडायला नको होत. ते उघडून तुम्ही अमानवी शक्तींना आमंत्रण दिल आहे. मला तर आता जायला पाहिजे.पण जाताना तो हा ताईत तुमच्यासाठी देऊन गेला आहे. तो सतत तुम्ही दंडात बांधावा अशी त्याची इच्छा होती. मालक हा ताईत दंडात किंवा गळ्यात बांधा आणि कधीही काढू नका. काकांचं मला बोलावणं आलं आहे आणि मला जायलाच पाहिजे.”

-१४-
तो दिवस दुःखात गेला. पण नी च्या अस्तित्वाची ओढ ही कायम होती. संघ्याकाळी जेवताना काशी गेल्यावर नी आली आणि थातुर मातुरच जेवली.
“काय ग? जेवत का नाहीस?”
“काही नाही. जरा भूक मंदावली आहे आणि गेल्या दोन महिन्यात आपल्या पद्धतीच्या अन्नाची चवही कमी झाली आहे.”
“अग पण तू कोणाकडे, कुठल्या गावात होतीस?”
“खरं तर मला नक्की आठवत नाही पण आठ-दहा दिवसांनी आपण हिंडून शोध घेऊ.”
ती रात्र सुखात गेली. सकाळी मात्र मला दमल्यासारखं वाटत होत. त्यातून पहाटे नी म्हणाली
“स दिवसभर मी एकटी घरात असते आणि जाम कंटाळते. तू आजूबाजूच्या वाडीतून कुठल्यातरी बाई ला सोबत म्हणून पाठव ना.”
“अग तूच चल ना वाडीवर. बघ तरी काय काय नवीन प्रयोग चालू आहेत ते.”
“नको, नको इतक्यात नको.”
शेवटी मी शेजारच्या गावातील एका चटपटीत बाईला सोबतीण म्हणून दिवसा घरी बोलवले. दोन-तीन दिवस शांततेत गेले पण चौथ्या दिवशी नी ची परत भुणभुण सुरु झाली
“अरे ती बाई आज येणार नाही काल जातानाच तिने सांगितले”
“का ? काय झाले?”
“इथलं काम फारच कंटाळवाणं आहे असं ती म्हणाली”
“नी मात्र उत्साही आणि तजेलदार दिसत होती.”
दुसऱ्याच दिवशी सकाळी त्या बाईचा भाऊ घरी आला आणि त्याने बहिणी बद्दल विचारले.
“काल ती घरी आलीच नाही.”
“अरे मी तर दिवसा घरी नसतो आणि कामावर येणार नाही असं तीन सांगितलं होते.”
“ती घरी आली नाही का? इथून तर संध्यकाळीच घरी गेली.” नी
“बरं. मी बघतो आजूबाजूच्या नातेवाइकांकडे.”
नंतर हा जणू नियमच झाला होता. कुठलीही बाई तीन-चार दिवस राहायची नंतर नाही म्हणायची आणि बेपत्ताच व्हायची.
एका सकाळी वाडीवरची लोकं मला भेटायला आले.
“मालक तुमच्याकडे कोणी बाई टिकतच नाही. तुम्ही घरी नसता तेव्हा काय होते हे तुम्हालापण माहित नसते.
पण चार-पाच दिवसातच तुमच्या इथली बाई पळून जाते आणि ती बेपत्ताच होते. घरी पण जात नाही, कुठल्या नातेवाईकाकडे ही नसते मग तिचे काय होते काहीच कळायला मार्ग नाही. काही घातपात असावा तर तिचे प्रेत ही कुठे सापडत नाही. थोडक्यात ती पूर्णतः नाहीशी होते. त्यामुळे गढीवर भुताटकी असावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं.” 'सरपंच'
“अरे बाबांनो!भूतबीत काही नसत.”
“आम्ही पोलिसात ही तक्रार देणार आहे. पण आम्हाला असे वाटते कि एकदा मांत्रिकाला ही बोलवावे” 'सरपंच'
“हे बघा मला यातील काहीही माहित नाही. तुम्ही मांत्रिकाला किंवा पोलिसांना सांगा. माझ्या बाजूने हवी असेल ती मदत मी करेन.”
बाबा ना मी बोलावून घेतलं तसेच त्यांच्या कानावरही ह्या बातम्या गेल्याच होत्या. रात्री नी ने ही काही दिवस बाहेर गावी जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बाबा आणि पोलिसही आले.
पोलिसांनी गढीच्या खोल्या व कोपरा न कोपरा तपासला. पण त्याना काहीच आढळले नाही. पोलीस गेल्यानंतर बाबांनी मला विचारलं
“काय रे सुहास तू सकाळ ते संध्याकाळ वाडीवर कामात असताना घरी बाया कशाला येत होत्या?” बाबा
मला ज्या प्रश्नांची भीती वाटत होती तोच प्रश्न बाबांनी विचारला आणि नी परत येईपर्यंत तिच्या विषयी मी काहीच सांगू शकत नव्हतो. त्यांनी व इतर लोकांनी मला वेड्यात काढलं असत. नी ला परत यायला पाच ते सहा दिवस अवकाश होता.
“बाबा तुम्ही पाहताच, मी सर्व खोल्या साफ केल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हल्ली वाडीवरची कामे ही वाढली आहेत त्यामुळे मी सकाळीच वाडीवर जातो. काशी तिचे काम झाल्यावर डबा घेऊन वाडीवर येते. अशा वेळी गढी रिकामी ठेवणे मला योग्य वाटतं नाही म्हणून मी वाडीवर गेल्यावर संघ्याकाळपर्यंत बायकांना घरी पाठवत होतो. मला परत यायला आठ नऊ व्हायचे. काशी सात सव्वासात ला यायची त्या अगोदरच बाया जायच्या. आत्ता त्या कुठे आहेत आणि कशा गेल्या मला काहीही कल्पना नाही.”
“अरे असं म्हणून चालत नाही आपल्याकडे जो कामाला येतो त्याची जबाबदारी आपल्यावरच असते. मी पोलिसांशी आणि सिंधुदुर्गच्या डी एस पी यांच्याशी बोलून घेतो. बघतो काही शोध लागतो का.”

