अमेरिकेतला पप्पू भाऊ!

Submitted by स्वप्नील on 15 October, 2017 - 20:22

अमेरिकेतला पप्पू भाऊ!

१७ ऑक्टोबर २००८, सॅन फ्रांसिस्कोहून निघालेलं आमचं जेट एअरवेजचं विमान मुंबईला पोहचलं. आरती आणि मी अमेरिकेला २००७ला गेल्यानंतर जवळ जवळ दिड वर्षांनी भारतात परत आलो होतो. निमित्तही तसं खास होतं - लग्नाचं!!! विमानातला सगळा प्रवास लग्नाच्या आनंदाच्या हुरहुरीत गेला होता पण सोबतीला एक दुःखाची बातमीही होती. आमचे आप्पा (वडिलांचे मोठे भाऊ) वारले होते. माझ्या शहरी वाढलेल्या आयुष्यात मी जवळून पाहिलेला एकमेव शेतकरी म्हणजे आमचे आप्पा. काळा रखरखीत रंग, सडपातळ पण तंदरुस्त शरीर, करडे केस, सदरा, धोतर, टोपी आणि करकरीत आवाज करण्याऱ्या वहाणा! त्यांचं हे चित्र माझ्या डोळ्यात दडून बसलंय. त्यांच्या अकस्मात जाण्याने सगळं घरच दुःखात होतं. त्यांच्याच दहाव्याच्या कार्यक्रमासाठी गावाला जाणे ठरले होते.

१९ ऑक्टोबरच्या पहाटे मी आई वडिलांसोबत गावच्या प्रवासाला निघालो. ढगांना हळुवार चिरडून बाहेर येणारा प्रकाश, आकाशात धूसर होणारे तारे, रातकिड्यांची हळुवार थांबणारी किरकिर आणि सकाळची गोड थंडी - पहाटेचा रंगलेला निसर्गबेत मी एन्जॉय करत होतो. माझ्या मनात दिड वर्षात साचून राहिलेली अमेरिकेची पहाट आणि सद्यस्थितीतली भारतातली पहाट अशी नकळत तुलना सुरु झाली. पण ड्रायव्हरने अचानक हॉर्न मारून झोप मोडावी अशी माझी धुंद मोडली. साधारण ४ तासांचा पल्ला होता. शहर सोडून गाव जसे जवळ येत होते तसा हवेतला तो सुगंध प्रखर जाणवत होता. आठवणींच्या गोठडीत अजूनही त्या मातीचा वास दडला आहे.

आमचं गाव मंजूर - अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव शेजारी वसलेलं एक छोटंसं गाव. आमचं घर तसं गावाबाहेरच - रानाशेजारी. मी लहानपणापासून गावाला जाण्याचं ठरलं कि तोंड मुरडायचो. कारणही तसं गंमतीचं होतं. मला गावच्या पाण्याची चव आवडत नसायची. शहरात जन्म झालेल्या माझ्या शरीराला गावच्या जड पाण्याची गोडी कधीच लागली नाही. बऱ्याच वेळा मी पाणी न पिता फक्त गोड्या चहावर काढलेले दिवसही आठवतात. कदाचित हेच ओळखून आईने सोबत पाण्याच्या दोन मोठ्या बाटल्या घरूनच भरून घेतल्या. आजही आई वडिलांना त्या आठवणी ताज्या असतील.

मी साधारण सात-आठ वर्षांनी गावाला भेट देत असेन. माझ्या शेवटच्या भेटीतलं गाव आणि आत्ताचं गाव यात नक्कीच फरक जाणवणार यात मला तिळमात्र शंका नव्हती. कोपरगाव तालुक्यातील मुख्य हायवे घेऊन चास फाट्याशेजारून एक रस्ता मंजूर गावात शिरतो. चास फाट्यावरच गावातला महत्वाचा बाजार भरत असे. मंजूरसाखीच आजूबाजूला दोन-तीन छोटी गावं वसलेली. ती सगळी गावं मिळून एकाच दिवशी चासला बाजार करी. मला अजूनही आठवतं लहानपणी गावाला गेलेलो असताना आप्पा आम्हा लहान मुलांना चासला चुरमुऱ्यांचा भत्ता, गोडी शेव, बुंदीचे लाडू आणि ऊसाचा रस खाण्या-पिण्यासाठी न्यायचे. फाट्यावर शेजारी असलेल्या एका 'हाटेलात' आमची मेजवानी असायची. पण आमची गाडी जशी फाट्याजवळ येत होती तसे मला ते स्वरूप बदललेलं दिसत होतं. सायबर कॅफे, लॉज, कपड्यांची मोठी दुकाने, ५-६ हॉटेल्स वगैरेने चासचा कायापालट झाला होता. वडिलांकडून कळालं कि त्याच हायवेने पुढे शिर्डीसाठी बायपास काढला आहे म्हणून हा सगळा बदल दिसतोय. ते बघून थोडी खंत वाटली. 'गावाने गावासारखं राहावं' कदाचित माझी हि मानसिकता त्याला आड येत होती. परंतु तो बदलच कदाचित 'विकासाची' व्याख्या असेल.

