उगाली आणि सुकुमा - खाऊगिरीचे अनुभव ५

Submitted by सुमुक्ता on 26 October, 2017 - 09:49

आफ्रिकन सफारी करण्याचे स्वप्न कित्येक वर्षांनी साकार होणार होते. माझ्या आणि नवऱ्याच्या स्वभावानुसार आफ्रिकन जेवण मिळणार म्हणूनसुद्धा मन हवेत होते. १५-१६ तासाचा प्रवास करून रात्री ९ च्या आसपास नैरोबी एयरपोर्टवर उतरलो. आमचा गाईड आम्हाला हॉटेलवर सोडून, जुजबी सूचना देऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला तयार रहायची आठवण करून देऊन निघून गेला. आम्हाला प्रचंड भूक लागली होती. म्हणून आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटकडे कूच केले. रात्रीचे १०-१०.१५ वाजले होते रेस्टॉरंट मध्ये शुकशुकाट होता. लॅम्ब चॉप्स ऑर्डर केले. जेवण येईपर्यंत धीर निघत नव्हता इतकी भूक लागली होती. भूक लागल्यामुळे असेल किंवा खरेच असेल इतके चविष्ट लॅम्ब चॉप्स मी ह्यापूर्वी कधीही खाल्ले नव्हते आणि पुन्हा खायला मिळतील असे वाटत नाही. त्या रात्री कॉफी सुद्धा अमृतासमान भासत होती.

दुसऱ्या दिवशी बरोबर ६ वाजता तयार होऊन आम्ही अँबोसेली नॅशनल पार्कला जायला निघालो. आमच्याबरोबर अजून २ नवीन लग्न झालेली जोडपी होती. ते हनीमूनला आले होते. हनिमूनला सफारी कोण करतं? असा प्रश्न आम्ही विचारलाच तर म्हणे सफारी फक्त ४-५ दिवस पुढे १५ दिवस मोम्बासाला बीच हॉलिडे आहे. तर ते असो. त्यांना खाण्यापिण्यात विशेष रस होता असे काही दिसले नाही. आमचे मात्र इतर प्रश्नांबरोबरच गाईडला आफ्रिकन जेवणाबद्दल प्रश्न विचारणे चालू होते.

केनियामध्ये पिढ्यानपिढ्या अनेक भारतीय रहात असल्याने तेथील जेवणावर भारतीय जेवणाचा खूप प्रभाव आहे. आम्ही आमच्या गाईडला विचाराले की तुम्ही घरी जेवणात काय बनवता? तर तो म्हटला "चपाती"!!!! आम्ही त्याला सांगितले की आम्हाला पारंपारिक आफ्रिकन पदार्थ खायचे आहेत. तेव्हा त्याने आम्हाला सांगितले "उगाली" खा म्हणून सांगितले. त्याने पुढे असेही सांगितले की तुमच्यासाठी आफ्रिकन पदार्थ बनवायला मी हॉटेलच्या किंवा आपण पुढे लॉजमध्ये राहणार आहोत तेथील रेस्टॉरंटमध्ये सांगून ठेवतो. १-२ दिवसात सकाळी नाश्त्याला आम्हाला आफ्रिकन फीस्ट मिळाली. आम्ही विचार केला की गाईडची बरीच वट दिसते आहे. मग कळले की हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये हे पदार्थ बऱ्याच वेळा नाश्त्याला मिळतात. घ्या!!!! म्हणजे हा गाईड उगाचच भाव खात होता तर!! ते असो.