दुसऱ्यादिवशी गावातील लोक मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिकाने गढीची पाहणी केली आणि एवढ्या सगळ्या भुतांना काढायला दोन -तीन दिवस लागतील आणि बरेच पैसे खर्च होतील असे सांगितले. बहुतेक त्याला वर्षभराचे काम आणि पैसा एकाच ठिकाणी मिळवायचा होता.
बाबांच्या संमतीने मी त्या मांत्रिकाला संमती दिली. अर्थातच माझा याच्यावर विश्वास नव्हता त्यामुळे बाबांनी आणि गावातील लोकांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करायचे ठरवले. याच्या नंतर गढीतच गावजेवण द्यायचे ठरले
तीन दिवस गढीत नुसता धुमाकूळ चालू होता. भूत परवडली पण मांत्रिक नको असे मला वाटतं होते. शेवटी गाव जेवण झाल्यावर गढी परत एकदा शांत झाली.
गाव जेवणाच्या दुसऱ्या दिवशी मी नी ची वाट पाहत होतो. ती आली ती मुळात घाईत असल्यासारखी.
“काय ग काय झालं? असं वाघ पाठीमागे लागल्यासारखं का पळतेयस?”
“काही नाही रे सहा-सात दिवसात आपण भेटलो नाही त्यामुळे थोडी अस्वस्थ आहे. आणि काय रे कसले कसले वास येतायेत गढीत, चल आपण बाहेर जाऊ.”
मलाही ते पटलं आणि मी तिच्या मागे मागे गेलो.

-१५-
-मामा -
अगोदरच चौदा -पंधरा लोक बेपत्ता झाली होती. पोलीस तपासही झाला, मांत्रिक आले पण कोणीच सापडले नाही.
गाव जेवणाच्या दुसऱ्या दिवशी सुहास ही बेपत्ता झाला. तो कुठे, कसा आणि का गेला या विषयी आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यामुळेच रमेश ने तुम्हाला फोन केला.
सुहास बेपत्ता झाल्यावर आम्ही त्याची पोलीस केस नोंदवली. त्यातून अजूनतरी काही निष्पन्न झाले नाही.
“ठीक आहे. आता झाराप ला जाऊन काय ते बघू. उद्या सकाळी आम्ही लवकरच बाहेर पडतो.” समीर
“पण तुम्ही काय म्हणून तिकडे जाणार ?”
“सोप्प आहे. आम्हाला गढी आणि वाडी विकत घ्याची आहे म्हणून आम्ही जाणार” समीर
“ठीक आहे. मी तुम्हाला तिथल्या सरपंचांकरिता पत्र देतो. नाहीतर लोक तुमच्याशी या विषयावर बोलायचे नाहीत.”
“आणि त्या खोल्यांच्या किल्ल्या कुठे आहेत?” समीर
“सुहास बेपत्ता होऊन दोन तीन दिवसच झाले आहेत त्यामुळे दिवसा काशी तिथे असते आणि रात्री दोन गडी असतात त्यामुळे तिघांचा वावर आहे तिथं.”
पहिल्यांदा आमचा विचार होता कि गढीतच जाऊन राहायचं पण कुडाळवरुन अर्ध्या तासाचे अंतर असल्यामुळे तशी काही गरज नव्हती.
“फारतर तानाजीला लोकांमध्ये मिसळून बोलण्यासाठी तेथे ठेऊ. 'समीर'