वडिलांनी ड्रायव्हरला गावात जाणारा रस्ता दाखवला. एका खडबडीत धुळीदार वळणावर बारीक दगडं आणि खडी तुडवत मातीच्या रस्त्यावर आमची गाडी उतरली. एवढ्या वेळ हायवेवर निमूटपणे सीटला चिकटून बसलेल्या आमच्या शरीराला थोडी हालचाल मिळाली. तिने आम्हाला पुरतं जागं केलं. आमच्याच गाडीने उडणारी धूळ आत शिरू पाहताच आईने लागलीच तिच्या बाजूची खिडकी बंद केली. ती मलाही सांगत होती. पण गावात आल्याचं खरं समाधान मला तेव्हाच मिळालं. डौलात झुलणारे हिरव्यागार ऊसाचे शेत, बहरलेल्या कांद्याचा मळा, कोथिंबिरीच्या बागा - निसर्गाच्या वेगळ्याच रूपाचे दर्शन मला घडत होते. घर एक-दोन मैलांवर दूर असताना वडिलांनी ड्रायव्हरला गाडी एका बाजूला घ्यायला सांगितली आणि मला "बाहेर ये" म्हणाले. एका मोकळ्या हिरव्यागार कांद्याच्या मळ्याकढे बोट दाखवत ते मला म्हणाले कि "हे आपलं शेत. आप्पा याच कांद्यावर काम करत होता". त्यांच्या दाटलेल्या कंठातून येणारे शब्द आणि पाण्याने भरलेले डोळे मला स्पष्ट दिसत होते. फळ्यावरील अक्षरे पुसावी तसे त्यांनी रुमाल काढून अश्रू पुसले आणि शब्द गिळून टाकले. पण मी त्या जागेचा आणि वेळेचा मोह टाळू शकलो नाही. माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये वडिलांच्या पाणावलेल्या डोळ्यांसोबत ती निसर्गसंपत्ती मी कैद केली.

शेवटी गावाला पोहोचलो. कच्च्या रस्त्याच्या प्रवासाने गाडीतल्या पेट्रोलसारखंच माझ्या पोटातलं पाणीही पुरतं हललं होतं. गावच्या घराजवळ येताच माणसांचा खूप मोठा लोंढा दिसू लागला. त्या माणसांच्या लोंढ्यातही गावचं घर स्पष्ट दिसत होतं. मराठी सिनेमात पाहायला मिळतं अगदी तसंच आमचं घर - जमिनीपासून चार फुटांचा उंचवटा त्यावर दगड सिमेंटने बांधलेलं दुमजली घर. दुसरा मजला तसा शहरी भाषेत बिल्डिंगच्या गच्चीसारखा. घरापुढे मोठं अंगण आणि त्याभोवती बसायला बांधलेला कठडा. लहानपणी जेवणानंतर आम्हा भावंडांच्या गप्पा तिकडे मस्त रंगायच्या. घराशेजारी डाव्या बाजूला गाईंचा गोठा आणि उजव्या बाजूला बैलगाडी उभी करायची जागा. त्याच्याच शेजारी रचून ठेवलेला बैलांचा चारा. मागल्या बाजूला स्वयंपाकघर आणि एक उंच झाड ज्याच्या सावलीत आम्ही जेवण करायचो. आजी आजोबांनी हे घर साधारण कधी बांधलं हे मला ठाऊक नाही पण त्यांची पुण्याई तिकडे प्रकर्षाने जाणवते. पहिल्या पावसाच्या सरीसाठी ढग जसे तळमळून दाटून येतात तशाच घराला एवढ्या वर्षांनी बघून आठवणी दाटून आल्या. शहरात बंद फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्या आम्हा भावंडाना हि खूप मोठी पर्वणी होती. गाडीतून खाली उतरलो. त्या माणसांच्या लोंढ्यात माझी नजर ओळखीच्या चेहऱ्यांना शोधण्यात मग्न झाली. आणि तितक्यात समोरून धावत येणारा विजू दिसला - आप्पांचा मोठा मुलगा. त्याने येऊन घट्ट मिठी मारली आणि बांध फोडून रडला. त्याच्या मिठीत आणि माझ्या शर्टवर पडलेल्या त्याच्या प्रत्येक आसवात वडील गेल्याच्या दुःखाचा ओलावा जाणवत होता. मी त्याला सावरण्याइतका मोठा नव्हतो पण प्रयत्न केला.

