पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा....

Submitted by निर्झरा on 26 October, 2017 - 06:04

पुर्वी पासपोर्ट काढणे अवघड होते असे ऐकून होते. अलीकडच्या काळात ही प्रक्रिया विना एजंट सहज करता येते. अट फक्त एकच, तुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा. आमचे पासपोर्ट काढून झाले होते तेव्हा ईतका त्रास झाला नाही, पण काही दिवसांपुर्वी माझ्या आईचा पासपोर्ट काढायचे ठरले. तस जेष्ठ नागरीकांसाठी काय काय लागत हे साईटवर बघून झाल. त्यांच्या मागणीनुसारा 'अ' आणि 'ब' दोन गटांतील यादीतील कुठलही एक -एक डॉक्युमेंट पुरेस होत. यात आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे तर आमच्याकडे होत. आम्ही लगेच कामाला लागलो. फॉर्म भरला, या दोन डॉक्स व्यतिरिक्त लाईटबिल, गॅस कार्ड, पासबूक असे ईतरही कागद ज्यात तिच नाव असेल असे जवळ ठेवले. आमचा अपॉईंटमेंटचा दिवस आला. आई आणि कागद पत्रांसकट आम्ही पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. पहिली फेरी झाली. मला हुश्श वाटल. पुढे दुसरी फेरी झाली तस अजून हायस वाटल. आता आम्ही शेवटच्या फेरीत आलो आणि आमचा नंबर आला होता त्या बाईसमोर बसलो. तिने सगळी कागदपत्र तपासली. काही क्षण पॉज घेतला आणि विचारल.... " ह्यांच लग्ना आधीच नाव वेगळ होत का?" झाल, आमची पंचाईत झाली. खरं बोलाव की वेळ मारून न्यावी अस झाल. पण आम्ही हरिशचंद्रांच्या घराण्यातले असल्यामुळे आम्ही लगेचच हो म्हणून गेलो की लग्ना आधीच नाव वेगळ होत. मग तिचा पुढचा प्रश्न " ते नाव फॉर्म मधे टाकल नाही? काय बोलावे ते कळेना. तस सांगीतल की पासपोर्ट सासरच्या नावानेच हवाय. हे नाव टाकायच असत हे माहीत न्हवत. तस तिने परत सांगीतल... " पेपर आउट करा" या वाक्याचा बराच वेळ काही संदर्भच लागेना. तिला परत विचारल नेमक काय. तस तिने सांगीतल..." दोन न्युज पेपर मधे यांची अ‍ॅड द्या नाव बदल्याची. एवढ बोलून ती तिच्या पुढच्या कामाला लागली आणि आम्हाला पुढची अपॉईंटमेंट दिली.
आम्ही घरी आलो. अ‍ॅड एजन्सीला फोन केला तेव्हा कळाले की अशी अ‍ॅड देण्यासाठी एफिडेवीट लागत. मग आम्ही तेही करून घेतल. अ‍ॅड पाठवली. परंतू पेपरला सुट्टी आल्याने आमची अ‍ॅड एक दिवस उशीरा येणार होती. तरीही ती अपॉईंटमेंटच्या एक दिवस आधी येणार होती. अचानक अ‍ॅड येणार त्याच्या एक दिवस आधी त्या एजंसी मधुन फोन आला. तिच्या मते आमची अ‍ॅड दिल्या तारखेला येऊ शकत न्हवती. हे ऐकल्यावर मला तर काहीच सूचेना. म्हणजे पुन्हा नविन तारखेची अपॉईट्मेट घ्या, मी तिला खडसावल तरीही ती अ‍ॅड द्यायला तयार होईना. शेवटी ज्या पेपरमधे अ‍ॅड येणार होती तिथे फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगीतली. आम्ही नियमाप्रमाणे