-१६-
- झाराप-
दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून, न्याहारी करून, गाडीत बरच सामान भरून ही चौकडी झाराप ला निघाली.
“जाताना जेवणाचा डबा तरी घेऊन जा” मंदा
“काही जरूर नाही तिथे काशी आहेच ती करेल आमच्यासाठी जेवण” समीर
“बरं पण यायला फार उशीर करू नका. रात्रीचे जेवायला आम्ही वाट पाहतोय.” मंदा
झाराप ला पोहचायला सकाळचे साडेआठ वाजले. गाव छोटं पण निसर्गरम्य होत. लोकांची रहदारी जवळ जवळ नव्हतीच. सावंतवाडी ते कुडाळ रहदारी बऱ्यापैकी होती. समीरने पहिल्यांदा गढीवर जायचे ठरवले. गढी दिसायला सुबक आणि शांतता पूर्ण होती. महाद्वार उघडच होत. दारातच दोघेजण गप्पा मारत उभे होते. बहुतेक ते गडी असावेत. गाडी गढीजवळ जाताच त्या दोघांनी आमच्या गाडीजवळ येऊन विचारलं
“कोण पाहिजे?”
“रामरावांची गढी हीच का?” समीर
“होय पण आपण कोण?” गडी
“इथले सरपंच कोण आहेत? त्यांना जरा बोलावणं पाठवा आणि आपण आत गढीत जाऊनच बोलू.” समीर
“अहो पण तुम्ही कॊण ? असं कसं कोणालाही गढीत घुसू देऊ आम्ही?” गडी
“हे बघा तुम्हाला सांगितलेली काम करा. उगाचच नसत्या चौकश्या करू नका. मुकाट्यानं सरपंचांना घेऊन या नाही तर आमचा तानाजीचं तुमच्यासारख्या वीस जणांना भारी आहे.”
समीर जरबीन बोलला. समीरची खास शैली होती. उगाचच वाद घालत बसायला त्याला आवडत नसे. त्यातला एक गडी सरपंचांना बोलवायला गेला. नाहीतर समीरने दोघांनाही गाडीत कोंबून वाड्यात प्रवेश केला असता.
ड्राइव्हर गाडीतच थांबला आणि तिघेहि आत शिरले. सुहास नाहीसा होऊन दोन तीन दिवसच झालं असल्यामुळे सगळीकडे स्वच्छता होती.

