इयत्ता दहावी पास

Submitted by ललिता-प्रीति on 6 October, 2017 - 02:08

एप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली, तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘स्नेक-२’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता! त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून, दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती.
आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गेम सुरू करण्यापूर्वी कुमार यश खांब सोडून सुटाच उभा राहिला.
जरा वेळाने कुमार यशने जवळच्या एका बाकड्याच्या कोपर्‍यावरची जागा पकडली. बाकडंही गरम झालं होतं; पण खांबाइतकं तापलेलं नव्हतं. पाठीवरच्या बॅगेमुळे बाकड्यावर व्यवस्थित बसता येत नव्हतं. पण ज्या एका गोष्टीसाठी तो बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर आला होता, ती गोष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी अशा बारक्यासारक्या गैरसोयी दुर्लक्षाव्या लागतात इतकं कळण्याजोगा कुमार यश मोठा झालेला होता. बॅगेसकट बाकावर टेकता टेकता डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्याने हळूच आईकडे नजर टाकली, तर आई त्याच्याकडेच बघत होती. बॅगेसकट कसा तिथे बसणारेस, बॅग इकडे दे, हे आईच्या नजरेत लिहिलेलं त्याने वाचलं. त्याने स्नेकला पुढे ढकलणं परत सुरू केलं. आईने नजर अन्यत्र वळवलेली त्याला कळली. तुला काय करायचं ते कर, ऐकायचंच नाही म्हटल्यावर काय, हे त्या नजरेत लिहिलेलं असणार हे त्याला न वाचताच समजलं. त्याने स्नेकच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केलं.
दोन-चार मिनिटं गेली असतील आणि कुमार यशला मागून अगदी कानाशी काहीतरी हालचाल जाणवली. त्याने पाहिलं तर मागच्या बाकावर इतका वेळ त्याच्या पाठीला पाठ लावून बसलेलं एक बारकं आता उलटं वळून, गुडघ्यावर बसून, त्याच्या फोनमध्ये डोकावून पाहत होतं. कुमार यशला अनेक सायास करूनही त्या बारक्याकडे दुर्लक्ष करता येईना. त्याने मध्येच बारक्याकडेही एक मोबाईलयुक्त तुच्छ कटाक्ष टाकून बघितला. तरी बारकं बधलं नाही.
परत काही वेळ गेला. कुमार यशला आता चैन पडेना. त्याच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये असलं सार्वजनिक आक्रमण त्याला कदापि सहन होण्यातलं नव्हतं. त्याने वैतागून पण मख्ख चेहर्‍याने परत बारक्याकडे पाहिलं. बारकं आपल्या वयोमानापरत्वे मख्ख चेहरा वगैरेंसारख्या विभ्रमांपासून कोसो दूर होतं. त्याने आपल्या मानेला जरासा झटका दिला आणि कुमार यशला ‘गाइये ना, चुप क्यूं हो गये’च्या चालीवर ‘ गेम खेळ की, माझ्याकडे काय बघतोस’ असं सूचित केलं. कुमार यशने चरफडत परत फोनमध्ये डोकं घातलं. बघताबघता बारक्याशेजारी आणखी एक बारकीही अवतरली. ज्या एका मुख्य गेमसाठी आपण इथे आलो आहोत, ती वेळेआधीच ओव्हर होऊ नये यासाठी बर्‍याच बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे हे एव्हाना कुमार यशला कळून चुकलं होतं.
अखेर गाडीची घोषणा झाली आणि सुटका झाल्याच्या आनंदात कुमार यश उठला. फोन बंद करून त्याने आपल्या थ्री-फोर्थच्या खिशात टाकला; आई बघते आहे हे लक्षात येताच खिशाची चेन लावून घेतली आणि पाठीवरची बॅग सावरत तो आईजवळ येऊन उभा राहिला. गाडी स्टेशनमध्ये शिरत होती.
गाडीचा वेग कमी झाला तसं इतक्या वर्षांच्या सवयीने कुमार यश नकळत आईचा हात धरायला गेला; पण अगदी ऐनवेळी त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला एकट्याने प्रवास करायचा आहे आणि त्याने आपला हात मागे घेतला. आईचं लक्ष डब्यांच्या आकड्यांकडे होतं. सी-२ डबा समोर येऊन थांबला, तसं आईने त्याच्या खांद्याला किंचित धरल्यासारखं करत त्याला ‘चल, चढ’ म्हटलं. इतरवेळेस कुमार यशला आईची ही कृती नापसंत पडली असती; त्याने आईचा हात झिडकारण्याचा प्रयत्न नक्की केला असता. पण, कसं कोण जाणे, या वेळी त्याला ते जमलं नाही.
*