चार दिवस आधी अ‍ॅड दिली होती. तरीही ती हवी त्या तारखेला येणार न्हवती. मग तो माणूस अ‍ॅड द्यायला तयार झाला. हो नाई करता ज्या दिवशी अपॉईंटमेंट होती त्या दिवशी अ‍ॅड येईल असे सांगीतले. मनात धाकधूक होत होती. पेपरवाल्याला सकाळीच पेपर टाकायला सांगीतला. त्या दिवशी सकाळी पेपर येताच पहिले पान हे अ‍ॅडचे बघितले, आईचे नाव...... दिसले, सापडले, अ‍ॅड आली. लगेच तिला घेउन परत पासपोर्ट ऑफिस गाठले. शेवटची फेरी पार पडली. हुश्श् करून बाहेर पडलो.
आता पोलीस व्हेरीफिकेशन. रोज आईचा फोन चेक करायचा. काही मेसेज आलाय का ते पहायला. आमचे पासपोर्ट काढले तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण आइच्या वेळेस चक्क तो पोलीस घरी येतो म्हणाला. तस आईला घेऊन तिच्या घरी पोहोचलो. घरात झाडु मारला. खुर्च्या टाकल्या. ( वडील गेल्या पासून आई माझ्याकडे आणि बहीणिकडे थोडे थोडे दिवस राहते. त्यामुळे तिच घर बंदच असते. घरातील सामान नुकतेच पॅक करून एका खोलीत टाकून ठेवले.) पोलीस आले, त्यांच्या शोधक नजरेने त्यांनी लगेच ओळखले की या घरात कोणी राहात नाही. तस त्यांनी प्रश्न केला.
" तुम्ही ईथे रहात नाही का?", झालं..... आता काय बोलाव. तस त्यांना सांगीतल की मुलाच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे आईला माझ्याकडे नेले आहे. तरीही हे उत्तर त्यांना पटले नाही. दोनचार वाकडे प्रश्न केलेच. मग आईचे अजून काही डॉक्स त्यांनी मागीतले. शाळ सोडल्याचा दाखला. आता तो काही आईकडे न्हवता. मग जन्म दाखला. तो होता पण त्यावर तिच नावच न्हवत. त्यात फक्त जन्म तारीख आणि आई वडिलांचे नाव एवढच होत. तो ही त्यांना पटला नाही. हो नाई करता. त्याने सांगीतले कि तुम्ही तुमच्या मुलिंच्या घराचे पत्ते यात का टाकले नाहीत. तुम्ही तिथे राहता तर ते टाकायला हवे. अरे देवा.... आता हे काय..... या सगळ्यातून एक लक्षात आले की एजंट का हवा.
आता तो पोलीस सांगून गेला आहे की फॉर्म मधे दोघी मुलींचे पत्ते घाला.
आता हे सगळ जवळ जवळ महिनाभर चालु आहे. अजूनही काम अर्धवटच आहे. बघूया पुढे काय होतय.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म. जेव्हा त्यांनी विचारलं की 'आधीचं नाव वेगळं होतं का' तिथेच तुम्ही ती अपॉइन्टमेंट रद्द करुन नवीन घ्यायला हवी होती आणि नव्याने केस मांडायला हवी होती. पेपर आउट करायचा वेळ आणि मनस्ताप वाचला असता. तिथे बसलेल्या अधिकार्‍यांकडे जाण्याआधी पुरेशी तयारी करुनच जायला हवी, हल्ली अर्ज देण्याआधी योग्य ते वेरिफिकेशन करुनच अर्ज वॅलिड आहे की अजून काय पाहिजे याबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन पासपोर्ट ऑफिसमध्ये केले जाते. अर्थात तुम्हाला अनुभव आहेच. तसेच मी काही तज्ञ नाही, हे माझे वै म आहे.

तुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा.

हे जरा ट्रिकी आहे. समोरची व्यक्ती कोणत्या कागदांची मागणी करेन हे आधीच स्पष्ट असले पाहिजे. विहित यादीतल्या कागदांशिवाय इतर कोणताही कागद ऐनवेळेला कोणताही अधिकारी मागू शकत नाही. त्यासाठी त्यांना लिखित स्वरुपात तसे कागदपत्र उपलब्ध करण्याबद्दल लिहून द्यावे लागते. तोंडी मागणी वॅलिड नाही. तसेच शासकिय अधिकार्‍यांकडे बरेचदा कोणत्याही नियमांचे पालन करायचे व न करायचे काहीही कायदेशीर स्पष्टीकरण नसतं. ते त्यांच्या 'विलिंगनेस'वर अवलंबून असतं (हेच भारतातल्या भ्रष्टाचाराच्या वटवृक्षाचे सोटमूळ आहे.)

पोलिस व्हेरिफिकेशन मध्ये कागदपत्र मागणे कायद्यात बसते का ह्याबद्दल मी साशंक आहे. कारण पापोचा अर्ज सर्व कागद नीट आहेत तेव्हाच स्विकारला जातो. पोलिसांचे काम केवळ सदर व्यक्तीचे राहत्या ठिकाणी किती काळ वास्तव्य आहे , खरेच आहे का व काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का इतकेच तपासणे असते असे वाटते. याउप्पर जास्त चवकशा ह्या हात खाजवत असल्याचे लक्षण समजाव्या.

हो अगदी खरं आहे हे अनुभव कित्येकांच्या बाबतीत येतात माझ्या वडिल दोन वेळेस अमेरिकेत जाऊन आलेत पण त्यापूर्वी त्यांच्या दहावीच्या सर्टिफिकेट मध्ये एक स्पेल्लींग जास्त होत तर जाहिरात देऊन तो मामला लवकर निपटला....तशी एजंटची गरज नाहीये कुणी याआधी काढला असेल तर प्राथमिक माहिती घ्या... पासपोर्ट लवकर निघावा ययासाठी शुभेच्छा....!!!

नाना, कागदपत्रे कुठली हवीत, ह्याबद्दल अंतिम निर्णय असिस्टंट पासपोर्ट ऑफिसर किंवा रिजनल पासपोर्ट ऑफिसर ह्यांचाच असतो. ते ऐनवेळी कोणताही कागद मागू शकतात. विहित यादीच्या खाली तशी तळटीपही लिहिलेली असते. मी स्वतःच ह्याचा अनुभव काही महिन्यांपूर्वीच घेतलेला आहे.

ओके! पण ह्यात एजंट काही करु शकत नाहीत असाही अनुभव आहे. कारण ऑफिसर मागतील ते सर्व कागदपत्रं उपलब्ध करुन देणे हे ज्याचे त्यालाच करावे लागते. तेव्हा एजंटपासून दूरच राहावे असे माझे मत. पासपोर्ट ऑफिसर योग्य ती मदत करतात, एजंटची जरुर नाही.

माझ्या स्वतःचा पासपोर्ट एजंटशिवाय काही कटकट न होता झाला पण आई वडिलांचा मात्र एजंटमार्फत काढला त्यांनी कारण त्यांना जास्ती कटकट नको होती. पण पासपोर्ट कार्यालयात सध्या तरी एजंट ची गरज ही फक्त आपण आपल्याकडे असलेली कागदपत्रे बरोबर आहेत ना या करताच भासते. जर फॉर्म भरून नीट वाचून कागद घेऊन गेलो तर गरज भासायला नको, तरीही भाचा म्हणतो तसे शेवाटी अंतीम निर्णय हा त्या अधिकार्‍याचाच असतो Lol

हो, एजंटची गरज नाही हे खरेच. फक्त एखादी खेप पडण्यापेक्षा अगदी गरज नसलेला कागदही जवळ ठेवावा, हे स्वानुभवाचे बोल. Happy

तुमचा अनुभव खरंच वेगळा आहे. खरंतर पासपोर्ट काढण्यात कोणत्या मार्गाने अडचणी येतील सांगता येत नाही. माझ्यावेळी तर पोलीस व्हेरिफिकेशन पर्यंत सर्व गोष्टी एकदम सुरळीत झाल्या. परंतू पापो फॉर्म वर आपला पत्ता कोणत्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येतो तेथे मी आमच्या सर्वात जवळच्या स्टेशनचे नाव टाकले. जवळ जवळ १ महिना पाठपुरावा करुनही व्हेरिफिकेशन फॉर्मच पोलिसांकडे न आल्याने चौकशी केल्यावर समजले की आम्ही रहातो तिच इमारत रस्त्याच्या पलीकडे असल्याने ग्रामीण पोलिसांच्या अख्त्यारित येत होती. या सर्व सोपस्कारांतून पासपोर्ट मिळण्यास २ महिने उशीर झाला. त्यामुळे इच्छुकांनी फॉर्म भरताना आपले पोलीस स्टेशन तपासून घ्यावे एवढा एक अगाऊ सल्ला.

