दिवाळी मागतो घरोघरी

Submitted by र।हुल on 15 October, 2017 - 04:42

विझलेले-विझणारे ते
दीप पेटावेत घरोघरी
उधळीत रंग बिलोरी
लक्ष्मी यावी घरोघरी ॥१॥

पेटती कागद फुकाचे
देतसे आनंद क्षणभरी
वेदनेची जाणिव देणारी
संवेदना यावी घरोघरी ॥२॥

निस्तेज बावर्या नयनी
तू नकोस देऊ लाचारी
मागणे विसरावे दारी
परी भूक मिटावी घरोघरी ॥३॥

दीप चैतन्याचे चेतूनी
बाळांची संपावी मजूरी
पाटी पुस्तक न् दप्तरी
सरस्वती नांदावी घरोघरी ॥४॥

देहात साधन सृजनाचे
संसार चालवे शक्ती नारी
जन्मली ज्योती, आली परी
स्वागत व्हावे घरोघरी ॥५॥

भिजावे रान व्हावे पिवळे
मौक्तिकांची रास रानभरी
बघूनी सुखावा शेतकरी
बळीराजा हसावा घरोघरी ॥६॥

कटू कडू आठवणींनी
विझूनी जावे ह्रदयांतरी
प्रेमळ क्षणांच्या सोनेरी
नात्यांनी उजळावे घरोघरी ॥७॥

कैवार घेऊनी धर्माचे
मांडला बाजार मंदिरी
संपावे संत जे नामधारी
ज्ञानेश प्रगटावा घरोघरी ॥८॥

दिव्यांनी उजळावी लेखणी
प्रतिभा उमलावी अंतरी
असे शब्दांचा मी भिकारी
मागतो समृद्धी घरोघरी ॥९॥

―र।हुल/१५.१०.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल या पेक्षा सुंदर दिवाळी अभिष्टचिंतन असूच शकत नाही . दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा !>>> +1111 खुप आवडली निव्वळ अप्रतिम

भारीच...
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!! Happy

भारीच...
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!! Happy

अक्षय, दत्तात्रयजी, सायु, अंबज्ञजी, विबी, अश्विनीजी, समाधानीजी, पंडितजी,फारएन्ड, मेघा प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. Happy
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!