भगवंताशी नसे कुणा देणेघेणे...स्वार्थाच्या उत्सवात ताशे तडतडती…

Submitted by डॉ. अमेय गोखले on 27 September, 2017 - 01:54

*भगवंताशी नसे कुणा देणेघेणे*
*स्वार्थाच्या उत्सवात ताशे तडतडती…*

© डॉ. अमेय गोखले.

नुकताच गणेशोत्सव होऊन गेला…

भरपूर वर्गाण्या जमा झाल्या , भरपूर दान पेट्या भरल्या , ज्या त्या *नवसाच्या राजा*ची मंडळाच्या श्रीमंती प्रमाणे (बाप्पाच्या नव्हे बरं का !) चर्चा झाली. नवसाला पावणारे काही नवीन राजे स्थापन झाले , तर काही राजे यंदा बंद पडले… ज्याचा राजा सगळ्यात मोठ्ठा , सगळ्यात उंच , ज्याचे दागिने जास्त , तो मोठा… बाकी सगळे छाटछूट !!!!! मोठमोठ्या रांगा लागल्या. सेलिब्रेटींनी गर्दीत दर्शन घेऊन बाप्पावर उपकार केले… भरपूर भोळ्या भाबड्यांनी नवस केले. काहींनी गेल्या वेळच्या नवसाची परतफेड केली…

भरपूर स्पर्धा झाल्या… अगदी लिंबू चमचा पासून पाककला स्पर्धांपर्यंत आणि बुद्धीबाळा पासून गायन स्पर्धां पर्यंत… त्यात खूप जणांना आपापल्या कला सादर करायला व्यासपीठ मिळालं…

कार्यकर्ते मरेपर्यंत राबले. वर्गाण्या वसूल केल्या , शिव्या दिल्या , राडे केले… पण हे सगळं त्यांच्या त्यांच्या बाप्पांसाठी बरं का ! एरवी ते तसे नसतात ! फावल्या वेळात कार्यकर्ते कॅरम खेळले , गप्पा (आणि लायनी) मारल्या , गुटखा खाल्ला , पवित्रता पाळावी म्हणून मंडपा बाहेर जाऊन थुंकला , रोजच्यारोज श्रमपरिहार तर हवाच ! मग बसणं आलंच ! श्रमांपेक्षा परिहारच जास्ती !!! बरं , सायबांना देणग्या , वर्गाण्या , दान पेट्यांचा हिशोब रोजच्या रोज चुकता करणं आलंच !!!

पाच दिवस , सात दिवस , वामन द्वादशी , अनंत चतुर्दशी वगैरे मुहूर्त साधून त्या त्या राजांची पाठवणी झाली. मोठ्या मिरवणुका झाल्या. काहींच्या गाजल्या. झोपडीत वीज नसल्यामुळे चौकातल्या ज्या लाईटखाली बसून भाजीवल्याची पोरं रोज अभ्यास करतात , त्या चौकातला सरकारी लाईट विसर्जनाच्या मिरवणुकीच्या झगमगाटात दिपून गेला… "पोरं लय नाचली आपली" हे वाक्य खरं करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाची शर्थ केली. तोबरे भरले , पाचपच थुंकले , ninety लावली , अहो का म्हणजे काय , त्याशिवाय मिरवणुकीचा फील येत नाही ना !!! सगळ्यांच्या मिश्र वासात उदबत्तीचा वास वेगळाच वाटत होता. मध्येच फटाके आणि बॉम्बनी भटक्या कुत्र्यांना चांगलाच धडा शिकवला… चांगली चामडी सोलून काढली सल्यांची…

हॉस्पिटल बाहेरून जातानाही फटाके वाजले , शिट्ट्या वाजल्या , dj तर सुरूच , ताशे कडाडले. अरे आव्वाज कुणाचा !!! साल्यांना आजारी पडायला हाच मुहूर्त मिळतो काय !!!!

कुणाची मिरवणूक ८ तास चालली , कुणाची १० तर कुणाची १२ , १५ अगदी २४ तास सुध्दा !!!

"गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ! "

" गणपती गेले गावाला , चैन पडेना आम्हाला "

दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर भग्न अवशेष विखुरलेले !
कार्यकर्ता घरी सुस्तीत पडलेला !
साहेब अजून नोटा मोजतोय !!!

© डॉ. अमेय गोखले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्तम! गणेशोत्सोव हा धार्मिक सण राहिला नाही ती जत्रा झाली आहे. इथे हौशे गवशे नवशे सगळे असतात. गणपती नुस्ता नावाला| चैन पाहिजे आम्हाला||