माझे पासपोर्ट चे काम एजंट शिवाय अगदी पटकन झालेलं पण पोलिस व्हेरिफिकेशन ला ते घरी येतील असे समजून वाट बघत बसलो.
असेही पासपोर्ट कधीतरी लागेल म्हणून काढला होता त्यामुळे घाई नव्हतीच, महिनाभराने विसरून गेलो आणि आठ नऊ महिन्यांनी आठवण झाली तेव्हा मग मीच पोलीस शोधत गेलो तेव्हा त्यांनीच खडसावले इतके दिवस काय करत होता

आपल्या एक दिवसाचा पगार एजंट फी पेक्षा जास्त असेल तर सुट्टी खर्च करण्यापेक्षा एजंट वापरायला हरकत नाही असा विचार करून मी शक्यतो मनस्ताप टाळायला बघतो. तसेही मला पित्ताचा त्रास असल्याने उन्हात फिरणे टाळतोच.
@ पासपोर्ट - आम्ही पंधरा जणांच्या ग्रूपने एकत्र काढल्याने एजंट फारच स्वस्तात पडलेला.

ऋ, काही फेकंफाक करु नकोस प्लिज. टाटा बिर्ला अंबानी असेल तरीही त्याला स्वत:ला पासपोर्ट ऑफिसला जावे लागतेच.

पेपर्स क्लियर असतील तर हल्ली पासपोर्ट २४ तासात येतो (पुण्यात) असं ऐकलं! पण नेम चेंज, अड्रेस हे मुद्दे पक्के हवेत. लांच देणे, एजन्ट असं काही करावं लागत नाही.
साधा पासपोर्ट २४ तासात येतो तर तात्काळ मधे काय हा प्रश्न आहे. बहुधा तात्काळ मध्ये पेपर्स सबमिट झाले की गरमागरम ताजा पासपोर्ट देऊनच घरी सोडत असावेत!

ऋ, काही फेकंफाक करु नकोस प्लिज. टाटा बिर्ला अंबानी असेल तरीही त्याला स्वत:ला पासपोर्ट ऑफिसला जावे लागतेच.
>>>>>

मला माहीतही नाहीये की पासपोर्ट ऑफिस कुठे आहे आणि तिथे काय करतात. एजंट आला, सर्वांचे ओरिजिनल घेऊन गेला. मी कुठेही गेलो नाही. पोलिसस्टेशनला मात्र मी गेलेलो. ते देखील विभागातलेच असल्याने संध्याकाळी ऑफिसहून परतताना चक्कर टाकली. सुट्टी टाकावी लागली नाही.
मी पासपोर्ट 2008 साली काढलाय. तेव्हाचे आणि आताचे रूल्स वेगळे असतील तर कल्पना नाही. ईतर कोणी माझ्यासारखे पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट काढला असेल तर ते प्रकाश टाकतील.

पुण्यात पासपोर्ट रिलटेड काहीही फास्ट होतं यावर माझा विश्वास नाही.
ठाण्यात महिन्याभरात पासपोर्ट घरी आलेला. नंतर काही वर्षांनी पुण्यात पुलिस क्लिअर्न्स फक्त हवा होता तो पासपोर्ट हापिस थ्रु होतो.. मेन पुलिस क्लिअर्न्स मी फेर्या मारुन लोकल पुलिस, कमिशनर हापिस, तिकडून पासपोर्ट हापिस हे आठवड्यात उरकलं.
पासपोर्ट हापिसला आलेल्या मेल्स मधून पासपोर्ट शोधणे यासाठी चकरा मारल्या पण लक्षात आलं की एजंटच्या माथी अडीच तीन हजार घातल्याशिवाय वेळेत मिळणार नाही. सहा महिने थांबणे मला शक्य न्हवते.
अत्यंत गलथान ऑफिस आहे.
घर/ जागा बदलणे जर लीगल आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टवर पत्ता बदलणे रॉकेट सायन्स का करतात!!!

ईतर कोणी माझ्यासारखे पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट काढला असेल तर ते प्रकाश टाकतील. >>>
हो हो मी काढला ऋ म्हणतात तसा पासपोर्ट. Happy
माबो जाणकारांनो,
सगळे डॉक्यूमेंट्स जमा केले. नंतर ते स्कैन करून आपल्या ऋ ला माबोच्या संपर्कमेल सुविधेतून पाठवले. पुढे ऋ नं ते एजंटथ्रू प्रोसेस करून तयार पासपोर्ट मला विपूतून लिंक देऊन गुगल ड्राईव्ह वरून डाउनलोड करून घेण्यास सांगितला. सकाळी आठला सुरू झालेली प्रोसेस अकरा वाजेपर्यंत तिन तासात संपली...आणि हो मध्ये साडेनऊ वाजता मला एक कॉल आला त्यावर विचारण्यात आले, 'राहुल *** आपणच का?' म्हटलो हो. तिकडून सांगण्यात आले, 'तुमचे पासपोर्ट साठीचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले आहे. अभिनंदन!!' जिओ नेटवर्क फ्री असल्याने काही खर्चही आला नाही. अच्छे दिन!!!!!

