आवर्जून पहावा असा न्यूटन

Submitted by सई केसकर on 29 September, 2017 - 00:55

लोकशाहीचा प्रवास व्यक्ती पासून सुरु होऊन संस्थेमध्ये संपतो. एखादी व्यक्ती, ती व्यक्ती ज्या वैचारिक समूहाचे प्रतिनिधीत्व करते आहे तो समूह, आणि असे कित्येक भिन्न भिन्न विचार असलेले समूह एकत्र येऊन सरकार निवडून देतात. मतदान करणे ही क्रिया म्हणजे उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायांमधून विचारपूर्वक, एखाद्याची निवड करणे आणि आपला संविधानिक अधिकार (आणि कर्तव्य) बजावणे, असे असले, तरी मतदान हे दोन अधिक दोन इतके सोपे नाही.
याचाच विचार करायला लावणारा न्यूटन हा सिनेमा आहे. आणि इतर कुठलीही टीका झालेली असली, तरी जे स्वतःला मध्यम वर्गीय, कष्टाळू, प्रामाणिक आणि एकूणच आदर्श नागरीक समजतात, त्यांनी हा सिनेमा न चुकता बघावा. कारण असे सगळे लोक न्यूटन आहेत.

न्यूटन (राजकुमार राव) हा असाच एक मध्यमवर्गीय आणि अव्यवहार्यपणे प्रामाणिक असलेला मनुष्य आहे ज्याला नक्षलवाद्यांच्या भागात इलेक्शन ऑफिसर म्हणून जावे लागते. त्याचे आणि त्याच्या टीमचे संरक्षण करायची जबाबदारी आत्मा सिंग (पंकज त्रिपाठी) या लष्करी अधिकाऱ्याकडे आणि त्याच्या टीमकडे देण्यात येते. न्यूटनवर ७६ लोकांची मतं गोळा करून आणायची जबाबदारी असते आणि यात त्याला लोकनाथ (रघुवीर यादव) आणि मालको (अंजली पाटील) मदत करत असतात. सुरुवातीला न्यूटनचे इलेक्शन ऑफिसरचे ट्रेनिंग दाखवले आहे. त्याच्या ट्रेनरची भूमिका संजय मिश्राने केली आहे.
ज्या शाळेत मतदान होणार असते ती शाळा झाडण्यापासून सुरुवात करावी लागते. संबंध सिनेमा हा न्यूटनच्या सत्याचा अट्टाहास आणि कर्तव्यदक्षता, आणि आत्मा सिंगच्या त्या सगळ्या प्रकाराबद्दल असलेल्या उदासीनतेच्या खटक्यांमध्ये आहे.

कथानकाची हाताळणी परिपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही. काही काही ठिकाणी कथा थोडी रखडल्यासारखी वाटते, आणि काही ठिकाणी विनोदसुद्धा थोडा ताणल्यासारखा वाटतो. पण तरीही हा सिनेमा महत्वाचा आहे.
सुरुवातीलाच संजय मिश्राच्या तोंडी एक वाक्य आहे, जे तो न्यूटनला उद्देशून म्हणतो.
"तुला तुझ्या प्रामाणिकपणाचा दुराभिमान आहे"
आपण प्रामाणिक आहोत याचा गर्व असायचे काहीच कारण नाही. ऑफिसला वेळेवर जाणाऱ्याला बक्षीस द्यावे लागते हे दुर्भाग्य आहे. आपण वेळेवर जातो, प्रामाणिकपणे आपले काम करतो याचे भांडवल केल्यामुळे, आपल्यावर अन्याय होतोय अशी एक भावना येते. आणि या भावनेतूनच कित्येकवेळा मतदान केले जाते. वास्तविक, आपण जसे आहोत तसा नेता आपल्याला हवा असतो. पण आपल्यासारखे न्यूटन, म्हणजे असे वेळेवर जाणारे, सगळे कर भरणारे, ट्राफिक रूल पाळणारे वगैरे, आपल्या समाजाचा एक छोटासाच भाग असतात.
न्यूटन जसा प्रामाणिक आहे, तसा तो अतिशय निरागस देखील आहे. साधा आहे. अर्थात त्याच्या तोंडावर त्याला कुणी साधा आणि निरागस म्हंटले तर त्याला कमालीचे लागेल. कारण न्यूटनसारख्या व्यक्तीला एखाद्या पान वाल्याने, "अहो तुम्ही काहीच जग बघितलं नाहीये साहेब!" असे म्हंटले तर तो त्याच्या शिक्षणाचा, हुशारीचा आणि एकूणच त्यांनी कमावलेल्या सगळ्या अभिमानास्पद गुणांचा अपमान असेल. पण न्यूटनसारख्या व्यक्तींनी स्वतःच्या कक्षेबाहेर जाऊन अनुभवसमृद्ध होण्याची जास्त गरज आहे. कारण तसे झाल्यास, त्यांच्यातील गुणांना खुले मैदान मिळेल, आणि परिणामी त्यांची मानसिक घुसमट बंद होईल.