समीर आणि कुणाल दिवाणखान्यात बसले आणि तानाजी आजूबाजूला फिरू लागला. दिवाणखान्यातच गणपतीचे मोठे चित्र होते. तानाजी त्याला नमस्कार करूनच बाहेर गेला गड्याने पाणी आणून ठेवले तेवढ्यात सरपंच आले.
“मी गणेश खोत, या गावचा सरपंच. बोला माझ्याकडे काय काम आहे?” सरपंच
“आम्ही कुडाळच्या रामराव देसाई कडून आलो आहोत. त्यांचे पाहुणे आहोत. त्यांनी तुम्हाला हे पत्र दिले आहे.” समीर
सरपंचानी दोनदा पत्र वाचले.
“म्हणजे रामरावांनी सुहास परत येण्याची आशा सोडून दिली वाटतं?” सरपंच
“नाही. असं काही नाही” कुणाल
“तसेच वाटतंय हो. नाहीतर त्यांनी हे सर्व विकायला काढलंच नसत आणि तुम्ही हे पत्र आणलं हे बरं केल. कारण आपली ओळख नाही. तसा मी या रमेशला पाहिलेला आहे पण या पत्रामुळे मला सर्व लोकांना नीट सांगता येईल. नाहीतर इथे किंवा वाडीत कोणीच तुम्हाला काही माहिती दिली नसती” सरपंच
सरपंचानी दोन्ही गड्याना बोलावलं.
“हे बघा हे रावसाहेबांचे पाहुणे आहेत. सात आठ दिवस तरी त्यांचा आपल्या भागात मुक्काम आहे अर्थात ते गढीत राहणार नाहीत कारण ते रावसाहेबांच्या कुडाळच्या बंगल्यावर उतरले आहेत.” सरपंच
“काही काळजी करू नका आम्ही सगळी व्यवस्था बघतो” गडी
“आणि हे बघा यांच्यापैकी एकाला वाडीत घेऊन जा तिथल्या लोकांशी भेटी गाठी घालून द्या आणि सर्वाना सांगा कि यांच्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या. तसेच काशीला सांगून त्यांच्या चहा-पाणी, जेवण या कडेही लक्ष द्या.” सरपंच
“धन्यवाद!!” समीर
“हे बघा तुम्ही आम्हाला परके मानू नका. रावसाहेबाचे पाहुणे ते गावाचे पाहुणे. केव्हांही, कुठल्याही मदतीसाठी बोलवा.” सरपंच
सरपंच निघून गेले आणि तेवढयात काशी आली. गड्यानी तिला या चौघांची माहिती करून दिली. काशीने लगेच सगळ्यांसाठी चहा ठेवला. समीर गड्यांशी बोलू लागला.
“काय रे नाव तुमची ?” समीर
“मी शिवा आणि हा बाळू” गडी
“बरं. किती वर्षे आहात इथे?” समीर
“तस काय सांगवत नाही. आता काय आम्ही इथेच लहानाचं मोठं झालो. आई वडील, काका सगळेच गडीवर किंवा वाडीवर काम करतात. आम्ही पण कळायला लागल्या पासून इथं काम करतो.” गडी
“बरं मग तुमचे छोटे मालक कुठं आहेत ? कारण सरपंच म्हणत होते कि ते परत येणार नाहीत.” समीर
“ही मोठी माणसं कवा जातात, कवा येतात आपुन काय सांगणार.?” गडी
शिवाने प्रश्नच टाळला.
“जाऊन किती दिवस झाले?” समीर
“बघा आज गुरुवार. सोमवारी तर मालक इथे होते. रात्रीपण घरातच होते. आम्ही बाहेर ओसरीतच झोपलो होतो. दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे काशीने न्याहारी तयार केली तर मालकांचा त्यांच्या खोलीत पत्ताच नाही. आम्ही सगळीकडे शोधलं. वाडीवरही निरोप पाठवून विचारलं पण छोटे मालक कुठे गेले हे कुणालाच माहित नव्हतं.” शिवा