आम्ही उत्साहाने इतर पदार्थांबरोबर उगाली आणि सुकुमा वाढून घेतले. उगाली म्हणजे इडलीसारखे शिजविलेले मक्याचे (कधी कधी ज्वारी किंवा बाजरीसुद्धा) पीठ. दिसायला इडलीसारखे असले तरीही आंबवलेले नसल्याने इडलीची आंबटसर चव उगालीला नसते. सॉस, स्ट्यू किंवा सुकुमा बरोबर खायची ही उगाली मला नुसती खायलासुद्धा आवडली (मला इडलीसुद्धा नुसतीच खायला आवडते) . त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्हाला आफ्रिकन खाद्यपदार्थ खायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा आम्ही उगाली आणि सुकुमा अक्षरशः चापत होतो. मी उगालीची रेसिपीसुद्धा मिळविली होती आणि घरी परत आल्यावर एकदा तरी उगाली करून खायची असा निश्चय केला होता. अजून मुहूर्त लागलेला नाही ती गोष्ट वेगळी. असो.

सुकुमा म्हणजे कोलार्ड ग्रीन्सची परतून केलेली भाजी. कोलार्ड ग्रीन्स येथे वर्षभर मिळत असल्याने सुकुमा बऱ्याच प्रमाणात खाल्ला जातो (खाल्ली जाते). ही भाजी करताना प्रथम कांदा, टोमॅटो परतून त्यानंतर कोलार्ड ग्रीन्स घालून परततात. पारंपरिक पद्धतीमध्ये पाणी न घालताच ही भाजी परतली जाते. पण आम्ही खाल्लेली भाजी पाणी घालून शिजवली गेली होती असा माझा अंदाज आहे. ही भाजी फारच चविष्ट लागत होती. कोलार्ड ग्रीन्सच्या ऐवजी पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या घालूनसुद्धा ही भाजी करता येते.

अजून एक म्हणजे काळे मसूर आणि क्रीम घालून केलेली एक उसळ आम्हाला १-२ वेळा तिथे खायला मिळाली. अप्रतिम चवीच्या ह्या उसळीची नाव मी कसे काय विसरले तेच कळत नाही. आंतरजालावरसुद्धा बरेच शोधूनही मला ह्या पदार्थाची रेसिपी अथवा नाव काहीच सापडले नाही. असो.

ह्या तीनही पदार्थात एक गोष्ट आम्हाला आढळून आली ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे मसाले घालून हे पदार्थ केले जात नाहीत. त्यामुळे पदार्थाच्या मूळ चवीचा अधिक आस्वाद घेता येतो. अतिशय साधेपणाने केलेले असले तरीही हे पदार्थ अप्रतिम आणि खूप चविष्ट लागत होते. मुख्य म्हणजे शाकाहारी असूनही हे जेवण आम्हाला प्रचंड प्रमाणात आवडले होते (ही कोणत्याही शाकाहारी व्यक्तीवर टीप्पणी नाही. आम्ही मांसाहारी आहोत आणि संधी मिळेल तेव्हा मांसाहाराला प्राधान्य देतो. असे असूनही शाकाहारी पदार्थ आम्हाला आवडले एवढेच म्हणायचे आहे) . साधेपणातदेखील अनेक वेळा खूप सौंदर्य असते हा खूप मोठा धडा आम्हाला येथे मिळाला.

फोटो आंतरजालावरून
Ugali and Sukuma.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे.
आफ्रिकेचे नाव ऐकून हत्तीच्या कानाचे सॅन्डवीच किंवा गेंड्याच्या चरबीचे सूप ईमॅजिन केले होते, पण ईडली उपम्यासारखी नाश्त्याचे पदार्थ हे सरप्राईज निघाले Happy

धन्यवाद आनंदिता आणि ऋन्मेष!!

खूप दिवसांन्नी लिहिलेत खाऊगिरी बद्द्ल. >>> कशाबद्दल लिहावे असा निर्णय होत नव्हता. असो. पुढचा लेख लवकर टाकायचा प्रयत्न करेन Happy

हत्तीच्या कानाचे सॅन्डवीच किंवा गेंड्याच्या चरबीचे सूप >> गेम मीटवर बंदी आहे आफ्रिकेत Proud पण आफ्रिकेत रोजच्या जेवणात शाकाहारी पदार्थ जास्त खाल्ले जातात हे माझ्यासाठीसुद्धा सरप्राईज होते Happy