आपली विंडो-सीट आहे हे कुमार यशला चार लायनी अलिकडूनच दिसलं होतं. पाच सेकंदांच्या आता तिथे पोचलं नाही तर लाईफ संपेल अशा आवेषात त्याने आधी सरळ मुसंडी मारली आणि मग चार लायनींनंतर एकदम नव्वद अंशांत वळत तिथे बसलेल्या दोन बायकांना एका झटक्यात ओलांडत तो बॅगेसकट आपल्या सीटमध्ये धपाक्कन सांडला.
शेजारच्या सीटवरच्या बाईच्या पायावर कुमार यशचा जोरात पाय पडला होता. ती बाई व्हॉटस्अॅपमधून डोकं वर काढत अत्यंत त्रासिक नजरेने त्याच्याकडे बघत ‘पागल है...!’ असं पुटपुटली. ते कुमार यशच्या गावीही नव्हतं. त्याने वाभर्‍यासारखं एक-दोनवेळा इकडे तिकडे बघितलं आणि त्या बाईलाच विचारलं- ‘‘ही सी-टू बोगीच आहे ना?’’ यावर निव्वळ होकारार्थी मान हलवून त्या बाईला शांत बसता आलं असतं. पण तिने ‘‘हां, तो??’’ असं एक विनाकारण ‘तुझ्या बापाची भीती नाही मला’ या सुरातलं उत्तर दिलं. तो सूर तरी कुमार यशच्या गावी गेला की नाही कुणास ठाऊक; कारण एव्हाना तो लांबवर मान उंचावून बघायला लागला होता. त्रासलेल्या बाईनेही तिकडे बघितलं. त्या दिशेला कुणाकडे तरी पाहून कुमार यशने हात हलवला आणि तो जरा सैलावला. तिकडूनही एक हात हलला. ती कुमार यशची आई होती. त्रासलेल्या बाईची मान दोन-तीनदा आई-मुलगा, आई-मुलगा अशी हलली; गाडी हलली नसती तर आणखीही काहीवेळा हलली असती.
गाडी स्टेशनातून बाहेर पडली. शेजारची बाई फोनवर गाणी ऐकायला सुरूवात करणार इतक्यात कुमार यशने आपला पहिला फोन लावला...
‘‘हॅलो, अर्णव, यश बोलतोय... गाडी सुटलीय. तू साधारण ६ वाजता स्टेशनवर यायला घरातून निघ. हो... आई स्टेशनवर पोचवायला आली होती... तिने टीसीला सांगून ठेवलंय. स्टेशन जवळ आलं की तो मला सांगणारे... अरे, ही बाबाची आयडिया, आई आधी तयार नव्हती... बाबा म्हणत होता आजी-आजोबांकडे जा... पण आई म्हणाली की ते खूप लांब पडेल; आधी हा छोटा प्रवास कर.... हा आईचा जुना फोन आहे. आज संध्याकाळी मी पोचणार, मग उद्या-परवा... टोट्टल चार दिवस राहणारे तिथे... केतकी, साधना मावशीचं काय ठरलं?.... येणारेत का? आल्या तर मजा येईल... बरं, चल ठेवतो... तू सहाला निघ, हां’’
कुमार यशने फोन बंद केला. त्रासलेली बाई शेजारच्या दुसर्‍या बाईकडे पाहून ‘पागल है...!’ असं पुटपुटली. दुसर्‍या बाईने काही प्रतिक्रिया दिली नाही. इकडे कुमार यशने दुसरा फोन लावला.
‘‘हॅलो, आजी, यश बोलतोय... अर्णवकडे निघालोय, एकटा.... हो, त्याला सांगितलंय ६ वाजता स्टेशनवर यायला घरातून निघ, म्हणून... आजोबा काय करतायत?... हो, आई स्टेशनवर पोचवायला आली होती... तिने टीसीला सांगून ठेवलंय. स्टेशन जवळ आलं की तो मला सांगणारे... अगं, ही बाबाची आयडिया, आई आधी तयार नव्हती... बाबा म्हणत होता तुमच्याकडे जायचं... पण आई म्हणाली की ते खूप लांब पडेल; आधी हा छोटा प्रवास कर.... आजोबा काय करतायत?... हा आईचा जुना फोन आहे. आज संध्याकाळी मी पोचणार, मग उद्या-परवा-तेरवा राहणारे तिथे... आजोबा काय करतायत?... केतकी, साधना मावशीचं अजून नक्की नाही ठरलेलं... आल्या तर मजा येईल... बरं, चल ठेवतो... आजोबांना सांग.’’
कुमार यशने फोन बंद केला. त्रासलेल्या बाईने एक सुस्कारा टाकला आणि ती ‘पागल है...!’ असं स्वतःशीच पुटपुटली. दरम्यान कुमार यशने तिसरा फोन लावला.
‘‘हॅलो, विदित, यश बोलतोय... मामाकडे निघालोय, एकटा.... हो, तुला त्यादिवशी म्हटलं होतं ना.... ही बाबाची आयडिया, आई आधी तयार नव्हती... बाबा म्हणत होता आजी-आजोबांकडे जा... पण आई म्हणाली की ते खूप लांब पडेल; आधी हा छोटा प्रवास कर.... चार दिवस राहणारे तिथे... मावशी, मावसबहीण पण येणारे कदाचित... नाही, जुना फोन आहे... फक्त स्नेक-टू आहे... बरं, चल ठेवतो... हो, शुक्रवारी परत येणारे. आल्यावर फोन करतो.’’
कुमार यशने फोन बंद करून खिशात ठेवून दिला. खिशाची चेन लावून घेतली. त्रासलेल्या बाईने शेजारच्या बाईकडे मान वळवत ‘पागल है...!’ अशा अर्थाची पुटपूट केली. दुसर्‍या बाईने काही प्रतिक्रिया दिली नाही.
