झहिरा

Submitted by सायलीमोकाटेजोग on 3 October, 2017 - 16:00

झहिरा भेटली मला मुंबईला ‘ग्रँड ह्यॅटस्’ मध्ये. साल २००६. आमचं विमान रद्द झाल्यामुळे ३ दिवस सहप्रवासी या नात्याने आमची प्रथम तोंड ओळख झाली. जुजबी नाव-गाव बोलणे झाले आणि काही तासातच आमच्या गप्पा रंगल्या. बुजऱ्या स्वभावाची झहिरा खूप बोलकी झाली. “तुझा स्वभाव आवडला मला… मागच्या काही वर्षात मी इतकं कुणाशीच बोलले नाहीये… ” ती म्हणाली. मला आनंद वाटला आणि कुतूहलही!

झहिरा मूळची हैदराबादची. BCA झाल्यावर वडिलांनी आलेले स्थळ बघून तिचा निकाह लावून दिला. फारशी घराबाहेर न पडलेली झहिरा नातलग परिवार सोडून नवऱ्याबरोबर दूर अमेरिकेला आली. नव्या नवलाईची स्वप्न गळून वास्तवाची जाणीव झाली ती आपण एक हक्काची मोलकरीण आहोत अशीच. नवऱ्याकडून छळ, सासरी उणी-दुणी, मागण्या आणि माहेरून दुबळा आधार. “सिर्फ घुटन… और कुछ नही…” बोलताना तिचे डोळे भरून आलेले. तिच्या पाठीवर हात फिरवत “मग पुढे काय केलंस?” मी विचारलं.

भूतकाळात हरवलेली झहिरा भानावर आली. “बहोत कोशिश की… त्यांना पाहिजे तसं साफ घर ठेवायची मी… खाणंपिणं सगळं त्यांच्या पसंतीने… उपास, कडक रोजे ही केले… पण कशाचा काही फायदा नाही… फक्त मन मारून जगायचे… मूल झालं तर परिस्थिती बदलेलं असं वाटलं… मुलगा झाला मला… त्याची तारीफ होऊ लागली पण बाकी सगळं तसंच…” ती विषण्ण होऊन म्हणाली. “अगं अमेरिकेत होतीस, पोलीस का नाही बोलवलेस? शिकली सवरलेली तू अशी कशी गप्प सहन करत राहिलीस?”… मी. “बच्चा छोटा होता आणि मला नोकरी नव्हती… नवऱ्याशी मोडून परत हैदराबादला जायचं तर नामुमकिन…” तिला हुंदका आला.

एका रात्री नवऱ्याने जीवे मारण्याची दिलेली धमकी आणि झहिराकडे फक्त काही तास होते. तिच्या एका मैत्रिणीने राहण्यासाठी तिला मदतीचा हात देऊ केला. सारं काही गुपचूप करायचं होतं… घटस्फोटाशिवाय तिची कागदपत्रे आणि नोकरीसाठी व्हिसा मिळणे शक्य नव्हते… आणि पैश्याची सोय नसताना मुलाला कसे घेऊन जायचे? पळून जाताना त्याला काही झाले वा उद्या चिडून नवऱ्याने बदला घेतला तर? डबडबलेल्या डोळ्यांनी तिने आपल्या लेकाचा निरोप घेतला… नवरा येण्यापूर्वी काही मिनिटे शेजारणीवर लेकाला सोपवून ती बाहेर पडली ती मनावर पुत्रवियोगाचे असह्य दुःख घेऊन.

पुढचे काही महिने एक बंदिस्त बीबी ते अमेरिकेत न्याय मागणारी सच्ची स्त्री हा प्रवास झहिराने धीराने केला. तिला घटस्फोट मिळाला पण “हीच मुलाला सोडून पळून गेली… ” या नवऱ्याच्या वकिलाच्या युक्तीवादानं तिचा मुलावरचा हक्क मात्र दुरावला… तिची आशा प्रबळ होती, जिद्दीने तिने छोटी नोकरी मिळवली… तिच्या सर्व उपकारकर्त्यांचे देणे फेडण्यास सुरुवात केली… कोर्टाच्या आदेशाने ३ महिन्यातून एकदा तिला मुलाला भेटण्याची परवानगी होती. नवरा प्रत्येक वेळी दूरचे ठिकाण बघे जेणेकरून झहिराचे बरेचसे पैसे प्रवासभाड्यात खर्चून जावेत… तरीही ते सारं सोसत झहिरा मुलाच्या ओढीने २ वर्ष आटापिटा करत राहिली… मुलाला समज येऊ लागली तीच त्याला सोडून गेलेल्या त्याच्या दुष्ट आईच्या कहाण्यांनी… पुत्रप्रेमाचा दुरावत चाललेला धागा तिला व्याकुळ करून जाई… एकेदिवशी तिचा नवरा देश सोडून दुसरीकडे जात असल्याची माहिती मिळाली आणि झहिरा लेकाला कायमची पारखी झाली… “जिथे कुठे असेल बेटा सलामत राहा… अम्मीची सच्ची दुवा नेहमी तुझ्यासोबत असेल…” जुन्या आठवणींनी दुःखावरची खपली निघाली. माझ्या खांद्यावर झहिरा हमसून हमसून रडली…