जोक्स दी अपार्ट,
सुरूवात कुठून करावी? Happy

ऑफिस ला काम करताना किमान ग्रॅज्युएट असावे
पासपोर्टसाठी तरी निदान असे गृहीत धरून चालू
ऑफिस बॉय असल्यास माहिती नाही
तर किमान वय २२ वर्षे, तेही आता सर्व सामान्य लोकांबद्दल बोलतोय म्हणून. काही विशिष्ट लोकांची वेगळी असतील परिमाणे.
तर २००८ मध्ये जी व्यक्ती किमान २२ वर्षाची असेल तर आज ३१ च्या घरात असायला हवी.

नानाकळा जुनी गोष्ट आहे. एजण्टसचे डिटेल्स शोधणे अवघड आहे. एका मित्राच्या भावाचा ऑफिसग्रूप होता. त्यात आम्ही जॉईन होत पंधरा जण झालेलो. आपले ओरिजिनल असे कोणाच्या हातात सोपवावे का म्हणून आम्ही असाही विचार केलेला की त्यासोबत एखाद्याने जावे का? पण कोण स्वताहून तयार न झाल्याने आमच्यातील तरी कोणीही सोबत गेले नाही. मित्राच्या भावाच्या ऑफिसमधील कोण गेले असेल तर कल्पना नाही. बाकी मला खरेच अजूनही माहीत नाही की पासपोर्ट ऑफिस आहे कुठे Happy

बाकी हे मी काही फुशारक्या मारायला लिहित नाहीये की मी बघा कसे पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट मिळवला की माझी कशी वट आहे. यात माझे काहीच कर्तुत्व नव्हते. मी फक्त पंधरा जणांच्या घोळक्यातील एक मेंढरू होतो ईतकेच.

पेपर्स क्लियर असतील तर हल्ली पासपोर्ट २४ तासात येतो (पुण्यात) असं ऐकलं! >>>
पोलिस व्हेरिफिकेशन झाले की पासपोर्ट प्रिंट , लॅमिनेशन , व्हेरिफिकेशन आणि स्पीड पोस्ट नी पाठवणे हे एका दिवसात होते. जर ४५ रुपये भरुन SMS अपडेट ची सुविधा घेतली असेल तर एका दिवसात दर तासा- दोन तासात चार SMS येतात. जर ४५ रुपये नाही भरले तर ईमेल मध्ये पोलिसा कडॅ फाईल गेल्यावर, आणि पासपोर्ट डिस्पॅअच झाल्यावर ईमेल येते. पोलिस वेरिफिकशन ईमेलमध्ये जर पोलिस _ _दिवसात घरी नाही आले तर स्टेशन वर जा असे लिहलेले असते.
पोलिस व्हेरिफिकेशन ला वेळ लागतो. सध्या प्रत्येक पोलिस व्हेरिफिकेशन पोलिस हेडकॉर्टर मधे डेटाबेस मधुन जात असल्याने त्यात ३-४ दिवस लागतात. तात्काळ असेल तर हे काम लवकर होते. तात्काळ मध्ये पोलिस वेरिफिकेशन त्यादिवशी किंवा दुसर्या दिवशी चालु होऊन २ दिवसात संपते. साध्या पासपोर्ट मध्ये ६-८ दिवस लागातात.

जर पोलिसानी जेव्हा बोलवले त्या दिवशी जाउन फोटो सेशन केले तर तात्काळ मध्ये ५ दिवसात आणि साधा ८-१० दिवसात घरी पासपोर्ट येतो.

एजंट जरी असेल तरी पासपोर्ट ऑफिस मध्ये एकट्यालाच जावे लागते. फक्त १८ वर्षा खालील मुला -मुली बरोबर आई- वडिल आणि ज्येष्ठ नागरिका बरोबर एक जण जाउ शकतात. हल्ली फोटो आणि बायोमॅट्रीक पासपोर्ट ऑफिस मध्येच घेत असल्याने एजंट चे काम नाही.