दहाव्याचा कार्यक्रम पार पडला. जेवणाच्या पंगती बसल्या. मी भावा-बहिणीसोबत गप्पा मारत असताना आप्पांचा दुसरा मुलगा पिंट्या मला बोलवू लागला. मी त्याच्या कडे गेलो तेव्हा बोलला "भाऊ, चल काही लोकांना तुला भेटायचंय". मी जरा दचकलो. मनात विचार आला कि आधी हे शब्द फक्त काही राडा झालेला असताना ऐकलेले. तेव्हा मी भारतातच राहत होतो पण आता तर??? तो माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत पुन्हा म्हणाला "येतोय ना भाऊ?" मी म्हणालो "कुणाला भेटायचंय?" तो म्हणाला "अरे हाईत काय लोकं, तू चल तर?" त्याच्या हट्टाला मी नकार देऊ शकलो नाही. चावडी शेजारीच असणाऱ्या भीमा तात्याच्या घरी त्याने मला नेले. तिकडे १५-२० लोकांचा जमाव बसला होता. मी घरात शिरताच त्यांचं बोलणं बंद झालं आणि सगळ्या नजरा माझ्या कडे येऊन टेकल्या. मी घरभर नजर फिरवली. भीमा तात्या सोडून एकही जन ओळखीचा नव्हता पण त्यांच्या डोळ्यातली ती आतुर नजर आणि चेहऱ्याचं हास्य "आम्ही तुझीच माणसं आहोत दादा" असं म्हणत होत्या.

पिंट्या मोठ्यांनी आवाज काढून म्हणाला "तर हा आमचा अमेरिकेतला पप्पू भाऊ!!! संपत तात्यांचा थोरला". मी चक्रावून त्याच्याकडे नजर फिरवली. त्याने माझी अवस्था ओळखली आणि म्हणाला "अरे भाऊ, या सगळ्यांना तुला भेटायचं व्हतं. बघायचं व्हतं कि अमेरिकेतला भाऊ कोण आहे अन कसा दिसतो ते". मी ओशाळून हसलो आणि म्हणालो "अच्छा!". डोक्यावर पदर घेतलेली, कपाळावर मोठा लाल टिळा लावलेली एक बाई म्हणाली "भाऊ, तू तर आमच्यातल्याच दिसतो कि - काळा सावळा". मी म्हणालो "हो तर, तिकडे जाऊन रंग थोडी ना बदलेल. शेवटी जन्मापासूनची गॅरंटी आहे". त्या सगळ्यात हसू फुटलं. एक मुलगी शाळेतल्या वयातली असेल बहुदा म्हणाली "भाऊ, तिकडे लोकं पण आपल्यासारखीच असतात का रे?". या प्रश्नात बोलण्यासारखं खूप दडलं होतं पण तिने अमेरिकेतल्या लोकांच्या दिसण्याबद्दलचा प्रश्न विचारला असा समज करून मी म्हणालो "हो तर, अगदी आपल्यासारखीच. २ हात, २ पाय, २ डोळे असणारीच". त्यांचं हसणं अजून वाढलं. एका वरिष्ठ गृहस्थाने म्हंटलं "भाऊ, इथं आम्ही ममईला जायला घाबरतोय अन तू एवढ्या लांब गेलाय व्ह. गावाचं नाव काढलंस. भाऊ, आम्ही काय तुझ्या लग्नाला येऊ शकणार नाय पण तुला भेटलो हेच झाक झालं बघ". त्यांच्या डोळ्यातलं कुतुहूल, आपुलकी आणि प्रेम बघून वाटलं कदाचित आपणच भरपूर गोष्टींची गुंतागुंत वाढवतो. त्यांच्या इतकं साधं जगणं जास्त सोप्पं असतं.

एका दुसऱ्या बाईने डोक्यावर पदर ओढत माझ्या हातात थोडा गूळ आणि पाण्याचा ग्लास दिला. गूळ तर ओळखीचा होता पण ते "पाणी"??? लहानपणापासून कडवट वाटणाऱ्या त्या जड पाण्याची चव नकळत जिभेवर रेंगाळली. थोडा अस्वस्थ झालो पण एवढा मोठा जमाव माझ्याकडे डोळे लावून बसला होता. त्यांच्याच नजरेतला गोडवा पाण्यात उतरला आणि तो ग्लास मी पिऊन रिकामा केला.

"अमेरिकेतल्या पप्पू भाऊचा" एवढ्या वर्षांचा गावच्या पाण्याचा उपवास त्या दिवशी मोडला!!! परतीच्या प्रवासात या गोड आठवणींचा ठेवा सोबत घेत, कसारा घाटाच्या हिरव्यागार डोंगरा आडून येणारी थंड हवेची घोंगडी ओढून मी जेटलॅगच्या झोपेत बुडून गेलो.

- स्वप्निल पगारे

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलय.. <<माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये वडिलांच्या पाणावलेल्या डोळ्यांसोबत ती निसर्गसंपत्ती मी कैद केली...>> हे तर थोडं मन हेलावुन गेलं..