पुढे नोकरीत Java संबंधी तिला माहिती हवी होती ती मी तिला पाठवली. काही काळानंतर तिचा इमेल बाऊंस झाला आणि आमचा संपर्क तुटला… ऑनलाईन शोधून ती मला सापडली नाही. विचार करताना वाटतं… तिच्या कहाणीला प्रेरक म्हणू की शापित? कदाचित तिने तेव्हाच आणखी धैर्य दाखवून पोलीस बोलावले असते तर ती तिच्या मुलासोबत सलामत असती… तिचं पुढे काय चाललंय हे मला आज माहिती नाही. पण जेव्हा केव्हा तिची आठवण होते; मी मनाशीच म्हणते… “झहिरा, जिथे कुठे असशील – नीट राहा, सांभाळून राहा!”

http://sayalimokatejog.wordpress.com/2017/10/03/zahira/

~ सायली मोकाटे-जोग
#सायलीमोकाटेजोग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, ईतका त्रास होईस्तोर का करायचे न सहन.

पण जोपर्यंत पुरुष मनापासुन स्त्रियांचा आदर करणार नाहीत तोवर बायकांचे असे भोग संपणार नाही असे वाटते Angry

पण जोपर्यंत पुरुष मनापासुन स्त्रियांचा आदर करणार नाहीत तोवर बायकांचे असे भोग संपणार नाही असे वाटते>>>>+++१११

अश्या झहिरा समाजामध्ये बर्‍याच आहेत .. कमी अधिक प्रमाणात हिच कहाणी असते प्रत्येकीची.. अन त्यात मुस्लीम महिला असेल तर अशीच कहाणी असते. आमच्या बिल्डींगमध्येहि आहे अशीच एक ... अगदि अशीच फरफट.. फक्त तिला एक समाधान कि तिची दोन्ही मुलं तिला मान देतात अन तिच्या डोळ्यासमोर आहेत जरी ती नवर्‍यापासुन वेगळी असली तरी..
छान अधोरेखित केलंस झहिरा ला.. Happy

काहीतरी मिस होतय का माझ गोष्टीत? सत्य अनुभव लिहिलाय अस ग्रुहित धरूनः
झहिराला जर मुलाला भेटायची परवानगी असेल तर आई म्हणुन मुलावर झहिराचा हक्क आहे हे कोर्टाने मान्य केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका सोडून जायला मुलाला परवानगी आई वडील दोघांच्या संमतीशिवाय नाही. जर आईने परवानगी दिली नसेल तर नवरा मुलाला घेवून देश सोडून जाऊ शकत नाही. मग तो माणुस गेला कसा दुसर्‍या देशात ?

रीया, पुरंदरे शशांक, mr.pandit - खरंय, सुन्न करणारीच ही गोष्ट आहे...
च्रप्स - नशीब की प्राक्तन... तो देवच जाणे?
सिंथेटिक जिनियस, कऊ, VB - मला वाटतं मन मुक्त हवं मग कठीण परिस्थितीतूनही मार्ग निघतो
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद - देवकी, अंकु, भावना गोवेकर

सीमा - हो मलाही हा प्रश्न पडला पण तिने सांगितलं होतं की तिच्याकडे नवऱ्याचा ठावठिकाणा नाही... पुन्हा कोर्ट केस त्या सगळ्याला ही बहुतेक विटली होती आणि त्यात तिचा मुलगा ही तिला मनाने दुरावत असावा म्हणून कदाचित तिनेच आशा सोडली असावी... ती खूप हळवी झाली होती बोलताना त्यामुळे मी जास्त खोलात नाही शिरले त्यावेळी.

रावी - वैचारिक, आर्थिक ... सर्वच बाबतीत स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि मुळात कुटुंबव्यवस्था निर्दोष होणं जास्त गरजेचे.

लग्न तुटले तर, मुलं दुरावली तरं... हे जे काही टेंशन असते ते तुलनेत स्त्रियाच जास्त घेतात. ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, बरेपैकी कमावत आहेत, अश्या स्त्रियाही जेव्हा असाच विचार करताना बघतो तेव्हा मला खरेच आश्चर्य वाटते.
बघं, पटलं तर राहू नाही तर वेगळे होऊ, आणि वेगळा जोडीदार बघू ... असा विचार जेव्हा स्त्रिया सहजपणे करू लागतील तेव्हा त्या चक्रातून सुटल्या असे समजायचे.

ऋन्मेऽऽष - मुळात मन भयमुक्त हवे मग स्त्री असो वा पुरुष... म्हणजे कोणत्याही अवघड प्रसंगांना तोंड द्यायला जमते.