“काय रे ते अधून मधून असे कुठे जायचे का?” समीर
“नाही. आत्ता लग्न झाल्यानंतर वाहिनीबाई सोबत इथे ते दोन -तीन महिने राहिले आणि वाडी सोडून ते मुंबईला गेले. त्यांनी मुबंईला नोकरी धरली असं ऐकलं होत.” शिवा
“नंतर परत कधी आले?” समीर
“तसे अधून मधून सुट्टीला यायचे पण राहायला कधीच आले नाहीत. आणि आले असले तरी कुडाळलाच राहायचे.” शिवा
“तू तर आत्ता म्हणालास की ते इथे राहायचे” समीर
“ती खरं म्हणजे दुःखद घटनाच होती. मुंबईला जाताना वाहिनीबाई आणि त्यांचा मुलगा सावित्री नदीत वाहून गेले. आजवर त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.” शिवा
“हो रावसाहेब काहीतरी सांगत होते खरं” समीर
“नंतर छोट्या मालकांनी मुंबई सोडली. एक दीड महिना कुडाळलाच होते नंतर तीन चार महिन्यापूर्वी इथे राहायला आले. वाडीवर नवीन पद्धतीची शेती करायची त्यांच्या डोक्यात होत.” शिवा
“अरे पण कुडाळवरुन ये जा का करत नव्हते. इथेच का राहायचं होत?” समीर
“ते काय सांगता येणार नाही. त्यांना एकट्यालाच इथं राहून काम करायची होती.” शिवा
“मग ते या गढीत एकटेच राहत होते?” समीर
“तस नाय हो हा वाडा मोठा दिसत असला तरी ते आल्यावर चार पाच खोल्या उघडून साफ केल्या होत्या. आम्ही दोघेही गढीवर राहायचो, त्यांच्या बरोबर वाडीवर जायचो. आणि दिवसभर स्वयंपाकासाठी आणि घरकामासाठी काशी असायची” शिवा
तेवढ्यात तानाजी फिरून परत आला. काशीने सगळ्यांना चहा दिला.
“साहेब या गढीवर पंधरा -वीस तरी खोल्या आहेत पण बहुतेकाला तर कुलपच आहेत.” तानाजी
“अरे तुम्ही तर म्हणत होता पाच सहा खोल्या साफ केल्या म्हणून.” समीर
“व्हय साहेब पण इथं आल्यावर आम्ही दिवाणखान्यातील कपाटं आवरायला घेतली. त्याच्यातच आमचे दोन तीन आठवडे गेले. त्यातल्या एका कपाटात आम्हाला बाकीच्या खोल्यांच्या दाराच्या किल्ल्या मिळाल्या.” शिवा
“मग काय बघितलं का उघडून लगेच?” समीर
“चार पाच खोल्या पाहुण्यांसाठीच होत्या. तीन चार खोल्या सगळ्या सामानानी भरल्या होत्या म्हणजे गाद्या गिरद्या इत्यादी.. आणि तीन चार खोल्या काकांच्या होत्या.” शिवा
“हे कोण काका? ते इथेच राहायचे का ?” समीर
“नाही नाही साधारण वीस वर्षांपूर्वीच ते गेले. आणि त्यानंतर ह्या खोल्या बंदच होत्या.” शिवा
“पण ते काय करायचे? कुठे असायचे?”
“आम्हाला त्याविषयी फारशी माहिती नाही. कारण ते गेले तेव्हा आम्ही फारच लहान होतो. पण वस्तीवरची जुनी लोक सांगतात त्यावरून ते उत्तम जोतिषी होते. पत्रिका पाहणे हा त्यांचा छंद होता, त्याचप्रमाणे काही विपरीत घडले तर त्याच्यावर उपाय पण करायचे. 'शिवा'
“विपरीत म्हणजे काय?” समीर
“म्हणजे कुणाला भूतानी धरलं, भानामती झाली किंवा चेटूक झालं तर अशी लोक काकांकडे यायची व काकाही त्यांना मदत करायचे.” शिवा