कुठल्याही देशातील लोकशाही, मतदान करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात जशी असते, तशी ती प्रत्येक मतदानानंतर रुपाला येते का? याचे उत्तर अर्थात नाही असे आहे. आणि याचे कारण म्हणजे जेव्हा एक मत दिलं जातं, तेव्हा कित्येकवेळा, आणि खासकरून मध्यमवर्गीयांसाठी, ती एक भावना असते. उद्वेग असतो, चीड असते, आशा असते, उत्साह असतो, निरागसता असते. काही काही लोकांच्या बाबतीत मात्र त्यांचे मत हे फक्त केंद्रावर जाऊन दाबलेले एक बटन असते. ते दाबा, असे त्यांना कधी देवदर्शनाला नेऊन, तर कधी धमक्या देऊन, कधी खोटी वचने देऊन, तर कधी सरळ पैसे देऊन सांगितलेले असते. अर्थातच हे अक्षम्य आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. हे शोषण आहे. पण काहीही असलं तरी हा लोकशाहीचाच एक भाग आहे. किंबहुना, सगळ्या पक्ष्यांना मनापासून आवडणारा तो एक भाग आहे.

सिनेमा पाहून, "सुजाण" नागरीक म्हणजे नक्की कसा नागरीक हा प्रश्न पडतो.
आपल्या कर्तव्यांबद्दल अतिदक्ष असलेला, आणि जगातल्या भ्रष्टाचाराकडे बघून दुःखी होणारा?
की भ्रष्टाचार आहे, हे मान्य करणारा, राजकारण्यांचे मोठे मोठे दावे हलकेच घेऊन, प्रत्येक वेळी सगळ्या कचऱ्यातून बरे पर्याय शोधण्याचा मनापासून प्रयत्न करणारा?

आत्मा सिंगची भूमिका ही दुसऱ्या प्रकारात मोडते. आत्मा सिंग मतदानाबद्दलच उदासीन असतो. सुरुवातीला न्यूटनने शाळेत जाऊन मतदानकक्ष थाटण्यापेक्षा काहीतरी मॅनेज करून परत जावे असा प्रस्ताव तो मांडतो. पण अर्थातच याला न्यूटन बेंबीच्या देठापासून, तिरीमिरीला येऊन विरोध करतो. म्हणून आत्मा सिंग आपली फौज घेऊन आठ किलोमीटर पायपीट करून, न्यूटन आणि सहकाऱ्यांना शाळेपर्यंत घेऊन जातो. नक्षल भागात जगण्यातली जोखीम आत्मा सिंग ओळखून असतो, आणि नक्षलवादी-आदिवासी, नक्षलवादी-लष्कर आणि लष्कर-आदिवासी या नात्यांमधल्या सगळ्या खाचाखोचासुद्धा त्याला माहिती असतात. त्याला त्याच्या युनिफॉर्मची मिजास आहे असं वाटेपर्यंत लगेचच त्याच्यामधल्या माणसाचे आपल्याला दर्शन होते. जिथे जमेल तिथे फाटा मारणारा, पण आहे त्या परिस्थितीतून डोक्याला जास्त ताप न करून घेता, आणि आजूबाजूची परिस्थिती ओळखून वाट काढणारा आत्मा सिंग शेवटी न्यूटनच्या प्रामाणिकपणाला भारी ठरतो. त्याचा दृष्टिकोन बऱ्याच अंशी "जुगाड" आहे. पण जुगाड हे भारतातले एक नाकारता न येणारे सत्यही आहे.