इकडे कुमार यशने मांडीवरची बॅग खाली पायाशी ठेवली; जरा वेळाने पुन्हा मांडीवर घेतली; मग वरच्या हुकाला लटकवली. मग जरा वेळ खिडकीतून बाहेर बघितलं. मग हुकावरची बॅग पुन्हा खाली काढली. त्यातून दोन पुस्तकं काढली. दोन्ही इंग्रजी होती- एक हार्डी बॉईज गटातलं कुठलंतरी आणि एक फेमस कोटस ऑफ वर्ल्डफेमस पर्सनॅलिटीज अशा काहीतरी नावाचं. दुसर्‍या बाईला वाटलं आता शेजारची बाई परत म्हणेल- ‘दो-दो बुक्स एकसाथ पढेगा... पागल है...!’ पण कुमार यशचे फोन थांबताच शेजारची बाई पेंगायला लागली होती. ते पाहून दुसर्‍या बाईनेही आपले डोळे मिटून घेतले.
*
बंद डोळ्यांसमोर काहीतरी जोरात फडफडलं आणि दुसरी बाई दचकून जागी झाली. पाहते तर कुमार यश तिकीटाची प्रिंट-आऊट टीसीच्या दिशेला धरून तयार होता. गाढ पेंगणार्‍या ‘पागल है...!’ला त्याची गंधवार्ता नव्हती. टीसीने कुमार यशच्या हातातून प्रिंटआऊट घेतलं. दुसर्‍या बाईने पाहिलं की दोन प्रिंटआऊटस एकमेकांना स्टेपल केलेली होती. तिने अंदाज बांधला, की एक आजचं आणि एक परतीच्या प्रवासाचं तिकीट असावं. ‘पागल है...!’ अजूनही पेंगतच होती. दुसर्‍या बाईने तिला हलवून जागं केलं. तिला वाटलं या मुलाचा धक्का लागूनच आपली झोपमोड झाली. ती परत ‘पागल है...!’ म्हणणार इतक्यात तिला टीसी दिसला.
तिघांची तिकीटतपासणी झाली. टीसी पुढे निघून गेला. कुमार यशने जरा वेळ दोन्ही पुस्तकं आळीपाळीने वाचल्यासारखं केलं. बरोबर चारच्या ठोक्याला तो परत उठला आणि वरच्या बॅगेतून त्याने एक प्लॅस्टिकचा डबा काढला. डब्यातल्या तिखटा-मिठाच्या पुर्‍या खाण्यात पुढची पाच-दहा मिनिटं गेली. हे सगळं बर्‍यापैकी शांतपणे सुरू होतं. त्यामुळे शेजारची बाई परत एकदा पेंगायला लागली होती.
जरा वेळ असाच गेला. शेजारच्या बाईला अर्धवट झोपेत आपल्या मागे अगदी कानाजवळ काहीतरी हालचाल जाणवली. तिने जडावलेले डोळे उघडून पाहिलं तर मागच्या सीटवरची दोन चिंटी-पिंटी कुमार यशच्या फोनमध्ये डोकावून पाहत होती- एक सीटच्या फटीतून आणि एक तिच्या डोक्यावरून. कुमार यशच्या ते गावीही नव्हतं. दुसरी बाई मान विरुद्ध बाजूला वळवून पेंगत होती. त्यामुळे शेजारच्या बाईने तीन ‘पागल है...!’ गिळले आणि आपले डोळे परत मिटून घेतले.
*
सहा वाजत आलेले होते. कुमार यशने पुस्तकं परत बॅगेत ठेवून दिली. फोन खिशात ठेवून दिला. खिशाची चेन लावून घेतली. आणि तो उठला; दोन्ही बायकांच्या पायांना धक्के मारत पुढे झाला; नव्वद अंशात वळला आणि त्याने दाराच्या दिशेला मुसंडी मारली. शेजारच्या बाईने वैतागून ‘क्या लडका हैऽ... भगवाऽऽन!’ असा एक दीर्घसूत्री शेरा मारला. दुसर्‍या बाईने काही प्रतिक्रिया दिली नाही. पाच-एक मिनिटांत शेजारची बाई देखील आपलं सामान घेऊन उठली आणि दाराच्या दिशेला गेली.
इकडे दुसर्‍या बाईने आपले अवघडलेले पाय आता रिकाम्या झालेल्या सीटांवर पसरावेत म्हणून वर घेतले आणि तिला शेजारच्या दोन सीटांच्या फटीत एक कागदाची घडी दिसली. आधी तिने दुर्लक्ष केलं. मग तिला जाणवलं की ते त्या मुलाचं तिकीट असू शकतं.... काय करावं? उघडून पाहावं का? पण एकट्याने प्रवास करणारा तो मुलगा, फोन-बिन वापरणारा, तो असं तिकीट विसरणार नाही... पण त्याला स्टेशनवरच्या टीसीने पकडलं तर? जाऊ दे... दोन्ही तिकिटं एकत्र स्टेपल कशाला करायची? तेवढी अक्कल नको घरच्यांना?... शिवाय त्याला कुणीतरी न्यायला येणारच आहे, ते बघून घेतील... अशा विचारांत तिने आणखी दोन-एक मिनिटं घालवली. गाडीचा वेग थोडा थोडा कमी व्हायला लागला होता. तिला चैन पडेना. अखेर तिने ती घडी उचलली; उलगडली. पहिल्या कागदावर टीसीच्या पेनाचा फराटा दिसला. तिने तो कागद पालटला. मागे आणखी एक तिकीट होतं. त्यावर फराटा-बिराटा दिसला नाही. तिची नजर त्यातल्या तपशीलांवरून भरभर फिरली आणि ती ताडकन उठलीच. तिकीट घेऊन दाराशी गेली. दाराशी गर्दी होती. कुमार यश बराच पुढे उभा होता. पण शेजारची बाई हाताच्या अंतरावर होती. तिने तिच्या खांद्याला हात लावून तिचं लक्ष वेधून घेतलं, ते तिकीट तिच्या हातात दिलं आणि ते कुमार यशकडे पोचतं करायला सांगून ती परत वळली...

