माझ्या महाराष्ट्राचं गाणं

Submitted by अनन्त्_यात्री on 27 October, 2017 - 01:10

बेलाग कातळ कड्याची कपार
त्यातून खुणवी गरुडाचे घर
घाटाचे वळण थोपवी पठार
झुकल्या माडांशी खेळतो सागर

पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर
घामाच्या खताने फुलते शिवार
शेताच्या बांधाशी चटणी भाकर
कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर

भारूडा भुलवी लावणी शृंगार
ओवीच्या थेंबात शांतीचा सागर
अभंग हसतो झेलून प्रहार
भक्तीने भिजतो चंद्रभागातीर
दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर

मेणाचे मार्दव, वज्रास टक्कर
रांगडा, भावुक, उदात्त, गंभीर
कीर्तीचा डिंडिम अटकेच्या पार
मानवी रत्नांचा अथांग सागर
भारतवर्षाचा चिरायु आधार.

Group content visibility: 
Use group defaults

सहजसुंदर लिहिलंय कविराज!
पण वाचून वाटलं, 'एवढंच???' जेवायला सुरूवात केली न् जेवणच संपलं असं झालं. Happy

धन्यवाद, राहुल!
जास्त नाही लिहिलं. कारण एकच " अठरा भार वनस्पतींची लेखणी | समुद्र भरला मषीकरुनी | मायभूचे गुण लिहिता धरणी | तरी लिहिले न जाती ||"

यथार्थ वर्णन.... रांगड्या, कणखरतेचं.... भक्तीत भिजलेल्या महाराष्ट्राचं.....

शशांकजी, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपण सुचविलेली दुरुस्ती करतो. Happy