नानकटांची कटकट - दिवाळीनिमित्त!

Submitted by स्वप्नील on 19 October, 2017 - 18:55

नानकटांची कटकट - दिवाळीनिमित्त!

"नील उठतोस का? अरे सुट्टी आहे म्हणून काय झालं. दिवाळीचा पहिला दिवस उद्या तोंडावर आलाय. बरीच कामं बाकी आहेत. चल मला थोडी मदत कर". आईचे हे शब्द नीलच्या कानावर पडत होते खरे पण रोज सकाळी शाळेला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कटकटीतून दिवाळीच्या सुट्टीनिम्मित्ताने सुटका झाली होती. लवंडलेले त्याचे जड डोळे तो हळू हळू उघडू लागला आणि पलंगाच्या शेजारून मुंबईला सकाळच्या गडबडीत कामाला निघालेल्या चाकरमान्यांसारखी घाई-गडबडीत निघालेली लाल मुंग्यांची रांग बघत बसला. घरात सुटलेल्या दिवाळीच्या फराळाच्या घमघमाटाने बहुदा त्यांनाही आमंत्रण मिळालं कि काय आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्या आमच्या घरी मुक्कामाला आल्या? असं त्याला वाटू लागलं.

सकाळचे विधी आटपून, आंघोळ करून तो आईशेजारी येऊन बसला आणि "हे फराळ वगैरे करायला मी काय मुलगी आहे का. ताईला सांग ना" बोलून मोकळा झाला. आईनेही जास्त हुज्जत न घालता फक्त "ह्या चकल्या पाडायला आणि हे नानकट बेकरीतून भाजून आणायला तुझी मदत हवी" असं बोलून नीलचा भार कमी केला. बहुदा तिलाही नीलच्या सुट्टीतल्या प्लॅनचा अंदाज आला होता. फटाक्यांची यादी, खरेदी, मित्रांसोबत बनवायचा किल्ला, भरपूर फराळ खाणं, फटाके उडवणं आणि वेळ मिळाला तर शिक्षकांनी "पिक्चर अभी बाकी है" या अंदाजाने "शाळा अजून बाकी आहे" म्हणून सुट्टीत करण्यासाठी दिलेला दिवाळीचा ढीगभर अभ्यास - असा जंगी प्लॅन त्याने करून ठेवलेला.

एरवी शाळेत असताना शिक्षक बोरिंग धडा शिकवत असले कि नीलला नेहमी वाटायचं चौकात आता या वेळी काय चालले असेल? या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तो बाहेर पडला. पण मोरे मावशींचा चिवडा, थोरातांचे अनारसे, सोंडेची चकली आणि परबांच्या करंज्या याची चव त्यांच्या मुलांच्या वशिल्याने चाखून तो त्या अनुत्तरित प्रश्नासह घरी परतला. घराच्या उंबऱ्यात बसून येणारी-जाणारी वर्दळ पाहता दिसले कि दिवाळीच्या या गडबडीतही जाधवांच्या घरी येणारी कामवाली, गादीचा कापूस पिंजून हवा आहे का विचारणारा गादीवाला, कपडे घेऊन भांडी देणारी भांडेवाली बाई, दहिवला आणि भाजीवाला जणू काही दिवाळी नसल्यासारखे नेहमीच्या कामात गुंतलेत. नीलला ते जणू काही ‘थोर’ वाटले पण दिवाळी त्यांच्याही घरी असेल असं गृहीत धरून दुसऱ्या विचारात तो मग्न झाला. तेवढ्यात समोर खाकी पँट, शर्ट, डोक्यावर टोपी, खांदयावर झोळी, पॅरागॉनच्या चप्पला आणि घामटलेल्या सावळ्या चेहऱ्यावर उठून दिसणाऱ्या त्या हास्यामधला पोस्टमन दिसला. त्याने नीलकडे बघून "या पोराला विचारण्यात काही अर्थ नाही" असं मनोमनी बोलून घरात बघितलं आणि "पगारे ताई दिवाळी द्या...दिवाळी" असा आवाज दिला. आईने नीलला आत बोलावून घेतलं आणि "साखरेच्या डब्यातून दहा रुपये काढ आणि या फराळाच्या पिशवीसोबत त्यांना दे" म्हणून सांगितलं. कदाचित आई आणि पोस्टमनमधली हि "done deal" असावी असं समजून नीलने आईला काही प्रश्न न विचारता आपलं कुतुहूलाच मन मोडून ती फराळाची पिशवी दहा रुपायांसोबत पोस्टमनला दिली आणि त्या बदल्यात पोस्टमन कडून थकल्या आवाजात मिळालेल्या "दिवाळीच्या शुभेच्छां"ना त्याने मुकाट्याने स्वीकारलं.