फोनवर कुमार यश म्हणाला होता - चार दिवस आहे, शुक्रवारी परत येणार... आणि त्याच्या परतीच्या तिकीटावर पाच दिवसांनंतरची तारीख होती, शनिवार लिहिलेला होता! दुसरी बाई आपल्या जागेवर बसता बसता न राहवून स्वतःशीच पुटपुटली- ‘खुळंच आहे...!’

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
पण कुमार यश दहावी पास न वाटता त्यापेक्षा लहान वयाचा वाटला मला.

गोड कथा. शैलीदार लिहिली आहे Happy

ईयत्ता सातवी हवे होते. मी चौथीतच एकट्याने लांबचा (मुंबई-पुणे) प्रवास केला आहे. रोज बसट्रेनने स्कॉलरशिपच्या एक्स्ट्रा लेक्चरसाठी एकट्याने प्रवास व्हायचाच त्यामुळे कॉन्फिडन्स खूप होता.

मस्त वाटलं.

लोक मुद्दा का विचारताहेत फक्त एक गंमतीशीर निरिक्षण आहे सध्याच्या काळातले... खास करून फोन धारक जर अडनिड्या वयात असलेले.( मला तरी हेच वाटतेय)

सोपं आहे । कुमार यश ला ५ दिवस नव्हते राहायचे, ४ दिवसातच परत यायचे होते म्हणून त्याने मुद्दाम तिकिट सोडले। आता त्याला नवीन तिकिट देतील काढून ४ दिवासानंतरचे। असा प्लॅन वाटतोय त्याचा।

हा नमुना पाहिला तेव्हा मलाही तुमच्यासारखेच प्रश्न पडले होते. Lol

अर्धवट वयातला धांदरटपणा, काही बाबतीत चोख प्लॅनिंग, काही बाबतीत भोंगळ, या वयात 'मी काहीही करू शकतो' असं एक फीलिंग असतं मनात, त्याला अनुसरून आलेली एक्साइटमेंट (आणि गडबड) - असं सगळं प्रकरण होतं ते.

त्यावर शेजारची बाई ओव्हर-रिअ‍ॅक्ट करणारी, दुसर्‍या बाईला काही देणंघेणं नसतं, तरीही शेवटी ती देखील न राहवून रिअ‍ॅक्ट होतेच! इतका त्या नमुन्यातला विरोधाभास. Lol

आवडलं.
ते 'पागल है' वालं पालुपद वाचून ' ओम शांती ओम' मधला 'व्वा..क्या अ‍ॅक्टिंग करता है' आठवलं Happy

लोल

Pages