मतदान कुणी कितीही भावुक होऊन केले काय, किंवा लाच खाऊन केले काय, सत्ता मिळालेल्या राजकारण्याला एक अगडबंब यंत्र मिळते. आणि न्यूटनसारखे मध्यमवर्गीय, अंबानी सारखे अब्जपती आणि नक्षल भागातले आदिवासी हे त्याला गियर सारखे एकात एक बसवून हे यंत्र पुढे न्यायचे असते. असे करताना न्यूटनसारख्या प्रामाणिक लोकांची कळकळ या यंत्रवत कारभारात टिकून राहत नाही. आणि तिला हवे तितके प्राधान्य मिळत नाही.
राजकारणी आपले मत घेऊन बदलतात, का ते मत घेण्यापुरते बदललेले असतात हे ठरवण्यासाठी न्यूटनसारख्या लोकांनी, त्यांच्या व्हिक्टीम मोड मधून बाहेर येऊन खऱ्या परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. कारण लोकशाहीचा अभ्यास करून, ती आहे तशी, भावनाविवश न होता स्वीकारल्याशिवाय, ती बदलता कशी येणार?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहेस. चित्रपट पाहिला नाही अजून.
कारण लोकशाहीचा अभ्यास करून, ती आहे तशी, भावनाविवश न होता स्वीकारल्याशिवाय, ती बदलता कशी येणार?>> सहमत आहे. कित्येक वेळा एखाद्या व्यवस्थेकडे तटस्थपणे पाहिलेच जात नाही त्यामुळे टोकाच्या भुमिका घेणारे समूह निर्माण होतात

छान परीक्षण.

न्यूटनसारखे लोक मुळात अल्पसंख्य आहेत भारतात. तेच बहुसंख्य झाले तर देश सुधारेल.

सिनेमा पाहून, "सुजाण" नागरीक म्हणजे नक्की कसा नागरीक हा प्रश्न पडतो.
आपल्या कर्तव्यांबद्दल अतिदक्ष असलेला, आणि जगातल्या भ्रष्टाचाराकडे बघून दुःखी होणारा?
की भ्रष्टाचार आहे, हे मान्य करणारा, राजकारण्यांचे मोठे मोठे दावे हलकेच घेऊन, प्रत्येक वेळी सगळ्या कचऱ्यातून बरे पर्याय शोधण्याचा मनापासून प्रयत्न करणारा? >> ह्या बरोबरच, नेत्यांना निवडून दिलं म्हणजे आपलं काम झालं असं न मानता त्यांच्या राज्यकारभाराचा realistic analysis करून त्याबद्दल feedback देणं. आपला आवाज राजकारण्यांपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळे दबावगट तयार करणे हे सगळ सुजाण नागरिकाचं कर्तव्य ह्यामधे मोडतं. अगदी केंद्र सरकारच्या पातळी पर्यंत पोचता नाही आलं तरी महानगरपालिके च्या पातळीवर प्रयत्न करून बघायला काही हरकत नसावी. आपल्या प्रश्नांना वाट मिळवून देण्यासाठी मतपेटी हा शेवटचा पर्याय मानावा. आपली सत्ता जाऊ शकते ह्याबद्दलची पुरेशी भिती राजकारण्यांच्या मनात निर्माण करण ह्यासाठी सतत आणि आटोकाट (पण सनदशीर मार्गाने) प्रयत्न करणं हे सुजाण नागरिकाचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे.

काय सुरेख लिहिलं आहेस सई. आता मी सिनेमा पाहून तर तो तुझ्या परिक्षणाला खरा उतरेल की नाही हे आधी पाहिलं जाइल Happy

छान लिहिले आहे. ट्रेलर बघून स्टोरीलाईन ईण्टरेस्टीण्ग वाटलेलीच. पण आत रटाळ आहे की सुसह्य यावरच तो बघायचे की नाही ठरते. बघूया आता कधी योग येतो.

एक सहज ट्रेलर बघून वाटले. जर चित्रपटाच्या आशयात दम असेल तर अक्षयकुमारला यात घ्यायला हवे होते. जरा फिल्मी झाला असताही, पण जास्त लोकांपर्यण्त पोहोचला असता.

