गडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)

Submitted by मध्यलोक on 26 September, 2017 - 07:50

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी

https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)

https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

https://www.maayboli.com/node/64000 ------> गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)

https://www.maayboli.com/node/64002 ------> गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)

===========================================================================

बेलाग, दुर्गम, उंच, ताशिव, सुळके, कडे असे शब्द एखादा ट्रेकर बोलताना कानावर पडले तर समजून घ्यायचे की साहेब नुकतेच "नाशिक" वारी करून आले आहेत. बागलाण, अजिंठा-सातमाळ ह्या ह्याच भागातील काही डोंगररांगा. ह्या डोंगर रांगेत वसला आहे साल्हेर सारखा सर्वोच्च किल्ला तर सोबतीला आहेत सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड, सप्तश्रृंग, मार्कण्डेय, रावळा - जावळा, कांचना, धोडप आणि इतर किल्ले.

महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ल्याच्या मान आहे "साल्हेर" कडे तर १४४५ मीटर (४७६१ फुट) उंची असलेल्या *धोडप* कडे अजिंठा सातमाळ रांगेतिल सर्वोच्च किल्ला असल्याचा मान आहे. एकाच रांगेतिल ट्रेक करण्याच्या रेंज ट्रेक प्रकारात "सातमाळ" रांगेचा क्रमांक ट्रेकरच्या मनात बहुदा पहिला क्रमांक असावा कारण तो ह्या रांगेत असलेल्या एका पेक्षा एक सर्वांग सूंदर किल्ल्यामुळेच. ह्या रांगेतील किल्ले हे सह्याद्रीचे रत्न असून धोडप हा ह्यातील "कोहिनूर".

धोडपगडाची गडस्वामिनी आहे "धोडंबदेवीे". गडाच्या पायथ्याच्या गावाचे नाव हत्ती म्हणजे पूर्वीचे धोडांबे, गावातील गावकऱ्यांची ही कुलस्वामिनी. गडाच्या बालेकिल्ल्यावरील १० मीटर X ८ मीटर अश्या प्रशस्त गुहेत आहे धोडंबदेवीेचे निवासस्थान. देवीची मूर्ति चतृभुज असून मूर्तिची उंची साधारण ३ फुट आहे. देवीला साजश्रृंगार आहे आणि लक्षवेधी मूर्ति लगेच मनःशांति देते.

धोडप गडाचा कातळ उठावदार असून त्यातील खाच तासुन अभेद्य बनविली आहे. गडाच्या बालेकिल्ल्याकडील भागात साधारण २००मीटर ऊँचावलेला "शेंडी" नावाचा सुळका आहे. राजवाड्याचे जोते, देखणी तटबंदी व बुरुज, संरक्षक दरवाजे किल्ल्याचे गतवैभव दर्शवितात. किल्ल्याच्या पूर्वाभिमुख असलेल्या कातळ कोरीव दरवाज्यावर बाहेरील बाजूस "फारशी" भाषेत शिलालेख आहे. महादरवाजा, सोनार माची, महादेव, गणेश, मारुति मंदिर, कमान व पायऱ्या असलेली विहीर, तोफ असे अनेक स्थापत्य येथे आहे.

किल्ल्याला प्रचंड भूगोलाप्रमाणे प्रचंड इतिहास सुद्धा आहे. ई.स. १५५० ला निजामशाही मधे असलेला हा किल्ला पुढे १६३५ मधे मुघल सत्तेत आला. १६७२ मधे शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. ई.स. १७७२ मधे राघोबा दादा ह्यांनी माधवराव पेशवा विरुद्ध बंड पुकारले होते आणि त्यांनी धोडपलाच आश्रय घेतला होता. धोडपला राघोबा दादा विरुद्ध पेशवा असे युद्ध झाले असता राघोबा दादा ह्यांचा पराभव झाला. परंतु ई.स. १८१८ मधे इंग्रजी तोफ गोळ्यांच्या मारासमोर मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली आणि हा "कोहिनूर" सुद्धा इंग्रजाकडे गेला.

हा प्रचंडकिल्ला बघण्याचा आनंद घेण्यासाठी हाताशी किमान दोन दिवस असावे आणि कुठलीही गडबड न करता मनमुराद ह्या किल्ल्याच्या भटकंतीचा व देवीच्या दर्शानाचा आस्वाद घ्यावा.

~विराग

Dhodap.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच Happy

हा प्रचंडकिल्ला बघण्याचा आनंद घेण्यासाठी हाताशी किमान दोन दिवस असावे आणि कुठलीही गडबड न करता मनमुराद ह्या किल्ल्याच्या भटकंतीचा व देवीच्या दर्शानाचा आस्वाद घ्यावा. >>>>>+१ Happy