-१७-
चौकशी सुरु असतानाच एक दीड कधी वाजला हे कळलंच नाही. काशीने साधं पण रुचकर जेवण तयार ठेवलंच होत. जेवण उरकून पाचही जण वाडीवर जायला निघाले. शिवानी त्यांना सर्व वाडी फिरून दाखवली. वाडीचा पसारा अवाढव्य होता. वाडीतच अधून मधून पाडे होते.
प्रत्येक ठिकाणी लोकं कुतूहलाने आम्हा चौघांकडे पाहत होते. समीरने आज फक्त निरीक्षण करायचे असेच ठरवले होते. वाडी फिरून पाहता पाहता संध्याकाळ केव्हा झाली हे कळलंच नव्हतं. मग परत गढीवर जाऊन चहा व फराळ केला.
समीर शिवाला म्हणाला “शिवा हा आमचा तानाजी इथेच राहणार आहे पाच सहा दिवस. त्याला काय हवं नको ते बघ.”
शिवा तयारी करायला निघून गेल्यावर समीरने तानाजीला बोलाविले . “तानाजी तू तुझे सामान गाडीतून काढ. तुला इथे पाच सहा दिवस राहायचं आहे. इथे राहून तू गढीवर लक्ष ठेऊ शकतोस. गढी तर तू फिरून बघितली आहेसच पण रात्रभर तुझी जाग असूदेत.”
तानाजी म्हणाला “ठीक आहे समीर सर. मी बघतो काय करायचं ते.”
“जरा या गड्यांबरोबर व काशीबाईंशी बोलून जरा लोकांचा अंदाज घे.” समीर
रमेशलाही तिथे राहण्याची इच्छा होती पण समीरने त्याला विरोध केला.
“हे बघ रमेश जोपर्यंत आपल्याला निश्चित अनुमान लागत नाही तोपर्यंत इथे थांबायचं नाही.” समीर
तानाजीला तिथेच सोडून तिघेही कुडाळला पोहचले. जेवण तयारच होते.
“काय रमेश काय म्हणतायेत पाहुणे?” मामा
“मामा खूप भूक लागली आहे. अगोदर जेवण करू आणि नंतर गप्पा मारत बसू”
त्याला मंदाच्या समोर विषय वाढवायचा नव्हता.
जेवण झाल्यावर सगळे बाहेर येऊन गप्पा मारत बसले.
“मामा आज फक्त परिसराची टेहळणी केली” समीर
“मग काय सुगावा लागतोय का?” मामा
“अजूनतरी नाही. आजचा दिवस तरी जास्त चौकशी करण्याचा नव्हता त्यामुळे शिवा आणि काशी यांच्याशी जुजबी बोलणी झाली. दोघेही सरळ दिसतायेत.” समीर
“हो त्यांच्या वाडवडिलांपासून ते आमच्याकडेच काम करत आहेत.” मामा
“तसेच तानाजीने ही संपूर्ण गढी फिरून पाहीली त्यालाही काही संशयास्पद आढळल नाही. आज आम्ही कुठल्याही खोल्यांचे फारस निरीक्षण केलं नाही.” समीर
“तस काही असेल असं मला वाटत नाही. कारण त्या सर्व खोल्या साफ सफाई करून झाल्या होत्या.” मामा
“वाडीवरूनही फिरून आलो लोकांशी ओळखी करून घेतल्या. ती सगळी लोकं नाकासमोर जाणारी वाटली.” समीर
“आणि सरपंच काय म्हणत होते ?” मामा
“साधा माणूस वाटला आणि तुमच्या बद्दल तर त्याला फारच आदर होता.” समीर
“अहो देसाई कुटुंब इथे दहा बारा पिढ्या इथे आहे त्यामुळे सगळेच जण ओळखतात. गेली काही वर्षे संपर्क तुटला आहे तरी जुन्या लोकांना अजून जाणीव आहे.” मामा
“मामा तुमच्याकडे एक गोष्ट बोलायची आहे.” समीर
“काय ?”
“आम्हाला काकांविषयी काही माहिती सांगाल का ?”
“हो. तुम्ही ज्याला काका म्हणता तो माझा मोठा भाऊ. आमच्या दोघात पंधरा सोळा वर्षाचं अंतर होत. आम्ही त्याला शंकर दादा म्हणत होतो. शंकर दादा लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. त्यावेळी इथे शाळा नव्हत्या पण नाही म्हणायला एक शिक्षकी प्राथमिक शाळा होती. माध्यमिक शिक्षणासाठी सावंतवाडीलाच जायला लागत होत. आणि सावंतवाडीला बैलगाडीने प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात तर फारच हाल व्हायचे. त्यामुळे त्याला एका नातेवाईकाकडेच राहायला पाठवले. सात वर्षे तो तिथंच होता ज्यांच्याकडे तो राहायचा ते दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांचे संस्कृत, पाली, मोडीअशा प्राचीन भाषांवर प्रभुत्व होते. शंकर दादा हा आधीपासूनच तल्लख आणि त्यातून घरचा शिक्षक त्यामुळे तो ही बऱ्याच भाषा शिकला. त्याचप्रमाणे मंत्रतंत्रातही त्याची बरीच प्रगती झाली. त्यांच्या मागे लागून तो जोतिषशास्त्र पण शिकला मॅट्रिक नंतर त्याने शाळा सोडली आणि तो झाराप ला आला. परत आल्यावरही त्याने स्वतःची साधना सुरूच ठेवली आणि त्यातूनच त्याची पुस्तक वाढत गेली.
घरची गडगंज श्रीमंती असल्यामुळे त्याला कधी कोणी अडवलं नाही.” मामा
“मग पुढे?” समीर
“त्याच्या साधनेत कोणीही वत्यय आणत नव्हतं आणि घरची काम सांगण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्याने मंत्रसाधना, यज्ञ उपासना सुरु केली. हळूहळू त्याला मुली सांगून यायला लागल्या. पण लग्न केलं तर आपल्या साधनेत व्यत्यय येईल त्यामुळे त्याने लग्न न करण्याचा निश्चय केला. मग त्याची ख्याती आजूबाजूच्या गावातून पसरू लागली. लोकं त्याच्याकडे मदतीसाठी येऊ लागली आणि तेही त्यांना जमेल तेवढी मदत करू लागले. नंतर तर त्यांच्याकडे येणाऱ्यांची रहदारी एवढी वाढली कि आजोबानी एक वेगळे दारच करून घेतलं. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता हा मागच्या दारानेच होत होता. एव्हाना काकांनी एक यज्ञकुंड बांधले होते. आजोबांनी त्यांच्या करिता शेवटच्या चार पाच खोल्या वेगळ्याच काढल्या होत्या. आणि त्या भागात जायला बाकीच्यांना बंदी होती. क्वचितच आम्ही सणासुदीला काकांना पाहायचो आणि त्यांच्याबद्दल आम्हाला भीतीयुक्त आदर वाटायचा.” मामा
“काका एकटेच राहायचे का? त्यांना कोणी मदत करायचे का?” समीर
“वाडीवरचा बजाबा नावाचा गडी वाड्यावर राहायचा आणि तो काकांची सर्व सेवा करायचा. त्यालाही बऱ्याच प्राथमिक माहिती झाल्या होत्या. आपण आत्ता जो दिवाणखाना वापरात आहोत तो त्या वेळी फक्त काकाच वापरायचे.” मामा
“म्हणजे गणपतीचं चित्र लावलेलं का?” समीर
हो तेच ते. काकांना देव देवतांच्या चित्रांचा आणि मूर्तीचा फार नाद होता. कुठेही काही विशेष आढळले कि ते लगेच घेऊन यायचे.”