पाहिला. शेवट अचानक गुंडाळल्यासारखा वाटला. >> एक्झॅक्टली!

बाकी सिनेमा आवडला.

>>>एक सहज ट्रेलर बघून वाटले. जर चित्रपटाच्या आशयात दम असेल तर अक्षयकुमारला यात घ्यायला हवे होते. जरा फिल्मी झाला असताही, पण जास्त लोकांपर्यण्त पोहोचला असता.

अगदीच नाही.
शाहरुखनी जसा रीसेंटली इम्तियाज अलीचा कचरा केला तसं झालं असतं.

सगळ्यांचे वाचल्याबद्दल आणि प्रतिसादांबद्दल आभार!

एक सहज ट्रेलर बघून वाटले. जर चित्रपटाच्या आशयात दम असेल तर अक्षयकुमारला यात घ्यायला हवे होते. जरा फिल्मी झाला असताही, पण जास्त लोकांपर्यण्त पोहोचला असता.>>>> सहमत चित्रपट सहज १०० करोडपर्यन्त गेला असता.

आज पाहिला हा सिनेमा. मस्त आहे, आवडला. राजकुमार राव ने भारी काम केलेय. बाकीचे ही मस्त कलाकार आहेत एकेक. निशाणी डावा अंगठाची आठवण झाली मला. तसे साम्य नाही पण सरकारी कामे आणिरिमोट खेड्यात त्याची अंमलबजाबणी यावर सार्केस्टिक , डार्क ह्यूमर.

मस्त लिहिले आहेस सई
मी बघून होईपर्यंत टाळले होते परीक्षण वाचणे
आता नुकताच पहिला आणि जबरदस्त भावला
राजकुमार राव ने कमाल केलीये आणि पंकज त्रिपाठी पण तोडीस तोड
अंजली पाटील तर अस्सल आदिवासी

सुंदर चित्रपट आहे. पंकज त्रिपाठीचा रोल खूप आवडला. त्याचे डेडपॅन संवाद खत्रा आहेत. नक्षल भागातली कोंबडी २-३ तास इण्टरोगेशन केल्याशिवाय अंडे देत नाही म्हणणे, किंवा "देखो कैसे भूखे शेर की तरह वोट देने के लिये खडे हो गए" वगैरे वाक्ये त्या नाट्यामधे धमाल उडवतात.

नुकताच न्यूटन बघितला. चित्रपटाविषयी आम्हाला काहीच माहित नव्हते. मला तर वाटलं की विज्ञानाविषयी काही असेल. एकंदरीत कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय बघितला आणि कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. "पाहूया तर" ह्या श्रेणीतला.

चित्रपट फार आवडला आणि आपण त्याचे परीक्षण फारच सुरेख लिहिले आहे.

आवडलेला. ब्लॅक ह्युमर, सतत भाष्य करीत राहतो सिनेमा.... ज्याला जे नरेटिव्ह दिसेल ते तो घेईल. पण न्युटनला नायक बनवल्याने त्याच्यासारख्यांना विचार करायला नक्की भाग पाडेल अशी ब्रिलियंट मांडणी आहे.

न्युटन बघितला आणि ह्या परिक्षणासारखाच खूप आवडला. जाने भी दो यारों ची आठवण होत होती सारखी.

सगळ्यांची कामं सुरेख आणि संवाद जबरदस्त आहेत.

मला अजिबात शेवट गुंडाळला आहे असं वाटलं नाही.

मस्त लिहिले आहे.

> आपण प्रामाणिक आहोत याचा गर्व असायचे काहीच कारण नाही. ऑफिसला वेळेवर जाणाऱ्याला बक्षीस द्यावे लागते हे दुर्भाग्य आहे. आपण वेळेवर जातो, प्रामाणिकपणे आपले काम करतो याचे भांडवल केल्यामुळे, आपल्यावर अन्याय होतोय अशी एक भावना येते. > हे फार आवडले. पण हे फक्त घराबाहेरील कामांसाठी नाही; आपण घरातली काम करतो हे सतत सांगत फिरणारऱ्यांसाठीदेखील आहे.