SMS सेवा घेतली नसेल तर पोलिस व्हेरिफिकेश कुठपर्यन्त आले ते पोलिसाच्या वेबसाईट वर आणि पासपोर्ट चे काम कुठपर्यन्त आले ते पासपोर्ट च्या वेबसाईट वर बघु शकतो.

वरील सगळी माहिती गेल्या महिन्यात आलेल्या स्वानुभावा वरुन लिहलेली आहे.

पासपोर्ट ऑफीस मध्ये किंवा पोलिसा बरोबर कधी कधी सिलेक्टिवली खरे सांगायचे असते. जर तुम्ही ईथे रहात नाही का? प्रश्न विचारला तर सध्या तरी ईकडेच असते (जरी १ दिवस जरी राहात असला तरी हे उत्तर खरे आह्रे) , घर माझ्या / माझ्या नवर्याचा नावावर आहे. हा माझा permanent address आहे ( यातले जे खरेआहे ते) असे सांगायचे असते. हल्ली काही ठिकाणी पोलिस स्टेशन वर पण जाउन फोटो काढ्ला जातो.
जर लग्नात फक्त आडनाव बदलले असेल तर, पासपोर्ट ऑफिस मध्ये माझ्या जन्मापासुन माझे नाव हेच आहे असे आडनावचा उल्लेख न करता सांगितले तरी चालते.

मॅरेज सर्टिफिकेट असेल तर लग्नात बायकाचे नाव बदलले असेल तर काही समस्या येत नाही. लग्नात नाव बदलले असेल आणि मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर मात्र मोठा ईश्यु होतो.

ऑफिस ला काम करताना किमान ग्रॅज्युएट असावे
>>>>
मी तेव्हा डिप्लोमाला होतो.
आम्हाला सहाव्या आणि सातव्या सेमीस्टरला एक वर्ष ट्रेनिंग असते. कॉलेज नसते. कामाला जातो. त्याचा पगार मिळतो. ग्रॅज्युएट दूरची गोष्ट, डिप्लोमाही कम्प्लीट झाला नव्हता Happy

अत्यंत अपेक्षित प्रतिसाद
Happy
नसता आला तर मला बाहेर जाऊन बघावे लागले असते की आज सूर्य कुठून उगवलाय ते बघायला.

आशुचॅम्प, सत्य हे नेहमी सूर्यप्रकाशाईतकेच स्वच्छ असते. आपले कॅल्क्युलेटर आता माझे वय काय रिकॅलक्युलेट करते हे जाणून घ्यायला आवडेल. गेले काही वर्षे वाढदिवस साजरा न केल्याने चटकन लक्षात येत नाही Happy

असो, अवाण्तराबद्दल क्षमस्व.

मी पासपोर्ट ऑफिसला न जाता पासपोर्ट काढला आहे हे सत्य आहे. यावर कोणाचा विश्वास बसत नसेल तरी माझी काही हरकत नाही. पण जे घडलेय ते घडलेय. त्यात माझा दोष नाही. उगाच लोकांचे शंकानिरसन करता करता मी धागा हायजॅक केला अशी बोंबाबोंब होऊ नये म्हणून आता थांबतो.

ते नॉर्मल व्यक्तीबाबतच होऊ शकते वय काढणे. शक्यता आहे की बालवाडी पासूनच काम करत असाल. वेळ आणि कल्पनाशक्ती भरपूर असली की काय अशक्य आहे?

आम्ही आत्तापर्यंत पासपोर्ट , व्हिसा, रेल्वे विमान आरक्षण , आरटीओ ची कामं हे सगळं एजन्टच्या मदती शिवाय सुरळीतपणे मिळवलं आहे . कधी कधी एजन्ट ना फार लिमिटेड माहिती असते , नेट वरून आपण जास्त सखोल अद्ययावत माहिती मिळवून काम पूर्ण करू शकतो अस मला वाटत. तसंच एजन्ट नको असताना ऐफिडेव्हीत वैगेरे करायला सांगतात ज्यात त्यांचं ही कमिशन असत असा माझा समज आहे.
आत्ता युके व्हिसा काढताना मी एजन्ट कडे गेले होते, मुलाच बँक stetment लागेल म्हणून agent अडून बसला होता , मी म्हटलं गरज नाही तर ऐकायला तयार नाही . शेवटी माझा मीच फॉर्म भरला documents जोडली. मुलाचं bank statement जोडलं नाही , आणि विनासायास व्हिसा मिळवला.

Pages