चकल्या पाडून, भावा-बहिणीसोबत फटक्यांची यादी करून, किल्ल्याचा फेज वन संपवून दमून घरी येऊन पाय पसरून नील पलंगावर पडला पण तेवढ्यात आईने "नील चहा पिऊन हा नानकटांचा डब्बा बेकरीत टाकून ये" म्हणून फर्मान सोडले. इतर कामात मदत करायची टाळण्यासाठी बेकरीची चक्कर मस्त निम्मित होईल हे ओळखून त्याने पलंगावरून उडी मारली आणि चहाचा कप एका करंजीसोबत खाऊन रिकामा केला. आईने "३० नानकट आहे यात. नीट ने. डबा जास्त हलवू नको आणि त्या भैय्याला उद्या पर्यंत ये होनाच चाहिये असं बजावून ये" सांगून नीलला जायला सांगितलं. नील सोबत बंटी, शिऱ्या आणि पश्या बेकरीसाठी निघाले. वाटेतून येता येता किल्लावर्गणीतून जमा झालेल्या २५ रुपयांनी नवीन शिवाजी महाराज, मावळे आणि घोडे आणायचं त्यांनी ठरवलं होतं. बेकरीत डब्बा देऊन आईच्या "उद्या पर्यंत ये होनाच चाहिये" ला वजनाने बोलून नील आणि गॅंग तिकडून पुढच्या खरेदीला निघाले.
….
दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस उन्हात किल्ल्याचे उरले सुरलेले काम संपवून त्यांवर शिवाजी महाराज, मावळे बसवून, पणत्या आणि पताके लावून चौकात एकमेव साउंड सिस्टम असलेल्या जाधवांच्या अमरला मोठ्या आवाजात "शूर आम्ही सरदार आम्हाला" लावायला सांगून किल्ल्याचे अधिकृत उदघाटन चौकातल्या मुलांनी केले. गाणे संपताच आई आवाज देते हे ऐकून नील तिच्याकडे धावत गेला. आईने हातात ४० रुपये देऊन "जा ते नानकट घेऊन ये" म्हणून पुन्हा एकदा फर्मान सोडलं. दिवसभर काम करून थकलेल्या मित्रांसोबत नील बेकरीच्या दिशेने निघाला. वाटेवर येणाऱ्या इतर चौकातल्या किल्ल्याना बघत नील आणि मित्र आमचा किल्ला किती भारी आहे असं त्या मुलांना चिडवून बोलत होते. बेकरी आली. भैय्याने "नवबालकाच्या जन्मानिमित्त पगारे कुटुंबाला सप्रेम भेट" असं कोरून लिहिलेला स्टीलचा डब्बा नीलला दिला. नीलने ते कोरलेलं वाचून डब्बा आपलाच आहे हि खात्री करून घेतली आणि घरच्या वाटेवर निघाला.

गरमा-गरम नानकटांचा चांगलाच घमघमाट पसरला होता. दिवसभर किल्ले बांधणीच्या श्रमाने थकलेल्या मुलांना त्या वासाने बेचैन केलं आणि पश्याने न राहून "नील्या यार एक नानकट दे ना" म्हणून विचारलं. नीलच्याही पाणी सुटलेल्या तोंडाला एक-दोन नानकट गट्टम करावेशे वाटले पण आईचा रागावलेला चेहरा ओळखून त्याने "नाही यार, आई ओरडेल आणि तसंही आज संध्याकाळी ताई घेऊन येईल तुम्हा सगळ्यांच्या घरी फराळ. तेव्हा खा" बोलून मित्रांचा मनात नसूनही हिरमोड केला. वाटेवर थोड्या पुढे गेल्यावर शिऱ्याला अस्वस्थ झाले आणि "यार, एक तर दे. आईला नाही कळणार तुझ्या" म्हणून नीलला विचारलं. आणि नीलने "तिने ३० मोजून दिलेत" बोलून पुन्हा एकदा आशाभंग केला. रस्त्याच्या कडेने जात असताना मित्रांचे हिरमुसलेले चेहरे नीलने अब्दुल नाव्ह्याच्या दुकानातील मोठ्या आरश्यात पहिले आणि जागीच थांबून "यार, फक्तच एकच देईन. चालेल?" असं बोलून मित्रांना चकित केलं. डबा उघडून एक एक नानकट मित्रांना आणि स्वतःला घेऊन त्याने डब्बा बंद केला आणि एका घासात सगळ्यांनी ते नानकट खाऊन एकमेकांना बघून टाळी दिली आणि घरच्या रस्त्याला निघाले.

नील घरी पोहचला आणि आईच्या लक्षात येण्याआधी नानकटांचा डब्बा किचनमध्ये अलगद ठेऊन "आई, नानकट आणले गं" बोलून पळू लागला पण तितक्यात आईने "नील थांब जाऊ नकोस" म्हणून परतीची बोलावणी केली. तिने नानकटांचा डब्बा उघडून एक नानकट बाहेर काढून नीलला देत म्हणाली "एवढ्या सुट्टीत काही कटकट न करता तू हे काम केलं म्हणून तुला हे पाहिलं नानकट". नील ते नानकट अगदी आनंदात खाऊन आपण या दिवाळीत आईला हि मदत करून काहीतरी थोर काम केलंय असं समजून त्याने तिकडून पळ काढला.

थोडं पुढे जाऊन "आम्ही रस्त्यात आधीच चार नानकटं संपवली" असं परत जाऊन आईला सांगावं आणि आपली चूक कबूल करावीशी त्याला वाटली. पण ते सांगून होणारी ‘नानकटांची कटकट’ त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि ते सांगण्याचा मोह त्याने टाळला आणि भाऊबिजेनंतर एकही नानकट न खाण्याची भीष्मप्रतिज्ञा मनोमनी करून किल्ल्यावर वाट पाहत बसलेल्या शिवाजी महाराजांना एका मावळ्यासारखा दंडवत ठोकायला निघाला.

- स्वप्निल पगारे

Group content visibility: 
Use group defaults

Mast!

छान

Cute

तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! माझ्या लहानपणातला हा किस्सा तुम्हाला आवडला हे वाचून आनंद वाटला.

च्रप्स - तुमच्या प्रश्नाचा थोडा खुलासा करता का?