पुढचा भाग 3
https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त,
फक्त काही ठिकाणी तृतीयपुरुषी निवेदन, आणि काही ठिकाणी प्रथम पुरुषी मनोगत असं झालंय,
आणि सुहास गायब असताना त्याचे प्रथमपुरुषी निवेदन थोडे कॉन्फ्युसिंग वाटले,
अर्थात, कथा इतकी छान रंगवली आहेत की वरच्या प्रकाराने कथेच्या फ्लो ला बाधा येत नाही

अविनाश जी छान चालू आहे.
कृपया मागील व पुढील भागाच्या लिंक द्याल का प्रत्येक भागात? सलग वाचायला सोईस्कर होते.

सुहास गायब असताना त्याचे प्रथमपुरुषी निवेदन थोडे कॉन्फ्युसिंग वाटले,>>>>+१

कथेचा फ्लो मस्त आहे

@simba et all
thanks for your comment.
technique of switching back and forth is not accidental but intentional
imost revered author of 60/70s Harold Robins used it heavily in his novels like Carpetbaggers , Dream Merchants and so many. New generations may not be aware oF this writer [ sold more than 750,000,000 copies in multiple languages,

i tried this as it makes flow very powerful.
hope u liked flow. my poor efforts dedicated to HR
Happy

कृपया मागील व पुढील भागाच्या लिंक द्याल का प्रत्येक भागात? >>>
Wtll Do!
Tha nks for suggestion.

You can also read full Samir Novel बोगोरबुदूर रिव्हाईज्ड
https://www.maayboli.com/node/63726

पण ते पात्र कथेच्या सुरवातीपासून मिस्सिंग आहे, ते वाचकांसमोर आलेच नाहीये,
अशा वेळी त्याच्या बद्दलची माहिती लोकांकडून (या केस मध्ये त्या दिवसात के घडले ते बजाबा सांगू शकतो) पाहिजे, खुद्द त्या पात्राकडून नव्हे.( उदाहरणार्थ सुहासिनी त्याला भेटायला आली, आणि तिच्या सोबतीला बायका बोलावल्या गेल्या, हा भाग केवळ सुहासलाच माहीत आहे, आणि तो वाचकांना कळावा म्हणून मुद्दाम सुहास येऊन बोलतोय असे वाटते.

हे म्हणजे, गोष्टींच्या सुरवातीला एका व्यक्तीचा खून झालाय, आणि मध्येच ती व्यक्ती आपल्या खुनाच्या दिवशी काय काय झाले हे तपशीलवार सांगते असे वाटते.
त्या व्यक्तीच्या त्या दिवसाचे डिटेल्स हा आपल्यासाठी एक खड्डा असेल, जो बाकी लोकांच्या माहिती ने थोडा थोडा भरेल.

असो,
कथा छान चालू आहे ,पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

@ avinash thanks
i am fan of your writing n had read bogurbudur in one go
Keep going best of luck