बाप ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 October, 2017 - 00:55

तुझ्या नाजुक कोवळ्या खांद्यांवर
माझ्या पहाडाएवढ्या दु:खाला थोपटत
पहिल्यांदा अंगाई गायलीस तेव्हा
होतास अवघ्या एकोणीशीचा
आणि माझी आई झालास !

ते दहा दिवस
तुझा माझ्या डोळ्यांवर सक्त पहारा
काय बिशाद एक टिपूस ओघळेल तर !
दहाव्याला मात्र ओक्साबोक्षी रडून घेतल घाटावर..
तुला विधीत गुंतलेल पाहून
आणि माझा तटस्थ, पाठीराखा सखा झालास !

मग तू मोठा मोठा होत गेलास
आणि मी लहान लहान ...!
माझी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती
फक्त न्याहाळत राहिलास
प्रत्येक निर्णायाला तुझा मूक पाठींबा
पडू दिलस, ठेचकाळू दिलस आणि त्रयस्थ राहून सावरलसही !

हे तुझ अकाली मोठ होण
नाही थांबवू शकत
आणि तुझ पोरकेपण
त्याहूनही नाही पाहू शकत !

कारण ...
त्या प्रलयाच्या दिवशी
फक्त वडिलांचच छत्र हरवल नव्हत तुझ
तू तर तुझ्या आईचाही बाप झालास
आईचाही बाप झालास !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users